Jan 3, 2015

`प्रभात`ची संध्याकाळ...


1997 ला पुण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी कुठलं काम केलं असेल, तर ते जवळची सगळी थिएटर्स शोधून काढायचं. मोठं झाल्यावर पैसे मिळवायला लागल्यावर सगळ्या थिएटर्सचे सगळे सिनेमे बघायचे, हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं. पुण्यात आल्यावर options जास्त असल्यामुळे ते अंशतः का होईना, साकार करण्याची संधी प्रथमच मिळत होती. भाऊ महाराज बोळात म्हणजे अगदी मध्यवस्तीत राहत असल्यामुळे जवळची `विजय, अलका, लक्ष्मीनारायण, नीलायम, रतन, श्रीनाथ`पासून ते `भारत, अपोलो, अल्पना, वेस्ट एन्ड, व्हिक्टरी`पर्यंतची सगळी थिएटर्स आणि शोधून काढली. सगळ्यात जवळचं आणि सोयीचं होतं ते अप्पा बळवंत चौकातलं `प्रभात`.

तीस ते चाळीस रुपयांत तिकीट आणि अगदी चालत जाण्यासारखं असल्यामुळे `प्रभात`वर जास्त जीव जडला. `सकाळ`मध्ये कामाला लागल्यापासून तर हापिसात गाडी लावायची, दुपारी 12 किंवा 3 चा सिनेमा बघायचा आणि संध्याकाळी किंवा दुपारी ड्यूटीवर जायचं, हा शिरस्ता बनला. अनेकदा 3 ते 9.30 ची ड्यूटी करून रात्री 9.30 चा शेवटचा शो बघून घरी जायचे उद्योगही अगदी 2012 साली नोकरी सोडेपर्यंत करत राहिलो.

परीक्षणांसाठी बघितलेले (किंवा सहन केलेले) अनेक मराठी चित्रपट इथलेच. भरपूर उकाडा, इकडून तिकडे जाणा-या प्रेक्षकांमुळे होणारा त्रास, चिरका आवाज, हे सगळं सहन करत इथे अनेक चित्रपटांचा आनंद घेतला, तो फक्त सिनेमावरच्या निस्सीम भक्तीमुळे. अनेकदा शो हाऊसफुल्ल असल्यामुळे घरीसुद्धा परत आलो, पण कधी भिडे काकांना फोन करून तिकीट ठेवायला सांगावंसं वाटलं नाही. कारण उद्या पुन्हा येऊ, थिएटर आपलंच आहे, जातंय कुठे, ही भावना.

या महिन्यात प्रभात कायमचं बंद होणार, ही बातमी वाचली होती, पण नेहमीच्या विसरभोळेपणामुळे आणि बेफिकिरीमुळे ती नेमकी तारीख विसरून गेलो. `हॅपी जर्नी' बघायचा राहिला होता आणि `प्रभात`ला तो दोन शो मध्ये होता, तरीही आठवडाभर पुण्यात असूनही त्याला जाणं जमलं नाही. गुरुवारी, 25 तारखेला संध्याकाळी सातच्या दरम्यान अचानक आठवलं, की आज `प्रभात'चा शेवटचा दिवस. `हॅपी जर्नी` चुकला, पण निदान शेवटचा शो बघण्याचं भाग्य तरी पदरात घेऊ, असा विचार करून, धावपळ करून रात्री थिएटरवर पोचलो. 50 रुपयांचं सर्वोच्च दराचं (stall चं) तिकीट काढलं. 9.20 झाले होते आणि सिनेमा 9लाच सुरू झाला होता. पाच मिनिटांचा सिनेमा बुडला, तरी थिएटरवरून परत जायचं, हा अनेक वर्षांचा शिरस्ताही बाजूला ठेवला आणि थिएटरात शिरलो. `लव्ह फॅक्टर`नावाचा भीषण सिनेमा बघण्याचे `भोग' नशीबात होते. पण याआधी असे अनेक भोग स्वखुशीने उरावर घेतलेले असल्यामुळे आज काही विशेष वाटलं नाही. त्यातून `प्रभात'मधला (कदाचित) शेवटचा शो बघितल्याचं सुख सोबतीला होतं, ते वेगळंच.

शेवटचा शो संपेपर्यंत `प्रभात'चे व्यवस्थापक भिडे काका, संचालक विवेक दामले आणि इतरही सगळे जण आवर्जून थांबले होते. जेमतेम पन्नास साठ प्रेक्षक होते, सिनेमलाा शिव्या घालून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षक अतिशय आनंदाने त्या सगळ्यांबरोबर फोटो काढत होते. `प्रभात`च्या परंपरेला साजेशा पुणेरी पाट्याही थिएटरबाहेर लावण्यात आल्या होत्या. खरंच एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं.

पुन्हा कधी `प्रभात'समयो पातला, तर आम्ही पिटात हजर असूच!!