तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...
`
दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात. अरबाज खाननं केवढ्या उदात्त हेतूनं त्याच्या `दबंग`मध्ये हे गाणं टाकलं!स्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत न देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा न करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतील! तिचं प्रेम अढळ आहे. तिची निष्ठा अविचल आहे. तिचा निर्धार दबंग...साॅरी..अभंग आहे.
भारतीय संस्कृतीचं मोल आणि सार किती सार्थपणे मांडलंय मोजक्या शब्दांतून...किती समर्पक उपमा! किती नेमक्या भावना! काय उत्स्फूर्त नृत्य!!
गाण्यातल्या नेमक्या भावना, विचार आपल्या अंगप्रत्यंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेली तशीच समर्थ अभिनेत्री, नृत्यांगनाही हवी. अरबाज खाननं हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सहधर्मचारिणीलाच साकडं घातलं. तिनंही पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ही कामगिरी लीलया पार पाडलेय. प्रेक्षकांच्या हृदयांचा आणि स्वतःच्या हाडांचा चक्काचूर होईल, याची पर्वाही न करता तिनं गाण्यातल्या भावना, विचार नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी किती विद्युल्लतेच्या वेगानं कंबर लचकवलेय पाहा...
प्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...वहिनी असावी तर अशी असं प्रत्येकाला वाटलं नाही, तर ज्याचं नाव ते.
चित्रपट संगीताची ओळख बदलून टाकणा-या, गीतलेखन-नृत्यशैलीला नवी दिशा दाखवणा-या, भारतीय संस्कृतीची महती नेमक्या शब्दांत पटवून देणा-या या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणं, त्यासाठी निर्मात्यांना कोर्टात खेचणं, याला करंटेपणा म्हणावं नाहीतर काय..
...