नोकरी करतानाच वेगळं काहीतरी करायला हवं, असा विचार डोक्यात आला आणि आपण काहीतरी वेगळं करू शकतो, याचा साक्षात्कार झाला, तेव्हा अर्थातच कामाची शोधाशोध सुरू करण्यापासून तयारी होती. आयुष्यात आपण (स्वतःचं आणि प्राथमिक टप्प्यावर आणखी एका जीवाचं) पोट भरण्यासाठी काय करायचं आहे, याची समज येण्याआधीही जसे खाचखळगे पार करावे लागले, तीच गत याबाबतीतही होती. मग आधी डीटीपीची कामं, जाहिरातींचं copy writing, वगैरे करत शेवटी पुस्तकाच्या भाषांतरावर गाडी येऊऩ ठेपली.
पहिलं पुस्तक मिळालं, ते अमेय प्रकाशनाचं. आधी त्यांच्यासाठी एका पुस्तकाचं एक प्रकरणच करणं अपेक्षित होतं, पण नंतर सगळ्या पुस्तकाचीच जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली. ते पुस्तक सुरू असतानाच मेहता प्रकाशनाचं `सेंड देम टू हेल` हे पुस्तक भाषांतरासाठी मिळालं. अर्थातच दोन्हीकडे मी स्वतःच खटपट केली होती. दोन्ही पुस्तकांचं काम एकाच वेळी सुरू केलं. त्याच दरम्यान ओम पुरी यांच्यावरील पुस्तक मला मेहता प्रकाशनाकडून वाचण्यासाठी मिळालं होतं. त्याचं परीक्षण करून त्यांच्याकडे द्यायचं होतं. अक्षरशः चार दिवसांत ते झपाट्यानं वाचून काढलं. एवढ्या जलद गतीनं वाचलेलं हे पहिलं इंग्रजी पुस्तक. परीक्षण करून दिल्यावर त्याचं भाषांतर करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. आधीचं नियोजन बदलून हे पुस्तक मला भाषांतरासाठी देणार असल्याचं कळलं, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला.
पुस्तकाचं काम मिळाल्यानंतर ते पुन्हा एक-दोनदा वाचून काढलं. भाषा अलंकारिक, पण साधी, सोपी होती. विशेष म्हणजे आवडता विषय, आवडता नट आणि आकर्षक घडामोडी, यामुळं या पुस्तकाच्या भाषांतराकडे काम म्हणून बघावंच लागलं नाही. नोकरी सांभाळूनही रोज नियमितपणे त्याची काही पानं भाषांतरित करत होतो. जवळपास वीस-पंचवीस दिवसांत पूर्ण पुस्तकाचा फडशा पाडून टाकला!
नंतर मात्र ब-याच कारणांनी त्याचं प्रकाशन लांबणीवर पडलं. दरम्यानच्या काळात अमेय प्रकाशनासाठी केलेलं `seeds of terror` हे पुस्तकही तयार झालं होतं. अफगाणिस्तानातील अफूचा व्यापार आणि त्यावर चालणारी `तालिबान`ची आर्थिक उलाढाल, हा पुस्तकाचा विषय. लेखिकेनं स्वतः अफगाणिस्तानमधील त्या कुख्यात प्रांतांमध्ये फिरून गोळा केलेला तपशील, त्यावरची माहिती आणि विवेचन, थक्क करणारं होतं. त्या पुस्तकासाठीही मेहनत घ्यावी लागली. इंग्रजी धाटणीचं इंग्रजी आणि त्याचं सोपं मराठीकरण करणं हे एक आव्हान होतं.
माझी तीन पुस्तकं माझ्याकडून भाषांतराचं काम पूर्ण होऊन तयार होती, पण ती बाजारात येण्याचा दिवसच उजाडत होता. अचानक मे महिन्यात मी काश्मीरला फिरायला जाण्याच्या आदल्या दिवशीच अमेय प्रकाशनाकडून फोन आला आणि त्यांनी पुस्तक तयार असल्याचं सांगितलं. माझं नाव मोठ्या पुस्तकाच्या कव्हरवर आलेलं पाहण्याची मोठी उत्सुकता होती. पण ती पूर्ण करण्यासाठी त्या दिवशी तयारीची गडबड सोडून जाणं शक्य नव्हतं. काश्मीरला फिरून आल्यानंतर ते पुस्तक हातात पडलं. समाधान वाटलं. त्यानंतर पंधरा दिवसांतच ओम पुरी यांचं पुस्तकही तयार होऊन हातात मिळालं.
तिसरं अनुवादित पुस्तकही या वर्षाच्या अखेरीस प्रसिद्ध होईल. आता स्वतः लिहिलेल्या पुस्तकाची तयारी सुरू करायची आहे. जमेल ना मला?