Aug 19, 2013

बिनकांद्याचा श्रावण


""निनाद कुठाय? आत्ताच्या आत्ता त्याला इथे यायला सांग!'' बाहेरून आल्या आल्या श्री. किरकिरेंनी खास "वडीलकी'चा स्वर लावला होता.
""बाबा, तो सोसायटीत खेळायला गेलाय. काय झालंय?'' कु. नं विचारलं.
""तो येऊ दे. मग मला तुमच्याशी एकत्रच बोलायचंय! जा, त्याला हाक मार.''
एवढं बोलून श्री. हातपाय धुवायला गेले. एव्हाना आरडाओरडा ऐकून सौ.सुद्धा फोडणीचा गॅस बंद करून बाहेर आल्या होत्या. कु.ची आणि त्यांची खुणवाखुणवी झाली.
""आई, नक्की काय झालंय? बाबा चिडलेत कशानं एवढे?''
""सांगते नंतर.''
""अगं, सांग ना. आमच्यावर रेशन निघायच्या आधी त्याचं कारण तर कळू देत.''
""बोकडाच्या मानेवर सुरी फिरवायच्या आधी त्याला सांगतात का, की बाबा गेल्यावेळी तू एकदा मला ढुशी दिली होतीस, म्हणून तुला कापतोय...?'' सौं.चा युक्तिवाद पटण्यासारखा होता.
""अगं आई, पण...'' कु. काहीतरी बोलणार, एवढ्यात श्री. फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. त्यामुळे कु.नं तिचे पुढचे शब्द गिळले.
""आला का निनाद?''
""नाही अजून. बोलावते.'' कु. पटकन हाक मारण्यासाठी बाहेर पळाली.
""अहो, जरा शांत राहा. मुलं लहान आहेत, त्यांना जास्त ओरडू नका.''
""काही लहान नाहीयेत. तू त्यांना डोक्‍यावर बसवून ठेवलंयंस.''
""मी? बरं!'' वाद घालण्यात काही अर्थ नाही, हे सौं.च्या लक्षात आलं. (कधी वाद घालायचा आणि कधी वाद घालण्यासाठी एनर्जी राखून ठेवायची, हे बायकांना बरोबर कळतं.)
काही क्षण असेच तणावाचे गेले आणि चि. आणि कु. दारात हजर झाले. घरात स्फोटक परिस्थिती आहे, हे कु.नं चि.ला आधीच सांगितेललं होतं. महायुद्धाचा भडका उडणार होता, पण त्यामागचं तात्कालिक कारण कुणाला कळत नव्हतं.
""आलात का? या!'' श्री.ंच्या आवाजावरूनच चि.चा धीर आणखी खचला.
""काल कुठे गेला होतास?''
""काल...?''
""हो. कालच! कोर्टात साक्षीला उभा राहिल्यासारखा चेहरा करू नकोस. दोन वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल विचारत नाहीये तुला. कालचंच विचारतोय!'' चि.चं आज काही खरं नव्हतं.
"" कानतोडेंकडे गेलो होतो...भुर्जी तोडायला...आपलं...भुर्जी खायला.''
""हेच...हेच...हीच शिस्त नाहीये तुम्हाला. महिना कुठला चालू आहे आत्ता?'' श्री. जाम भडकले होते.
""ऑगस्ट!'' कु. नं आता कुणीही न विचारता उत्तर दिलं.
""मराठी महिना कुठला चालू आहे, ते विचारतोय.''
""अं...बहुतेक चैत्र असावा.'' कु.च्या निरागस प्रश्‍नाने श्रीं.चा पारा आणखी चढला.
""श्रावण महिना चालू आहे! तुम्हाला काही आहे का त्याचं?''
""आईशपथ, खरंच हो. लक्षातच नव्हतं माझ्या. श्रावणात एकदा सत्यनारायणाची पूजा घालायची म्हणत होते मी. बरी आठवण केलीत.'' सौं.च्या या विधानाने श्री. आणखी भडकले.
""बाहेर लोक माझी खेटरानं पूजा बांधतायंत आणि तुला सत्यनारायणाची पूजा सुचतेय?'' श्रीं.च्या पट्ट्यातून आज कुणीच सुटणार नव्हतं.
""नक्की काय झालंय, सांगाल का? काल संध्याकाळपासून तुम्ही असे निष्कारण चिडचीड करताय.'' सौ.नी पुन्हा मुलांची बाजू घेतली.
""चातुर्मास चालू आहे आणि भुर्जी पाव खायचं सुचतंय तुम्हाला? तू त्यांच्याकडे जाऊन भुर्जी खाल्लीस, म्हणजे उद्या आपल्याला त्यांच्यासाठी भुर्जी करावी लागेल. मग काय करणार? किरकिरेंच्या सात पिढ्यांमध्ये कुणी श्रावणात कांदा आणि मांसाहार केलेला नाही, माहितेय का? उद्या लोकांनी विचारल्यावर काय उत्तर देऊ मी?''
""बाबा, पण परवाच आईनं घरी भुर्जी केली होती, ती आपण सगळ्यांनीच खाल्ली!'' कु.ला राहवत नव्हतं.
""हो का...? ती चुकून खाल्ली असतील. पण यापुढे कडक श्रावण पाळायचा. कांदाबिंदा सगळं बंद!''
""आणि नॉनव्हेज?''
""तेसुद्धा बंद!''
""चला, मी सकाळीच ताजी मासळी आणलेली पाटीलकाकूंना देऊन टाकते.'' सौ.नी केलेल्या या विधानामुळे श्रीं.ची थोडी चलबिचल झाली, पण तसं न दाखवता ते तडक आत निघून गेले.
आता चि. आणि कु. ने सौ.ना एका कोपऱ्यात घेतलं.
""बाबा एवढे का बिथरलेत?'' दोघांनीही एकदमच विचारलं.
""काय सांगू मुलांनो तुम्हाला? माझीच चूक आहे!'' सौं.नी असं सांगितल्यावर दोघांनीही कान टवकारले.
""काय झालं?''
""अरे, काल चुकून त्यांना बाजारातून भाजी आणायला सांगितलं होतं. यादीत एक किलो कांद्याचाही उल्लेख होता. कांदे घेऊन आले आणि जे बिनसलंय, ते आत्तापर्यंत. प्रत्येक गोष्टीचा हिशोब करत बसलेत! चातुर्मास आणि कांदा-लसूण न खाणं वगैरे सगळ्या संकल्पांचा जन्म त्यातूनच झालाय!!'' सौं.नी खुलासा केला.

सलमानभाऊ, "लई भारी'!


दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः


-ं पहिलं लफडं (मैंने प्यार किया)
-लव्हरनं मारली टांग! (सनम बेवफा)
-किरण्या-अज्या (करण अर्जुन)
-घ्या मुका ः पार्ट 2 (खामोशी)
-व्यक्ती तितक्‍या प्रकृती (अंदाज अपना अपना)
-लफडी करणाऱ्या सगळ्यांसाठी (हर दिल जो प्यार करेगा)
-तुझा-माझा काय संबंध? (हम आपके है कौन)
-जुळ्याचं दुखणं (जुडवा)
-सख्या सजणा (साजन)
-उशिरा झोपून उठणारा (सूर्यवंशी)
-आईशपथ, अशी बायको पाहिजे यार! (बीवी नं. 1)
-हरवला आहे! (वॉंटेड)
-टग्या (दबंग)
-तुमच्यासाठी काय पण! (रेडी)
-आणखी एक टग्या (दबंग-2)
-अंगाला हात लावायचं काम नाही! (बॉडीगार्ड)
-एक होता वाघोबा (एक था टायगर)
-
-आणि
-आगामी ः
-
-लाथ मारीन तिथं पाणी काढीन! (किक)

कांद्याअभावी वांदा टाळण्यासाठी...कांद्याच्या भावांनी सध्या (कांदा न चिरताही) अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. पुढचे काही दिवस सहजासहजी कांदादर्शन घडण्याची चिन्हं नाहीत. कांदा हा जीवनातला आणि जेवणातला अविभाज्य भाग आहे. श्रावणातही कांदा खाण्याची इच्छा मारता येत नाही. त्यामुळे या काही कांदाविरहित पाककृती ः

बिनकांद्याची भजी ः
साहित्य ः कांदा, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, पाणी, पातेलं, गॅस, कढई, तेल आणि (मानवी) हात.
कृती ः आधी अख्खा कांदा उभा बारीक चिरून घ्यावा. तुकडे वेगवेगळे करण्याऐवजी कांदा खालच्या किंवा वरच्या बाजूने एकसंध ठेवावा. (फळविक्रेते शोभेसाठी डाळिंब कापून, फुलवून ठेवतात, तसा.) त्यात मीठ, थोडी हळद आणि लाल तिखट घालून तो भिजवून ठेवावा. त्याला पाणी सुटल्यानंतर त्यात बेसन पीठ मिसळावे. हातांनी हे मिश्रण नीट कालवून घ्यावे. थोडा वेळ हे मिश्रण तसेच राहू द्यावे. त्यानंतर अख्खा कांदा तसाच उचलून घ्यावा. त्यावर पाणी ओतून कांद्याच्या फोडींमध्ये अडकलेले सगळे पीठ व्यवस्थित धुवून घ्यावे आणि कांदा नीट बाजूला काढून ठेवावा. आता कांद्यातून बाजूला केलेले पीठ आणि आधीचे पिठाचे मिश्रण एकत्र करून, गरम तेलात त्याची छोटी भजी करून तळावीत. बाजूला काढून ठेवलेला कांदा तसाच फ्रीझमध्ये ठेवून, पुढच्या भज्यांच्या वेळी अशाच प्रकारे वापरावा.
टीप ः पाहुणे आले असल्यास ही भजी शक्‍यतो गार करून वाढावीत. जेणेकरून ते कमी खातील.
....
कांदा-बटाटा रस्सा
साहित्य ः कांदा आणि बेसनपीठ सोडून वरीलप्रमाणेच. फक्त शेंगदाण्याचे कूट किंवा ओले खोबरे अतिरिक्त.
कृतीः कढईत चवीप्रमाणे मसाल्याचे पदार्थ, मसाला, लसूण, जिरे, असे पदार्थ छान खरपूस परतून घ्यावेत. हे मिश्रण (कढई सोडून!) मिक्‍सरमधून काढावे. पुन्हा कढईत तेल घेऊन फोडणी करावी आणि त्यात हे मिश्रण घालावे. दरम्यानच्या काळात नवऱ्याला बटाटे धुवून कांद्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायला सांगावेत. पेपर वाचण्याचा, फेसबुक, व्हॉटस्‌ ऍप बघण्याचा, मॉर्निंग वॉकचा वेळ वाया गेल्याची कुरकुर त्याने केल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कांद्याप्रमाणे बारीक चिरलेला हा बटाटा फोडणीत घालावा. नंतर पुन्हा नव्याने वेगळे बटाटे धुवून, त्याचे थोडे मोठे काप करावेत आणि ते फोडणीत घालावेत. चवीप्रमाणे (आणि घरातल्यांवर किती राग काढायचा आहे, त्याप्रमाणे) मीठ व तिखट घालावे. गरमागरम कांदाविरहित कांदा-बटाटा रस्सा तयार!
....
मिसळ, पावभाजी.
साहित्य ः नेहमीचेच.
पावभाजी आणि मिसळ,या दोन्ही पदार्थांना वरून घातलेल्या कांद्याशिवाय चव नाही. त्यामुळे या दोन्ही पाककृतींमध्ये कांदा पूर्णपणे टाळता येणार नाही. फक्त वाचवता येईल. त्याची कृती पुढीलप्रमाणे ः
लहानात लहान कांदा बारीक चिरून घ्यावा. तो एका ताटलीत पसरून ठेवावा. त्यावर बारीक छिद्रांची जाळी कायमस्वरूपी चिकटवून टाकावी. मिसळ किंवा पावभाजी घरातल्या मंडळींना डिशमध्ये वाढल्यानंतर ही कांद्याची ताटली त्यांच्या नाकासमोरून फिरवावी. बारीक छिद्रांच्या जाळीमुळे कांद्याचा वास त्यांच्या नाकापर्यंत जाईल आणि कांदा खाल्ल्याचा फील येऊ शकेल. जाळी निघणार नाही किंवा कुणाला काढता येणार नाही, याची काळजी घ्यावी. ही ताटली फ्रीझमध्ये ठेवून महिनाभर सहज वापरता येईल.
....
रामबाण उपाय ः
बिनकांद्याचे हे पदार्थ खाऊन थोड्या दिवसांनी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी कर्ज काढून कांदे विकत आणण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी पुढील उपाय करावा ः
""अरे देवा! ह्यांना चक्कर आली! अहो काकू, दोन कांदे द्या पटकन!'' असं म्हणून शेजाऱ्यांच्या घरी विद्युतवेगाने धावत जावे. प्रचंड घाबरेघुबरे झाल्याचा अभिनय करावा. (प्राइम टाइममधली कोणतीही मालिका पाहिल्यास हा अभिनय फारसा अवघड जाणार नाही.) शेजारच्या काकूंनी शेजारधर्माला जागून (यदाकदाचित) कांद्याची परडी पुढे धरल्यास "असू देत अडीनडीला' असं म्हणून चार-पाच कांदे पटकन उचलून घराच्या दिशेने पोबारा करावा.