Jan 6, 2014

रजनी फॅन्स...डोन्ट मिस द चॅन्स...!


सासवडला होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सुपरस्टार रजनीकांतला निमंत्रण धाडण्यात आल्यानंतर समस्त सारस्वत विश्वात अपरिमित आनंद झाला. रजनीकांतने येणार असल्याचे गुपचूप कळवून टाकल्यानंतर त्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. त्यानुसार संमेलनातील काही कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला.

`मराठी साहित्याचे काय होणार` अशा स्वरूपाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, तो बदलून `मराठी साहित्यः तंत्रज्ञानाने मारले, रजनीकांतने तारले` असा करण्यात आला. `मराठी साहित्य साता समुद्रापार` अशा विषयावर एक परिसंवाद होता, त्याचाही विषय बदलून `मराठी साहित्य सात आकाशगंगांपार` असा करण्यात आला. या परिसंवादांना तुफान प्रतिसाद मिळाला. रजनीकांतच्या उपस्थितीमुळे फक्त मराठी, अमराठी आणि परदेशस्थ भारतीयच नव्हे, तर इतर ग्रहांवरील काही वाचकही सहभागी झाल्याचे समजते. स्वागतगीताच्या ऐवजी `लुंगी डान्स`वर अप्रतिम नृत्य सादर करण्यात आले. रजनीकांत यांच्या तेजामुळे डोळे दिपू नयेत, म्हणून साहित्यनगरीला भेट देणा-या सर्वांसाठी मोफत गॉगल्सची व्यवस्थाही करण्यात आली होती.

रजनीकांतच्या धमाकेदार एन्ट्रीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. साहित्य महामंडळाने त्यासाठी मुख्य मंचाच्या शेजारीच सुपरसॉनिक रॉकेट उतरण्यासाठीचा तळ बांधला होता. प्रत्यक्षात रजनीकांतने चेन्नई ते सासवड अशा भुयाराची रचना करून घेऊन त्यातून मंचावर एन्ट्री घेतली.

साहित्य संमेलनातील रजनीकांतचे भाषणही खूप गाजले. ``सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मला मिळाले, तेव्हा मी माझ्या रोबो-2 या चित्रपटाच्या तयारीत बिझी होतो. हा आधीच्या `रोबो`पेक्षा खूप वेगळा आणि बिगबिगबजेट सिनेमा आहे. याच्यात डॉ. चिट्टी एक रोबो बनवतो आणि नेपच्यूनवर राहणा-या एका मुलीच्या हा रोबो प्रेमात पडतो. आपल्या ग्रहावरची मुलगी पळवली, म्हणून नेपच्यूनवासीय पृथ्वीवर हल्ला करतात आणि मग हा रोबो पृथ्वीला वाचवतो, अशी ही कथा आहे. सासवडबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. नेपच्यूनवरची वस्ती याच भागात एक सेट लावून दाखवता येईल, असं मला वाटलं. म्हणून मी लगेच होकार कळवून टाकला. आमचा सिनेमा भव्यदिव्य असल्यामुळे शूटिंगसाठी बरंच `साहित्य` लागतं. संमेलन सासवडलाच होणार असल्यामुळे तिथून रेडीमेड `साहित्य` मिळेल, असं माझ्या निर्मात्यानं मला सांगितलं. पण संमेलनातलं साहित्य आणि शूटिंगसाठी लागणारं साहित्य या वेगळ्या गोष्टी आहेत, हे इथे आल्यावर समजलं. असो. काही हरकत नाही. मी महाराष्ट्राचा असलो, तरी चेन्नईशिवाय आता करमत नाही. त्यामुळे शूटिंगच्या काळातही मी रोज चेन्नई-सासवड अपडाऊन करणार आहे. आमची डझनभर हेलिकॉप्टर्स, दहा सुपरसॉनिक विमानं आणि पाच रॉकेटस शूटिंगच्या ठिकाणी रोज साहित्य घेऊन येणार आहेत. त्यामुळे संमेलनात `साहित्य` कमी पडलं, तरी ते पुरवणं आमच्यासाठी अभिमानास्पद असेल.``

संमेलनाच्या व्यासपीठावर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्ये रजनीकांत बसले होते. सिक्कीमला शूटिंगसाठी येण्याचं निमंत्रण पाटीलसाहेबांनी रजनीकांतला दिल्याचं समजतं. तर मुख्यमंत्र्यांनी `आदर्श` प्रकरणाच्या अहवालाचा विषय समस्त भारतीयांच्या मेंदूतून कायमचा पुसून टाकण्यासाठी रजनीकांतना गळ घातल्याचीही खबर आहे. कार्यक्रमादरम्यान मध्येच उठून रजनीकांत हे शरद पवार यांच्याही शेजारी जाऊन बसले होते. त्यावरून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रजनीकांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ब्रॅंड अम्बॅसिडर बनणार असल्याची जोरदार चर्चाही उपस्थितांमध्ये सुरू झाली. शरद पवार यांनी या चर्चेत काही तथ्य नसल्याचं ती सुरू व्हायच्या आधीच स्पष्ट केलं आहे. ``मी फक्त रजनीकांत यांच्या अभिनयाची (?) प्रशंसा केली आणि त्यांच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. `परदेशी नको, देशी घ्या` या विषयावर मराठी चित्रपट बनविण्याची कल्पनाही मी रजनीकांत यांना सुचवली,`` असं पवारसाहेबांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यावरूनही वाद झाल्यानंतर `परदेशी` या शब्दाचा मा. सोनिया गांधी किंवा `वाईन` या दोन्ही गोष्टींशी काहीही संबंध नव्हता, तर ते वक्तव्य नागरिकांचा देशाभिमान जागविण्यासाठी होते, असेही पवारसाहेबांनी स्पष्ट केले आहे.

यापुढेही साहित्य संमेलनाला येण्याचे रजनीकांत यांनी कबूल केल्यामुळे `मराठी साहित्याचे काय होणार` ही चर्चा यापुढील काळात सुरू राहिली, तरी `साहित्य संमेलनाचे काय होणार,` याविषयीच्या शंकांना मात्र पूर्णविराम मिळाला आहे!