Jun 14, 2013

प्रिय तार आजी...

प्रिय तार आजी, 

शि. सा. न. वि. वि. 
म्हणजे, शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. 
(एक वेळ "एलबीटी' म्हणजे काय, ते माहीत असेल. पण, "शि. सा. न. वि. वि.'चा फुलफॉर्म माहीत नसण्याची शक्‍यता जास्त! म्हणून हा खुलासा.) 

जपानमधल्या 116 वर्षांच्या जगातल्या सर्वांत वयोवृद्ध आजोबांच्या निधनाची आणि तुझ्याही "अवतारसमाप्ती'ची बातमी एकाच दिवशी यावी, हा एक कटू योगायोग. 

त्या आजोबांच्या निधनाची बातमी वाचून "हो का?' यापलीकडं काहीच प्रतिक्रिया मनात उमटली नाही. पण, तुझ्याबद्दलची बातमी वाचून मात्र खरंच हळवा झालो. 160 वर्षांच्या आयुष्यात तू काय काय पाहिलं नाहीस? प्रामुख्यानं इतरांच्या निधनाच्या बातम्या पोचवण्याचंच काम तू केलंस. पोस्टमन अवेळी दारात आले, की जवळच्या नात्यातलं कुणीतरी गेलं, असंच मानलं जायचं. इतरवेळी देवदूतासारख्या वाटणाऱ्या याच पोस्टमनची चातकासारखी वाट पाहिली जायची. पण, या वेळी मात्र तो "यमदूत' ठरून घरी येऊच नये, असं वाटायचं. थरथरत्या हातांनी तुला स्वीकारलं जायचं आणि धडधडत्या काळजानं एकेक अक्षर वाचलं जायचं...

"...क्रिटिकल. स्टार्ट इमिजिएटली,' असं वाक्‍य असलं, की तारेमध्ये उल्लेख असलेल्या माणसाला आता पुन्हा काही डोळे भरून पाहता येणार नाही, असं तार वाचणारा समजून जायचा. "क्रिटिकल' ही फक्त समोरच्या माणसाला बसणारा धक्का काहीअंशी सुसह्य व्हावा, यासाठी तूच आजीच्या मायेनं केलेली सोय असायची. 

अर्थात, दर वेळी तू दुःखाच्या बातम्या पोचवायचीस, असंच काही नाही. अनेकदा तुझ्या मुलाबाळांना नोकरीत बढती मिळाल्याच्या, बदली झाल्याच्या, नातवंडांना परीक्षेत चांगले मार्क मिळाल्याच्या आनंदाच्या बातम्याही अगदी उत्साहानं सांगायचीस. निकाल लागल्यानंतर सुमारे आठ-पंधरा दिवसांनी येणाऱ्या पत्राची वाट बघत राहण्यापेक्षा तुझ्यामार्फत आलेली ही शुभवार्ता खूपच गोड वाटायची. अगदी थोडक्‍यात, कमी ओळीत असली, तरी! नंतर येणाऱ्या पत्रात सविस्तर वर्णन वाचायची उत्सुकता आणखी टिकून राहायची. 

तुझ्या नातवंडं-पतवंडांच्या जन्माच्या बातम्या तर किती उत्साहानं दिल्या असशील गं तू! त्या बाळाच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना झालेल्या आनंदाच्या कितीतरी पटीनं तुला उचंबळून आलं असेल! मनातल्या मनात त्या बाळांना जोजवून त्यांचं नावही ठरवून टाकलं असशील तू. फक्त तुला ते सांगता आलं नसेल. निधनाच्या बातम्या पोचवण्यासाठी तुझ्या जिवावर आलं असेल. मात्र, अशा आनंदाच्या बातम्या कधी एकदा योग्य व्यक्तीपर्यंत पोचवून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहते, असं तुला झालं असेल! 

अगदी अचानक ठरलेली लग्नं, मुंजी, बारशी, डोहाळजेवणं ("डोहाळे' हा आयत्यावेळी ठरलेला कार्यक्रम नसला, तरी त्यानिमित्तचा समारंभ मात्र आयत्यावेळीच ठरतो!) वैयक्तिक आणि लग्नाच्या वाढदिवसांचे समारंभ, यांच्या निमंत्रणांसाठीही कधी कधी तुला मध्यस्थ केलं जायचं. अशी निमंत्रणं तर तू डोक्‍यावर पदर घेऊन, तारेच्या कागदावर अक्षता, हळद-कुंकू ठेवूनच दिली असशील! खात्री आहे मला. 

आयत्या वेळी रद्द झालेल्या किंवा ठरलेल्या नातेवाइकांकडच्या दौऱ्याच्या वेळी तर निरोप पोचवण्यासाठी तुझाच आधार असायचा. गाडीवर परस्पर पाठवून दिलेलं पार्सल किंवा एखादा छोटा मुलगा-मुलगी त्याच्या नातेवाइकांपर्यंत सुरक्षित पोचतील, अशी खात्री पाठवणाऱ्यांना असायची, ती फक्त तुझ्या भरवशावर. नंतर "ट्रंक-कॉल' आले आणि त्यांनी तुझा भार थोडा हलका केला. हळूहळू "एसटीडी' नावानं आलेल्या त्यांच्या भाईबंदांनीही हातपाय पसरायला सुरवात केली आणि तू नकळत बाजूला पडू लागलीस. मोबाइल नावाच्या तरुण परदेशी पाहुण्याचं आगमन झालं आणि तू पार अडगळीत पडलीस. आजीच्या मायेनं तू पोचवलेले निरोप, पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता दाखवलेली तत्परता, वेळेला धावून जाऊन आधीच्या पिढीतल्या असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर फुलवलेलं समाधान, सगळं विसरलं गेलं. 

आता अवतारकार्य संपल्यानंतर तुला "संग्रहालय' नावाच्या वृद्धाश्रमात तरी पाठवलं जावं, असं मनापासून वाटतं. जेणेकरून पुढच्या पिढीतल्या मुलांना, नातवंडांना सांगता येईल, अशी होती आमची प्रेमळ, लोभस "तार आजी!' 

कळावे, 
तुझा लाडका नातू