Aug 30, 2007

लग्नाला यायचं (नाही) हं...!

आमीर खान-किरण राव यांच्या लग्नाच्या "कव्हरेज'साठी आधी मुंबईत आणि नंतर पाचगणीत गेलेल्या पत्रकारांच्या पदरी निराशाच पडली. "बाईट' काय, आमीरनं साधं दर्शनही दिलं नाही. वर त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. खरं तर हा प्रकार गैरसमजुतीतून घडला. आमीरनं लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवली आहे, असा सर्व माध्यमांचा समज झाला, त्यामुळे ते धावत गेले; पण खरी निमंत्रणपत्रिका आम्हाला मिळाली. सोबत ती देत आहोत...

--------
...(सौ.) रिना प्रसन्न... आमचे येथे श्री कृपेकरून श्री. आमीर खान आणि किरण राव यांचा विवाह समारंभ मुंबईत नोंदणी पद्धतीने होणार आहे. त्यानंतर पाचगणीत दोन दिवस स्वागत समारंभाच्या नावाखाली "श्रमपरिहार' आयोजित करण्यात आला आहे. (तिथे सगळी "सोय' आहे.)

कार्य सिद्धीस नेण्यास आमचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आम्ही स्वतः समर्थ आहोत. या शुभकार्यास आपले (दुरून) आशीर्वाद आम्हास अतिशय मोलाचे आहेत, तरी लग्नसमारंभातील गोंधळ आणि स्वागत समारंभाची धावपळ लक्षात घेता, दोन्ही कार्यक्रमांना "न' येणेचे करावे. नंतर आमचे नवीन चित्रपट, अन्य "प्रोजेक्‍ट' आणि गॉसिप यांसाठी मात्र अवश्‍य येणेचे करावे.
(आपल्याला न बोलावता आमच्या लग्नाला जेवढी प्रसिद्धी मिळेल, तेवढी बोलावूनही मिळणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.)

विशेष टीप ः कृपया कॅमेरे आणि माईकचा "आहेर' आणू नये. आपली अनुपस्थिती हाच आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आपले, समस्त हुसेन आणि राव परिवार

जाहीर आभार!



"समस्त अंगप्रदर्शक नायिका संघटने'च्या धाडसी प्रवक्‍त्या, आमच्या प्रेरणास्थान आणि समस्त उदयोन्मुख नायिकांच्या स्फूर्तिस्थान असलेल्या, "थेट बोल'सम्राज्ञी मल्लिकाताई शेरावत यांना त्रिवार प्रणाम! ताई, केवळ आपण होतात म्हणूनच माझ्या रूपात आमूलाग्र बदल होऊ शकला. माझं जुनंपुराणं, "काकूबाई' रूप घालवून तुम्हीच मला नवं, आकर्षक आणि "वळणदार' रूप मिळवून दिलंत.


आपली आंतरराष्ट्रीय ख्यातीची ऐश्‍वर्याही आमच्या कुठल्या भगिनीचा असा "काया'पालट घडवू शकली नव्हती. आता तर मल्लिकाकडे बघावं, की तुझ्याकडे असा प्रश्‍न पडतो, अशी "चावट' कॉमेंटही मला ऐकू येते. (माझं "कर्व्ही' हे नवं रूप खास तरुणांसाठी आहे, असंही मल्लिकाताई म्हणाल्या...इश्‍श्‍य!)


परमपूज्य मा. मल्लिकाताईंच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा!!


-शुभेच्छुक, सेव्हन अप "कर्व्ही'

लज्जा आणि मज्जा!


बिच्चारी राखी सावंत!

काय तरी तिच्या अब्रूचे धिंडवडे!

त्या निर्लज्ज मिकानं त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचा मुका घेतला. तोही सगळ्यांच्या देखत. बिच्चाऱ्या राखीनं आतापर्यंत कुण्णा कुण्णाला म्हणून मुका दिला नव्हता. त्याच पार्टीत आधी तिनं त्याच्या गालांची पप्पी घेतली ती केवळ आदर व्यक्त करण्यासाठी. मिकानं मुक्‍यानं तिचा अपमान केला.


बिच्चारी.

कुठ्ठं कुठ्ठं म्हणून तोंड दाखवायला जागा राहिली नाही तिला.

पण ती काही रडूबाई नव्हती. रणरागिणीच्या थाटात ती धाडसानं प्रसारमाध्यमांसमोर जाऊन उभी ठाकली. त्यांना सर्व हकीकत इत्थंभूत वर्णन केली. पोलिसांकडे जाऊन तक्रारही दिली. म्हणजे काय? सोडते की काय ही मराठी वाघीण त्या पंजाबी "लांडग्या'ला? पंजाबी असला म्हणून काय झालं, तुझी मर्दानगी तिकडं सीमेवर दाखव म्हणाव. मराठी मुलीचा असा "विनयभंग' करतोस म्हणजे काय? "तळं "राखी'ल तो पाणी चाखील' ही म्हण मिकाला माहिती असण्याचं काहीच कारण नाही. राखी कोणाचीही होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे, असं कुणी तरी त्याला सांगितलं असणार. त्यानं बाकी काही माहिती करून न घेता त्याचं अनुकरण केलं, एवढंच. राखीनं त्याच्या गालांवर पप्पी दिली, त्यानं तिच्या ओठांवर! त्यात तिचा अपमान आहे, तिच्यातल्या संवेदनशील स्त्रीच्या चारित्र्यावर घाला आहे, हे कळलंच नाही त्या मेल्याला.


ती बिचारी गरीब, साधी-भोळी मुलगी. पोटासाठी तिला आणि तिच्यासारखीच "पाठी-पोटा'ची लढाई लढणाऱ्या दीपल शॉ, सनोबर कबीर, आणि असंख्य "नटव्यां'ना काय काय करावं लागतं! गाण्याची लय, ताल आणि त्यातले भाव यांच्याशी संबंध नसलेलं नृत्य करायचं. आपल्या संगीत-तमाशाची बारी घेऊन गावोगाव हिंडायचं. प्रेक्षकांची गरज आणि मागणी म्हणून त्यांना हवे तसे हावभाव करायचे. त्यातून काय दोन-चार पैसे गाठीला येतील ते कुटुंबीयांसाठी, स्वतःसाठी राखून ठेवायचे. पुरेसे कपडेही घालायला परवडत नाही बिचाऱ्यांना. वर पोलिसांचा, संस्कृतिरक्षकांचा ससेमिरा आहेच. गरिबी, आधुनिक नृत्य कशाशी खातात, हे ठाऊक नसलेल्यांनी सार्वजनिक भावना लक्षात न घेता "अश्‍लील अश्‍लील' म्हणून एकीकडे त्यांच्याविरुद्ध तुरुंगात जायचं. त्यांनी घाबरून व्यवस्थित कपडे घातले, तरी दुसऱ्या ठिकाणच्या प्रेक्षकांनी "पैसा वसूल न झाल्याची' बोंब ठोकायची. सगळीच गोची.


त्यातून राखी पडली बिचारी मराठी पोरगी. "बुरसटलेल्या विचारां'च्या लोकांच्या समाजात वावरणारी. आपल्यातली एक मुलगी अटकेपार झेंडे लावतेय, केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला आपल्या तालावर नाचायला लावतेय, याचा अभिमान मिरवण्याऐवजी तिचे पाय ओढण्यात धन्यता मानणारेच अधिक. मग तिनं हिंदी चित्रपटसृष्टीच्या महासागरात "स्ट्रगल' करावा तरी कुणाच्या बळावर? आता करत असेल ती अश्‍लील हावभाव. केलं असेल अंगप्रदर्शन. अगदी कमरेचं सोडून डोक्‍याला गुंडाळलं असेल. पण एक मराठी मुलगी एवढं पुण्ण्याचं ("पुण्या'चं नाही!) काम करतेय, अवघी चित्रपटसृष्टी व्यापून राहिलेय, याचं काहीच कौतुक नाही तुम्हाला? ती म्हणतेच, "अगर अपनी फिल्में दाल हैं, उसमे मेरे "आयटेम सॉंग'का डाल दे, तो उसमें "तडका' लग जाता है.' आपली मराठी लवंगी मिरची "दाल तडक्‍या'लाही पुरून उरलेय, याची कुठे तरी जाणीव नको?


अमेरिका चंद्रावर पोचलीय. तुम्ही डोंगरावर किती दिवस राहणार? बिच्चाऱ्या त्या माधुरी दीक्षित, ऊर्मिला मातोंडकर, मधू सप्रे, उज्ज्वला राऊत, सोनाली बेंद्रे, वर्षा उसगावकर याच जुनाट विचारांशी लढत राहिल्या. आता नव्या दमाची मराठी मुलगी नव्या जोमानं लढायला सज्ज झाली आहे. "राखी' हे नाव घेतल्यावर बहिणीविषयीचा आदर, प्रेमाची जशी पवित्र भावना आपल्या मनात दाटते, तसंच पवित्र काम राखी सावंत करत आहे. "अश्‍लील, बीभत्स,' असे टोमणे मारून तिची उमेद खच्ची करू नका. जरा डोळे उघडून बघा. बुरसटलेले विचार झटकून टाका. टीव्ही वाहिन्यांनी तिच्या वादाचं दळण थांबवलं असेल, तर तिचे विचार ऐकायला "मुक'लेले तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. आता तरी तिच्या अंगविक्षेपांचा, अंगप्रदर्शनाचा वेगळ्या "अंगा'नं विचार करा. त्यातली आधुनिकता, सौंदर्य तुम्हालाही सापडेल!


तथास्तु!

Aug 29, 2007

टाळण्याची कला...

आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन...
-----------

एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं. (आपली गोची इथंच होते!) त्यामुळं लेख लिहिणं टाळणं टाळता येण्यासारखं नव्हतं.

तर...टाळणं. आयुष्यात काय काय टाळावं लागतं नाही! आणि काय काय टाळावंसं वाटतं, तरीही जमत नाही! आपल्याला आपल्या अपत्याचा जन्मही टाळता येतो; पण स्वतःचा जन्म मात्र नाही. एक वेळ दुसऱ्याला टाळता येतं; पण स्वतःला टाळता येणं अशक्‍यच. लोकांना टाळणं हा काही जणांचा हातखंडा खेळ असतो. काही जणांना मात्र टाळण्याची कलाच अवगत नसते. कुणाकुणाला टाळावंसं वाटतं, याची यादी करायची म्हटली तर भलीमोठी होईल. दूधवाला, पेपरवाला, कचरेवाली, लाइट बिलवाले, टेलिफोन बिलवाले, मोबाईल बिलवाले, मेंटेनन्सवाले, प्रॉपर्टी टॅक्‍सवाले हे महिन्याच्या महिन्याला किंवा ठरलेल्या तारखेला हजर म्हणजे हजर! एक वेळ रोजचा रतीब चुकवतील, खाडा मांडायला चुकतील; पण बिल न्यायला ठरलेल्या तारखेला यायला चुकतील तर शपथ!! बरं, तोंडावर भाव असा, की आठ-आठ दिवस उपाशी आहेत आणि आपल्या शंभर-दोनशे रुपयांच्या बिलानं त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे.

काही दूधवाले, पेपरवाले मात्र प्रेमळ असतात. महिन्याच्या महिन्याला बिलं पाठवत नाहीत; पण जेव्हा पाठवतात, तेव्हा ती आपले डोळे पांढरे करणारी असतात. एकदम सहा-सहा महिन्यांची बिलं. म्हणजे "भीक नको पण कुत्रं आवर'सारखी अवस्था. त्यावर व्याज लावत नाहीत, हे नशीब. ही झाली आपण घेतलेल्या सेवेसाठी पैसे मागणाऱ्या लोकांची उदाहरणं. आपल्याला नको असलेल्या सेवेबद्दलदेखील पिडणारे कमी नाहीत. त्यांना टाळावं कसं, याचे प्रशिक्षण वर्ग घेतले, तर धो धो चालतील. काही काही सोसायट्यांवर पाट्या दिसतात- "फेरीवाले, विक्रेते यांना सोसायटीत प्रवेश बंद.' पण फोनवरून कुठल्या कुठल्या उत्पादनांबद्दल गळ घालणारे आणि "आमच्याकडून यंदा कर्ज घ्याच...' अशी प्रेमळ विनंती करणाऱ्या फेरीवाल्यांना कसं अडवणार?

बॅंका हल्ली "फ्रॅंचायझी' नेमतात आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना ग्राहकांवर "छू' करतात. हे "फ्रॅंचायझी' खरोखर भुकेल्या कुत्र्यासारखे आपल्यावर तुटून पडतात. सगळ्यात वात आणतात ते क्रेडिट कार्डवाले. एक वर्षासाठी फुकट, अमक्‍या रकमेच्या खरेदीवर तमकं फुकट असल्या "ऑफर' घेऊन हे विक्रेते दिवसभर फोनमध्ये तोंड घालून बसलेले असतात. त्या ऑफरची माहिती देऊन झाली, की लगेचच आपण त्याला होकार देऊन टाकणार आणि काही क्षणांत त्यांचा प्रतिनिधी आपल्या घरात येऊन आपल्या कुठे कुठे सह्याही घेऊन जाणार, हे त्यांनी अगदी गृहीतच धरलेलं असतं.

काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्‍य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना.

या लोकांची घरी फोन करण्याची वेळही झक्कास असते. सकाळी नऊ, रात्री आठ, भर दुपारी दोन किंवा तीन...वाट्टेल तेव्हा! आपण दुपारी वामकुक्षी घेत पहुडलेले असताना घणघणणारा फोन उचलण्यासाठी चरफडत उठायचं आणि ऐकायचं काय, तर कुठल्यातरी बॅंकेच्या क्रेडिट कार्डाची, कर्ज योजनेची, नाहीतर कुठल्या तरी कंपनीच्या बक्षीस योजनेची माहिती. आपण बाहेर निघालेलो असताना अचानक येऊन टपकणाऱ्या पाहुण्यांना, नको असताना पत्र पाठविणाऱ्यांना / फोन करणाऱ्यांना, आपल्यालाच फोन करायला लावून अघळपघळ बोलत बसणाऱ्यांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या उखाळ्यापाखाळ्या करणाऱ्यांना कसं टाळायचं, हीदेखील एक समस्याच. लोकांच्या उधाऱ्या घेऊन वर त्यांनाच काहीबाही कारणं सांगून आपल्याविषयी सहानुभूतीच वाटायला लावणारे महाभाग काही कमी असतात? पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून आपल्याला टाळणं, ही त्याच्यासाठी समस्या नसतेच. उलट, तो पुन्हा पैसे मागू नये म्हणून त्याला टाळणं ही आपल्यासाठीच समस्या बनते.

टाळण्याची कला ज्यांना येते त्यांच्याकडून ती शिकून घ्यावी, हे बरं. उद्या त्यांनाच टाळायचं झाल्यास "गुरूची विद्या गुरूला' वापरता येईल. असो. टाळाटाळीवर बरीच टकळी चालवली.

आता "टळलेलं' बरं.

Aug 28, 2007

माझा साक्षात्कारी चित्रपटरोग

चित्रपट पाहण्याचं आमचं व्यसन जुनंच. अगदी लहानपणापासून कधी आयशी-बापसाचा डोळा चुकवून, कधी लाडीगोडी लावून, कधी "बंडल' मारून थेट्राच्या वाऱ्या आम्ही करत आलोय. (वि. सू. "आम्ही' म्हणजे कोण, असा बावळटासारखा प्रश्‍न विचारू नका. "आम्ही' म्हणजे आम्ही स्वतः. म्हणजे मी...घरी-दारी किंमत नाही; निदान व्यक्तिगत पातळीवर तरी आदर मिळवू द्या राव!) झापा-बिपाच्या थेट्रात पिक्‍चर पाहिला नाही कधी; पण सत्यनारायाणाच्या पूजेच्या निमित्तानं शेतात, काट्याकुट्यात, बांधावर, झाडावर, कुठेपण बसून पिक्‍चर पाह्यलेत.

चित्रपटांचं हे व्यसन कधी लागलं, काही सांगता येणार नाही. (देव आनंद कधी बहकला, महेश भट कधीपासून वाईट चित्रपट काढायला लागला, हे नेमकं सांगता येईल का? ते जाऊ दे! ...गेला बाजार ममता कुलकर्णी, शिल्पा शिरोडकर, सोनम, किमी काटकर, कधीपासून बघवेनाशा झाल्या सांगता येईल का? ...तसंच आहे हे!!) तर सांगण्याचं तात्पर्य हे, ही हे चित्रपटवेड अगदी प्राचीनच म्हणायला हवं. चौथीत असताना पहिल्यांदा आई-बापाव्यतिरिक्त, एका टवाळ पोराबरोबर पिक्‍चर पाह्यला होता...अमिताभचा "इन्किलाब'. तेव्हापासून ते "गणपती बघायला जातोय' सांगून पाहिलेल्या "राम तेरी गंगा मैली' किंवा "टारझन' (आपला गावठी टारझन...हेमंत बिर्जेचा...बो डेरेकचा हल्ली हल्ली पाहिला बरं का...!) व्हाया हे व्यसन आता पोरीबरोबर "चक दे इंडिया' पाहण्याची कसरत करेपर्यंत कायम राहिलंय...चित्रपट पाहण्याचं वेड (किंवा असभ्य भाषेत "खाज'च म्हणा!) एवढं, की कुठलंही थेटर, कुठलाही वर्ग, कुठलंही ठिकाण आपल्याला वर्ज्य नाही. अगदी "निशात', "अल्पना', "भारत', "श्रीकृष्ण', "श्रीनाथ'पासून ते "ई-स्क्वेअर', "आयनॉक्‍स'पर्यंत मोठी "रेंज' आहे आपली! बाकी, मल्टिप्लेक्‍सला फक्त ऑफिसच्या खर्चानंच पिक्‍चर परवडतो म्हणा!

बरं, कुठलाही हिरो, कुठलीही हिरॉईन वर्ज्य नाही आपल्याला!तुम्ही देव आनंदचा "मैं सोलह बरस की' पाहिलाय?...मी "फर्स्ट डे फर्स्ट शो', "वसंत'ला पाहिलाय! सकाळी साडेनवाच्या ठोक्‍याला!त्याच्या "गॅंगस्टर', "सेन्सॉर', अशा सिनेमांची नावंही अनेकांना माहित नसली, तरी ते मी पाहिलेत. स्वतःच्या खर्चानं, तिकीट काढून....लॉजवर राहत असताना रात्री साडेनऊचा पिक्‍चर बघायचा आणि जेवायला वेळ नाही, म्हणून आधी डबा खोलीवर आणून ठेवून, रात्री साडेबाराला रूममेटना त्रास नको, म्हणून अंधारात जेवण्याचा पराक्रमही मी केलाय!मिथुन, सुजॉय मुखर्जी, करण कपूर, अरमान कोहली...यापैकी कुणाच्याही पिक्‍चरला मी थेट्रातून एक क्षणही हललेलो नाही...अर्ध्यावर निघून जाण्याची तर गोष्टच सोडा!तर असं हे आमचं चित्रपटवेड.पण आता वय नाही राहिलं, तेवढ्या उत्साहाचं. संसाराचा भार पेलताना परवडतही नाहीत, असली "थेरं'.कधीकधी फारच उबळ आली, तर जातो. बहुधा...एकटाच!परवा असाच एक पराक्रम केला...माझ्या अडीच वर्षांच्या मुलीबरोबर...मनस्वीबरोबर एकट्यानं चित्रपट पाहण्याचा...!"चक दे इंडिया' पाहायचा तर होता, पण कुणाबरोबर जाणं जमत नव्हतं. म्हणून मनस्वीला घेऊनच जायचं ठरवलं.

"सिटीप्राईड कोथरूड'ला 90 रुपयांचं तिकीट आणि वर पार्किंगला पाच रुपयांची दक्षिणा देऊन आत प्रवेश मिळवला. ती राहतेय की नाही, ही धाकधूक होतीच...कारण तिला घेऊन आधी एकच पिक्‍चर पाहिला होता...महेश कोठारेंचा "जबरदस्त'. पण त्या वेळी बायकोही बरोबर होती आणि पिक्‍चर मराठी असल्यानं तिलाही (म्हणजे, मनस्वीला...फालतू विनोद कसले करताय?) थोडंफार कळत होतं. या वेळी थोडी अवघड परीक्षा होती...हिंदी चित्रपट तिच्या पचनी पाडण्याची. म्हणजे, तिला काय माझ्यासारखं परीक्षण वगैरे लिहायचं नव्हतं, पण ती निदान अडीच तास थेटरात बसणं आवश्‍यक होतं.

रांगेत राहून तिकीट काढलं आणि पहिलीच रांग मिळाली. चित्रपटाआधीच्या संगीताचा दणदणाट सुरू झाल्यावरच मनस्वी घाबरली. एकतर पहिल्या रांगेत असल्यानं पडदा अंगावर येतोय, असंच वाटत होतं. त्यातून डॉल्बी डिजिटल का फिजिटल काय ती साऊंड सिस्टीम. कसं सहन करावी त्या एवढ्याशा जिवानं? बरंच काही समजावल्यावर मग राहिली. दहा मिनिटांतच तिचा खुराक सुरू झाला. डब्यातून आणलेली बिस्किटं, बाकरवड्या, वेफर्स, नानकटाई, सगळं चरून झालं. वीसेक मिनिटांनी मागच्या रिकाम्या खुर्च्या बघून शाहरूख खानची बूज राखण्यासाठी मागे जाऊन बसलो. मग मात्र मनस्वी जरा थंडावली. एकतर तिला (फुकटात) स्वतंत्र सीट मिळाली होती, वर खुराकही चालू होता.

तिच्या अधूनमधूनच्या बडबडीचा माझ्याशिवाय कोणाला त्रास होत नव्हता.इंटरव्हलच्या काही मिनिटं आधीपासूनच तिची चुळबुळ सुरू झाली. नंतर आईस्क्रीम घेऊन देण्याची लालूच मी तिला दाखवली होती. त्यासाठी ती उतावीळ होती. दारं बंद आहेत, लाईट चालू नाहीत वगैरे कारणं तिच्या गळी उतरली नाहीत. तेवढ्यात इंटरव्हल झाला आणि माझ्याच जिवात जीव आला. इंटरव्हलमध्ये आईस्क्रीम आणि पॉपकॉर्नसाठी 55 रुपयांची फोडणी बसली. आईस्क्रीम खाण्याचा कार्यक्रम यथासांग (पॅंट, टी शर्ट, तोंड, हात आणि सर्वांग रंगवून) झाला. हात पुसून टाकायला तिचा विरोध होता. (स्वच्छतासम्राज्ञीच ना ही!) त्यामुळं चरफडत तिला घेऊन बेसिनपर्यंत जाणं आलं. तिथून थेटरात परल्यावरही तिला तोंड धुवायचं राहिल्याचं लक्षात आलं. म्हणजे, तोंड धुतलं होतं तिचं, पण चूळ नव्हती भरली. (रोज घरी सकाळी तोंड धुताना आणि दात घासताना घाम काढते कार्टी!) समजावण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर पुन्हा बाथरूमची वारी करावी लागली. बरं, लेडीज टॉयलेटमध्ये जावं, तरी पंचाईत! शेवटी अपंगांसाठीच्या राखीव टॉयलेटमध्ये तिचं तोंड विसळावं लागलं. तरीही तिचं समाधान झालं नाहीच. पुन्हा खुर्चीवर येऊन बसल्यावर तिनं हात धुण्याचं टुमणं लावलं. मग पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतच तिला हात धुवायला सांगितलं, तर बयेनं तोंडात पाणी घेऊन पाचकन चूळही भरली खुर्चीखाली!अरे कर्मा! कुणी बघितलं नाही म्हणून नशीब!नाहीतर पुण्यातले तथाकथित उच्चभ्रू वास्सकन अंगावर भुंकले असते...!!


सिनेमा सुरू असताना, पडद्यावरची पात्रं ओरडली, की हीदेखील ओरडायची! गंभीर दृश्‍य सुरू असताना काहीतरी बोलायची तिला उबळ यायची. मग तिला आवरताना नाकी नऊ येत होते. (पोरीबरोबर बघायचाय ना सिनेमा, मग भोग आपल्या कर्माची फळं!)सिनेमा संपायला काही मिनिटं बाकी असताना म्हणते कशी, "शाहरूख खान कुठे गेला बाबा?'

...मी खुर्चीतून कोसळायचाच बाकी राहिलो होतो!
शाहरूख खान...?

च्यायला, शेजारच्यांचं किंवा शाळेतल्या बाईंचं नाव सांग म्हटलं तर येणार नाही कार्टीला...अजून ...यची नाही अक्कल, नि शाहरूख खान...?
हिला काय माहित?
च्यायला, आईस-बापूस हेच शिकवतात की काय घरी...असेच विचार मनात तरळून गेले.

कसाबसा सावरलो आणि सिनेमाही लवकर संपला. तसा फारसा त्रास झाला नाही, उलट मजाच आली. वेगळाच अनुभव होता."तुला काय बोलायचं असेल, तर आत्ताच बोल. सिनेमा सुरू झाल्यानंतर पचकू नकोस' अशी धमकी बायकोला किंवा मैत्रिणीला देणारा मी, मुलीपुढे हतबल होतो. पण बरी राहिली होती बया...तशी फार उधळली नाही.

पुन्हा बघायला हरकत नाही एखादा पिक्‍चर तिच्याबरोबर...!

अर्थात, थेटरवाल्यांची तक्रार नसेल, तर!

-----