Apr 6, 2011

अनुयायांची पंच्याहत्तरी!...

"मोठेपणी तू कोण होणार बाळा,' असं प्रत्येक (अवलक्षणी) कार्ट्याला त्याला दहावीत पास होणार की नाही, हे माहीत नसण्याच्या वयात विचारलं जात असतं. मग त्यानं अलिकडच्या काळात बघितलेल्या सिनेमामधल्या प्रमुख नायकानं जे पात्र रंगवलं असेल, तेच आदर्श मानून तो ठोकून देतो - डॉक्‍टर होणार, वकील होणार, क्रिकेटपटू होणार! मला अगदी लहानपणी सिनेमानट होण्याची आणि जरा नंतरच्या काळात राजकीय पुढारी होण्याची स्वप्नं पडायची. पण नट होण्यासाठी किमान अभिनयाची पातळी आणि पुढारी होण्यासाठी किमान अनुयायांची संख्या असावी लागते, हे माझ्या गावी नव्हतं. त्या वेळीही मला कुत्रं विचारत नव्हतं आणि आताही परिस्थिती फारशी बदललेली आहे, असं मला वाटत नाही. तर सांगायचं काय, त्या वेळच्या या दोन्हीही महत्त्वाकांक्षा काळाबरोबर पुसट होत गेल्या. सिनेमातला नाही, गेला बाजार हौशी रंगभूमीवरचा एखादा नवशा-गवशा नट होण्याची धुगधुगी अजूनही मनात आहे, पण आपल्याला कुणी अनुयायी मिळतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात, "ब्लॉग' नावाचं हुकमी हत्यार त्या वेळी मला सापडायचं होतं!
ऑफिसातल्या एक-दोन सहकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन ब्लॉग सुरू केला, तेव्हा त्यावर काय लिहायचं, हा प्रश्‍न मलाही भेडसावत होता. ब्लॉगवर लिहिण्यासारखं बरंच काही असतं आणि ते पेपरमध्ये किंवा अन्यत्र लिहिता येत नाही, ही कल्पना मला त्या वेळी यायची होती. बरं, तसं बघायला गेलं, तर ही खासगी डायरी असली, तरी सगळ्यांना वाचायला देण्याजोगीच होती. म्हटलं तर मुक्त चिंतन, म्हटलं तर शेअरिंग, म्हटलं तर दुसऱ्यांचे विचार, भावना जाणून घेण्याचं व्यासपीठ, असं सबकुछ या ब्लॉगमध्ये होतं. मला त्याचा उलगडा खूप उशिरा झाला.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की मला ब्लॉगवर आता काय लिहायचं, असा प्रश्‍न पडण्याचं बंद होऊन युगं लोटली. "अरे, इथे लिहिण्यासारखं बरंच आहे की!' हे लगेचच कळलं आणि नंतर तर ब्लॉग लिहायला विषय आहे, पण वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. ब्लॉगवर प्रतिक्रियाही भरपूर येत गेल्या आणि त्यातून नवं लिखाण करण्याचा हुरूप वाढला. विशेषतः मनस्वीच्या जडणघडणीच्या टप्प्यातल्या गमतीजमती लिहिताना मजा आली. निमिषला घरी आणण्याची प्रक्रिया, त्याविषयीचे आमचे विचार (डोंबल!) हे लिहितानाही आनंद वाटला. त्यावर प्रतिक्रियाही उत्साहवर्धक होत्या.
ब्लॉगवर नवी पोस्ट कधी टाकणार, अशी विचारणा वाचकांकडून होऊ लागली आणि आपलं लिखाण लोकांना आवडतंय, याची खात्री झाली. एकेक "फॉलोअर' मिळत गेले आणि त्यातूनही लिहिण्याची ऊर्मी वाढली. गेल्याच महिन्यात या फॉलोअर्सची संख्या 74 झाली. त्यानंतर पंच्याहत्तरीचा टप्पा गाठायला बराच काळ जावा लागला. अखेर गेल्या आठवड्यात तोही टप्पा पार झाला. आता माझे स्वतःचे नाहीत, निदान माझ्या ब्लॉगचे 75 अनुयायी आहेत, असं मी अभिमानानं सांगू शकतो!