Jan 22, 2018

मी आणि माझा(ही!) शत्रुपक्ष


नमस्कार.
सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे `चौथी अ` यत्तेतल्या मुलानं बाईंनी लिहून दिलेलं आणि `योग्य जागी` छड्या मारून, घोटवून पाठ करून घेतलेलं भाषण प्रमुख पाहुण्यांसमोर घडाघडा म्हणून दाखवण्यासारखंच झालं, नाही? ``व्यासपीठावरील मान्यवर, माझे आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो...` असो!)

तर, सांगण्याचा उद्देश काय, की गोडबोले हे आडनाव असलं, तरी आडनावासारखं माणसानं वागायलाच हवं, असं नाही. वाघमारे आडनावाची माणसं घरात झुरळसुद्धा मारू शकत नसतात आणि हगवणे आडनावाच्या माणसांना कधीही पोटाच्या तक्रारी नसतात, तसंच हे. माझ्या आडनावासारखाच नावाचाही थोडासा घोळच आहे. तसं माझं पाळण्यातलं नावसुद्धा भास्कर. आई सांगते, की माझ्या जन्माच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होतं. खरंतर तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला जे ग्रहण लागलं, ते कायमचंच. पण तेही असो! आता सूर्यग्रहणाच्या दिवशी माझा जन्म होऊनसुद्धा माझं नाव `भास्कर` ठेवायची दुर्बुद्धी त्यांना का झाली, हे तो सूर्यदेवच जाणे! कर्णासारखा माझा जन्म सूर्याच्या आशीर्वादानं (म्हणजे पौराणिक सिरियलमध्ये सिनेमात दाखवतात तसं हातातून निघालेले किरण डायरेक्ट गर्भाशयात पोहोचून तिथे गर्भधारणा होते, तसं!) झालाय की काय, अशी शंका माझ्या मनाला लहानपणीच चाटून गेली होती, पण ती जाहीरपणे विचारली, तर वडिलांचा हात माझा गाल आणि लाथ माझा पार्श्वभाग चाटून जाईल, याची साधार भीती वाटल्यामुळे ती मनातल्या मनातच ठेवली, हे वेगळं सांगायला नको. माझ्या जन्मपत्रिकेत नावाचं आद्याक्षर `` होतं आणि त्यावेळी त्यांना हेच नाव योग्य वाटलं, असं वडील सांगतात. अर्थात, त्यानंतर वडिलांनी आणि जवळच्या सगळ्याच आप्तेष्टांनी भकारातल्या सगळ्या संस्कृत शब्दांचा माझ्यावर कायम मारा करावा, अशी वेळ मीच त्यांच्यावर आणली, ती गोष्ट वेगळी. तर, पाळण्यातलं नाव भास्कर. पण बारशाला जमलेल्या सगळ्याच साळकाया माळकाया पाळण्यात मुंडी घुसवूघुसवू, माझ्या कानात कुर्रर्र करून `भास्करsss भास्करsss` असं किरकिरायला लागल्या, तेव्हा मीच एका क्षणी ओरडून चिमखड्या बोलांत `आता बास कर!` असं म्हणालो आणि तेव्हापासून मला `कोटिभास्कर` असंच टोपणनाव पडलं, अशी आठवण आई सांगते. खरंतर बाळाचं नाव ठेवण्याचा जिचा हक्क असतो, त्या आत्यानं माझ्या कानात पहिल्यांदा कुर्रर्र करून नाव सांगितल्यानंतर प्रथेप्रमाणे तिच्या पाठीत गुद्दा घालायच्या वेळी कुणीतरी एवढ्या जोरात गुद्दा घातला, की आत्या कळवळून खाली कोसळली होती. स्वतः आत्यानंच मला हा किस्सा सांगितला आणि आईनं लग्नापासून तिला खायला लागलेल्या सगळ्या टोमण्यांचा हिशोब एकाचवेळी चुकता केला असणार, याची मला मनात खातरी झाली.

तर सांगण्याचा (पुन्हा) मूळ उद्देश काय, तर माझं टोपणनाव कोटिभास्कर असं झालं, ते तेव्हापासून. खरंतर आज मला जे सांगायचं आहे त्याचा आणि माझं नाव कशावरून पडलं आणि का, याचा काडीचाही संबंध नाही. पण एखाद्या पिंपळवाडी बुद्रुक गावातल्या सार्वजनिक मुतारीच्या उदघाटनाला आलेले प्रमुख पाहुणेसुद्धा त्यांच्या भाषणाची सुरुवात जागतिक तापमानवाढीच्या परिणामांपासून करतात, तेव्हा त्या भाषणाला जसं वजन येतं ना, तसंच हे. गोडबोले आडनावाच्या माणसालासुद्धा कितीतरी शत्रू असू शकतात, हे सांगण्यासाठी एवढा द्राविडी प्राणायाम करावा लागला. आता मूळ मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे माझा(ही!) शत्रूपक्ष!

आळस हा माणसाचा खरा शत्रू आहे, असा सुविचार आमच्या शाळेच्या दारावर लिहिलेला होता. आमचे मास्तर वर्गावर येऊन त्यांच्या खुर्चीत तास दोन तास ठिय्या देऊन बसायचे आणि रोज स्वतःचं बूडही न हलवता एखाद्या मुलाला फळ्यावर नवा सुविचार लिहायला सांगायचे, तेव्हाच या सुविचाराचा खरा अर्थ कायमचा माझ्या मनात बसला होता. ते सुविचारसुद्धा थोरच असायचे. नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये, `आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते,` `मित्र परीसासारखे असावेत, म्हणजे आयुष्याचे सोने होते,` `यशामध्ये नशीबाचा भाग एक टक्का आणि परिश्रमाचा भाग 99 टक्के असतो,` `मनाचे दरवाजे कायम खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कधी कुठून येईल, सांगता येत नाही.` वगैरे वगैरे.

फळ्यावरचे सुविचार रोज बदलत असले, तरी मुख्य दरवाज्यावरचा सुविचार कायम असायचा - `आळस हा माणसाचा शत्रू आहे.` मला तर वाटतंय, की शाळेतले इतर शिक्षकसुद्धा कंटाळा म्हणूनच हा सुविचार बदलत नसावेत. बरं, सद्बुद्धी, परीसारखे मित्र, आळस हा शत्रू वगैरे सगळं घोटवून आयुष्यात फरक काहीच पडला नाही. म्हणजे मुख्याध्यापक किंवा बाहेरचे पर्यवेक्षक शाळेवर तपासणीसाठी आले, की आपल्या वर्गातल्या मुलांना सगळं येतं, असं मास्तर दडपून सांगायचे, तेव्हा ते खोटं बोलतायंत, हे त्यांना स्वतःला माहीत असायचं आणि पाहुण्यांनाही! गेला बाजार काही क्षणांसाठी आपल्याला खरंच सगळं येतं, असं वाटून आमची कॉलर काही काळासाठी ताठ व्हायची. परीसासारखे वाटणारे जे मित्र जवळ केले, ते काळोत्री दगडच निघतील, याची तेव्हा कल्पना नव्हती आणि आली, तेव्हा खूप उशीर झाला होता. `यशामध्ये नशीबाचा वाटा एक टक्के आणि परिश्रमाचा 99 टक्के असतो,` हे परीक्षेत दरवर्षीच लक्षात यायचं. आम्ही ज्या ज्या म्हणून संभाव्य उत्तरांच्या कॉप्या खूप परिश्रम घेऊन, कुठे कुठे लपवून परीक्षेच्या वेळी घेऊन जायचो, त्यातला कुठलाच प्रश्न पेपरमध्ये विचारला न जाणं, हेच आमच्या नशीबी असायचं!
`आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते,` याचा धडा मात्र शाळेच्या उत्तरार्धात मिळाला. आमचे गणिताचे लाडके कानविंदे सर शाळेत नव्यानेच शिकवायला आलेल्या खानविलकर बाईंबद्दलच्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलायला लागले, तेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली आणि खानविलकर बाईंची वेगळ्या शाळेत बदली केली, तेव्हा कानविंदे आणि खानविलकर बाई दोघांनाही भावनांना आवर घालून कर्तव्यच श्रेष्ठ मानावं लागलं होतं.
थोडक्यात, `सुविचार हाच माणसाचा खरा शत्रू आहे`, हाच सुविचार मनाच्या गाभाऱ्यात कायमचा कोरला गेला. शाळेनंतर काही सुविचारांशी फारसा संबंध आला नाही. कॉलेजमध्ये आणि नंतर पोटासाठीची वणवण करताना कुविचारांचाच प्रभाव जास्त राहिला असावा. त्यांची पुन्हा भेट झाली, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. फेसबुक आणि व्हॉटस अप सुरू झाल्यापासून जणू `शहाणे करून सोडावे अवघे विश्व` असा ध्यास घेऊन रोज कुठून कुठून शोधून सुप्रभात, सुदुपार, सुसंध्याकाळ, शुभरात्र अशा संदेशांबरोबर सुविचार पाठवणाऱ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला. बरं, हे सुविचारकर्ते एवढे भाषातज्ञ असतात, की सगळे विद्यावाचस्पती, भाषाभ्यासक, तर्कतीर्थ वगैरे त्यांच्यासमोर झीटच येऊन पडावेत! `साखरेची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते, पण स्वभावातील गोडी मात्र मनात कायमचं घर करून जाते.` आता यात `करून`च्या ऐवजी `करुण` लिहिलेलं असतं आणि मग आपला चेहरा करुण होतो.

हे सुविचार तयार करणाऱ्यांनी निसर्गातल्या सगळ्या घटकांना वेठीला धरलेलं असतं. चंद्र, सूर्य, नदी, झरे, डोंगर, दऱ्या, इंद्रधनुष्य, पालवी, कोंब, धुमारे, पशू, पक्षी, गुरंढोरं, सगळेच्या सगळे ह्यांच्याकडे आयुष्यभरासाठी वेठबिगार असल्यासारखे राबत असतात.
`ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.`
म्हणजे?
ढगाआड गेलेल्या सूर्याचा आणि आईचा काय संबंध? उद्या म्हणाल, की `कंबरेतून निसटलेली चड्डी पुन्हा घालता येते, पण हातातून निसटलेली वेळ परत मिळत नाही.` ह्या दोन्हीचा काय संबंध?

`प्लंबर कितीही निष्णात असला, तरी तो डोळ्यांतून वाहणारं पाणी रोखू शकत नाही.`
अरे?
याचा काय अर्थ घ्यायचा? म्हणजे प्लंबरनी यापुढे डोळ्यांतलं पाणी थांबवण्याचं तंत्रही शिकून घ्यायला हवं? की ज्यांच्यामुळे आपल्या डोळ्यांत पाणी येतं, त्यांनी प्लंबिंग शिकून घ्यायचं? की डोळ्यांतून पाणीच येऊ नये, म्हणून संशोधकांनी वेगळं शास्त्र शोधून काढायचं?

असे सुविचार थांबवण्याचे प्रयत्न करून करून माझ्याच डोळ्यांत पाणी यायला लागलं आणि ते थांबवण्यासाठी कुणी प्लंबरही मिळेना, तेव्हा मी सोशल मीडियावरूनच रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं आणि तो एक शत्रू कायमचा लांब गेला.

सुविचारांबरोबरच दुसरी एक गंभीर आजाराची साथ असते, ती म्हणजे HBD आणि RIP ची. शाळेत आणि इतर कुठेही एकमेकांना हाक मारताना बापाच्या नावाचा उद्धार करणारे जवळचे मित्रसुद्धा कुणा ओळखीच्या व्यक्तीच्या जराजर्जर झालेल्या, आता आयुष्यात काही बघायचं बाकी न उरलेल्या एखाद्या पणजी किंवा पणज्याचं निधन झाल्यानंतरही RIP मेसेजचा एवढा महापूर त्या ग्रुपवर आणतात, की खरंच त्यानं यमालासुद्धा पाझर फुटून त्यानं त्या पणज्याचे प्राण परत करावेत! तीच गत एचबीडीची असते. पूर्वीतर मला एचबीडी म्हणजे `घोडा छाप बिडी`, `55 नंबर बिडी`सारखंच काहीतरी वाटायचं. या शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म कळेपर्यंत आमचा फॉर्म निघून गेला होता.
एकानं दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच थोडीफार पानंफुलं बदलून आणि एखादा शब्द इकडचा तिकडे करून बाकीचे दोनशे मेंबरही त्याच ग्रुपवर देतात, तेव्हा त्या सत्कारमूर्तीलाही गुदमरून जायला होत असणार. माझ्या एका व्हॉटस अपवर नव्यानेच आलेल्या मित्रानं दुसऱ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अशीच पानाफुलांची कलाकुसर करून भल्या पहाटे त्याला ग्रुपवर RIP अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या, तेव्हा ग्रुपवर हलकल्लोळ उडाला. व्यक्तीचा वाढदिवस असेल तेव्हा HBD म्हणायचं आणि लग्नाचा वाढदिवस असेल, तेव्हा RIP म्हणायचं, असं ब्रह्मज्ञान त्याला कुणीतरी दिलं होतं किंवा त्याचं त्यानं सोशल मीडियावरून मिळवलं होतं. RIP कधी म्हणतात, हे त्याला समजेपर्यंत त्याला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली होती!

माझा दुसरा आणि महत्त्वाचा शत्रू म्हणजे कोडी घालणारे लोक. हे लोक कायम दुसऱ्यांना (म्हणजे बहुतेक वेळा आपल्यालाच!) वेगवेगळी कोडी घालत असतात! ते दिवसाच्या कुठल्याही वेळी, कुठल्याही मोसमात आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरत असतात आणि इकडे आल्यावर अचानक आपल्यासमोर येऊन टपकतात. त्यांनी केलेली नवीन खरेदी त्यांना आपल्याला दाखवायची असते. बरं ती कोरी करकरीत गाडी असो किंवा लेंग्याची नाडी, ते तेवढ्याच उत्साहानं आपल्याला दाखवतात. आपल्याला ती बघण्यात नाडीचाही...म्हणजे, काडीचाही इंटरेस्ट नसतो. पण ती बघण्यातून आपली सुटका होत नाही. बरं, ती उत्साहानं दाखवून झाल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न असतो, `कुठून घेतली असेल, ओळख?` आता आपण भीतभीत माहीत असलेल्या जवळपासच्या दुकानांची, ठिकाणांची नावं सांगतो, पण ते हसत, एक पाय हलवत माना उडवत राहतात. `कसा गंडवला!` असे उर्मट भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. बरं, नक्की काय सांगावं, हा खरंतर पेचच असतो. म्हणजे आपण नाक्यावरच्या दुकानातून घेतली, असं म्हणावं, तर तो म्हणतो, ``ह्या! काय राव, इज्जत काढतोस का? पॅरिसवरून आणलेय!`` आता पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर फेरीवाले `दस का तीन`, `दस का तीन` किंवा `रस्ते का माल सस्ते में` असं ओरडून लेंग्याच्या नाड्या कशा विकत असतील, हेच चित्र माझ्या डोळ्यांसमोर येतं. बरं, आपण एखाद्या मोठ्या ठिकाणाहून घेतली असं म्हटलं, तर तो म्हणणार, ``फॉरेनवरून आणलेय, असंच वाटतंय ना? अरे, आपल्या पुढच्या चौकातल्या किराणाच्या दुकानातून घेतली!`` प्रत्यक्षात ती जुन्या बाजारातून घेतलेली असते, ही गोष्ट वेगळीच!

जी पद्धत ती वस्तू कुठून घेतली हे ओळखण्यासाठी, तीच वस्तूची किंमत ओळखण्यासाठी. आता एकवेळ वस्तूची किंवा त्या माणसाची लायकी ओळखून त्यानं ती कुठून घेतली असेल, याचा आपण अंदाज करू शकतो. पण ती किती किमतीला घेतली, हे कसं काय बुवा ओळखणार? बरं, या बाबतीत त्यानं प्रत्यक्ष मोजलेल्या किंमतीपेक्षा आपण जास्त सांगावी, अशी त्याची अपेक्षा असते. मग आपणच त्या वस्तूची साधारण किंमत काय असेल, याचा अंदाज लावून त्याच्यापेक्षा मुद्दाम वाढवून सांगायची. `शंभर..?` असं आपण म्हणायचं. मग तो चकारार्थी उच्चार काढून खुशीत नकार देतो. मग आपण घासाघीस केल्यासारखी किंमत थोडी कमी करायची. `नव्वद?`` मग तो पुन्हा चकारार्थी उच्चार काढून मान उडवणार. आपण आपली कशी फजिती होतेय, असा अभिनय करायचा आणि शेवटची बोली लावायची. म्हणजे तो त्यापेक्षा आपण कशी स्वस्त घेतली, हे सांगून शेखी मिरवणार. आता ह्यात गंमत अशी असते, की तीनवेळा सांगायची ही किंमत त्याच्या मूळ किंमतीच्या खालीही येऊन चालत नाही. नाहीतर त्याचा पोपट व्हायचा. त्याला आपण जिंकल्याची भावना कायम राहील आणि आपणही तोंडघशी पडणार नाही, अशी ही तारेवरची कसरत करत, त्याची अशी कोडी झेलत राहावं लागतं.

स्वतःहून काहीतरी वेगळं करणारे किंवा करून मिरवणारेही माझे एक नंबरचे शत्रू असतात. मुख्य म्हणजे काहीतरी करून त्यांचं भागत नाही. त्यांना ते सेलिब्रेट करायचं असतं. `हॅविंग बटाट्याची भाजी and अळवाचं फदफदं @ अण्णाची खानावळ` हासुद्धा त्यांच्यासाठी अभिमानाने मिरवण्याचा स्टेटस असतो. बरं, अशा पोस्ट करून वर ते आपल्याला त्यात टॅग करत असतात. जेवणाचं सोडा, पण लोक हनीमूनला गेल्यानंतरही `हॅविंग फन ऑन हनीमून विथ डिअर अमूकतमूक and 17 अदर्स` असली काहीतरी भयंकर पोस्ट करून हलकल्लोळ उडवून देतात.
पुण्यात तर सवाई गंधर्व महोत्सव आणि त्यापाठोपाठ आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) ला जाणे, हा एक असाच असाध्य आणि गंभीर आजार आहे. या आजाराची साथ चटकन पसरते आणि त्यावर उपायही करायला कुणी तयार होत नाही. कधीकधी तर ज्यांनी उपाय करायचा, तेच स्वतः आजार पसरवण्यात पुढाकार घेत असतात. कुंपणानंच शेत खाल्लं तर दाद मागायची कुणाकडे? दरवर्षी हिवाळ्यात होणारा सवाई गंधर्व महोत्सव आणि आता `पिफ` ही तुम्ही सुज्ञ, सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत, सुविद्य पुणेकर असल्याची पोचपावती आहे. पुणेकरांकडे एकवेळ आधार कार्ड नसलं तरी चालेल, पण `सवाई`ची तिकिटं आणि `पिफ`चे पास असणं अनिवार्य असतं. सवाई महोत्सवात कुणीही गाणार असो, त्याची वेळ आणि काळ कुठलाही असो. सीझन पास काढून रोज वेळेच्या आधी तिथं हजर राहणं आणि आपण हजर असल्याचं ओळखीच्यांना आवर्जून दाखवणं, हे केल्याशिवाय पुण्याचं नागरिकत्व मिळत नाही, अशीच या लोकांची समजूत असते. स्टेजवर गायन चालू असो की वादन, मंडपात शांतपणे झोप येईल, असा कोपरा शोधून तीच जागा धरून बसण्याचं कसब काहीजणांना साधलेलं असतं. काही अतिउत्साही प्रेक्षक त्या त्या गायकाची ही शेवटचीच मैफल असल्यागत त्याच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून घेत असतात, तेसुद्धा स्पीकरला आपल्या जवळचा मोबाईल चिकटवून. त्या गायकाच्या गाण्यांची सीडी किंवा डीव्हीडी विकत घेणं, हे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसं नसावं, किंवा त्याचा बडेजाव करता येत नसावा.
काहीजण तर सवाई गंधर्व महोत्सवाकडे संगीत महोत्सव म्हणून न पाहता खाद्य महोत्सव म्हणूनच बघत असतात. ``आज अमका गायक तमक्या वेळेला गाणार आहे,``यापेक्षाही कुठल्या स्टॉलवर वडा चांगला मिळतो, कुठला पाणीपुरीवाला त्याच्याकडच्या पवित्र लोट्यांतलं गंगाजलच पुरीबरोबरच्या पाण्यासाठी वापरत असतो, कुठल्या डोसेवाल्याकडे काय स्वस्त आहे, याबद्दल त्यांनी प्रगाढ संशोधन केलेलं असतं.
कुणीही गायक कुठल्याही प्रकारचं आणि दर्जाचं गाणं गात असो, ते आपल्याला समजत असो किंवा नसो, आकडी आल्यासारख्या माना डोलावण्याचं काम ते इमाने इतबारे करत असतात. अनेकदा तर ही खरंच दाद आहे, की झोपेमुळे आलेली डुलकी, हे कळायला मार्ग नसतो.
`पिफ`ला जाणाऱ्यांची तर तऱ्हाच वेगळी असते. आपण सिनेमा बघायला नव्हे, तर त्या दिग्दर्शकांना कसं काही कळत नाही, हे सांगायला आलो आहोत, अशा तोऱ्यात येणारे काहीजण असतात. त्यांना सिनेमा समजून घ्यायचा नाही, तर आपल्या जवळच्यांना (त्यांनी न विचारताही!) समजून सांगायचा असतो. दहावीनंतर काही मुलं हुशार मुलांनी सायन्स घेतलं, म्हणून आवड नसतानाही तिकडे जाणारी असतात ना, तसंच इथे `पिफ`च्या काही प्रेक्षकांचंही असतं. आपण कशातही मागे नाही, आपणही आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे अभ्यासक आहोत, हे दाखवण्यासाठी जाणारे काहीजण असतात.
काहीजण मात्र `कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या`च्या चालीवर कमी पैशांत जास्तीत जास्त सिनेमे बघायला मिळणार, याच अपेक्षेने आलेले असतात. अगदी ऑस्कर विजेत्या चित्रपटांपासून `तू माझी करवली, मी तुला पटवली`पर्यंत त्यांची अफाट रेंज असते. भस्म्या रोग झालेल्या माणसाला जसं समोर दिसेल ते खावंसं वाटतं, तसंच ह्यांना समोर दिसेल तो सिनेमा बघावासा वाटतो. थिएटरमध्ये संपूर्णपणे डोक्यावरून गेलेला सिनेमा कसा ग्रेट होता, हे बाहेर आल्या आल्या समोर दिसेल त्याला सांगण्यातही हे लोक वाकबगार असतात. त्या दिग्दर्शकालाही माहीत नसतील किंवा अभिप्रेत नसतील, असे फ्रेम्सचे अर्थ आणि आशय ह्यांना माहिती असतो.

कधीकधी वाटतं, की आपला सगळ्यात मोठा शत्रूपक्ष म्हणजे आपण स्वतःच आहोत. आपला खरा शत्रू ओळखता न येणं, ही सगळ्यात मोठी कमजोरी मानली जाते. पण मला तर माझे शत्रूपक्ष कोणकोण आहेत, हे पक्कं ओळखता आलं आहे. त्यांची लक्षणं, त्यांच्या तऱ्हा, आपल्यावर हल्ला करण्याच्या पद्धती, त्याचे परिणाम, सगळं सगळं माहीत झालंय. तरीही या शत्रूपक्षाला टाळता येत नाही, त्यांना आयुष्यातून बाजूला काढण्याचा धीर होत नाही. म्हणजे माझा स्वतःचा शत्रू मीच नाही का? पण मग मी विचार करतो, की अशा प्रकारे सात्त्विक त्रास देऊन छळ करणारे हे लोक आसपास आहेत, म्हणून तर आयुष्य जगण्याची उमेद, उत्साह टिकून आहे. या छळातून सुटका करण्याचे रोज नवे मार्ग शोधण्याची जिज्ञासा आणि हुरूप कायम आहे, म्हणून तर आयुष्य पुढे जातंय...मग मी शांत होतो आणि माझ्या या शत्रूपक्षाला कडकडून मिठी मारायला पुन्हा नव्याने सज्ज होतो!

-          अभिजित पेंढारकर.
-          (पूर्वप्रसिद्धी : रविवारची जत्रा दिवाळी अंक, 2017.)

दुःस्वप्न


सहा अजून वाजायचे होते. निरंजन झोपेतून जागा झाला, तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला होता.

``काका...काका कसे आहेत?`` त्यानं अंजलीला विचारलं.

``कोण काका?`` त्याची ती अवस्था बघून ती जरा घाबरलीच होती.

``अगं कोण काय? आपले भालेराव काका!`` तो उगाचच तिच्यावर डाफरला. अजूनही तो भीतीने थरथरत होता.

``त्यांचं काय?``

``त्यांची तब्येत कशी आहे आता... ? तुला भेटले का ते? किती वाजले आत्ता...?``

तो सैरभैर झाल्यासारखं करत होता.

``तुला काही वाईट स्वप्न वगैरे पडलं होतं का?`` तिनं त्याला पाणी दिलं. एका दमात ते पाणी घटाघट संपवून तो म्हणाला, ``हो. खूप वाईट स्वप्न. जे कधीच खरं होऊ नये, असं स्वप्न. ``

``कसलं स्वप्न? तू नीट काही सांगशील का? `` ती आता जराशी वैतागली होती.

त्यानं आधी भानावर येण्यासाठी आणखी काही मिनिटं घेतली. स्वप्नातल्या घटनांची संगती कशी लावायची, त्या घटना नक्की कशा सांगायच्या, हे त्याला सुचत नव्हतं. नेमक्या क्रमाने सगळं स्वप्न आठवतही नव्हतं. मात्र काहीतरी वाईट दिसलं होतं, एवढं नक्की. त्याची अवस्था बघून अंजलीसुद्धा घाबरली होती.

``तुला बरं वाटतंय का? पडतोस का आणखी थोडा वेळ?``

``नाही...नको!`` त्यानं एकदम तिचा हात झिडकारला. आपल्या विचित्र वागण्याचं आता त्यालाही वाईट वाटायला लागलं होतं. काही वेळानं तो सावरला.

``भालेराव काका दिसले मला स्वप्नात. ते कुठल्यातरी विचित्र संकटात सापडले होते...`मी आता वाचत नाही....मी आता जाणार...` असं आर्तपणे सांगत होते...त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. मी समोरच होतो, पण मला त्यांना वाचवण्यासाठी काहीच करता येत नव्हतं.`` एवढं सांगून निरंजन थांबला. त्याला पुढे बोलवेना.

``काका तुला भेटले का सकाळी?`` काही वेळानं त्यानं पुन्हा अंजलीला विचारलं.

``नाही रे. आज मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेच नाहीये मी. ``

``आत्ता कुठे असतील भालेराव काका? ``

``असतील की त्यांच्याच घरी! ``

निरंजन ताडकन उठला आणि तडक घराबाहेर पडला.

``अरे, निदान तोंड तरी...`` ही अंजलीची हाक हवेत विरून गेली.

...

 

भालेराव काकांचं घर आलं आणि निरंजन तीरासारखा घरात घुसला. त्याला जी भीती वाटत होती, ती सुदैवानं खोटी ठरली होती. समोरच भालेराव काकांना आरामात पेपर वाचताना बघून त्याला हायसं वाटलं. त्याच्या मनावर असलेलं प्रचंड दडपण कमी झालं. तो एकदम त्यांच्या पायापाशी बसला आणि एवढा वेळ रोखून धरलेले अश्रू त्याच्या डोळ्यांतून घळाघळा वाहू लागले.

``निरंजन, अरे झालं काय तुला? असा रडतोयंस का?`` भालेराव काकांनी विचारलं, पण पुढची काही मिनिटं निरंजन काहीच बोलू शकला नाही.

``काका, वेडा आहे मी...आज स्वप्नात जे काही बघितलं, ते खूप वाईट होतं...तुम्ही खूप चांगले आहात काका. तुम्हाला काही होणार नाही!`` धीर एकवटून तो बोलला.

नक्की काय झालंय, काकांना कळेना. निरंजनचा रडवेला चेहराही त्यांना पाहवत नव्हता. एरव्ही निरंजन हा कायम हसतमुख, सगळ्यांशी मिळून मिसळून असलेला, हरहुन्नरी प्राणी. त्याच्या चेहऱ्यावर अशी उदास छटा काकांनी कधीच पाहिली नव्हती. त्याला उगाच कुठल्याही कारणावरून दुःखी होतानाही कधीच अनुभवलं नव्हतं. उलट कुणी अडचणीत असेल, काळजीत असेल, तर त्याला धीर द्यायला निरंजन कायम पुढे असायचा. त्यामुळेच तो सोसायटीत लोकप्रिय होता. त्याचं आणि अंजलीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं, तेव्हासुद्धा सोसायटीनं उत्साहानं आणि कौतुकानं सगळा सोहळा पार पाडला होता. सोसायटीच्या घरचं कार्य असल्यासारखं वातावरण त्यावेळी होतं. आज मात्र निरंजन हा रोजचा निरंजन नव्हताच. तो अतिशय उदास, हताश, भेदरलेला वाटत होता. त्या स्वप्नानं त्याला हैराण केलं होतं. त्याचे रोजच्या परिचयातले भालेराव काका संकटात असल्याचं स्वप्न! बरं, सगळ्यांशी प्रेमानं वागणारे, सोसायटीच्या कामांमध्ये हौसेनं सहभागी होणारे, साठीतही उत्तम तब्येत टिकवून असलेले भालेराव काका कुठल्यातरी संकटात आहेत, मदतीसाठी आर्त साद घालतायंत, असं स्वप्न अचानक निरंजनला का पडावं? आत्तापर्यंत त्याला अशी विचित्र, अनाकलनीय स्वप्नं कधीच पडली नव्हती. मग आजच काय झालं होतं? त्यालाही कळत नव्हतं.

निरंजनने बसल्या बसल्याच थोडा विचार केला, तेव्हा त्याला लक्षात आलं, की कालच आपलं भालेराव काकांशी कुठल्यातरी किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. तो ऑफिसमधून आल्या आल्या सोसायटीच्या दारातच काकांनी काहीतरी वादाचा विषय काढला होता आणि साध्या गप्पांचं रूपांतर एकदम भांडणात झालं होतं. त्या रागातून निरंजन त्यांना काहीतरी ताडकन बोलला होता. त्याचं मन त्याबद्दल त्याला खात होतं. अर्थात, हा राग भालेराव काकांवरचा नव्हता, तर त्याच्या बॉसवरचा होता. ऑफिसमधला तणाव, दगदग अशी चुकून काकांवर निघाली होती. एरव्ही अंजली या रागाची हक्काची धनी होती. संध्याकाळी काकांशी भांडण झालं आणि त्याच रात्री काका संकटात असल्याचं त्याला स्वप्न पडलं. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध असावा का? काकांशी काहीतरी वाजलं म्हणून त्यांच्या बाबतीत काहीतरी विपरित घडावं, असं आपल्याला वाटलं का? मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं म्हणतात. मग काकांना असं काहीतरी व्हावं, असं आपल्याला खरंच मनातून वाटत होतं का?

निरंजनचं डोकं सैरभैर झालं.

काका समोर बसले होते, तरी ते सुखरूप आहेत, याबद्दल त्याचा विश्वास बसेना. त्यानं पुन्हा एकदा तशी खात्री करून घेतली, काल घडलेल्या प्रकाराबद्दल काकांची पुन्हा पुन्हा माफी मागितली आणि तो तिथून निघाला.

दिवसभर निरंजनचं कामात लक्ष नव्हतंच. राहून राहून त्याला ते स्वप्न आठवत होतं. त्याची उकल करण्याचा तो प्रयत्न करत होता. पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्नं खरी होतात म्हणतात. हो...पहाटच होती ती. प्रचंड घाबरून निरंजन उठला, तेव्हा बाहेर झुंजुमुंजू झालं होतं. अर्थात, ते फक्त स्वप्नच होतं. कारण सकाळी उठून तो स्वतः भालेराव काकांना भेटला होता. त्यांची तब्येत उत्तम असल्याची खात्री त्यानं स्वतः करून घेतली होती. मनातल्या विचारांचा कल्लोळ निरंजनने मोठ्या हिमतीने शांत केला आणि पुन्हा एकदा ऑफिसच्या रुक्ष कामात डोकं खुपसलं.

दिवसभर अंजलीसुद्धा सतत निरंजनच्या संपर्कात होती. त्याची सकाळची अवस्था तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे इतरवेळी निरंजन ऑफिसमध्ये असताना त्याला फोन करणं अंजली टाळत असे. आज मात्र ती उगाचच निमित्त काढून त्याला दिवसभरातून दहावेळा फोन करत होती. अगदी डबा खाण्यापासून ते `वेळेत घरी ये`पर्यंतची आठवण करून देत होती. निरंजनलासुद्धा तिची काळजी आणि तिच्यातला बदल समजला होता, पण त्यानं ते फारसं मनावर घेतलं नाही. त्यालाही परिस्थितीची जाणीव होतीच.

 

दिवस सुरळीत पार पडला.

संध्याकाळी निरंजन ऑफिसमधून नेहमीच्या वेळी घरी आला, तेव्हा मात्र त्याला सोसायटीच्या दारात गर्दी दिसली. बरेच लोक जमले होते आणि सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. थोडं पुढे जाऊन निरंजनने अंदाज घेतला, तर ही सगळी गर्दी भालेराव काकांच्या घरासमोरच झालेली दिसली. आज दुपारीच भालेराव काकांचा अचानक मृत्यू झाला होता. कधी नव्हे ते सकाळच्या ऐवजी दुपारी उशिरा अंघोळीला गेले आणि गॅस गिझर सुरू केला, पण बहुतेक नळीतून गॅस बाहेर पडत होता. बाथरूममध्ये गॅस कोंडून राहिला आणि काकांना बाथरूमच्या बाहेरच पडता आलं नाही. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असणार, हेसुद्धा स्पष्ट जाणवत होतं. मात्र तिथेच दारापाशी गुदमरून ते मरून पडलेले आढळले होते.

ही बातमी समजल्यावर निरंजन जागच्या जागी कोसळला. सकाळी ज्या काकांशी आपण गप्पा मारल्या, त्यांच्या खुशालीची चौकशी केली, त्यांच्याबद्दल पाहिलेलं स्वप्न त्यांना सांगून माफी मागितली, ते काका अचानक दुपारी गेले. म्हणजे आपल्याला पडलेलं स्वप्न नक्कीच खरं होतं तर! नाही, पण हे कसं शक्य आहे? स्वप्नाचा आणि वास्तवाचा काय संबंध? हा नक्कीच योगायोग असणार. आत्तापर्यंत कधी कुणी गॅसमुळे गुदमरून मेलेलं नाही? अशा प्रकारे धडधाकट माणूस अचानक गेल्याची ही काय पहिलीच वेळ आहे? नाही नाही...पण ज्याच्याबद्दल काहीतरी स्वप्न पडलं, तोच माणूस गेल्याची ही नक्कीच पहिली वेळ होती. आणि त्यांचा जीव धोक्यात असल्याचं स्वप्न फक्त आपल्याला पडलं होतं.

पुढचे दोन आठवडे निरंजन अस्वस्थ होता. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. भालेराव काका गेले, त्या पहाटे आपल्याला हे असं वाईट स्वप्न पडलं होतं, हे कुणाला सांगायचं धाडसही त्याला झालं नव्हतं. अंजलीला मात्र त्याची अवस्था कळत होती. त्याच्याबद्दल तिला काळजी वाटत होती. भालेराव काकांशी त्याचं जवळचं नातं होतं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या दुःखाचा त्यानं स्वतःला त्रास करून घेऊ नये, एवढंच तिला वाटत होतं.

सुदैवानं अंजलीचे प्रयत्न आणि तिच्या सदिच्छा उपयोगी पडल्या. निरंजन हळूहळू ती घटना विसरून गेला, त्याच्या मनावरचं दडपण दूर झालं. कामात त्याचं लक्ष लागायला लागलं आणि आता तो नॉर्मल वागू लागला. भालेराव काका जाऊन आता जवळपास महिना झाला होता. त्यानंतर निरंजनला पुन्हा कुठलं दुःस्वप्नंही पडलं नव्हतं. त्या दिवशी जे घडलं, तो एखादा विचित्र योगायोग असावा, असं समजून त्यानं ती कटू आठवण मनातून दूर करण्याचा प्रयत्न केला.

...

एक महिना उलटून गेला आणि एके दिवशी पहाटे पुन्हा निरंजन खडबडून जागा झाला. त्याचं अंग घामानं डबडबलेलं होतं. त्याला पुन्हा तसंच स्वप्न पडलं होतं...बरोब्बर एक महिन्यापूर्वी पडलेलं. यावेळी त्याला स्वप्नात त्याचा जीवलग मित्र आणि सहकारी राकेश दिसला होता. निरंजन पहिल्यापेक्षा जास्त हादरला. गेल्यावेळी त्याला भालेराव काका दिसले होते. ते अगदीच म्हातारे नसले, तरी त्यांचं वय झालेलं होतं. आयुष्याचे सगळे टप्पे बघून झाले होते. राकेश अगदी तरुण होता, जेमतेम पस्तिशीचा. त्याच्याएवढाच. त्याला अजून बरंच आयुष्य बघायचं होतं. त्याचा मुलगा नुकताच पाच वर्षांचा झाला होता. रोज मुलाची वेगवेगळी कौतुकं सांगताना राकेशचा उत्साही चेहरा आणखी फुलत असे. निरंजनला क्षणार्धात हे सगळं आठवलं आणि त्याला पुन्हा प्रचंड अपराधी वाटायला लागलं. अंजलीला त्याच्यातला हा बदल जाणवला आणि गेल्यावेळसारखी शंका पुन्हा मनात दाटून आल्यामुळे तिचा चेहराही चिंताक्रांत झाला. तरीही धीर एकवटून तिनं स्वतःला सावरलं, काय झालंय, हे निरंजनला विचारलं.

``तेच स्वप्न...यावेळी राकेश दिसला मला स्वप्नात. तो संकटात होता. अंजली, मला भीती वाटतेय गं.`` निरंजन थरथरत होता.

``घाबरू नकोस, काही होणार नाही. गेल्यावेळी जे झालं, तो फक्त एक योगायोग होता. आणि अशी विचित्र स्वप्नं पडतात. आपल्याशी काहीही संबंध नसलेली माणसं स्वप्नात दिसतात. विचित्र परिस्थिती दिसते, प्रत्यक्षात तसं काही होत नसतं. सगळे मनाचे खेळ असतात. `` अंजलीनं त्याही परिस्थितीत त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला खरा, पण तीसुद्धा जराशी घाबरूनच गेली होती.

निरंजन अंथरुणातून उठला. अस्वस्थपणे स्वयंपाकघरात जाऊन त्यानं पाणी प्यायलं. हॉलमध्ये येरझारा घातल्या. उगाचच गॅलरीत डोकावून आला. तरीही त्याला चैन पडत नव्हतं.

``आज तारीख काय आहे?`` त्याला एकदम आठवलं.

``अठरा. का?`` अंजलीला तो काय बोलतोय कळत नव्हतं.

``आणि तिथी?``

``तिथी? ``

``तिथी गं...! मराठी तिथी...! ``

``मला नाही माहीत. बघावं लागेल. ``

``कॅलेंडर कुठाय? `` त्यानं धडपडत कॅलेंडर शोधलं. आजची तारीख बघून तो हादरला. आणखी अस्वस्थ झाला.

``आज अमावस्या आहे अंजली!`` त्याच्या तोंडून शब्द नीट फुटत नव्हते.

``बरं मग.. ? `` तिनं जणू काही कळलंच नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

`बरं मग` काय? अमावस्या आहे आज. तुला काही कळतंय का? अमावस्येच्या दिवशी मला हे वाईट स्वप्न पडलंय. ``

``असं होत असतं रे. गेल्यावेळीसुद्धा अमावस्याच होती काय़? काहीतरी बोलतोस उगाच!``

``गेल्यावेळी.... `` एकदम निरंजनच्या डोक्यात काहीतरी आलं. त्यानं कॅलेंडरचा आधीचा महिना काढला आणि तिथल्या प्रत्येक तारखेवरून त्याची नजर फिरू लागली.

``भालेराव काका गेले, तो दिवस कुठला होता? 19 तारीख होती...होय. आमची मीटिंग होती त्या दिवशी. पक्कं आठवतंय मला. 19 तारखेला तिथी.... `` निरंजन बारकाईनं पाहू लागला आणि एकदम त्या तारखेवरचा तपशील पाहून हादरला. कॅलेंडर बाजूला करून हताशपणे खुर्चीवर कोसळला.

``त्या दिवशीसुद्धा अमावस्याच होती, अंजली!`` त्याला पुढे काय बोलावं कळत नव्हतं. अंजलीही आता सैरभैर झाली होती. म्हणजे फक्त अमावस्येलाच त्याला अशी भयानक स्वप्नं पडत होती. गेल्यावेळी त्यानं भालेराव काकांना संकटात बघितलं आणि त्याच दिवशी त्यांचा अचानक मृत्यू झाला. यावेळी पहाटे त्याला त्याचा मित्र राकेश स्वप्नात दिसला होता. तिलाही काय बोलावं काही सुचेना.

``हे बघ निरंजन, घाबरू नकोस. असं काहीही होणार नाहीये. गेल्यावेळी भालेराव काकांशी तुझं भांडण झालं होतं. राकेशशी तुझं काही भांडण वगैरे झालंय का काल?``

``नाही. तो ऑफिसला आलाच नव्हता.``

``काय सांगतोस? बघ! मी म्हटलं नव्हतं, उगाच तुझ्या मनात शंका!``

अंजलीनं खुलासा केला आणि निरंजनलाही हायसं वाटलं. गेल्यावेळी भालेराव काकांशी आदल्या दिवशी त्याचं भांडण झालं होतं आणि पहाटे ते संकटात असल्याचं स्वप्न त्याला पडलं होतं. यावेळी त्याला राकेश स्वप्नात अशाच प्रकारे संकटात असलेला दिसला, पण त्याच्याशी भांडण वगैरे काही झालं नव्हतं. राकेश आदल्या दिवशी निरंजनला भेटलाच नव्हता. दोन्ही घटनांमधला समान धागा एकच होता, तो म्हणजे दोन्ही दिवशी अमावस्या होती.

तरीही निरंजनला राहवत नव्हतं. आता एवढ्या सकाळी राकेशला फोन करून त्रास देणं योग्य नव्हतं, म्हणून त्यानं सकाळी आठपर्यंत कसाबसा वेळ काढला. आठला त्यानं फोन केला, तेव्हा राकेश घरीच होता. एवढ्या सकाळी सकाळी निरंजनचा फोन बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. पण निरंजनने सहज, काल का आला नव्हतास, ते विचारायला फोन केला, असं सांगून वेळ मारून नेली. नाही म्हटलं तरी त्यामुळे राकेश थोडासा दुखावला गेलाच. राकेश आणि निरंजन मित्र असले, तरी अलीकडच्या काळात ऑफिसमध्ये निरंजनचा भाव थोडा वधारला होता. त्याला राकेशपेक्षा जास्त महत्त्व मिळायला लागलं होतं. नवीन आलेल्या बॉसची निरंजनवर जास्त मर्जी होती आणि इतर लोक त्याबद्दल निरंजनवर जळतही होते. निरंजनही हल्ली बदललाय, अशी कुजबुज सुरू झाली होती. राकेशचाही आज असाच गैरसमज झाला. आपण खरंच एका महत्त्वाच्या कारणासाठी आलो नव्हतो, पण तेही कन्फर्म करायला निरंजनने फोन केला, असं त्याला वाटलं आणि कळत नकळत त्या दोघांची थोडी वादावादी झाली. निरंजनलाही मग राहवलं नाही आणि त्यानं राकेशवर राग काढला. सहज म्हणून केलेला हा फोन रागारागाने कट केल्यानंतरच संपला.

त्या दिवशीही राकेश ऑफिसला आला नाही, तेव्हा निरंजनची अस्वस्थता वाढली. राकेशला फोन करून एकदा त्याच्या तब्येतीबद्दल विचारावं का, असा विचार त्याच्या मनात आला, पण आपण आजही येऊ शकत नाही, असं राकेशनं सकाळीच स्पष्ट केलं होतं. त्यावरून त्या दोघांची थोडी वादावादीही झाली होती. आता निष्कारण पुन्हा फोन करणं योग्य दिसलं नसतं, याची निरंजनला कल्पना आली. त्यानं फोन करण्याचा विषय मनातून काढून टाकला. संध्याकाळी चारच्या सुमारास निरंजनचा फोन वाजला, तेव्हा अनोळखी क्रमांक त्यावर दिसत होता. निरंजनने फोन घेतला. राकेशच्या भावाचा फोन होता. त्यानं जी माहिती दिली, ती ऐकून निरंजन हबकला. राकेशला अचानक हार्ट अटॅक आलाय आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे, असं त्याच्या भावानं सांगितलं. निरंजन त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये धावला, पण तोपर्यंत खेळ खलास झाला होता. राकेशचा निर्जीव देह समोर बघून निरंजनच्या पायातलं त्राणच नाहीसं झालं. तो कितीतरी वेळ तिथेच एका बाकड्यावर बसून रडत राहिला. मध्ये अंजलीचे अनेकदा फोन येऊन गेले, पण त्याला उत्तर द्यायचंही भान राहिलं नाही. त्याला पुन्हा ते सगळं आठवलं. सकाळी आपल्याला पडलेलं स्वप्न, त्यानंतर वाटलेली राकेशची काळजी, सकाळीच त्याच्याशी फोनवरून झालेलं भांडण आणि दुपारी राकेशच्या भावाचा ही वाईट बातमी देणारा फोन...! निरंजनला काय बोलावं कळत नव्हतं. कसाबसा तो घरी आला. त्याच्या स्वप्नानं आज दुसरा बळी घेतला होता. गेल्या अमावस्येला भालेराव काका आणि यावेळी त्याचा जवळचा मित्र, राकेश.

निरंजनचं आयुष्य एका महिन्यात होत्याचं नव्हतं झालं होतं. त्याचं कशात लक्ष लागेनासं झालं होतं. कळत नकळत आपल्या जवळच्या दोन व्यक्तींच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरला होता. त्यांच्या मृत्यूची चाहूल त्याला लागली होती, पण तो काहीही करू शकला नव्हता. किंबहुना, काही करायचं त्याला सुचलंच नव्हतं. दोन्ही घटनांमध्ये एक विलक्षण संगतीही होती. दोन्ही वेळेला त्याला त्या-त्या व्यक्तीची स्वप्नं पडली होती, तीसुद्धा अमावस्येच्या रात्री. दोन्ही वेळेला एकतर आधी किंवा नंतर त्याचं त्या त्या व्यक्तींशी भांडण झालं होतं आणि त्याच दिवशी काहीतरी निमित्ताने त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. म्हणजे निरंजनला लोकांचा मृत्यू दिसू लागला होता. निदान जवळच्या व्यक्तींचा तरी!

अंजलीच्या आग्रहावरून निरंजनने सध्यातरी या प्रकाराची कुठेही वाच्यता करायची नाही, असं ठरवलं होतं. अगदी आईवडिलांनाही त्यानं याबद्दल काही सांगितलं नाही. काही दिवस गेले आणि तोसुद्धा हळूहळू ते प्रसंग काही काळासाठी विसरून गेला. पुढची अमावस्या जवळ आल्यानंतर मात्र त्याला पुन्हा त्या कटू प्रसंगांची आठवण झाली आणि मनातली धाकधूक वाढली. गेल्यावेळचं ओझं निरंजनने बाळगायची गरज नाही, यावेळी काही होणार नाही, असं अंजली त्याला वारंवार बजावत राहिली, पण निरंजनला अजूनही खातरी होत नव्हती. काहीतरी विपरित घडणार, असं त्याला उगाचच वाटत राहिलं होतं.

अमावस्येच्या आदल्या दिवशी तर निरंजन फारच अस्वस्थ झाला. आपल्याला पुन्हा ते स्वप्न पडणार आणि कुणाचातरी नाहक बळी जाणार, अशी भीती त्याचं मन कुरतडायला लागली होती. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. अंजलीलाही त्याची ही अवस्था बघवत नव्हती, पण ती त्याला शाब्दिक धीर देण्यापलीकडे काही करू शकत नव्हती.

निरंजनने पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा पहिल्यापासून विचार केला आणि त्याला एकदम काहीतरी सुचलं.

``अंजली, असं केलं तर?`` तो चमकून म्हणाला.

``कसं?`` तिनंही उत्सुकतेनं विचारलं.

``हे बघ, गेल्या दोन्ही वेळेला मला पहाटेच्या वेळी ते स्वप्न पडलं होतं. आणि फक्त अमावस्येच्याच रात्री ते स्वप्न पडतंय. यावेळी मी रात्रभर झोपलोच नाही, तर?``

त्याच्या डोक्यातला विचार तिलाही पटला.

``खरंय रे. म्हणजे, दरवेळी तुला असं काही स्वप्न पडेलच असं नाही, पण यावेळी उगाच रिस्क घेण्यापेक्षा हा उपाय चांगलाच वाटतोय मला.``

``मलासुद्धा. हे बघ, माझाही या अनैसर्गिक गोष्टींवर विश्वास नाही. पण गेल्या दोन अमावस्यांना जे काही घडलंय, ते आपल्या डोळ्यांसमोर आहे. आता मी या परिस्थितीत आणखी धोका पत्करू शकत नाही.`` निरंजन मनापासून बोलला, ते तिलाही पटलं.

``पण रात्रभर कसा जागा राहणार तू? दुसऱ्या दिवशी त्रास होईल, त्याचं काय?``

``दुसऱ्या दिवशीच्या त्रासाचं बघून घेऊ. ज्या रात्री मला स्वप्नं पडतात, त्या रात्री मी झोपलोच नाही, तर स्वप्न पडायचा प्रश्नच येणार नाही. बरोबर ना?``

निरंजनचा युक्तिवाद बिनतोड होता. शिवाय त्या परिस्थितीत दुसरं काही सुचत नसल्यामुळे अंजलीनेही त्याला होकार दिला. ती स्वतः त्याच्याबरोबर जागी राहणार होती. रात्री त्याला झोप येऊ नये, म्हणून काय काय करायचं याची यादीच त्यांनी तयार केली होती. दिवसभरात चुकूनही कुठलंही औषध पोटात जाणार नाही, झोप येईल, असा कुठलाही पदार्थ खाल्ला जाणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. रात्री टीव्ही आणि डीव्हीडीवर बघण्यासारखे भरपूर सिनेमे शोधून ठेवले. कॅरम, पत्ते, कुठले कुठले गेम्स शोधून ठेवले. रात्री अगदीच वाटलं तर नाइट आउट करायचा, गाडीतून कुठेतरी भटकून यायचं, हेही त्यांनी निश्चित केलं होतं.

अमावस्येची रात्र उजाडली. अंजलीलाही टेन्शन आलं होतं, पण तिनं तसं दाखवलं नाही. निरंजनला आधार देणं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. दोघांनी लग्नानंतर कधी नव्हे ते एवढा सलग वेळ एकमेकांसाठी दिला. त्यांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या. कुठले कुठले विषय निघाले, लग्नाआधीच्या गमतीजमती, लग्नानंतरचे रुसवेफुगवे, सगळ्या आठवणी निघाल्या. दोघंही या गप्पांमध्ये रंगून गेली होती. मध्येच अंजलीनं उठून कॉफी केली, दोघांनी आवडीचे सिनेमे आलटून पालटून बघितले. मध्यरात्र उलटून गेली होती. आता पहाट व्हायला काहीच तास बाकी होते. अंजली सोबत असल्यामुळे निरंजनलाही झोपेची गरज वाटत नव्हती. झोप येत होती, पण ती अगदी अनिवार झाली नव्हती. एकमेकांच्या सहवासात वेळ कसा गेला, कळलंच नाही.

...

 

किचनमधून आलं-सुंठ घातलेल्या चहाचा मस्त वास घरात दरवळला आणि निरंजन टेबलापाशी चहा प्यायला येऊन बसला.

``घे. ताज्या दुधाचा गरमागरम चहा!`` अंजली उत्साहाने दोन कप घेऊन आली.

तिनं निरंजनसमोर एक कप ठेवला, स्वतः बसली आणि गरम चहाचा आस्वाद घेऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एका मोठ्या संकटातून सुटल्याचं समाधान होतं. निरंजन मात्र अजूनही अस्वस्थ वाटत होता. तिच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही.

``काय रे, चहा घे ना! कसला विचार करतोयंस?`` तिनं विचारलं.

निरंजननने फक्त नकारार्थी मान हलवली. चहाचा कप हातात घेतला, पण अजूनही त्याचं लक्ष नाहीये, याचा अंदाज अंजलीला आला.

``काय झालंय? आता ते सगळं विसरून जा. कालच्या रात्रीची भीती होती ना आपल्याला? ती रात्र संपलेय आता. आपण दोघं एकमेकांसमोर आहोत. खूप धीर दाखवून आपण हे संकट परतवलंय. आता काळजी करायचं काही कारण नाही!`` ती त्याला समजावत म्हणाली. निरंजनला मात्र ते पटलेलं दिसत नव्हतं. त्यानं कसातरी चहाचा एक घोट घेतला.

``तू बाहेर कशासाठी गेली होतीस?`` त्याच्या अचानक प्रश्नानं अंजलीनं चमकून पाहिलं.

``कशासाठी म्हणजे?  ताज्या दुधाची पिशवी आणायला गेले होते. तुला सांगूनच गेले होते की! तू अंघोळीला जातो म्हणालास आणि मी बाहेर पडले. का? काय झालं?``तिनं आश्चर्यानं विचारलं.

निरंजन त्यावर गप्प बसला.

``अरे काय झालं, सांग की. असं मनात ठेवू नकोस. तुलाच त्रास होईल.`` तिनं काकुळतीला येऊन विनंती केली.

``तू गेलीस तेव्हा मी बेडरूममध्येच होतो. घड्याळात पाच वाजलेलेही बघितले मी. अंघोळीसाठी उठणार होतो, पण तेवढ्यात...`` बोलता बोलता निरंजन एकदम थांबला.

``तेवढ्यात काय?``

``कसा कुणास ठाऊक, मी बेडवर बसल्या बसल्या आडवा झालो आणि पंधरा वीस मिनिटं झोप लागली मला.``

``काय?`` त्याच्या बोलण्यानं अंजलीच्या हातातला कप डचमळला. तिला काय बोलावं कळेना झालं.

``पुन्हा स्वप्न पडलं की काय?`` तिनं घाबरतच विचारलं.

``न...नाही.`` निरंजनने नजर चोरत उत्तर दिलं, तेव्हा अंजलीच्या चेहऱ्यावरची काळजी आणखी वाढली.

``म्हणजे तुला स्वप्न पडलं पुन्हा. हो ना?``

निरंजन काहीच बोलला नाही, पण त्याच्या मौनातच त्याचा होकार आहे, हे तिच्या नजरेनं हेरलं.

``निरंजन, काय स्वप्न पडलं, ते मला खरंखरं सांग.`` तिनं त्याला धीर दिला, पण आता तिचाही धीर खचला होता. तो काय बोलतो, हे ऐकण्यासाठी तिचे प्राण कानात एकवटले होते.

निरंजनने एक आवंढा गिळला आणि कसंबसं तो सांगू लागला, ``मला पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं...तसंच...कुणीतरी संकटात असल्याचं.``

``पण कोण?``

``नाही...यावेळी चेहरा दिसला नाही त्या माणसाचा.``

``कसं काय?``

``कुणास ठाऊक. पण ती व्यक्ती माझ्या जवळची होती. मला खूप काळजी वाटतेय, अंजली. खूप घाबरलोय मी. पुन्हा तसं काही झालं, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही...का पडतात मला अशी स्वप्नं? काय झालंय मला? मी नॉर्मल माणूस राहिलो  नाहीये का?``

बोलता बोलता निरंजनच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले. त्याला कसा धीर द्यावा, तेच अंजलीला सुचेना.

``हे बघ, पुन्हा सगळं तसंच घडलंय, हे कळतंय. पण यावेळी तुला कुणाचा चेहरा दिसला नाहीये, हे त्यातल्या त्यात समाधान नाहीये का?``

``अगं हो, पण...``

``पुरे. आता त्या विषयावर चर्चा नको. तू त्या स्वप्नाची आठवणच काढू नकोस. काही घाबरायचं कारण नाही. तू नेहमीसारखा ऑफिसला जा, कामात स्वतःला बुडवून घे. काही होणार नाही. पण तुझी झोप...?``

``झोपेचं काही एवढं टेन्शन नाही. मी करेन मॅनेज.``

``हं. मग ठीकेय.``

``पण मी ऑफिसला नाही जाणार. मला आज दिवसभर तुझ्याबरोबर राहायचंय. मला खूप काळजी वाटतेय अंजली. मला तुझा आधार हवाय.``

``अरे हो, कळतंय मला. पण तू घरी राहिलास, तर सतत तुझ्या डोक्यात तेच विचार येत राहतील. त्यापेक्षा कामात गुंतवून घे स्वतःला. मग त्रास नाही होणार.``

``अगं, पण...`` निरंजनला तिचं म्हणणं पटत नव्हतं. ``तू गेलीसच का बाहेर? नसता प्यायला चहा एखादवेळी!`` तो पुन्हा वैतागला. आता मात्र तिला राहवलं नाही.

``तुझ्यासाठीच बाहेर गेले होते ना? तू लगेच अंघोळीला का उठला नाहीस? मला कशाला दोष देतोयंस?`` तिचाही आवाज चढला. दोघांची वादावादी झाली. शेवटी अंजलीनेच माघार घेतली. निरंजनची अवस्था तिला कळत होती. कुणाचा मुद्दा योग्य, याच्यापेक्षाही निरंजनला त्रास होऊ नये, हे यावेळी महत्त्वाचं होतं. तिनं शांत राहायचं ठरवलं.

``हे बघ, काय झालं, ते विसरून जा. ऑफिसला जायचं की नाही, ते आपण नंतर ठरवू. तू सध्या आवरून घे. फ्रेश हो, आपण बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करून येऊ. तुला बरं वाटेल.``

``नाही...नको. बाहेर नको. तू घरीच काहीतरी कर. आज बाहेर कुठेच नको जायला.`` निरंजन एकदम उसळून म्हणाला. अंजलीला त्याचं वागणं विचित्र वाटलं, पण ती काही बोलली नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवायचं तिनं मनाशी ठरवलं होतं.

``बरं, तू अंघोळ करून घे, तोपर्यंत मी नाश्त्यासाठी काहीतरी करते,`` असं म्हणून ती जागेवरून उठली. त्याच्या जवळ जाऊन तिनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचा हात हातात घेऊन त्याला धीर दिला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. कधी नव्हे एवढी काळजी तिला त्याच्या डोळ्यांत दिसली. तिने पुन्हा त्याच्या हातांवर थोपटून त्याला धीर दिला.

``सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस.`` ती म्हणाली आणि स्वयंपाकघराकडे वळली. निरंजनची नजर मात्र तिच्यावरच रोखली गेली होती. त्याला बरंच काहीतरी सांगायचं होतं, पण सांगता येत नव्हतं. ``अंजली, तू आहेस म्हणून सगळं आहे. मला तू कायम माझ्या आयुष्यात हवी आहेस. कधीकधी मी तुझ्याशी उगाच भांडतो, पण तू मला समजून घेतेस. मी तुला काही होऊ देणार नाही...`` तो मनातल्या मनात पुटपुटला. स्वयंपाकघरात शिरताना अंजलीने मागे वळून पाहिलं आणि तिची निरंजनशी नजरानजर झाली. तो आपल्याकडेच बघतोय, हे लक्षात आल्यावर तिलाही हसू आलं. `उठा आता,` असं तिनं नजरेनंच त्याला खुणावलं, तसा तोही कसंनुसा हसला. मनातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो अंघोळीसाठी उठला. बाथरूमच्या दिशेने जायला निघाला, तेवढ्यात जोरदार स्फोटाचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्यापाठोपाठ अंजलीची किंकाळी.

...

पोस्ट मार्टेमचे सोपस्कार पार पडून अंजलीचा मृतदेह ताब्यात मिळाला, तेव्हा निरंजन कितीतरी वेळ तिच्याशेजारी बसून होता. तिचा चेहरा ओळखू येण्याच्या पलीकडे गेला होता. राहून राहून एकच विचार त्याच्या मनात येत होता – आज पहाटे पडलेल्या स्वप्नातसुद्धा तिचा चेहरा असाच आपल्याला ओळखूच आला नसता तर?

...

 

-       अभिजित पेंढारकर.

(पूर्वप्रसिद्धीः प्रपंच दिवाळी अंक, 2017.)