कामातून जरा निवांत वेळ काढून शरद यादव आज सकाळीच पाटण्यात फेरफटका मारायला निघाले होते. नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यापासून यादव तसे जरा अलिप्तच वागत होते. कुणी त्याला पक्षांतर्गत मतभेद म्हटलं, कुणी मत्सराचं नाव दिलं, तर कुणी "नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा मोठेपणा' असं नाव दिलं. काहीही असो, पूर्वीच्या जनता दलाच्या काळात शरद यादव या नावाला जे वजन होतं, ते आता राहिलं नव्हतं, हे मात्र खरं.
यादवांना आज जरा लोकांची मनं जाणून घ्यायची होती. "लालूराज' संपल्याच्या खुणा पाहायच्या होत्या. नव्या सुशासनाचा सुनियोजित कारभार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचा होता. लोकसभेच्या प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला जमलं नव्हतं. त्यातून त्यांच्याच पक्षातल्या फर्नांडिसांनी बंडाचं निशाण रोवून पक्षाच्या नाकीनऊ आणलं होतं. त्यांना निवृत्तीच्या वाटेला लावण्याची मोठी जबाबदारी यादवांनी पार पाडली होती. त्यामुळं त्यांना आता हायसं वाटत होतं.
बाजारपेठेतून चक्कर मारता मारता त्यांच्या असं लक्षात आलं, की काही वर्षांपूर्वीचं दहशतीचं सावट कुठच्या कुठं पळून गेलंय. नियमित व्यवहार सुरू आहेत. मुलं एकमेकांचा हात धरून शाळेत एकटी निघाली आहेत. आवश्यक तिथं पोलिसांचा पहारा आहे.
"चला, संयुक्त जनता दलाच्या राज्यात तरी गुन्हेगारी संपली, हे एक बरं झालं!' यादवांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. पण जसजसे ते पुढे जाऊ लागले, तसतसं त्यांना वातावरण काहीसं वेगळं जाणवू लागलं. दुकानात सगळीकडे बायकाच वस्तू विक्री करीत होत्या. किराणा मालाच्या दुकानापासून मॉलपर्यंत आणि पार्लरपासून हार्डवेअरपर्यंत, सगळीकडे बायकाच बायका! सायकल आणि स्टोव्ह रिपेअरिंगसाठीही बायकाच होत्या!
काहीतरी गडबड आहे की काय, याची शहानिशा करायला यादव पोलिस ठाण्यात गेले, तर तिकडेही सगळ्या बायकाच! अस्वस्थ होऊन यादव बाहेर आले. बिहार बदललाय, अशी चर्चा त्यांनी ऐकली होती; पण सगळीकडे बायकांचं राज्य असण्याइतपत परिस्थिती आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. तरतरत ते तसेच घराकडे निघाले. सोबतच्या कार्यकर्त्यांची मागून पळताना दमछाक झाली.
काही निष्ठावंत लगेच घरी दाखल झाले. यादव घामाघूम होऊन घरी पोचले. सकाळच्या फेरफटक्याचा प्रसन्न मूड कुठच्या कुठं पळून गेला होता. आता काय बोलावं नि करावं, कुणालाच सुचत नव्हतं. कुणी त्यांना थंड पाणी दिलं, कुणी कोल्ड्रिंक आणून दिलं. कुणी सरबताचा पेला पुढे केला. कुणी फॅनचा स्पीड वाढवला. यादवांचं कशातच लक्ष नव्हतं.
""मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसात फोन लावा!'' यादव कडाडले.
लगेच फोन लावण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली. पण प्रयत्न करूनही फोन लागेना, तसे यादव आणखी अस्वस्थ झाले. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर फोन लागला.
""मी शरद यादवांकडून बोलतोय. साहेबांना सीएमशी बोलायचंय!'' कार्यकर्त्यानं प्रस्तावना केली.
सीएमनी फोन घेतला. यादवांनी त्या कार्यकर्त्याकडून रिसीव्हर जवळपास ओढूनच घेतला.
""बोला!'' पलीकडून कुण्या महिलेचा आवाज आला.
""सीएम आहेत का? मला त्यांच्याशीच बोलायचंय.'' यादव गुश्श्यात म्हणाले.
""मी सीएमच बोलतेय.'' पलीकडून आवाज आला.
""अहो, काय चेष्टा करताय? तुम्ही नितीशकुमारांना फोन देता का?''
""नितीशजी आता सीएम नाहीत. त्यांनी मला सीएम केलंय. मी त्यांची पत्नी!'' फोनवरून खुलासा झाला.
यादवांच्या हातून रिसीव्हर गळूनच पडला. म्हणजे? नितीशकुमारांनी पण लालूंच्याच पावलावर पाऊल ठेवून बायकोला वारसदार केलं की काय? पक्षातल्या इतर नेत्यांना काही किंमतच नाही? या महिला एवढ्या डोईजड कशा झाल्या? महिला आरक्षण विधेयकामुळे?
""नाही नाही! मी हे होऊ देणार नाही! महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झालं, तर मी सभागृहात विष प्राशन करेन!'' यादव गरजले.
त्याच क्षणी त्यांची तंद्री भंगली. आपण घरी नाही, तर संसदेत आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं. "मघाचं सगळं स्वप्न होतं तर!' ते मनाशी म्हणाले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती...