Aug 30, 2010

लगी रहो मुन्नीबाई!

काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं.

तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...

`

दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...

देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात. अरबाज खाननं केवढ्या उदात्त हेतूनं त्याच्या `दबंग`मध्ये हे गाणं टाकलं!स्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतील! तिचं प्रेम अढळ आहे. तिची निष्ठा अविचल आहे. तिचा निर्धार दबंग...साॅरी..अभंग आहे.

भारतीय संस्कृतीचं मोल आणि सार किती सार्थपणे मांडलंय मोजक्या शब्दांतून...किती समर्पक उपमा! किती नेमक्या भावना! काय उत्स्फूर्त नृत्य!!

गाण्यातल्या नेमक्या भावना, विचार आपल्या अंगप्रत्यंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेली तशीच समर्थ अभिनेत्री, नृत्यांगनाही हवी. अरबाज खाननं हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सहधर्मचारिणीलाच साकडं घातलं. तिनंही पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ही कामगिरी लीलया पार पाडलेय. प्रेक्षकांच्या हृदयांचा आणि स्वतःच्या हाडांचा चक्काचूर होईल, याची पर्वाही करता तिनं गाण्यातल्या भावना, विचार नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी किती विद्युल्लतेच्या वेगानं कंबर लचकवलेय पाहा...

प्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...वहिनी असावी तर अशी असं प्रत्येकाला वाटलं नाही, तर ज्याचं नाव ते.

चित्रपट संगीताची ओळख बदलून टाकणा-या, गीतलेखन-नृत्यशैलीला नवी दिशा दाखवणा-या, भारतीय संस्कृतीची महती नेमक्या शब्दांत पटवून देणा-या या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणं, त्यासाठी निर्मात्यांना कोर्टात खेचणं, याला करंटेपणा म्हणावं नाहीतर काय..

...

दुःखालाही सुखाची सोनेरी किनार असते म्हणतात. `मुन्नी बदनाम हुई`वर बंदी येण्याच्या नैराश्यजनक, विदारक बातमीच्या सोबत एक आशेचा किरण आहेच....त्यातल्या हिंदुस्थान एवढ्याच शब्दाला याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. त्यामुळे देशाचा अवमान होत असल्याचा त्याचा दावा आहे. चला...म्हणजे तेवढा शब्द काढला, तर गाणं या भीषण संकटातून सहीसलामत सुटण्याची चिन्हं आहेत. देव पावला!
 

20 comments:

हेरंब said...

कलयुग रं बाबा कलयुग ;)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

नुसती बदनाम नाही झाली ती... झंडू बाम पण झाली (म्हणजे झंडू बाम चांगला की वाईट :-?)

Pradnya said...

धन्य तो दीर , धन्य ती वहीनी आणि धन्य ते पतिदेव !!! (बिचारे प्रेक्षक!!!)

tanvi said...

>>>>प्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...

सही आहे पोस्ट!! :)

बाकि सगळा खान प्रकार ...कठीण... आवरा!! ;)

SUHAS YADAV said...

एकदम मस्त. असे open out होण्यामुळे तब्येत चांगली राहते. लेखकाची आणि वाचकांची.

mau said...

कठिण आहे सगळा प्रकार...हेरंब आणि तन्वीशी अगदी सहमत..

विक्रम एक शांत वादळ said...

हा त्यांचा घरगुती चित्रपट आहे त्यात बाहेरील लोकांनी लक्ष घालू नये :P

THE PROPHET said...

झंडू बामची जाहिरात झाली...एव्हढंच दुःखात सुख!

मंदार जोशी said...

खरंच, घोर कलियुग.

Unknown said...

सर्दी, डोकेदुखी, वेदना वगैरे तक्रारी मुन्नी दूर करेल, बाकी तक्रारींचं तुम्ही बघा !

Unknown said...

अहो त्यांचे तेच तर उपजीवेकेचे साधन आहे. कुणाला आवडो अगर न आवडो कीतीही नावे ठेवली तरी पब्लीक डोळे फाडुन बघतातच न मग झाल तर.

Yogesh said...

>>झंडू बामची जाहिरात झाली...एव्हढंच दुःखात सुख! +१

Maithili said...

:-D पोस्ट मस्त आहे अगदी....
Btw, झंडू बाम होणे म्हणजे काय होणे नक्की...?
:-/

उघडझाप said...

कलियुग असूनही बिचारे किती सरळ वागत होते तरीही कारवाई.... ये तो बहुत नाईन्साफी है!

चला किमान ते तिघे पुन्हा लाईमलाईट मध्ये आले आणि जोडीला झंडू बामलाही आणले. हेही नसे थोडके. :)

सचिन उथळे-पाटील said...

मुन्नी हिट है ........

अभिजित पेंढारकर said...

च्या मारी, १५ प्रतिक्रिया?
माझ्या दत्तक विधानाच्या पोस्टवर पण एवढ्या वेगाने आणि एवढ्या प्रमानात प्रतिक्रिया आल्या नव्हत्या!

anyway. thanx a lot! keep reading!!

First day first show said...

झंडु बामचा खप महिन्यात दोन कोटी रुपयांनी वाढला (वाचा मिंटचा शुक्रवारचा अंक) पण बाई झंडु बाम झाल्यावर होणाऱ्या सोयी व गैरसोयींचा विचार जरूर व्हावा.

Anonymous said...

मस्त. खुपंच छान झाली आहे नोंद. आवडली.. :)

Anonymous said...

munni bai amar rahe

Anonymous said...

munni bai amar rahe