Aug 12, 2010

ये रे माझ्या "माग'ल्या!

युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्‍वभूमी' जरा वेगळी होती.
बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्‍वभागाचा! हो हो...!
`दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी...
कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं. शिवाय, त्यासाठी दहा कोटी रुपये कुठली कंपनी मोजायला तयार होणार, ते विमा म्हणून नक्की कशाची हमी देणार, याविषयीचं कुतूहल जास्त होतं.

बातमीतून तरी ते काही स्पष्ट झालं नाही. माझ्या मनात मात्र अनेक कल्पना, शंकाकुशंकांनी थैमान घातलं. त्यातल्याच या काही...
1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्‍वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?
2. बूडही न हलवता तासन्‌ तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?
3. पार्श्‍वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
5. ** फाटणे, ** मारणे, ** उदास होणे, अशा दुर्घटना/आपत्तींसाठी पण विमा योजना लागू होणार का?
---

Aug 11, 2010

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...
बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे. गेल्या महिन्यापासून तसा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडला. अलिकडच्या काळात सोन्याला सोन्याचा भाव आल्यापासून तर आपण त्यात गुंतवणूक करायलाच हवी, असं प्रकर्षानं वाटू लागलंय. त्यातून लॅपटॉपच्या "सरप्राइज गिफ्ट'साठी बायकोनं घरात जमवून ठेवलेलं सोनं उधळल्याचं रहस्योद्‌घाटन मला झाल्यानंतर तर हा किडा डोक्‍यात फारच वळवळायला लागला. गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडलाय. सोनं खरेदी करायचं ठरवणं, त्यासाठी वेळेत हातात पैसे असणं, हा "मणिकांचन योग'च! सुदैवानं तो जुळून आलाय.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की याच सोन्यानं आज एका संभाव्य भुर्दंडातून मला वाचवलं.
सकाळी सकाळी बहिणीचा फोन आला. बॅंकेत लॉकरच्या किल्ल्यांवर एम्बॉसिंग करून मिळणार आहे आणि त्याची मुदत आज आणि आणखी एक दिवस, अशी दोनच दिवस आहे, असं तिनं सांगितलं. या मुदतीत करून न घेतल्यास ग्राहकांना स्वतःच्या पैशांनी ते करून घ्यावं लागणार आहे, असंही समजलं. तसं पत्र तिला बॅंकेकडून आल्याचं तिनं सांगितलं. मला असं काहीच पत्र आल्याचं आठवत नव्हतं. मी तिच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी बॅंकेत जाऊन धडकलो. विचार केला, लॉकरची किल्ली घेऊन जात आहोत, तर लॉकर उघडून घरातलं काहीबाही ठेवूनही यावं. भविष्यकालीन योजनेसाठी घेतलेलं सोनंही त्यात होतंच.
घरातून लॉकरची किल्ली चटकन शोधून बॅंकेत पोचलो, तर हीऽऽऽऽ गर्दी होती. आधी लॉकर उघडून ते काम पूर्ण करावं, मग एम्बॉसिंगसाठी किल्ली द्यावी, असं ठरवलं. लॉकर उघडायला गेलो, तर किल्लीच लागेना. सोबत आलेल्या बाईंनी त्यांच्याकडची किल्ली लावली, तरी कुलूप ढिम्म. मग त्यांनी आलटून पालटून सगळ्या किल्ल्या लावून बघितल्या. दुसरा जुडगाही आणला. तरीही काहीही फरक नव्हता. मी चुकीची किल्ली आणली असेल, असं त्यांनी भीत भीत सुचवून पाहिलं, पण मी त्यांना धुडकावून लावलं. आमच्या घरात अशी दुसरी किल्लीच नाहीये, असं छातीठोकपणे सांगितलं. मग त्या थकल्यावर त्यांनी एका शिपायाला ते काम दिलं. त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले.
त्यांच्यावर उपकार केल्याच्या थाटात, "तरीही मी किल्ली चुकलेय का ते पाहतो,' असं मोठ्या मनानं मी त्यांना सांगितलं.
बाहेर पडल्या पडल्या हर्षदाला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला.
""तू चुकीची किल्ली नेली असशील!'' तिनं पहिलेछूट सांगून टाकलं.
स्वतःबद्दलही नसेल, एवढा विश्‍वास बायकांना नवऱ्याच्या गबाळेपणाबद्दल कसा असतो, कुणास ठाऊक!
तरीही मी मनाचा हिय्या करून तिला प्रत्युत्तर देण्याचं धाडस केलं. तूच कुठली तरी किल्ली आणून ठेवली असशील, मी चुकणं शक्‍यच नाही वगैरे तिला सांगून पाहिलं.
घरी येऊन तपासलं, तर तिचंच म्हणणं बरोबर होतं.
चुकीची किल्ली नेली होती. आता मान खाली घालून पुन्हा बॅंकेत जाणं आलं. तरीही बॅंकेतल्या बाई माझ्याशी सौजन्यानं वागल्या.
"तुम्हाला एवढीही अक्कल नाही का हो,'च्या ऐवजी फक्त "बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना,' एवढंच म्हणाल्या.
बाई देखण्या होत्या. त्यामुळे त्यांना "सॉरी' म्हणतानाही जिवावर आलं. त्यांनी त्याची दखलही घेतली नाही, हे सांगणे न लगे.
...
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बॅंकेचं लॉकरसंदर्भातलं जे पत्र आलं नाही म्हणून मी त्या (देखण्या) बाईंशी भांडलोही होतो, ते आमच्या घरीच असल्याचं मला बायकोनं नंतर सांगितलं.
"मला आधी का सांगितलं नाहीस,' असा जाब विचारल्यावर, ते मीच फोडलं होतं, अशी मौलिक माहिती तिनं दिली.
"किल्लीच्या एम्बॉसिंगबद्दल मला का सांगितलं नाहीस,' असं विचारल्यावर "तू ते वाचलंही होतंस,' अशी आणखी मौलिक माहिती तिनं दिली.
"माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
कपाळावर हात मारून घेण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता!
---

Aug 9, 2010

काचांची `लांबी' आणि गृहकृत्यदक्षतेची `रुंदी'

"घरच्या छपराचे कोने (दोन बाजूंच्या कौलांना जोडणारी वेगळ्या प्रकारची कौले) बसवायला माणूस मिळत नव्हता. घरी यायला नाटकं करत होता. शेवटी मी त्याला झिडकारून छपरावर चढून कोने बसवले...''
रायकर मास्तर आम्हाला सांगत होते.
""कुणी अडून बसला, तर त्याच्यावर अजिबात अवलंबून राहायचे नाही, हे धोरण अंगी आणायला हवे. जगात कुणाचं काही अडणार नाही!''...त्यांची भूमिका ठाम होती.
आज मी घराच्या खिडक्‍यांना लांबी बसवली, तेव्हा त्यांची आठवण झाली.
...
"घरात इतर काही करत नाहीस. निदान तेवढं तरी काम कर!''
...अगदी अशाच नाही, पण अशा भावना असलेल्या भाषेत सहधर्मचारिणीनं आमचा उद्धार केला होता. त्यामुळं आपल्यालाही घराची काळजी आहे, घरासाठी आपलंही काही योगदान आहे, हे सिद्ध करणं आवश्‍यक होतं.
घराच्या खिडक्‍यांच्या काचांची लांबी पडली होती. पण आमच्या मासिक आर्थिक नियोजनाची "रुंदी' कमी झाल्यानं लांबी लावण्याचं काम बाहेरच्या कुणाला देणं शक्‍य होत नव्हतं. एका कामगाराला बोलावलं, त्यानं सगळ्या काचांचे एक हजार रुपये सांगितले होते. त्याच वेळी त्याच्या पुढ्यात त्या सगळ्या काचा फोडून त्यावर त्याला नाचायला लावावं, असं मला वाटलं होतं. पण घरच्या "हेमा'नं रोखलं.
बाहेरच्या कुणालाही काम द्यायचं नाही, असं ठरवलं खरं, पण याचाच अर्थ ते काम मी करण्याला पर्याय नाही, असा झाला होता. त्यासाठी बाहेरून लांबी आणणं आणि वेळात वेळ काढून ती लावणं गरजेचं होतं. बरेच दिवस ते काही जमत नव्हतं. एक काच तर अगदी पडायला आली, तेव्हा चिकटपट्ट्या लावून तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ती आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती.
अखेर आज मुहूर्त लागला. समोर बॅंकेत काही कामानिमित्त गेलो होतो, तेव्हा मनाचा हिय्या करून हार्डवेअरच्या दुकानात गेलो आणि अखेर लांबी खरेदी केली. घरी आणून लावूनही टाकली. ती तयार अवस्थेतलीच होती. त्यात काहीच मिक्‍स वगैरे करायचं नव्हतं. अवघ्या वीस रुपयांत दोन काचांचं काम उरकलं!
एवढे दिवस लांबी कुठे मिळेल, ती कशी वापरायची, हाच गहन प्रश्‍न होता. त्यामुळे टाळाटाळ चालवली होती. एखाद्या दुकानात जाऊन चौकशी करण्याची तसदीही घेतली नव्हती. आज अचानक मनात आलं आणि लांबी मिळूनही गेली!
काही गोष्टींना थेट भिडल्याखेरीज त्या हाताशी येत नाहीत, हेच खरं!!
...
ता. क. : या ब्लॉगपोस्टला फारशी "खोली' नाही, हे जरी खरं असलं, तरी "लांबी'च्या या मोहिमेबद्दल मला छाती "रुंद' करून सांगायचंच होतं! असो.