Jan 9, 2010

चुकामूक

"व्हायचं असतं ते घडतंच' या म्हणीचा कधीकधी प्रत्यय येत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. परवाही असंच झालं. परवा म्हणजे गेल्या रविवारी. आई रत्नागिरीहून येणार होती. "मी स्वतः येईन रिक्षानं. तू कशाला झोपमोड करून येतोस,' असा तिला सल्ला. पण हा आज्ञाधारक, विनम्र पुत्र रात्री दीडला झोपून पुन्हा पहाटे पाचला तिला आणायला जाण्यासाठी सज्ज झाला. सकाळी बरोब्बर पाचचा गजर लावला आणि त्यानुसार (गजर तसाच बंद न करता) उठलोही. कार घेऊन जाऊन आईला आपल्या मुलाच्या गाडीचा आनंद घेतल्याचं कृतकृत्यतेचं समाधान देण्यासाठी बाहू फुरफुरत होते. पहाटेची वेळ असूनही, सगळे नियम पाळून, नो-एन्ट्रीतून न घुसता टिळक रोडने स्वारगेटला गेलो. सकाळी उठल्यावर आईला फोन केला होता, पण कुठे थांबायचं ते सांगितलं नव्हतं. आणि नेमका मोबाईल घरी विसरलो होतो. "स्वारगेटला पहाटे पाच वाजता आईला आणण्याच्या किरकोळ कामात कशाला लागतोय मोबाईल,' असा (अति) शहाणपणाचा विचार केला नि तसाच स्वारगेटला रवाना झालो होतो. "गरज लागली तर बघू, कॉइन बॉक्‍सवरून करू फोन,' अशीही कल्पना डोक्‍यात होती.
"नटराज' हॉटेलच्या समोर गाडी लावली नि आई कुठे दिसतेय का, ते पाहू लागलो. त्या बसस्टॉपपाशी ती नव्हती. कदाचित समोरच्या शंकरशेठ रस्त्यावर गाडी थांबविली असेल, असं वाटलं म्हणून तिकडे गाडी घेऊनच गेलो. तिथल्या फूटपाथवर, बसस्टॉपपाशी कुठेच नव्हती. बीआरटीच्या नव्या रस्त्यामुळं भलामोठा वळसा घालून पुन्हा स्वारगेटला यावं लागलं. दुसऱ्या गेटपाशी थांबून पाहिलं. तिथेही ती नव्हती. मग गाडी तिथेच लावून स्टॅंडमधूनही चक्कर मारून आलो. कुठेच ती दिसली नाही. नेमके सगळे कॉइन बॉक्‍सही "पुणेरीपणा'ची साक्ष देत बंद होते. सगळीकडे भिरभिरून शेवटी घरी आलो. आई घरीही पोचली नव्हती.
मधल्या वेळेत तिचा माझ्या मोबाईलवर फोन येऊन गेला होता. ती कुठल्यातरी गेटच्या समोर उभी आहे आणि समोर गाड्या दिसताहेत, असं तिनं सांगितलं होतं. त्यावरून ती नक्की कुठे उभी आहे, याचा अंदाज येणं अवघड होतं. एरव्ही एवढंसं वाटणारं स्वारगेट मला यावेळी चक्रव्यूह किंवा अलीबाबाच्या गुहेसारखं गूढ, चमत्कारिक, प्रचंड वाटू लागलं होतं. मग घरूनच तिला फोन लावण्याचा प्रयत्न सुरू केला. पण फोन सातत्यानं "स्विच ऑफ'चा संदेश देत होता. फोन केल्यावर चुकून बटण जास्त वेळ दाबलं गेल्यानं स्विच ऑफ झाला असावा, असा अंदाज केला. मग पुन्हा गाडी घेऊन तिला शोधण्याच्या मोहिमेवर बाहेर पडलो. तोपर्यंत सव्वासहा वाजले होते.
आता स्वारगेटला जरा गर्दी वाढली होती. गाडी थांबवण्याची जागाही रस्त्यावरच्या टपरीचालकांनी आरक्षित केली होती. मी गाड्या आत जाण्याच्या मुख्य गेटपाशी जाऊन टेहळणी केली. आई सापडली नाही. पुन्हा स्टॅंडमधून चक्कर मारली. तीनही गेट तपासली. मग रस्ता ओलांडून पलीकडे पीएमटी बसस्टॉपपाशीही पाहिलं. कुठेच आईचा पत्ता नव्हता. आता मात्र थांबण्यात काही अर्थ नव्हता. तिचा फोनही लागत नव्हता आणि कुठे शोध घ्यावा, हेही कळत नव्हतं.
मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड तास वाया घालवल्यानंतर हाती काहीच लागलं नव्हतं. घरी येऊन निवांत झोपलो.
सात वाजता बेल वाजली. आई दारात होती. शेवटी ती शेअर रिक्षानं घरी पोचली होती.शब्दबाणांतून तिचा संताप आणि अगतिकता झेलल्यानंतर उलगडा झाला, की बीआरटीच्या स्टॉपवर गाडी थांबल्यानंतर ती तिथेच उभी राहिली होती. म्हणजे धड स्वारगेटच्या दारापाशी नाही, की रस्ता ओलांडून पलीकडच्या फुटपाथवर नाही. या दोन्ही ठिकाणी मी पाहिलं होतं. फक्त मधल्या बीआरटीच्या स्टॉपवर पाहायचं राहिलं होतं. तिला नेमकी तीच जागा मिळाली होती!मोबाईलबद्दलही माझा अंदाज चुकला होता. चार्ज केलेला नसल्यानं तिचा मोबाईल एकदा फोन केल्यानंतर बंदच पडला होता आणि तिनंही त्याच्याकडे ढुंकून पाहिलं नव्हतं!
कधी मोबाईल न वापरणारी ती, मुद्दाम पुण्याला एकटं येताना मोबाईल घेऊन आली, तरी व्हायचा तो घोटाळा झालाच होता!
---
मोबाईल नसतानाची, म्हणजे हर्षदाकडे मोबाईल नसतानाची एक आठवण तेवढीच सुरस आणि चमत्कारिक आहे.दोन-अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. डेक्कनला रविवारी संध्याकाळी काही खरेदीनिमित्त जायचं होतं. गाडी लावून येतो, असं सांगून हर्षदाला गुडलकच्या समोरच्या फुटपाथवर उभं राहायला सांगितलं होतं. मी गुडलकच्या बाजूला गाडी लावायला गेलो होतो. येईपर्यंत वेळ लागला. तोपर्यंत ही गायब! फूटपाथ धुंडाळला, दुकानं पालथी घातली, रस्ते निरखले, पण व्यर्थ! मग मला वेगळीच शंका यायला लागली. अगदी अपहरण, अपघात, सर्व विचार डोक्‍यात आले. आसपासच्या दुकानांत इथे काही विपरित घडले काय, याचीही चौकशी केली. काहीच माहिती मिळाली नाही.
शेवटी कंटाळून घरी परत आलो. तर हर्षदाबाई घरी हजर होत्या! मी तिला शोधलं होतं, त्याच ठिकाणी म्हणे तिनंही मला बराच वेळ शोधलं होतं. तरीही, आम्ही एवढ्याशा त्या रस्त्यावर एकमेकांना दिसलो नव्हतो! माझ्यासोबत असल्यानं तिनं पर्सही घेतली नव्हती. त्यामुळं फोन करायला तिच्याकडे पैसेही नव्हते. यावर फक्त कडाक्‍याचं भांडण, एवढाच एक संवादाचा मार्ग उपलब्ध होता!
---