Aug 23, 2010

राखी अमावस्या!

राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्‍वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो...
शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम्‌ पापम्‌' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच! "मैत्रीण' असणं वगैरे गोष्टी वर्ज्यच होत्या, साधं वर्गातल्या मुलीशी बोलणंही दुरापास्त होतं. शाळेच्या व्हरांड्यात मुलं-मुली घोळक्‍यानं गप्पा मारताहेत, एकत्र नाटकं-सिनेमे बघताहेत, टाळ्या देऊन खिदळताहेत, अशी दृश्‍यं पाहिली, की आपण शाळेत भोगलेल्या "नरकयातना' नको नको म्हणताना आठवतात.
आम्ही सातवीच्या वर्गात होतो. आमचा वर्ग जाम दंगा करायचा, त्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला एका बेंचवर एक मुलगा-एक मुलगी असं बसवण्यात आलं होतं. केवढा घोर अपमान, अन्याय वाटला होता आम्हाला तेव्हा! तेव्हा आम्ही एकमेकांशी घेतलेली खुन्नस, बेंचवर आखून घेतलेली हद्द वगैरे गोष्टी ब्लॉगवर लिहिल्या आहेतच.
वर्गात मुला-मुलींच्या जोड्या लावायची फॅशन होती. कुणी मुलगा एखाद्या मुलीच्या जागेवर बसला, की त्याला तिच्या नावानं चिडवलं जायचं. किंवा साधारणपणे मुलग्यांमधला हुशार क्रमांक एक आणि मुलींमधली हुशार क्र. 1, अशा क्रमानेही जोड्या लागायच्या. एकमेकांच्या नावांमधली सामायिक अक्षरं शोधून त्यानुसार जोड्या लावल्या जायच्या. शेजारी पाजारी किंवा एकाच भागात राहणाऱ्या मुलामुलींच्या जोड्या लावायला तर सोप्पंच होतं. एकाच भागात राहत असलो, तरी शाळेत एकत्र वगैरे जाण्याची सोयच नव्हती. साधं एखाद्या मुलीच्या मागून गेलो, तरी हा मुलगा आपल्या मागे लागलाय की काय, असा संशय या मुलींना यायचा. "दहशतवाद' त्या काळीही फोफावलेला होताच!
अशा चिडवाचिडवीला वैतागून मग त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे राखीपौर्णिमेचा "पवित्र' सण होता. आपल्याला ज्या नावाने चिडवलं जातं, त्या मुलाला राखी बांधली, की भानगडच मिटून जायची. मग कोण कशाला धाडस करतंय चिडवायचं? असे आगंतुक "भाऊराया' बनायला काही लोक अगदी उतावीळ असायचे, तर काहींच्या हृदयाची अगदी शंभर शकलं व्हायची.
वर्गातून गायब होऊन किंवा आवडत्या मुलीला टाळून या दहशतवादातून सुटण्याचा मार्ग होता. पण शाळेत होणाऱ्या सामूहिक रक्षाबंधनाचं काय? संघाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या गोंड्याच्या राख्या प्रत्येकाच्या हातावर दिसल्याच पाहिजेत, असा शाळेचा दंडक होता. जणू सगळ्या मुलींचा संभाव्य तेजोभंग टाळण्याचा घाऊक मक्ताच शाळेने घेऊन टाकला होता! जेवढी मुलं, तेवढ्या राख्या वर्गात मागवल्या जायच्या आणि मग प्रत्येकाला समोर बोलावून एकेका मुलीनं त्याच्या प्रेमभावनांच्या सामूहिक कत्तलीचा साग्रसंगीत सोहळा पार पडायचा! तरीही शक्‍यतो आपली आवडती मुलगी आपल्याला राखी बांधायला येऊ नये, म्हणून मुलं जागांची अदलाबदल, बेंचखाली दडून राहणं, वगैरे वगैरे उपद्‌व्याप करायचे. कश्‍शाकश्‍शाचा म्हणून निभाव लागायचा नाही.
अर्थात, राखी बांधून घेण्यातही एक गंमत होतीच म्हणा! आपल्याला मुलगी राखी बांधतेय, म्हणजे इतरांपेक्षा जास्त भाव देतेय, असाही एक सर्वमान्य समज होता. हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका, असंही एक गृहीतक होतं. त्यातून मुलीच्या नाजूक हातातून राखी बांधून घेताना होणारा अलगद स्पर्शही त्या वयात मनाला मोहरून टाकायचा, ही गोष्ट अलाहिदा! शिंगं फुटली, तशी राख्यांची जागा "फ्रेंडशिप बॅंड'नी घेतली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचेही पेव फुटायच्या आतच आम्ही कॉलेजातून बाहेर पडलो होतो!
मनगटांतील राख्यांची आणि अपवादात्मक परिस्थितीत फ्रेंडशिप बॅंडची सद्दी संपली आणि लग्नाच्या वेळी हातात बांधलेला हळकुंडाचा दोरा हातात बांधला. दुसऱ्या दिवशी तो उतरवला असला, तरी आयुष्यभराची बेडी हातात पडली ती पडलीच!

12 comments:

Maithili said...

Wow...खूपच मस्त झालय लेख....शेवट तर सहीच....!!! :)

Anonymous said...

Very good blog.

हेरंब said...

झक्कास.. शेवट सुरेखच..

loukika raste said...

nice one!
mala pan shewat aawadla :) sahi aahe!

loukika raste said...
This comment has been removed by a blog administrator.
सागर said...

झक्कास.. शेवट सुरेखच.. +1

सागर said...

झक्कास.. शेवट सुरेखच.. +1

◄♪♫ संदिप पाटील ♫♪► said...

भोगले जे दु:ख त्याला, सुख म्हणावे लागले

पंकज जाधव said...

खूपच सही आहे !!!! शाळेतील दिवस आठवले !!! जामखेड (जि. अ. नगर) मध्ये असताना, मुलींमधला रोले नंबर १ हि मुलांमधला रोल नंबर १ ला राखी बांधत असे !!!असा खेळ शेवटच्या रोल नंबर पर्यंत चालत असे, आणि बहुतेक वेळी आपल्याला आवडणाऱ्या मुली कडून राखी बांधण्याची वेळ मुलांवर येत असे !!!

लीना said...

खूपच छान झालाय लेख... माझे कॉलेजचे दिवस आठवले. फारच छान..

prajkta said...

punha shaletle te diwas najrsmor tarloon gele.

अभिजित पेंढारकर said...

"अरे! उद्या राखी-पौर्णिमा!' असा साक्षात्कार सोमवारी सकाळी अचानक झाला, हाताशी वेळ होता म्हणून हाणला एक ब्लॉग! विशेष प्रयोजन वगैरे काही नव्हतं. तरीही आठवणींच्या लडी एकामागोमाग एक उलगडत गेल्या. काही मुद्दे आधी येऊनही गेले होते, पण तरी लिहायला मजा आली. त्यापेक्षा जास्त मजा तुम्हाला वाचताना आलेली दिसतेय! असो. भरभरून प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद.