Oct 28, 2018

मिसळ `मैफल`


मिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे.

मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण असणार, किती दर्दी असणार, याचा अंदाज घ्यावा लागतो.

मिसळीचंही तसंच आहे. `चला, आता शास्त्रीय संगीत मैफलीला जाऊ` असं म्हणून आपण उरकल्यासारखं मैफलीला जात नसतो. तसंच `चला, मिसळ खाऊ` म्हणून मिसळ खायला जायचं नसतं. मिसळ खाण्यासाठी बैठक लागते, पूर्वतयारी लागते. सुटीचा दिवस निश्चित करावा लागतो. सकाळपासून पोटात जागा ठेवावी लागते. किंबहुना, `उद्या मिसळ खायचेय,` हे कळल्यापासून जठराग्नीसुद्धा शांत होऊन कुठेतरी दडी मारून बसतो, कारण मिसळ समोर आल्यानंतर आपल्याला भडका उडवायचा आहे, याची त्याला कल्पना असते.

 

मिसळ खाण्यासाठीचं चांगलं ठिकाण आधीच शोधून ठेवायचं असतं. त्यासाठी गूगल मॅप्स, इंटरनेटची मदत होत नाही, तर केवळ चांगलं खाण्यासाठी जगणाऱ्या आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधावा लागतो. अतिप्रसिद्ध झालेली ठिकाणं सोडून फारशा तुडवल्या न गेलेल्या अनवट वाटा शोधाव्या लागतात. अशाच एखाद्या ठिकाणी आपली क्षुधाशांती करणारं ठिकाण अल्लाद सापडून जातं.

मिसळ म्हणून बटाट्याची भाजी, कांदापोहे, नायलॉन पोह्यांचा चिवडा आणि त्यात सांबारसदृश आमटी ढकलणाऱ्या हॉटेलांकडे फिरकणं म्हणजे महापाप. मुळात मिसळ हा वडासांबारपासून ते शेजवान राइसपर्यंत सबकुछ मिळणाऱ्या हॉटेलमध्ये खायचा पदार्थच नाही. तो फक्त मिसळच देणाऱ्या छोट्या टपऱ्या किंवा आडबाजूच्या अडचणीच्या ठिकाणांमध्ये खाल्ल्यावरच जास्त समाधान देणारा पदार्थ. मिसळीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रस्सा. सोडा घालून शिजवलेल्या पांढऱ्या वाटाण्यापासून कुठल्याही पद्धतीने केलं जाणारं फुळूकपाणी हा खरंतर रस्सा नव्हेच. फक्त फरसाण घालून ज्याची चव अबाधित राहते, तो खरा रस्सा. मग तो मटकीचा असो, की काळ्या वाटाण्याचा, की हरभऱ्याचा.

प्लेटमध्ये फरसाण, कांदा घातल्यानंतर मोठ्या पातेल्यात रटरटणाऱ्या द्रवपदार्थावरचं तर्रीचं जाडजूड झाकण ओगराळ्यानं बाजूला केल्यानंतर खाली दिसणारा तांबूस पदार्थ म्हणजे रस्सा. तो रस्सा घालून आणि वर तर्रीचं मधाचं बोट लावून कांदा, शेव, कोथिंबीर घालून मिसळ आपल्यासमोर येते, तेव्हा तिच्या त्या मनमोहक रूपानं आपलं लक्ष वेधून घेतलं जायला हवं.

 

मूर्तिमंत सौंदर्याला जसं हिरे-पाचू-माणसांच्या आभूषणांची गरज लागत नाही ना, तसंच मिसळीलाही फक्त बारीक चिरलेला भरपूर कांदा, शेव आणि कोथिंबीर, एवढीच सजावट पुरेशी असते. जोडीला कांद्याची एक्स्ट्रा वाटी, लिंबाची फोड आणि शेजारी ठेवलेल्या बादलीतला वाफाळता रस्सा, असे कसलेले वादक असले, की पुरे.

 

मिसळीच्या वाडग्यात आधी रश्श्याची पहिली वाटी रिकामी करावी, वाटीतला निम्मा कांदा ओतावा आणि बादलीतला तेवढाच रस्सा पुन्हा ओतून घ्यावा आणि मगच मिसळीचा आस्वाद घ्यायला सुरुवात करावी.

मिसळीसाठीचं ठिकाण ठरवताना `जादा रस्सा हवा असल्यास सव्वाअकरा रुपये जास्त आकार लागेल` असले बोर्ड टांगलेल्या ठिकाणांना आधीच बाद करून टाकावे. किमान दोनदा फुकट रस्सा, तोही न मागता देणाऱ्या किंवा शेजारी (`घ्या! अंघोळ करा ह्याच्यात!` अशा थाटात) रश्श्याची बादलीच आणून ठेवणारी ठिकाणं हीच खरी मिसळप्रेमी रसिकांच्या भावनांची कदर करणारी माणसं.

 

मिसळीची भैरवी सुरू झाली, की ती संपत आल्याची चुटपुट लागली, तर ती खरी मिसळ! कधी एकदा संपते असं झालं किंवा शेजाऱ्याकडे सरकवावी लागली, तर ती नापास!

 

सगळ्यात महत्त्वाचं :

मिसळ आवडल्यानंतर त्याच धुंदीत राहावं. `ह्याच्यापेक्षा त्या अमक्या ठिकाणची जास्त चांगली असते` हे वाक्य उच्चारून जिभेची चव घालवू नये. मैफलीत गाणं आवडलं नाही, पण तबला आवडला, तानपुरा झकास होता, असं होऊ शकतं. मिसळीच्या मैफलीत दोनच पर्याय असतात – आवडली, किंवा आवडली नाही! मिसळीत आणि शास्त्रीय संगीत मैफलीत तफावत असेल, तर ती एवढीच!

 

-    अभिजित पेंढारकर.

No comments: