Jan 29, 2011

गोप्या पडदो उघड!

गोप्यानं पडदो उघडल्यान.

क्‍क्‍याण्णवावं अखिल भारतीय नाट्य संमेलन रत्नागिरीत धूमधडाक्‍यात सुरू झालंय. तसं 25 तारखेपासूनच बालनाट्य, एकांकिका महोत्सवाची नांदी सुरू झाली, पण संमेलनात जान आली ती गुरुवारी संध्याकाळी डॉ. विजया मेहता यांच्या झालेल्या सत्कारानं. स्वतःची नाट्यसृष्टी घडवणाऱ्या विजयाताई म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण यांचं विद्यापीठ. त्यांनी मराठी रंगभूमीला दिलेल्या विक्रम गोखले, रीमा, नीना कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सुरेश भागवत, दिलीप कोल्हटकर अशा एकाहून एक ताऱ्यांनी, अर्थात त्यांच्या शिष्यांनीच त्यांचा सत्कार केला. रीमाताईंनी विजयाबाईंना कलाकारांच्या नव्या पिढीसाठी नाट्य शिबिरं घेण्याची गळ घातली. नीनाताईंनी विजयाबाईंची शिस्त, रंगभूमीबद्दलची निष्ठा, यांची आठवण सांगितली.

विक्रम गोखलेंनी या विजया मेहता नावाच्या या "आभाळा'ला आता तरी "पद्मभूषण' किताबाने सन्मानित करा, अशी गळ घातली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी भरपूर बॅटिंग केली. बहुधा नाट्य संमेलनात विजयाबाईंचा सत्कार होण्यासाठी उदय सामंत "आमदार' होण्याचीच सगळे जण वाट बघत होते, असा षटकारही ठोकला. केंद्र सरकार दरबारी प्रयत्न करून विजयाबाईंचा "पद्म'सन्मान करण्याचं त्यांनी दिलेलं आश्‍वासन आता किती खरं उतरतंय, ते लवकरच पाहायला मिळेल.

विजयाबाईंनीच 70च्या दशकात दिग्दर्शित केलेल्या "बॅरिस्टर' नाटकाचं आता त्यांचेच शिष्य विक्रम गोखलेंनी दिग्दर्शन करून ते पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे. त्याच्याच सेटवर विजयाबाईंचा सत्कार होणं हे एक वेगळं औचित्य होतं. सेटची तयारी सुरू असल्यानंच सात वाजताचा सत्कार प्रत्यक्षात रात्री साडेआठला सुरू झाला आणि बसण्याच्या व्यवस्थेचं नियोजनही थोडं फिस्कटलंच. सावरकर नाट्यगृहात एवढी तुडुंब गर्दी झाली, की खुर्च्यांच्या दोन्ही बाजूला लोक दाटीवाटीनं उभे होते. शेवटी दरवाजे बंद करून घ्यावे लागले. थोडंसं मानापमान, भांडणंही झाली. रात्री "बॅरिस्टर'चा प्रयोग उत्तम झाला. काहीसं गंभीर नाटक असलं, तरी रात्री पावणेदोनपर्यंत लोक खाली बसून, दाटीवाटीनं नाटक बघत होते.

गणपतीपुळे रस्त्यावरचं मौजे पिरंदवणे वाडाजून हे रत्नागिरीचे थोर कलावंत कै. शंकर घाणेकर यांचं जन्मगाव. रंगभूमीवर काम करता करता आयुष्याची अखेर होणं हे कोणत्याही कलाकारासाठी भाग्यच. कै. घाणेकरांना हे भाग्य लाभलं. 1974 साली गावातच "वरून कीर्तन आतून तमाशा' या नाटकाचा प्रयोग साकारताना हृदयविकाराच्या झटक्‍यानं त्यांचा मृत्यू झाला. त्याच रंगमंचावर गुरुवारी सकाळी त्यांना आदरांजलीचा कार्यक्रम झाला. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर, शंकर घाणेकरांबरोबर काम केलेल्या अभिनेत्री आशालता वाबगावकर या वेळी उपस्थित होते. घाणेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या भावजयीची भेटही या मंडळींनी घेतली.

आता आज (शुक्रवारी) संध्याकाळी नाट्यदिंडी आहे. बऱ्याच कलाकारांची नावं जाहीर करण्यात आल्येत. येतील तेवढे खरे म्हणायचे!