बातमी खूप वाईट आहे.
गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे.
माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे!
काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता. मला वाटलं, झाला असेल "स्विच ऑफ'! पण मोबाईल नव्हे, त्यातलं "सॉफ्टवेअर' स्विच ऑफ झालंय, याची मज पामरास काय कल्पना?
सकाळी सगळे प्रयोग करून पाहिले. बायकोच्या मोबाईलमधलं सिमकार्ड काढून इकडे घाल, इकडची बॅटरी तिकडे लाव, मेमरी कार्ड तपासून बघ...सगळे निष्फळ होते. मोबाईल जो रुसून बसला, तो उजेडात यायला काही तयार नव्हता.
""सगळे नंबर सेव्ह करून ठेवायला काय होतं तुला? फोन मेमरी कशाला वापरतेस? सिम मेमरी वापरत जा ना! एवढंही कळत नाही का...'' वगैरे वगैरे स्तुतिसुमनं मी हर्षदावर वारंवार उधळली होती. त्यामुळं माझ्याकडील सर्व नंबर सिमकार्डमध्ये सेव्ह असणार, याची खात्रीच होती. माझं सिमकार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं, तेव्हा त्यात ढिम्म एकसुद्धा नंबर दिसत नव्हता.
माझा पोपट झाला होता. मोबाईल बंद पडला होताच, वर सिम कार्ड कोरं होतं. सकाळी सगळा जामानिमा घेऊन मोबाईलच्या दुकानात जाणं नशीबी आलं.
"साहेब, काही होणार नाही. सॉफ्टवेअर बदलायला लागेल. मेमरी लॉस होईल...' तिथल्या कर्मचाऱ्यानं निष्ठूरपणे सांगून टाकलं.
""अरे लेका, आमची मेमरी लॉस झालेय म्हणून या मोबाईलच्या मेमरीवर अवलंबून राहतो ना! आता तीही लॉस झाली, तर "गझनी' होईल की नाही आमचा?'' असं म्हणायचं अगदी तोंडावर आलं होतं. पण मी ते माझ्या "मेमरी'तच ठेवलं. "डिस्प्ले' होऊ दिलं नाही.
मग खात्री करण्यासाठी आणखी दोन-चार दुकानं पालथी घातली. काहीही फायदा होणार नव्हता, हे लक्षात आलं होतं, तरी वेडी आशा काही सुटत नव्हती. "सध्याच्या स्थितीत फोन नंबर्स तरी सेव्ह होणार नाहीत का,' अशी अजीजी मी प्रत्येक ठिकाणी करत होतो आणि मी जणू काही त्यांची इस्टेट लिहून मागत असल्यासारखी प्रतिक्रिया ते देत होते.
शेवटी मनावर दगड ठेवून "सॉफ्टवेअर' बदलून घ्यायचं ठरवलं. दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून आधीच्या सॉफ्टवेअरला श्रद्धांजली वाहिली. काहीही झालं तरी त्यानं मला दोन वर्षं साथ दिली होती! संध्याकाळी मोबाईल कोरा होऊन माझ्या हातात आला, तेव्हा माझं मन मात्र आता सगळे नंबर पुन्हा जमविण्याच्या कल्पनेनंच भरून आलं होतं!
...
ता. क. : "तुमचा मोबाईल नंबर पाठवा,' असा एसएमएस माझ्या सर्व परिचितांना पाठवण्याचा विचार आहे. कशी वाटते कल्पना?