Nov 20, 2010

एलओएलझेड!

मला पहिल्यांदा कळायचंच नाही. "एलओएल' आणि "एलओएलझेड' म्हणजे काय ते! मला वाटायचं, सॉफिस्टिकेटेड भाषेत शिवी देण्यासाठी "वायझेड' म्हणतात, तशीच काहितरी शिवी असावी. पण फेकबुकाच्या वाऱ्या वाढल्यानंतर हे काहितरी वेगळं प्रकरण आहे, हे लक्षात यायला लागलं.
कुणीतरी समुद्रावर कुठेतरी उंडारतानाचा फोटो टाकते.
त्यावर डझनभर प्रतिक्रिया येतात.
"काय घरदार सोडलंय वाटत...एलओएलझेड!'
....
कुणीतरी हापिसातल्या कर्मचाऱ्यांच्या पार्टीतला कुणाच्या तरी गळ्यात पडलेला असतानाचा फोटो टाकते.
त्यावरही "हं...पार्टी-शार्टी...मजाय!' असली काहितरी भंपक कॉमेंट.
- पुढे - एलओएलझेड!
....
जत्रेतली शिंगं डोक्‍यावर लावलेला फोटो काढतं, वर फेसबुकात टाकतं.
त्यावरही डझनभर एलओएलझेड!
...
तरी फारच साधीसुधी, सोज्वळ, प्रातिनिधिक उदाहरणं घेतली.
या वरच्या प्रसंगांत "लाफिंग आऊट लाऊड' अर्थात तोंड फाटेस्तोवर हसण्यासारखं काय आहे?
ओळख, सुसंवाद, मैत्री, उत्तम मैत्री, एकमेकांच्या भावना न सांगता ओळखण्याएवढ्या पातळीवर गेलेली ही माणसं. निदान, तसा दावा करणारी. मग एखाद्याच्या फोटोवर हलकाफुलका विनोद करणारी, त्याचा पाय खेचणारी, त्याची कुरापत काढणारी कॉमेंट टाकली, तर "एलओएलझेड' कशाला म्हणावं लागतं? आपण त्याची चेष्टा करतोय, गंमत करतोय, हे पटवून देण्यासाठी? की त्याबद्दल आगाऊ माफी मागण्यासाठी?
विनोद आपल्या आयुष्यातून एवढा हद्दपार झालाय? आपण ज्याला "मैत्री' म्हणतो, ती एवढी पोकळ, बाळबोध, बालिश, बाष्कळ आहे? दुसऱ्यानं केलेली चेष्टा, गंमत, टर खुल्या मनानं, तेवढ्याच जिंदादिलीनं न स्वीकारण्याएवढी?
की "एलओएलझेड' म्हणण्याचा पण एक ट्रेंड आहे? सगळे म्हणतात, म्हणून आपणही म्हणूया! की स्वतःच्याच विनोदशैलीच्या क्षमतेबद्दल असलेली ही शंका आहे?
काय नक्की आहे काय?
...
ही झाली एक तऱ्हा.
दुसरी तऱ्हा म्हणजे फेसबुकावर काहितरी आचरट, अर्धवट, अपूर्ण आणि तथाकथितरीत्या उत्कंठा चाळवणारा स्क्रॅप टाकण्याची.
उदाहरणार्थ - "फीलिंग लाइक वीपिंग...'
"अलोन टुडे...'
"व्हाय धिस हॅपन्स टू मी ऑल द टाइम...'
"समथिंग इंटरेस्टिंग इन माय लाइफ...'
किंवा तत्सम काहितरी.
म्हणजे सरळसोट "आज 18 वेळा बादली धरून बसावं लागलं,', "अमक्‍या ढमक्‍याशी लग्न ठरलंय,' "तमक्‍यानं आज मला जाम पिडलं. जोड्यानं मारावासा वाटतोय साल्याला', असं म्हणायचं नाही. गोल - गोल फिरत बसायचं.
मग कुणीतरी विचारणार - "काय झालं गं?'
अशा दीडेक डझन कॉमेंट आल्यावर मग ही - "काही नाही गं...सहजच. गंमत करत होते,' असं काहितरी उत्तर देऊन वेळ मारून नेणार.
काय साधतं यानं?
लोकांचा वेळ फुकट घालवल्याचं समाधान? की लोकांना निष्कारण त्रास देण्याचा विघ्नसंतोषीपणा?
तुम्ही म्हणाल - "ज्याला वाचायचंय त्यानं वाचावं. इतरांनी सोडून द्यावं.'

मग प्रश्‍नच मिटला!
असो.
एलओएलझेड!
--------