Feb 18, 2009

`राजा' माणूस!

काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात। सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही. पण त्यांच्यातला एखादाच गुण एवढा जोरकस असतो, की रूढ अर्थानं असलेले इतर दुर्गुण त्यापुढे झक् मारतात!

राजा रेवाळे हा आमचा असाच एक कॉलेजमधला मित्र। अकरावीत प्रवेश घेतल्यापासून सगळं जगच बदललं होतं. एकतर शाळेतली शिस्त, नियमित अभ्यास, घरच्यांचा धाक, कायमचं लक्ष, या सगळ्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत होतो. परिणाम व्हायचा तोच झाला. शाळेत दहावीपर्यंत कधी स्वाध्यायात सुद्धा नापास झालेल्या मला अकरावीतल्या पहिल्याच चाचणी परीक्षेत पंचवीसपैकी एक, दोन असे गुण मिळायला लागले. अकरावी कशीबशी काढली आणि बारावीत चक्क नापास झालो. पुन्हा बारावी परीक्षा द्यायची ठरवली, तीपण सगळे विषय घेऊन. मी मेडिकलला वगैरे जाणार, अशी आशा घरच्यांना आणि मला तेव्हाही होती! म्हणूनच "ग्रुप'मध्ये चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी सगळे विषय घेऊन पुन्हा बसण्याची खुमखुमी होती.

वाईटातून काही चांगलं होत असतं म्हणतात। राजा रेवाळेचा आणि माझा परिचय याच वर्षी झाला. आधी केवळ चेहरा ओळखीचा होता, पण थेट संबंध आला नव्हता. तोही असाच बारावीत पहिल्या वर्षी गटांगळी खाऊन माझ्या जोडीला पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला बसला होता. मग आम्ही दीडशहाण्या रिपीटर्सची टीमच जमली! सगळे विषय आम्हाला आधीच कळलेत, आता फक्त उरलेय ती उजळणी, असाच आमचा पवित्रा असायचा. त्यामुळं वर्गात पुन्हा तेच विषय "समजून' घेण्याची आम्हाला काहीच गरज नव्हती! मग कुठे कॉलेजच्या गेटबाहेर उभं राहून पोरींची टवाळी कर, कधी ग्राऊंडवर टाइमपास कर, असे उद्योग चालायचे.

पुलंच्या "रावसाहेब'मध्ये सगळ्यात जास्त दंगा रावसाहेबांचा असे, तसाच दंगा आमच्या ग्रुपमध्ये "राजा' करायचा। त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा अफाट होता. विनोदाला फार काही दर्जाबिर्जा होता, असं नव्हे. पण कॉलेजातल्या टिंगलटवाळ्यांमध्ये तो अव्वल होता. वर्गात कधीमधी चुकून बसलोच, तर सर काहीतरी शिकवत असताना राजाच्या एखाद्या कॉमेंटवरून जी खुसपूस व्हायची, ती सरांच्या नजरेतून न सुटणारी असायची. मग एकेकाला वर्गाच्या बाहेर तरी जावं लागायचं, किंवा ओरडा खायला लागायचा. बरं, एवढं करून हा नामानिराळाच राहायचा.

राजाला उगाच डिवचणं आणि त्याच्याकडून शब्दांचा यथेच्छ मार खाणं, हे भाग्याचं लक्षण होतं। काही जण मात्र नकळत त्याच्या शेपटीवर पाय द्यायचे आणि मग आठ दिवस त्यांना तोंड दाखवायला जागा उरायची नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकून असलेल्या एका नवख्या पोरानं असंच एकदा राजाला डिवचलं.... "काय राजा, लग्न केलंस म्हणे! 'एखाद्यानं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं असतं.

राजा लगेचच म्हणाला। "म्हंजे काय? तुला माहित नाही? पोरगं पण झालं! घरी ये, "खरवस' खायला! 'आता, एखाद्याला हा विनोद अश्लील, दर्जाहीन वगैरे वाटू शकेल. पण त्यावेळी आम्ही गडबडा लोळलो होतो.मुलींशी बोलण्याची त्या काळात चोरी होती. कॉलेजात असलो, तरी आमचे मुला-मुलींचे ग्रुप वगैरे नव्हते. ग्रुप म्हणजे एकतर मुलांचा, किंवा मुलींचा. वेगवेगळा. एखादा मुलगा गॅलरीत मुलीशी बोलताना दिसला, की त्या प्रक्रियेला आमच्या शब्दकोषात "गूळ पाडणे' असं नाव होतं. मग एखादा मुलगा जास्तच चिकटलेला दिसला, की आम्ही त्याच्या समोरच्या गॅलरीत किंवा काही अंतर राखून जवळ उभे राहून पाठीवरून गुळाची पोती भरून नेल्याची ऍक्शन करायचो. तो तिच्याशी गुलुगुलू करून परत आला, की राजा त्याला हळूच म्हणायचा. "जपून रे! डायबेटिस होईल! ' नवखा असला, तर त्या बिचाऱ्याला काहीच कळायचं नाही.

"नेचर क्लब'च्या नावाखाली आम्ही भटकंतीला जायचो, तेव्हा गणपतीपुळ्याच्या एका ट्रेकदरम्यान तो नदी पार करताना खोल पाण्यात जाऊन बुडायला लागला होता। दोघातिघांनी हात दिल्यावर सावरला. तेव्हाची त्याची अवस्थाही पाहण्यासारखी होती. नंतर स्वतःवरच विनोद वगैरे करून त्यानं त्या घटनेचंही बरंच भांडवल केलं.कॉलेजच्या गॅदरिंगलाही हवालदाराचं सोंग आणून त्यानं धुमाकूळ घातला होता. मी त्या वेळी "बाई' झालो होतो आणि राजाच्या जोडीनं हास्याचे फवारे उडविण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता.

नंतर टी। वाय. पर्यंत आम्ही एकत्र होतो, पण आमचे विषय वेगवेगळे होते. कधीतरी ट्रेकला एकत्र भेटायचो किंवा कॉलेजच्या मधल्या सुटीतही. तेवढ्यापुरती मजा यायची. पण बारावीएवढी धमाल नंतर कधी केली नाही.कॉलेजातली मैत्री वर्ष संपता संपता कशी संपते, ते कधीच कळत नाही. मीदेखील रत्नागिरीतून शिक्षणासाठी (? ) पुण्यात आलो आणि राजाशी काहीच संपर्क राहिला नाही. आता तर तो काय करतो, याचाही मला पत्ता नाही. रत्नागिरीत गेल्यावर शोधून काढणं अवघड नाही, हे जेवढं खरं, तेवढंच जुन्या गोड आठवणींना आता वरकरणीच्या औपचारिक गाठीभेटींची पुटं चढवलेली पाहवत नाहीत, हेही!

Feb 17, 2009

शीर्षकाने केला घोटाळा

काही परीक्षणं लिहायला जाम मजा येते। काही अगदी रूटीन होतात. पण चित्रपटाची कथा-कल्पना आणि सादरीकरण यात काहीच संबंध नसेल, तर ती विसंगती लगेच पकडता येते. अशाच काही "जमलेल्या' परीक्षणांपैकी एक.
---
चित्रपटाच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मांडणं आणि परिणामकारक शीर्षकातून त्याला अपेक्षित परिणाम देणं हे खायचं काम नाही. `सालीनं केला घोटाळा'नं असा उत्तम परिणाम साधला आहे. `अल्ट्रा' कंपनी प्रस्तुत, भास्कर जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची कथा फिरते एका सालीभोवती. इथे `साली' ही शिवी किंवा मेहुणी या अर्थाने नाही, तर चक्क खरीखुरी केळ्याची साल आहे।
सटवाबाई (नयना आपटे) सारखी (गळ्यातील साखळीला अडकवून) केळी खात असते। तिच्या जाचाला कंटाळलेला जावई राजा गोंधळेकर (भरत जाधव) तिला मारण्याची सुपारी एका विमा एजंटाला (सिद्धार्थ जाधव) देतो। (आईशप्पथ! कुठे भेटतात असे विमा एजंट?) तिला मारताना तो तिनेच टाकलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरून पडतो। एकदा राजादेखील सासूनेच टाकलेल्या सालीवरून घसरून पडतो. आपल्या घरच्या अडचणी सोडविण्यासाठी राजा विसरभोळेंची (विजय चव्हाण) मदत घेतो. तेदेखील कधीकाळी सालीवरून (सटवाबाईने टाकलेल्या नव्हे!) घसरून पडलेले असतात.

चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला समजलेली कथा अशी. प्रत्यक्षात ही कथा संशयी पत्नी आणि धांदरट पती यांच्यातील गैरसमज आणि त्यातून होणाऱ्या गोंधळाची आहे, असं चित्रपटाचं माहितीपत्रक वाचून समजतं. या कथेचा (`शिवी'तल्या, मेहुणीतल्या किंवा केळ्याच्या) सालीशी काहीही संबंध नाही! असलाच; तर तो निव्वळ योगायोग समजावा!

सुरुवातीच्या मोलकरणीच्या दृश्‍यांपासून चित्रपट जी पकड घेतो, ती शेवटपर्यंत सोडत नाही। ही पकड मनाची की मानगुटीची, हे ज्याचं त्यानं ठरवावं। नंतर जी एकेक चित्तचक्षुवेधक आणि हास्यस्फोटक दृश्‍यं समोर येतात, त्यानं जागच्या जागी थिजून जायला होतं.चित्रपटाचं वैशिष्ट्य असं, की सालीनं केलेला घोटाळा तो हाच, असं दर अर्ध्या तासानं वाटतं. प्रत्यक्षात या घोटाळ्याचं गूढ शेवटीच उलगडतं आणि आधीचे घोटाळे कशाला दाखविले असावेत बुवा, असा प्रश्‍न पडतो.भरत जाधव, नयना आपटे, किशोरी अंबिये, विजय गोखले, शिल्पा, ऋतुजा आपटे यांनी चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसा अभिनय केला आहे. सिद्धार्थ जाधवनं उगीचच वेगळेपण वगैरे जपलं आहे.

Feb 16, 2009

भेट तुझी-माझी स्मरते...

वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्‍या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील.

मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे। कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्‍स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. काका-पुतण्याची केवळ तब्येतीच्या चौकशीसाठी झालेली ती भेट होती. मुलायमसिंह-अमरसिंह जोडगोळीनं ज्या निरपेक्ष देशभावनेतून कॉंग्रेस सरकारला पाठिंबा दिला, तेवढीच ही भेटही पवित्र होती. तिथेही मीडियानं राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला. अशोक चव्हाण यांनी नारायण राणेंची भेट घेतली, तीदेखील त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून महाराष्ट्रापुढील काही महत्त्वाच्या समस्यांविषयी मार्गदर्शन मिळविण्यासाठी होती.
प्रत्येक गोष्टीत "गॉसिप' शोधणाऱ्या मीडियानं अलीकडेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे आजी उपमुख्यमंत्री व भावी संभाव्य मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सदिच्छा भेटीचंही भांडवल करण्याचा प्रयत्न केला। या भेटीत काय घडलं, याच्या केवळ अंदाजपंची बातम्या सगळीकडे आल्या. त्याचं खरंखुरं वृत्त कुठेच आलं नाही. ते इथे देण्याचा प्रयत्न ः छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर हे सर्वजण सपत्नीक "मातोश्री' निवासस्थानी पोचले, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांची वाटच पाहत होते. रश्‍मीताईंनी सर्व वहिनींचे स्वागत केले. त्यानंतर सगळे जण बाळासाहेबांना भेटायला आत केले. नमस्कार चमत्कार झाल्यावर सगळे जण स्थानापन्न झाले.बाळासाहेब ः बरेच दिवस लावलेत, भुजबळ!
भुजबळ ः हो ना! व्यापात जमलंच नाही यायला। तरी, मी पंकजकडून तुमच्या तब्येतीची माहिती घेत होतो वेळोवेळी. आता कशी आहे तुमची तब्येत?
बाळासाहेब ः मायमराठीचा झेंडा फडकत ठेवण्यासाठी मी व्रतच घेतलंय, भुजबळ साहेब! मी ढेपाळलो, तर कसं चालेल?
भुजबळ ः खरं आहे, साहेब। पण आता तुम्ही उद्धवच्या खांद्यावर सोपवलेय ना जबाबदारी?
उद्धव ः (मध्येच हस्तक्षेप करून) भुजबळ, राजकारणावर अजिबात चर्चा करायची नाही, असं बजावलंय बाळासाहेबांनी! आपली ही सदिच्छा भेट आहे।
भुजबळ ः अरे हो, हो, विसरलोच होतो! बाकी, औषधं वगैरे सुरू आहेत ना व्यवस्थित?
बाळासाहेब ः तर! तुम्ही पण माझ्यासाठी हा खजूर-बिजूर आणलाय म्हणे! ठेवा तो। तो खाऊन आणखी टुणटुणीत होतो आणि दोरीच्या उड्या मारायला सुरवात करतो उद्यापासून!
(सगळ्या दालनात हास्यकल्लोळ।)
बाळासाहेब ः तुमच्या नाशिकच्या फार्मवरची झाडं कशी आहेत आता?
भुजबळ ः उत्तम! काही औषधी वनस्पती पण लावल्या आहेत। तुम्हाला पाठवून देईन. काहीकाही कडू औषधांचे डोस आमच्या काही मित्रांनाही पाजायचे आहेत लवकरच!
उद्धव ः भुजबळ साहेब, मघाशी आपलं काय ठरलंय?
भुजबळ ः अहो, मी औषधांबद्दलच बोलतोय! पंकज भेटला होता ना तुम्हाला मध्यंतरी?
बाळासाहेब ः हो तर! लग्नाची पत्रिका द्यायला आला होता तो। आज सुनांशी प्रत्यक्ष भेट झाली. शर्ट छान आहे हं तुझा पंकज! देशी की विलायती?
(पंकज काहीच बोलत नाही।)
बाळासाहेब ः असू दे असू दे। बाकी, आम्हाला विलायतीच आवडतं बुवा! द्या टाळी
(भुजबळ टाळी देतात।)
बाळासाहेब ः अरे, विसरलोच! अंजीरवाडीच्या गणपती मंदिराची काय हकिगत? पूजाबिजा होते की नाही व्यवस्थित?
भुजबळ ः तर हो! सगळं व्यवस्थित चाललं आहे। त्याचीच कृपा आहे.
बाळासाहेब ः त्याची आणि भवानीमातेची कृपा आहे हे खरं। तुम्ही पुन्हा एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचलात की त्यामुळेच!
भुजबळ ः हो ना! आता आपण एकत्र आलो तर...
(उद्धव पुन्हा भुजबळांना मघाचीच आठवण करून देतात।)
भुजबळ ः अरे हो रे! राजकारणाचा विषय काढायचा नाही, हे आहे माझ्या लक्षात! मी फोटोसाठी एकत्र येऊया म्हणतोय। बाळासाहेबांना फुलं देतानाचा फोटो काढायचा आहे.
उद्धव ः अच्छा, अच्छा! चला, भोजन करून घेऊया।
(सगळे जण भोजनाकडे वळतात। भोजनाच्या वेळीही हास्यविनोद आणि हवा-पाणी, तब्येत, इस्राईल-पॅलेस्टाईन युद्ध, भुजबळांच्या चष्म्याची बदललेली फ्रेम, बराक ओबामांचा शपधविधी, उद्धव ठाकरेंची नवी भटकंती, आदी विषयांवर चर्चा होतात.)
भोजन संपल्यावर भुजबळ आणि कुटुंबीय घरी जायला निघतात। इतर मंडळी पुढे गेल्यावर भुजबळ अचानक मागे फिरून पुन्हा बाळासाहेबांच्या जवळ येतात.
बाळासाहेब ः काही बोलायचं राहिलंय, का भुजबळ?
बाळासाहेब ः काही बोलायचं राहिलंय, का भुजबळ?
बाळासाहेब ः 18 वर्षांत आपली भेट नसली, तरी मी तुम्हाला ओळखतो भुजबळ! निःसंकोचपणे बोला!
भुजबळ ः या वेळच्या निवडणुकीत...
उद्धव ः भुजबळ साहेब...
उद्धव ः भुजबळ साहेब...
उद्धव ः तरीही, निवडणुकीचा विषय नको।
भुजबळ ः हो। मी वेगळंच सांगतोय. या निवडणुकीतही मोठं आव्हान आहे. आमच्या सरकारची कामगिरी, युतीचा जोर, सगळंच पणाला लागणार आहे. आमचीही दमछाक खूप होणार आहे. तेव्हा...
बाळासाहेब ः तेव्हा काय?
भुजबळ ः तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही!
(सगळे जण पुन्हा हास्यकल्लोळात बुडून जातात.)