Aug 8, 2009

ड्यूक्‍स नोजचा धडा

ड्यूक्‍स नोजला पहिल्यांदा गेलो, तेव्हा म्हणजे साधारण 1999 सालापासून मी कोणत्याही वर्षी हा ट्रेक चुकविलेला आठवत नाही. एखाद्‌ वर्षाचा अपवाद असावा. अलीकडच्या काळात त्यात तोरणा आणि ढाक-भैरीचीही भर पडली होती. पण त्यात अनेकदा खंड पडला. ड्यूक्‍स नोजचा नेम मात्र कायम होता. यंदाही जूनमध्ये कोरड्या वातावरणात तोरणा कटाक्षानं टाळला. त्याची पुरेपूर भरपाई ड्यूक्‍स नोजला झाली.
नेहमीप्रमाणं "सिंहगड एक्‍स्प्रेस'नं खंडाळा गाठून तिथे पोटपूजा करून चालायला सुरवात केली. पहिल्या धबधब्यापाशीच पावसाच्या जोराचा अंदाज आला होता. हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी, दोन-तीन रॉक-पॅचची थोडीशी अवघड, पण भन्नाट वाट! वाटेत एक-दोन छोटे धबधबे आणि ओहोळ व नंतर डोंगरावरून फेसाळत येणारा मोठा धबधबा. यंदा धबधब्यापर्यंत पोचेपर्यंत त्याविषयीचं आकर्षण वाढलं होतं. धबधबा मस्त फेसाळत वाहत होता. यंदा तर त्याचा जोर एवढा होता, की थोडासा आधार घेऊनच पार करावा लागणार होता. आम्ही अर्थातच धबधब्यात मस्त तासभर डुंबलो. मनसोक्त भिजून-भिजवून झालं. निसर्गाची करामत म्हणजे, यंदा धबधब्याच्या वरच्या भागातला डोह दरड कोसळून नाहीसा झाला होता. तिथल्या धबधब्याचा प्रवाहदेखील बदललला होता. खालच्या धबधब्याचाच जोर एवढा होता, की त्याखाली उभंही राहवत नव्हतं. मग तिथेच धमाल केली.
धुक्‍यानं दरीचा बराचसा भाग व्यापला होता. पावसाचं कृपाछत्र असल्यावर ड्यूक्‍स नोजच्या ट्रेकची मजा वाढते. यंदा तर पावसानं नुसता धुमाकूळच घातला होता. धबधब्यात भिजल्यानंतर बदलायला मी कधी कपडे घेत नाही, पण यंदा घेतले होते. पण बदलावेसे वाटले नाहीत. ओले कपडे अंगावर वाळवण्याच्या आनंदाने ट्रेकचा उत्साह आणखी वाढतो. हाच निर्णय नंतर नडला!
वाटेत एका ठिकाणी मस्त लोटांगण घातलं. हाता-पायाला थोडं झाजरलं, कपडे चिखलात लोळले. पठारावरही भरपूर धुकं होतं. ड्यूक्‍स नोजवर पोचायला साडेबारा वाजले. तिथेही पावसानं झोडपून काढलं. धुक्‍यामुळं दरी दिसण्याचा प्रश्‍नच नव्हता. धबधब्यानंतर कॅमेराही बाहेर काढण्याची सोय नव्हती. साधारणपणे दोन वाजेपर्यंत खाली उतरलो. आता उतारावरची बरीचशी माती धूप होऊन वाहून गेल्यामुळे आणि खाली सुरू असलेल्या नव्या रस्त्याच्या कामामुळे उतारावरून घसरत येण्याचा आनंद कायमचा गेला!
जीन्स घातली होती, ती ओली (पावसामुळे!) राहिल्यानं पायाला घासून पाय आतल्या बाजूने मस्त सोलपटून निघाले! दोन दिवस विदूषकासारखं चालावं लागत होतं! भरपूर दिवसांनी केलेल्या ट्रेकमुळे पाय (आणि मन!) भरूनही आलं होतं. ("कुणी सांगितलं होतं नको तिथे शेण खायला!' अशी सुवचनं सहधर्मचारिणीनं ऐकवली, ती गोष्ट वेगळीच!)
असो. पुढच्या ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे, असा निश्‍चय केलाय. बघूया, कितपत अमलात येतोय ते!!

Aug 5, 2009

राखी : देवस्थळी ते सावंत!

rakhi

राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते. तेवढं एक बंधन अतूट राहिलं.
त्या काळी वर्गातल्या, शेजारच्या मुलीशी बोलणंही पाप मानलं जायचं. वर्गात दंगा करणाऱ्या मुलाला शिक्षा म्हणून मुलीशेजारी बसवायचे! सातवीत एकदा अशीच "शिक्षा' आमच्या अख्ख्या वर्गाच्या वाट्याला आली होती. मग आम्ही बेंचवरच आपापली "हद्द' कर्कटकाने आखून घेतली होती. त्या हद्दीच्या पार कुठली वस्तू आली की जप्त करायची किंवा शेजारच्या मुलीला काहितरी शिक्षा करायची, असा नियम होता!
आमच्या घराच्या पल्याड काही अंतरावर राखी देवस्थळी नावाची एक मुलगी राहायची. घराशेजारी राहणाऱ्या, वर्गातल्या, नात्यातल्या, किंवा परिचयातल्या कोणत्याही समवयस्क मुलीच्या नावानं मुलांना चिडवण्याचा त्या काळी दंडकच होता! त्यामुळं मलाही तिच्या नावानं चिडवलं जायचं. हातावरच्या राखीनंतरची आयुष्यातली दुसरी "राखी' ही! बाकी, मामेबहिणी, अन्य शेजारणींच्या नावानंही चिडवणं व्हायचंच.
शाळेत रक्षाबंधनाचा सामूहिक, पारंपरिक, बंधनकारक सोहळा व्हायचा. मुला-मुलींची समसमान वाटणी करून प्रत्येकाला साधारणपणे एक या प्रमाणात राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'!) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची. शाळेत ज्याच्या नावानं आपल्याला चिडवलं जातं, त्याला राखी बांधण्याचीही भयंकर प्रथा त्या काळी अस्तित्त्वात होती. मग या दहशतीमुळे अनेक जण राखीपौर्णिमेच्या दिवशीच नेमके आजारी पडायचे! तरीही नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांना गाठून हा कार्यक्रम पार पाडला जायचाच! एकदा का त्या मुलाला राखी बांधली, की आपण "पवित्र' झालो, असा अनेक मुलींचा समज होता बहुधा!! पण राखी बांधली, तरी आम्ही "दादाभाई नवरोजी' व्हायला तयार आहोत, असा आमचा दावा असे.
हातावरची राखी जास्तीत जास्त दिवस टिकवणं हेदेखील एक पवित्र कर्तव्य होतं. आंघोळ करताना तिला पाणी लागू न देण्याचं कसब त्यासाठी पार पाडावं लागे. चित्रपटांच्या नावांच्या, भल्या मोठ्या स्पंजच्या आणि हल्लीच्या "पेस्ट्री'ला लाजवतील, अशा राख्याही बाजारात असायच्या. पण त्या हातावर बांधणं म्हणजे आपण अगदीच "ह्यॅ' असल्याचं लक्षण मानलं जायचं. शाळेत मिळायच्या त्या संघाच्या राख्या. मऊसूत गुंडा आणि एक साधा, केशरी दोरा. बस्स!
कॉलेजात असताना शेवटच्या वर्षात एकुलत्या एक वेळेला प्रेमात पडलो होतो. ही बया आपल्याला आता राखी बांधते की काय, अशी प्रचंड भीती त्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला होती! पण सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि तसं झालं असतं, तरी फरक पडला नसता, हे कॉलेज संपल्यानंतर उमगलं.
पुण्यात आल्यानंतर काही वर्षं बहिणींनी पोस्टानंही राखी पाठवली. साधारणतः राखीपौर्णिमा झाल्यानंतर आठवडाभराने ती मिळायची. त्यानंतरही ती हातावर बांधून मिरवण्यात एक प्रकारचं समाधान असायचं. विशेषतः एकटा राहत होतो, तेव्हापर्यंत!
...अगदी अलीकडच्या काळात आणखी एक "राखी' आयुष्यात आली. म्हणजे, खासगी नव्हे, तर सार्वजनिक आयुष्यात! ही राखी भलतीच मजबूत, बोल्ड आणि आकर्षक (हॉट?) होती! तीच ती..."महाराष्ट्राची खंत'. कुण्या पंजाब्यानं तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोण तीळपापड झाला होता अंगाचा!!
...पण हाय रे कर्मा! तिचं अगदी दोनच दिवसांपूर्वी लग्न ठरलं. आमचा मेव्हणा सातासमुद्रापारचा कुणी राजकुमार आहे म्हणे! आता त्याचे कान उपटायला जाईन म्हणतो!!