Dec 7, 2009

मलकापूरचा म्हातारा

बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो.
मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा. त्यामुळं लाल डब्याला पर्याय नव्हता. साधी गाडी कोल्हापूरमार्गे जायची. कोल्हापूरला थांबल्यानंतर सगळ्यात मोठं आकर्षण असायचं ते तिथला स्टॅंडबाहेर मिळणारा वडापाव खाणं. स्टॅंडच्या गेटबाहेर वडापावच्या भरपूर गाड्या रांगेने उभ्या असत. त्यांच्याकडे गरमागरम तळलेला गलेलठ्ठ वडा मिळे. मी कुठेही पाहिलेल्या वड्याच्या साधारण दीड ते पावणेदोन पट त्याचा आकार असे. त्याच्यासोबत पाव म्हणजे एक घसघशीत मोठा तुकडा असे. ग्रामीण भागात बेकरीत असे जाडजूड पाव तयार केले जातात. साधारण आपल्या शहरी ब्रेडच्या आकाराच्या अडीचपट त्याचा आकार असतो. वडा-पाव म्हणजे पावात घातलेला वडा नव्हे, तर वेगळा वडा आणि पाव, अशी ही कोल्हापुरी तऱ्हा. तरीही झणझणीत चटणी आणि त्यासोबत गरम वडा व पाव, असा बेत म्हणजे तोंडाला पाणीच सुटे. कोल्हापूरला थांबल्यानंतर धावतपळत जाऊन तो वडा घेऊन येणं आणि ओरपणं, हेच प्रवासाचं मुख्य आकर्षण होतं.
कालांतराने मात्र या गाड्या बंद झाल्या. बहुधा गुन्हेगारीमुळे पालिकेनं तिथे कारवाई करून रात्रीचे सगळे स्टॉल बंद करून टाकले. रात्रीच्या प्रवासाची सगळी गंमतच निघून गेली. मी पुण्याला कायमचा राहायला आल्यावर रत्नागिरी-पुणे वाऱ्या बऱ्याचदा सुरू झाल्या, पण आता हे आकर्षणही नव्हतं आणि माझाही प्रवास सेमीलक्‍झरीने सुरू झाला होता. सेमीलक्‍झरीचा प्रवासाचा मार्ग वेगळा होता. गाडी कोल्हापूरला न जाता परस्पर कोकरूडमार्गे मलकापूरला पोचते. त्यातून अंतर आणि तिकीटही कमी! पास मिळण्याचाही मुद्दा संपला होता...
कोकरूडच्या मार्गावर जाणारी बस मलकापूर स्टॅंडला काही सेकंदच थांबायची, तीही प्रवाशांच्या लघुशंकांसाठी. नंतर तातडीने वळून पुन्हा ती दोनच मिनिटांत थांबायची. सुरुवातीला झोपेच्या अमलाखाली मला काही कळायचं नाही. पण अधूनमधून जाग असायची, तेव्हा लक्षात आलं, गाडी चहाला थांबते. तेही मलकापूरच्या मुख्य बाजारातील एका अरुंद रस्त्यावर. एक म्हातारबाबानं तिथे आपली छोटीशी गाडी थाटली होती. आगेमागे बऱ्याच एसटी आणि इतरही ट्रक वगैरे गाड्या थांबलेल्या असायच्या. एकतर कऱ्हाड सोडल्यानंतर रत्नागिरीपर्यंत या मार्गावर कोणतंही मोठं शहर, ठिकाण नाही. महामार्गापासूनचा वेगळा रस्ता. त्यामुळं रहदारीही मोजकी. त्यामुळं कुठलं हॉटेल किंवा चहाचं दुकान वगैरे उघडं असण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे रात्रीच्या यात्रेकरूंना बहुधा चहाचा एवढा एकमेव पर्याय उपलब्ध असावा. तेव्हापासून आजतागायत मी ही गाडी याच ठिकाणी पाहत आलो आहे.
या म्हातारबाबांकडे मिळतो फक्त चहा आणि वडा. चहा द्यायची पद्धतही खास आहे. गाळण्याच्या ऐवजी असलेला कळकट, मळकट फडका. एका स्टोव्हवर रटरटत असलेलं एक ऍल्युमिनिअमचं पातेलं. त्याला वरून बंद ताटलीचं झाकण. या झाकणाला मध्यभागी एक मोठं छिद्र. त्या छिद्राच्या वर ठेवलेली चहाची किटली. त्या छिद्रातून आलेल्या वाफेनं किटलीतला चहा गरम होणार.
चहाची चव यथातथाच. बहुधा साखर जास्त आणि दूध कमी. तरीही, रात्री तीनच्या दरम्यान प्रवासातला टाइमपास म्हणून आणि थंडी उडवण्यासाठी गरम काहितरी प्यायला मिळण्याचं समाधानच जास्त. ड्रायव्हर-कंडक्‍टरही तिथे चहाचा आस्वाद घेतात. त्यामुळं प्रवाशांनाही गाडी सुटण्याचं टेन्शन राहत नाही. या टपरीवर थांबल्याशिवाय एसटी पुढे गेल्याचं मी तरी आजपर्यंत पाहिलेलं नाही.
म्हातारबाबांकडे मिळणारा वडा बहुतेक वेळा गारच. त्यातून तो मस्त तेलात माखलेला. व्हाइट कॉलर मध्यमवर्गीयानं चार हात लांबच राहावं, असा. तरीही, वड्यांचं ताट कधी भरलेलं मी पाहिलेलं नाही. बहुतेक वेळा तीन ते चारच वडे त्या ताटात दिसतात. एकतर त्यांना भरपूर खप असावा, किंवा म्हातारबाबा तेवढेच वडे बनवत असावा. मीही एकदोनदा तो वडा चाखल्याचं आठवतंय. (हल्ली हेल्थ-कॉन्शस झाल्यापासून घरचेही वडे-भजी खात नाही, ही गोष्ट अलाहिदा!)
गाडी तिथे सात ते आठ मिनिटंच उभी राहत असल्यानं या म्हाताऱ्याचं नाव, गाव, कूळ विचारण्याची संधी आजपर्यंत मिळालेली नाही. धंद्यावरची त्याची निष्ठा मात्र वाखाणण्यासारखी! जुलै-ऑगस्टच्या मुसळधार पावसातही त्याची गाडी कधी बंद असलेली मला आढळलेली नाही. त्याच्यासोबत मदतीला कुणी मुलगा, घरचं कुणीही कधी पाहिलेलं नाही. गाडी थांबल्यावर प्रवासी गाडीभोवती गोळा झाल्यावर अतिशय अदबीनं चहाचा ग्लास पुढे करण्याची त्याची अदाही विलक्षण.
अगदी गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून आलो, तेव्हाही म्हाताऱ्याकडचा चहा चाखला. मनस्वी गाडीत एकटीच झोपलेली असताना! ती पडेल की काय ही भीती होती, तशीच जागी झाली तर उठून बाहेर येईल की काय, हीदेखील! तर ते असो. या वेळी म्हातारबाबाच्या एका डोळ्यात फूल पडल्याचंही प्रकर्षानं जाणवलं. लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती!
एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!

Dec 6, 2009

मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच.
या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते. शाळा बुडण्याचं मनस्वीला काही दुःख नव्हतंच. उलट, रेल्वेच्या प्रवासाचं आकर्षण होतं. जाताना आईनं दहा-दहादा बजावून वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. तिला दिवसभरात द्यायच्या गोळ्या, घ्यायची काळजी, तिचे कपडे, बॅग, इकडे पाठव, तिकडे पाठवू नको वगैरे वगैरे. तिला सोडून कुठेही उंडारायला जायचं नाही, ही धमकीही होतीच! तिला सांभाळण्याच्या टेन्शनपेक्षा आईच्या सूचना पाळण्याचं टेन्शन मोठं होतं.
एकदाची सगळी तयारी झाली आणि आम्ही रात्री साडेनऊच्या रत्नागिरी बसमध्ये बसलो. नेहमीचाच प्रवास होता, पण या वेळी मी एकटा नव्हतो, तर मुलीचं ओझं रात्रभर वागवायचं होतं. दोन सीटचं आरक्षण होतं, पण तरीही जागा तशी अडचणीचीच. आमच्या तंगड्याही घड्या करून न ठेवता येण्यासारख्या. त्यामुळे कसेतरी पाय पुढच्या सीटखाली घुसवून रात्रभर पेंगत बसायचं, अशी एरवीची रीत. या वेळी मात्र मनस्वी मांडीवर होती. दुपारी झोप झाल्यानं साडेअकरापर्यंत जागत बसली होती. बसमध्ये सुद्धा तिला पुस्तकातून गोष्टी सांगाव्यात, अशी तिची अपेक्षा होती. महत्प्रयासानं मग तिला कसंबसं दोन गोष्टींत पटवावं लागलं. शिरवळच्या नंतर कधीतरी झोपली. ती मांडीवर असल्यानं तिचे पाय दुखावणार नाहीत, पावलांना थंडी वाजणार नाही, पांघरूण नीट अंगावर राहील, याची काळजी घेण्यातच माझी रात्र गेली. झोप फारशी लागू शकली नाही. रात्री मलकापूरला म्हातारबाबांकडे चहा प्यायलाच काय, साधं लघुशंकेला उठायचे कष्टही घेतले नाहीत!
सकाळी साडेचारला रत्नागिरी स्टॅंडवर गाडी पोचली, त्याआधीच मनस्वी टुणकन उठून बसली होती. साडेचार वाजता रिक्षा मिळणं दुरापास्तच होतं. बससाठी तासभर थांबावं लागणार होतं. दोन रिक्षावाले तर चक्क घोरत होते. एकानं आधी नकार दिला, मग तिप्पट पैसे मागितले. अर्थातच त्याला धुडकावून लावून आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी पावणेपाचला रत्नागिरीच्या रामआळी, गोखले नाका, गाडीतळ, पतित पावन मंदिरावरून मस्त गप्पा मारत नि थंडी अनुभवत आमची वरात निघाली होती. पहाटेचे किती वाजलेत वगैरे कसलंही भान मनस्वीला असण्याची अपेक्षाच नव्हती. नेहमीच्या तारस्वरात तिच्या गप्पा, प्रश्‍न, शंका, नि गाणी सुरू होती. मध्येच स्मरणशक्तीचा खेळही खेळून झाला. घरी गेल्यावर मात्र थोडा वेळ झोपली. मीही जरा अंग मोकळं करून घेतलं.
आम्हाला लगेच दुपारच्या रेल्वेनं गोव्याला निघायचं होतं. आधीच्या आठवड्यात रत्नागिरीच्या आमच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातून देणगीच्या अपेक्षेनं फोन आला होता. रत्नागिरीत जातोच आहोत, तर जाऊन येऊ, अशा विचारानं तिथे जाऊन आलो. मनस्वीलाही माझी शाळा पाहण्याचं कौतुक होतंच. मग माझ्या "दीक्षितबाईं'शी तिची भेट करून दिली. दीक्षितबाई म्हणजे तिच्या बालवाडीच्या शिक्षिका. त्यामुळे माझ्या शिक्षिकांनाही तेच नाव दिल्यानं ती खूश होती. मी देणगीची रक्कम दिली आणि मनस्वीला एक बालगीतांचं पुस्तक मिळालं. स्वारी खूश! मग त्यातली गाणी तेव्हापासून जी सुरू झाली, ती रेल्वेच्या दोन्ही प्रवासभर पुरली.
दुपारची गाडी अपेक्षेप्रमाणंच उशिराने आली. आम्ही करमळीला उतरून नागेश मंदिरात पोचेपर्यंत साडेसात वाजले. गेल्या गेल्या एक अपशकुन झाला. आमच्या ऐकण्यात गफलत झाल्यानं जेवण्यात मी वेळ काढला नि तोवर देवळाच्याच आवारातली पालखी संपून गेली. मनस्वीला नवे कपडे घालून तयार करून खाली आणलं, तोवर पालखी संपून गेल्यानं ती माझ्यावर भयंकर खवळली होती. मनसोक्त रडून झालं. दोन-तीन चॉकलेटच्या आमिषावर मग गाडं शांत झालं. दुपारी ट्रेनमध्ये तिने मस्त दोन-तीन तास ताणून दिली होती. वरच्या बर्थवर जाऊन माझ्याबरोबर मस्ती करण्याचा तिचा बेत होता, पण मी आडवा झालो नि तीही माझ्या आधीच डाराडूर पंढरपूर झाली!
रात्री गोष्टींना पर्याय नव्हता. चार-पाच गोष्टी झाल्यावर कुठे जरासं समाधान झालं. देवळाच्या आवारातच आमची राहायची सोय चांगली होती. दोन खोल्यांमध्ये मी व मनस्वीला वेगळी खोली होती. रात्री ती व्यवस्थित झोपली. हर्षदाला मात्र इकडे करमत नव्हतं. आधीच्या रात्री नि दुसऱ्या दिवशीही तिला बराच वेळ झोप आली नाही नि उमाळेही येत होते!
दुसऱ्या दिवशी आम्ही आसपासच्या परिसरातली देवळं वगैरे पाहिली. देवळं पाहण्याच्या कार्यक्रमाचा मनस्वीला भारी कंटाळा येतो. तिला हवी फक्त दंगामस्ती नि धुडगूस! बाग, प्राणिसंग्रहालय, अशा ठिकाणी ती जास्त रमते. देवळांत राम-कृष्णाचे वेगवेगळे अवतार पाहण्याचं तिला आकर्षण असतं, तेवढंच!
संध्याकाळी मग आम्ही देवळाच्या आवारातल्याच भल्या मोठ्या तळ्यात मस्त टाइमपास केला. चारही बाजूंनी या तळ्याला पायऱ्या होत्या नि त्यांवर उभं राहून पाण्यात खेळायलाही मजा येत होती. मनस्वीने तिथे भरपूर मजा केली. आदल्या दिवशी चुकलेली पालखी आम्ही दुसऱ्या दिवशी डबल वसूल केली! जवळच्याच एका दत्तमंदिरात तिला मुद्दाम घेऊन गेलो. तिथली पालखी पाहिली नि पुन्हा आमच्या नागेश मंदिरात येऊन तिथलीही पालखी पाहायला मिळाली. मग मात्र मनस्वी खूश होती. शिवाय, तिच्या आवडीची मनीमाऊ तिच्या काकूच्या घरी भेटली. एक-दोनदा हातही फिरवायला मिळाल्यानं तिला मूड आला होता. रात्री तिनं आजीकडे वशिला लावून मनाजोग्या गोष्टींचं पारायण केलं.
तिसऱ्या दिवशी मी मनस्वी आणि माझे बाबा, तिघेच पणजीला जाऊन आलो. आईला यायला जमणार नव्हतं. पणजीचा जातानाचा प्रवास थेट देऊळ ते पणजी स्टॅंड असा होता. मिरामार बीचवर तिला घेऊन गेलो नि तासभर पाण्यात, किनाऱ्यावर खेळलो. किल्ले, बोगदे, विहिरी नि समुद्राची शिल्पं तिथे साकारली. येतानाचा प्रवास मात्र कंटाळवाणा होता. पणजी ते फोंडा, फोंडा ते नागेशी अशा मिनिबसमध्ये खूप अवघडायला झालं.
आम्ही राहत होतो, त्या नागेशी मंदिर परिसरात फारशी दुकानं, हॉटेल्स नव्हती. बाजारही मोठा नव्हता. त्यामुळे कुठे काही पाहायला, फिरायला जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. मनस्वीला दुसऱ्या दिवशीच समोरच्या दुकानातल्या एका वेगळ्या प्रकारच्या चॉकलेटचा शोध लागला. एक रुपयाच किंमत होती, पण ते एका आकर्षक बॉक्‍समध्ये गुंडाळलेलं चॉकलेट होतं. शिवाय प्रत्येकात एक वेगळं गिफ्ट असणार होतं. मनस्वीनं मग दररोज दोन-तीन गिफ्ट जमवण्याचा सपाटा लावला. दोन वाघनखं नि दोन प्रकारच्या अंगठ्या तिला मिळाल्या. आईसाठी घे÷य ठेवलेल्या गिफ्टमध्ये "पाल' निघाल्यानं मात्र ती जराशी हिरमुसली होती.
चौथ्या दिवशीच आम्हाला रत्नागिरीला परतायचं होतं. सकाळी लवकर गोव्यातून निघालो. करमळी स्टेशनवर रेल्वेची वाट पाहताना मनस्वीला रोखणं अवघड झालं होतं. अंगात वारं भरल्यासारखी सैरावैरा धावत होती. तिथे तिला एक मोठी दोरी मिळाली होती. तिचं एक टोक तिच्या हातात नि दुसरं माझ्या हातात बांधून माझा अक्षरशः घाण्याचा बैल केला होता पोरटीनं!
दुपारी अडीचला रत्नागिरीत पोचलो. त्याच रात्री आम्हाला पुण्याला निघायचं असल्यानं संध्याकाळी कुठे गेलो नाही. बसप्रवासही गेल्या वेळेसारखाच झाला. बसमध्ये बसल्यावर लक्षात आलं, आपली शाल तिकडे गोव्यालाच मंदिराच्या खोलीत राहिलेय! मग मनस्वीचं थंडीपासून रक्षण करण्यासाठी टॉवेलचा आधार घ्यावा लागला. सुदैवाने थंडी फार नव्हती. या वेळी मात्र रात्री मलकापूरला चहा ढोसला. झोप लागली नाहीच. येताना पहाटे हर्षदा स्कूटी घेऊन कुडकुडत स्वारगेटला आली होती. मग तिथे स्टॉपवरच मायलेकींचा भरतभेटीचा कार्यक्रम झाला...
चारच दिवसांची सहल होती, पण मनस्वीनं फारसा त्रास दिला नाही. तिसऱ्या दिवशी तिला साधारण आईची उणीव जाणवू लागली होती, त्यामुळं तिची जराशी कुरकूर सुरू होती. पण तिनं प्रत्यक्ष तसं काही बोलून दाखवलं नाही. मग जरा तिच्या कलानं घ्यावं लागलं. कधी बावापुता करून, तर कधी पडतं घेऊन तिचा मूड बनवावा लागला. रोज दोन्ही वेळेला जेवण भरवण्याचा कार्यक्रम न कंटाळता करण्याला पर्याय नव्हता. त्यासाठी स्वतःचं जेवण गार होऊ देऊन तसंच पोटात ढकलावं लागत होतं. चक्क तिकडे रोज पांढरं दूधही (बोर्नविटा, कोकोचा आग्रह न धरता) प्यायली!
एकंदरीत आमची सहल छान झाली. पुढच्या वेळीही कधीतरी असा प्रयोग करायला हरकत नाही! काय?