Aug 17, 2017

संकटी रक्षी, शरण तुला मी!

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 4)


घरी आल्यापासून केतनला चहा मिळाला नव्हता. या श्रावणात घरात रोज कुठल्या ना कुठल्या पदार्थांचे वास घमघमत असायचे. आपणच केलेला पदार्थ त्याने सगळ्यात आधी खावा, यासाठी सासू-सुनांमध्ये चढाओढ लागलेली दिसायची. मग दोघींचेही पदार्थ कसे चांगले आहेत, असं कौतुक करताना केतनचा मुत्सद्दीपणा पणाला लागायचा. आज मात्र असं काहीच झालं नव्हतं. आज मात्र जेवणाची वेळ झाली, ती साध्या आमटीभाताचा वाससुद्धा दरवळत नव्हता.

केतननं जरा आढावा घेतला, तेव्हा त्याला लक्षात आलं, की सोनालीचा घरीच गणपती तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. गणपतीची माती, पाणी, काटे-चमचे, पळ्या, कागद, यांचा तिनं एवढा पसारा करून ठेवला होता, की खोलीत पाऊल ठेवायला जागा नव्हती. केतनला बघितल्या बघितल्या ती उत्साहाने उडी मारून म्हणाली, ``कसा झालाय माझा गणपती?`` तिनं खरंच छान मूर्ती घडवली होती. ``कमाल! हे कधी शिकलीस तू?`` त्यानं कौतुकानं विचारलं. सोनालीकडूनच त्याला समजलं, की तिनं गणपती तयार करण्याच्या एका कार्यशाळेत भाग घेतला होता. अवघ्या दोन दिवसांत ती असा गणपती तयार करायला शिकली आणि आता यंदा घरच्या गणपतीची मूर्ती आपणच तयार करायची, असं तिनं मनाशी ठरवलं होतं.

केतन म्हणाला, ``खरंच भारी आहेस तू. घरातली कामं सांभाळून तू गणपती करायला शिकलीस, एवढ्या लवकर एवढी सुबक मूर्ती तयार केलीस. यंदा हाच गणपती आपण बसवायचा. फायनल!`` आश्वासन दिलं खरं, पण नजीकच्या भविष्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याचं बोलणं संपतं न संपतं, तोच वत्सलाबाईंची हाक आली आणि तो तिकडे पळाला.

वत्सलाबाईंच्या खोलीत आल्यावर केतनला बसलेला धक्का आधीच्या धक्क्यापेक्षाही जास्त रिश्टरचा होता. त्यांनीसुद्धा असाच पसारा पाडला होता आणि त्याच्या मध्यभागी होती, त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेली गणपतीची सुबक मूर्ती.
``कसा झालाय माझा गणपती?`` त्यांनी उत्साहानं विचारलं.
``कमाल! हे कधी शिकलीस तू?`` केतनच्या स्वरात आश्चर्य, धक्का, उत्सुकता, भीती आणि भविष्यातल्या संकटाची चाहूल, सगळंच दाटून आलं होतं. वत्सलाबाईसुद्धा अशाच कुठल्यातरी कार्यशाळेत गणपती करायला शिकल्या होत्या आणि त्यांनीही घरी हा यशस्वी प्रयोग केला होता, हे त्याच्या लक्षात आलं. `यंदा हाच गणपती आपण बसवायचा,` असं आश्वासन त्याला इथेही द्यावंच लागलं.
आता केतनपुढे धर्मसंकट उभं होतं. दोघींपैकी एकीचा गणपती बिघडला असता, त्यांना जमला नसता, तर त्यांनी स्वतःहूनच माघार घेतली असती. पण यावेळी मुकाबला बरोबरीचा होता. घरात दोन गणपती बसवणं तर शक्य नव्हतं. कुणाचा एकीचा गणपती निवडला, तर दुसरीला राग येणार होता.

गणपतीच्या काळातल्या बंदोबस्ताचा पोलिस यंत्रणेला येत नसेल, एवढा तणाव केतनला या काळात आला होता. गणपती रंगवून पूर्ण होईपर्यंत केतनच्या जिवात जीव नव्हता. मात्र, एके दिवशी अचानक सोनाली आणि वत्सलाबाई एकदमच त्याच्या समोर आल्या आणि वादावर तोडगा निघाल्याचं त्यांनी सांगितलं.
``हे बघ, आम्ही ठरवलंय, की दोन्ही गणपती चांगले आहेत, त्यामुळे दोन्ही बसवायचे. फक्त एकाची पूजा करायची आणि दुसरा नुसताच. सार्वजनिक मंडळं करतात, तसं.`` वत्सलाबाईंनी खुलासा केला.
केतन समाधानाचा निःश्वास टाकणार, एवढ्यात सोनाली म्हणाली, ``फक्त मखरात कुठला बसवायचा आणि पूजेसाठी कुठला ठेवायचा, हे तेवढं तू ठरव!``

केतनला पुढच्या संकटाची चाहूल लागली आणि त्यातून वाचण्यासाठी त्यानं मनातल्या मनात विघ्नहर्त्याचा जप सुरू केला!