Nov 11, 2009

सूर्योदय रायगडावरचा

१. रायगडावरून दिसलेली चंद्राची मनमोहक प्रभा.
mahabaleshwar-nov 09 280

२. नगारखान्यावरून पहाटे टिपलेला चंद्र.

mahabaleshwar-nov 09 310

३. छत्रपतींसोबत चंद्रही सूर्योदय पाहायला उत्सुक होता.

mahabaleshwar-nov 09 316

४. आम्ही सरसावून बसलो होतो, पण आदित्य महाराज वाकुल्या दाखवत होते.
mahabaleshwar-nov 09 318


५. अखेर त्यांनी हळूच डोकं वर काढलं.

mahabaleshwar-nov 09 320

६. लांबवर एक नजर टाकली...
mahabaleshwar-nov 09 321


७. मग डुलत डुलत अजून वर सरकले

mahabaleshwar-nov 09 322

८. प्रुथ्वीतलावरची पकड आणखी घट्ट केली...

mahabaleshwar-nov 09 332

९. आणखी घट्ट....!

mahabaleshwar-nov 09 327

१०. भेट दोन सूर्यांची
mahabaleshwar-nov 09 334

११. नगारखान्याच्या दरवाज्यातून टिपलेलं सूर्याचं लोभस रूप

mahabaleshwar-nov 09 342


रायगडावर स्वारीची ही माझी तिसरी आणि मुक्कामाची दुसरी वेळ होती. याआधी मुक्काम केला होता, तो जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाच्या व्हरांड्यात. या वेळी सहकुटुंब गेलो असल्याने जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाचं आधीच आरक्षण करून ठेवलं होतं. पण तोही प्रयोग फसला. विश्रांतीगृह अगदीच भकास आणि गलिच्छ अवस्थेत होतं. पण एमटीडीसीच्या विश्रामगृहात उत्तम सोय झाली. संध्याकाळी गडावर फिरून आम्ही खोलीवर परतलो, तेव्हा चंद्राची तांबूस-तपकिरी प्रभा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत चंद्राचा असा रंग कधीच पाहिला नव्हता.
संध्याकाळी सूर्यास्तही पाहिला, पण सगळ्यात आकर्षण होतं सकाळच्या सूर्योदयाचं. मुक्काम गडावरच असल्यानं सकाळी हा मुहूर्त गाठायचाच, असं मी ठरवलं होतं. सकाळी सहा वाजता गजर लावून उठलो, तेव्हा बऱ्यापैकी फटफटलं होतं. वाटलं, सूर्य वर आला की काय! पटकन आवरून कॅमेरा सरसावून नगारखान्याकडे पळालो. सुदैवानं सूर्य वर आलेला नव्हता. तोपर्यंत मेघडंबरीचे आणि नगारखान्याच्या मुख्य दरवाज्याचे फोटो टिपले. चंद्रासह हे फोटो फारच आकर्षक वाटत होते. पहाटच असल्यानं बऱ्यापैकी अंधार होता आणि फ्लॅश टाकून स्पष्ट फोटो येत नव्हते. अखेर फ्लॅश बंद करणं जमलं आणि उत्तम फोटो टिपता आला.
धुंद-कुंद हवा आणि वारा वाहत होता आणि त्यात नगारखान्याच्या समोरच्या ध्वजस्तंभावरची लोखंडी साखळी स्तंभावर आपटून खण-खण आवाजात मधुर निवाद करत होती. त्या भारलेल्या वातावरणात तो मंद ध्वनी मंदिरातल्या पवित्र घंटानादासारखाच लयबद्ध वाटत होता. नगारखान्याकडून होळीच्या माळाकडे वळलो. बाजारपेठेसमोरच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो. तिथे काही अन्य लोक सूर्योदयाची छबी न्याहाळण्यासाठी जमले होते. सूर्योदयापूर्वीची प्रभा क्षितिजावर रंग उधळत होती, पण आदित्य नारायण उगवले नव्हते. बहुधा, धुक्‍यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे महाराजांचं कोवळं रूप पाहायला मिळणारच नाही, अशीच शंका मनात दाटून आली. 6.40 होत आले होते, तरी त्यांनी डोकं वर काढलं नव्हतं. "डोंगरावरून चढून यायला त्याला वेळ लागत असणार,' असा विनोदही कुणीतरी केला.
एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता! अखेर आमच्या प्रतीक्षेला फळ आलं आणि घरातल्या छोट्या खुर्चीच्या आधारानं लहानग्यानं उभं राहावं, तसं सूर्याच्या लालबुंद गोळ्यानं हळूच डोकं वर काढलं. आळसातून जागा होत असलेला रायगड आपल्याच कोवळ्या प्रकाशात दिसतो तरी कसा, हेच पाहण्याचा तो प्रयत्न करत होता बहुधा. बराच वेळ प्रतीक्षा करायला लावून एखादा "स्टार' कसा आल्याआल्या वातावरण भारून टाकतो, तसाच काहीसा अनुभव होता तो.
या "ताऱ्या'नं सगळ्यांना मनसोक्त फोटोबिटो काढू दिले. मग शिवाजी महाराजांच्या अस्तित्त्वाची आणि जबाबदारीची जाणीव झाली असावी बहुधा त्याला. लगालगा वर आला. आपली लालबुंद, कोवळी प्रभा झटकून टाकली आणि नंतर हळुहळू रंग बदलून कामाला लागला. मीदेखील मग त्याचा नि महाराजांचा निरोप घेऊन माझ्या आन्हिकांकडे वळलो...

for more photos click here

Nov 9, 2009

मी कात टाकली

कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे.

बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता. पाडव्याला संध्याकाळी घरी नको, म्हणून आम्ही सासुरवाडीला (माझ्या!) जाऊन आलो होतो. फटाके उडवण्याची ही शेवटचीच संधी मनस्वीला दवडू द्यायची नव्हती. तसेही, दिवाळी यंदा दोनच दिवस होती आणि लगेचच शाळा सुरू होणार होती. त्यामुळे साडेदहा वाजले होते, तरी मी तिच्याबरोबर गच्चीत फटाके उडवायला जायला तयार झालो. फुलबाजे वगैरे उडवून झाल्यानंतर आम्ही भुईनळे उडवायला घेतले. तिला भुईनळा लावायला शिकवण्याचा बेत होता. तिच्या हातात फुलबाजा देऊन मी तिला शिकवायच्याच प्रयत्नात होतो, पण तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिनं अचानक माघार घेतली. "मी नाही उडवणार' म्हणायला लागली. मग तिचा नाद सोडून तिच्यासाठी मीच तो भुईनळा पेटवण्यासाठी सरसावलो. छोटाच फुलबाजा होता. भुईनळ्याच्या टोकाला तो लावला आणि एकदम "ठाप्प' आवाज आला. माझ्या डोळ्यापुढे अंधार झाला. दोन मिनिटं काही सुचेचना. दिसेचना. मी जोरात ओरडलो फक्त. भानावर आलो तेव्हा कळलं, हाताचा अंगठा आणि एक बोट पूर्णपणे भाजलं होतं. मधल्या बोटालाही अर्धवट इजा झाली होती. भुईनळा वर उडण्याऐवजी फुटला होता. बॉंबसारखा! माझ्या हाताचा जो भाग मिळाला, तो पोळून निघाला होता.

सुरुवातीला भाजण्याची तीव्रता कळली नाही. चटकन नळाच्या धारेखाली हात धरला, पण आग वाढत होती. सहन होण्याच्या पलीकडे गेली होती. काय झालं, ते मनस्वीला कळतच नव्हतं. "बाबा, फटाके उडवायला चला,' हे तिचं टुमणं सुरूच होतं. मी ताडकन घरी आलो आणि पुन्हा हात पाण्याखाली बुडवून ठेवला. पण तरीही वेदना कमी होत नव्हती.

डोळ्यापुढे अंधार झाला, पण सुदैवानं डोळ्यांना काही झालं नव्हतं. काही क्षणांत मला व्यवस्थित दिसू लागलं. बाथरूममधल्या गॅस हीटरवरची काही अक्षरं वाचूनही पाहिली. मग समाधान झालं. हाताची आग मात्र थांबत नव्हती. पाण्याखाली तरी किती वेळ धरणार?

फटाके उडविण्याच्या कार्यक्रमाचा फियास्कोच झाला होता. कुणीतरी सांगितलं, बटाट्याचा किस हातावर लावा. तो उष्णता शोषून घेईल. मग तसं केलं. जरा गार वाटलं. पण नंतर पुन्हा तो किस गरम झाल्यासारखं वाटू लागलं. हात झोंबायचा काही कमी होईना.

साडेअकराला अंथरूणावर अंग टेकलं. दिवाणाच्या शेजारी तेवढ्याच उंचीचं स्टूल घेऊन त्यावर हात ठेवला. स्टुलावर हात, त्यावर बटाट्याचा किस, अशी "लगोरी' रचलेली दिसत होती. तरीही, स्वस्थ झोपवेना. हाताची वेदना काही सुचू देईना. मग उठलो. टीव्ही लावला. दिसेल ते बघत बसलो. रात्री दोनपर्यंत हात ठणकत होता. मी अस्वस्थ येरझारा घालत होतो, चॅनेल बदलत होतो, हातावर फुंकर मारत होतो, बटाट्याचा किस खालीवर करत होतो. शेवटी दोनला जरा वेदना कमी झाली आणि पुन्हा एकदा निद्रादेवीची आराधना करण्याचा विचार केला. सुदैवानं झोप लागली.

दुसऱ्या दिवशी काळी पडलेली बोटं आणि भाजलेली कातडी भयानक दिसत होती. डॉक्‍टरांकडून रंगीबेरंगी गोळ्या आणल्या. (कुठलाही आजार झाला, की आमच्या डॉक्‍टरांना रंगीबेरंगी गोळ्या द्यायची हौसच आहे. पूर्वी पानपट्टी चालवायचे बहुधा!) बॅंडेज करायचं नव्हतं, हात बांधायचा नव्हता. त्यामुळं आमचा हा उवद्‌व्याप सर्वांना चर्चेच्या गुऱ्हाळासाठी उपयोगी पडणार होती. ऑफिसच्या दैनंदिन गॉसिपव्यतिरिक्त चघळायला आणखी एक विषय!

साधारणपणे आठ दिवस जुन्या कातडीच्या खाली येणारी नवी कातडी जाम चावत होती. कराकरा खाजवायची इच्छा होत होती, पण इलाज नव्हता. सुदैवानं उजवा हात असला, तरी ऑपरेटिंगसह सगळी कामं मला करता येत होती. पंधरा दिवसांनी हात व्यवस्थित झाला. जुनी कातडी जाऊन नवी कातडी आली. मला कात टाकल्यासारखंच वाटू लागलं. आता नवी कातडी जुन्या कातडीशी जुळूनही आलेय बहुतांश भागात. पूर्ण बरं व्हायला अजून काही दिवस, महिने लागतील, अशी शक्‍यता आहे.

सुदैव म्हणजे मनस्वीला तो भुईनळा न उडविण्याची सुबुद्धी लवकर झाली. तो फुटणार आहे, हे तिला "सिक्‍स्थ सेन्स'नं कळलं की काय कोण जाणे! (ती मुलगी असल्यानं तिच्याकडे तो असण्याची दाट शक्‍यता आहेच. पण बापाला घडोघडी पिडू नये, हे पहिले पाच "सेन्स' वापरूनही का कळत नाही, ते तिलाच ठाऊक!)

मोठा झाल्यानंतर भाजण्याचा हा पहिलाच अनुभव. शाहिस्तेखानासारखं आमचंही त्या बोटांवरच निभावलं. लहानपणी असाच एकदा भाजलो होतो. खुर्चीवर मागे उभं राहून खुर्चीच्या दोन पायांवर ती आपल्या अंगावर घेऊन झुलण्याचा आवडता खेळ खेळत होतो. मागे स्टोव्हवर पिठलं रटरटत होतं. खुर्ची जास्तच अंगावर आली नि मी पिठल्यात पडलो. उजवा खांदा नि बरीच बाजू खरपूस भाजून निघाली होती. पिठल्यासारखी! दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती नि मी मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये बसून पेपर दिला होता! तरीही भाजल्याच्या रात्री मी व्यवस्थित जेवलो आणि मला भाजलं म्हणून माझी बालमैत्रीण कम बहीण मात्र उपाशी राहून रडत बसली होती, हे ती अजूनही सुनावते कधीकधी!

असो. कात टाकल्यानंतर आता लिहायलाही बरेच विषय आहेत. दर दोन-तीन दिवसांनी लिहीनच एखादा. वाचत राहा, म्हणजे झालं!