Dec 10, 2015

Operation `बाहु`बली

(भाग 3)

सर्जरी!
कन्फर्म झालं.

फक्त ती कधी करायची, एवढाच प्रश्न होता.
माझ्या आयुष्यात सर्जरीची ही पहिलीच वेळ होती. त्यातून उजवा हात, त्यातून खांदा. सर्जरी म्हणजे काहीतरी गंभीर जाणवत होतं, पण त्याचं पुरेसं गांभीर्य मला त्या क्षणी खरंच जाणवलं नव्हतं. छोटंसं OPERATION आणि नंतर दुस-या दिवसापासून कामाला सुरुवात, असंच त्या क्षणी वाटलं.

त्याच दिवशी इतर तपासण्या करून टाकल्या. सर्जरी दोन दिवसांनीच करायचं ठरलं. दुस-या दिवशी फिजिकल फिटनेस रिपोर्ट आणायचा होता. तोही झाला आणि तिस-या दिवशी सर्जरीसाठी दाखल झालो. सकाळपासून पाणीसुद्धा प्यायला बंदी होती. थिएटरशी माझा लहानपणापासून जिव्हाळ्याचा संबंध. पण OPERATION थिएटर आतून बघण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. साधारण दोन तास लागतील, असा अंदाज होता. मला लोकल अनेस्थेशिया दिला जाणार होता. म्हणजे स्वतःच्या खांद्यावरचे कापाकापीचे प्रयोग मला डोळ्यांनी बघता येणार होते म्हणे.

अनेस्थेशियाचं इंजेक्शन डाक्टरांनी देण्याआधीच खूप गोष्टी विचारायच्या होत्या, पण जमलं नाही. माझ्या नाकाला त्यांनी आक्सिजनचं नळकांडंही लावून टाकलं. श्वास जड होत असल्याचं जाणवायला लागलं होतं. घशात खवखवत होतं, म्हणून खोकण्यासाठी मास्क बाजूला करायला सांगितला, तर मला धड खोकताही येईना आणि श्वासही घेता येईना. डाक्टरांनी आपापसात काहीतरी गुफ्तगू केलं आणि माझी भूल वाढवली. नंतरचं मला काही समजलंच नाही. जाग आली, ती आजूबाजूला भयंकर च्यांवच्यांव सुरू असल्यानं. बघितलं, तर मी OPERATION थिएटरच्या बाहेर होतो आणि हर्षदा, इतर नातेवाईक आजूबाजूला होते. ``त्यांना कुशीवर होऊ देऊ नका!`` असिस्टंट डाक्टर एकदम ओरडल्या.
मग मला उताणी झोपवण्यात आलं. पुढचे काही दिवस मला असंच उताणं पडायचं होतं, याची तेव्हा कल्पना नव्हती. काही वेळानं मला माझ्या खोलीत शिफ्ट करण्यात आलं. पुढचे तीन दिवस असेच काढायचे होते. हातावर एक मोठा कट घेऊन आत धातूची प्लेट टाकण्यात आली होती. एक्सरेमध्ये ही प्लेट म्हणजे दरवाज्याच्या बिजागरीसारखी दिसत होती. स्क्रू टाइट करून ती फिटसुद्धा करण्यात आली होती. हात अडकवण्यासाठी दिलेली हॅंडबॅग पुढचा महिनाभर माझी साथ करणार होती. हात खांद्याला चिकटून राहावा, हलू नये, यासाठी एक  पट्टासुद्धा दिला होता. शर्ट घालायचीही पंचाईत झाली होती.

पहिल्याच दिवशी काही नातेवाईक भेटायला आले होते. आपण कुठल्याही अवस्थेत असलो, तरी कुणीतरी आपल्याला भेटायला येणं, आनंददायीच असतं. पण त्या दिवशी मात्र माझी चिडचीड चालली होती. एकतर संध्याकाळपर्यंत काही खायला प्यायला परवानगी नव्हती. पाण्याचा थेंबही घेतला नव्हता आणि घशाला कोरड पडली होती. डाव्या हाताला सतत इंजेक्शन्स देण्यासाठी आणि सलाइनसाठी एक सुई कायमस्वरूपी टोचून ठेवण्यात आली होती. ती सांभाळत सक्तीनं उताणी झोपायचं होतं.

आठ वाजता थोडं खायला हरकत नाही, असं डाक्टरांनी सांगितलं होतं, पण नर्स आणि असिस्टंट डाक्टर प्रत्येक जण वेगवेगळं सांगत होते. मला जास्त वेळ उठून बसायचीही परवानगी नव्हती. आठ वाजता नर्सनं सलाइन लावलं आणि पंधरा मिनिटांत ते संपेल, असं सांगितलं. त्यानंतर मला खायला परवानगी मिळणार होती. प्रत्यक्षात पाऊण तास झाला, तरी सलाईन संपायचं नाव घेईना. मग तिला पुन्हा शोधून आणून आठवण केली, तेव्हा तिनं सलाईनची गती वाढवली. तरी ते संपायला साडेनऊ वाजले. कडाडून भूक लागली होती, तरी थोडंच खायचं होतं. उलटी होण्याची शक्यता होती. सुदैवानं तसं काही झालं नाही आणि अखेर मी खाऊ आणि पिऊ शकलो. दिवसभर चाललेली माझी चिडचीड अखेर थंडावली.

रात्री डाक्टर व्हिजिटला आल्यानंतर त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्यांनी आता मी उठून हिंडू फिरूही शकतो, असं सांगितलं. असिस्टंट मात्र मी बेडवर उठून बसलो, तरी गुरकावत होते. दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळेल, असंही डाक्टरांनी सांगितलं.

हास्पिटलातले दोन दिवस म्हणजे दिव्य होतं. आमची रूम सेमिस्पेशल आणि हवेशीर, मोकळी ढाकळी असली, तरी दिवसभर कंटाळा सोबतीला होताच. तरी दुस-या दिवशी LAPTOP मागवून घेऊन एका स्क्रिप्टवर काम केलं. म्हणजे, निदान वाचता तरी आलं. पुढचे पंधरा वीस दिवस तरी लिहिणं कठीण होतं. कधी एकदा या तापातून बाहेर पडतो, असं झालं होतं.

रात्री झोपतानाही सक्तीनं उताणी झोपायचं होतं. कुठल्याही कुशीवर वळायला परवानगी नव्हती, त्यामुळे पाठीला रग लागायची. झोप यायची नाही. उजव्या हाताच्या कोपराखाली उंच उशी आणि डाव्या कुशीवर वळलं जाऊ नये, म्हणून डावीकडे एक लोड, असं काहीतरी घेऊन त्या खोपच्यात झोपावं लागायचं. थोडक्यात पाळण्यात झोपल्याचा फील या सर्जरीनं दिला होता. मध्येच पाठीला रग लागून जाग आली, की एकतर कमान करून शरीराचा त्रास कमी करणं, किंवा काही वेळ उठून बसून नंतर पुन्हा झोपणं, एवढाच पर्याय हातात होता.

अखेर तीन आठवड्यांनी टाके काढले गेले. त्यानंतर हाताच्या थोड्या हालचाली सुरू करायलाही डाक्टरांनी सांगितलं, काही व्यायामही दिले. आता थोडं रिलॅक्स वाटू लागलं. दोन्ही हातांतून पहिल्यांदा शर्ट घातला, तेव्हाच मी हुश्श केलं.

दिवाळी तोंडावर होती आणि मी हात गळ्यात घेऊन पडलो होतो. पण सुदैवानं दिवाळी गोड झाली. आदल्याच आठवड्यात एक्सरे पार पडला आणि तो उत्तम असल्याचं डाक्टरांनी सांगून आता मला हाताच्या नियमित हालचालीही हळूहळू करायला परवानगी दिली. एका कुशीवर वळायलाही आता हरकत नव्हती. एवढे दिवस सतत हात शरीराला चिकटून असल्यामुळे स्नायू आखडले गेल्यामुळेच हात हलवल्यावर दुखतोय, हा साक्षात्कार मला झाला. त्याआधी जरा कळ मारली, तरी प्लेट हलली की काय, असं वाटून घाबरायला होत होतं.
एकंदरीत या सर्जरीची कहाणी अशी सुफळ संपूर्ण झाली. अजूनही काही बंधनं आहेत, पण आधी जो त्रास सहन केला, त्या तुलनेत मी लवकर स्वतंत्र झालो, असंच म्हणायला हवं.

महिनाभरातच पुन्हा टायपिंगही सुरू झालं. कधी डाक्टरांच्या परवानगीनं, कधी त्यांची परवानगी गृहीत धरून मुंबई वारी आणि ड्रायव्हिंगही सुरू केलं.

कुठल्याही प्रसंगात देव आपल्या पाठीशी असतो, असं म्हणतात. अनंत चतुर्दशीला बाप्पा माझ्या समोर होता आणि मी पाठच्या पाठी पडलो, ते तो बघत होता. आता पुढच्या वर्षी त्याच्या पाठवणीला जावं, की मिरवणुकीकडेच पाठ फिरवावी, याचा विचार करतोय!

(समाप्त.)