Sep 20, 2015

जबाबदारी


रत्नागिरीच्या घरी गणपती असल्याने आणि आईवडील तिथेच राहत असल्याने दरवर्षी निदान मला तरी गणपतीत घरी जावं लागतं. पूर्वी स्वेच्छेने जायचो, आता कर्तव्य म्हणून जातो. गेल्या वर्षी सात दिवसांचा गणपती होता. तेव्हा मी सिरियलचं अचानक जास्त काम आल्यामुळे मला सात दिवसांत घरातून बाहेरसुद्धा पडता आलं नव्हतं. या वेळी मात्र बाहेर पडून आवर्जून काही लोकांना भेटायचं ठरवलं होतं.

काल स्टॅंडवर एका मित्राला भेटायला निघालो होतो, तेव्हा जाताना आईनं आठवण केली, ``गोखले नाक्यावरच्या दुकानात सुनीता असेल. लवकर गेलास, तर भेटेल.`` सुनीता माझी मामेबहीण. लग्न झाल्यानंतर आता ती रत्नागिरीतच असते. ब-याच दिवसांत तिची भेट झाली नव्हती. या वेळी भेटायचं असं मनात नव्हतं, पण अचानक योग आला होता आणि वेळेतही बसत होतं. गोखले नाक्यापर्यंत गेलो, पण सवयीनं मारुती आळीतून स्टॅंडकडे वळणार होतो. आज आठवडा बाजारामुळे मारुतीच्या आळीला गर्दी नसेल, म्हणून राम आळीनं जायचं ठरवलं आणि अचानक सुनीताला भेटायचं होतं, हे आठवलं. तिथे जवळच तिचं दुकान होतं. मी गेलो, तेव्हा ती आवराआवरी करून निघण्याच्या तयारीतच होती. पाच मिनिटांत बाहेर आली. कुठे बसूया, असा विचार करत मग आम्ही शेवटी राम आळीतल्या नूतनीकरण झालेल्या राम मंदिरात बसलो. त्या निमित्तानं श्रीरामाला माझं दर्शन घडलं.

सुनीता आणि मी एकाच वयाचे. लहानपणी रत्नागिरीत असताना मी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्यांमध्ये हटकून माझ्या आजोळी, म्हणजे शिपोशीला जायचो. तासा-दीड तासाचा बसचा प्रवास. थोडा मोठा झाल्यावर एकटाच जायला लागलो. मामा-मामी, आजी आणि ही तीन भावंडं, असा सहा जणांचा संसार. मी तिकडे जाणं म्हणजे ह्या भावंडांसाठी पर्वणी असायची. शिपोशी हे तसं अगदीच खेडेगाव. गावात उन्हाळ्यात पूजेनिमित्त प्रोजेक्टरवर दाखवले जाणारे चित्रपट, घराच्या जवळच असलेली नदी आणि कार्तिकातला गावाच्या देवळातला उत्सव, एवढंच काय ते मनोरंजन. त्या मानानं मी सुखी होतो. रत्नागिरीत तीन थिएटर्स होती आणि मला लहानपणापासूनच सिनेमाचं वेड होतं. मी तिकडे गेल्यावर नव्यानंच पाहिलेल्या सिनेमांच्या स्टो-या सांगायचो, ते त्या भावंडांसाठी मोठं मनोरंजन असे. कधीकधी तेसुद्धा शेतात, कुठल्या कुठल्या वाडीत प्रोजेक्टरवरून पडद्यावर बघितलेल्या सिनेमांच्या स्टो-या सांगत, तेव्हा मलाही नवीन ज्ञान मिळे. `यादों की बारात` आणि `आली लहर, केला कहर` या दोन सिनेमांची त्यांनी मला सांगितलेली स्टोरी अजूनही आठवतेय. (मी अजूनही हे दोन्ही सिनेमे पाहिलेले नाहीत. स्टोरी कळल्यामुळे नव्हे, योग आला नाही म्हणून! असो.) कधीतरी माझा बेळगावचा मावसभाऊ राजू राहायला यायचा, तेव्हा त्याच्याकडे सिनेमाच्या स्टो-यांचा खजिनाच असायचा. मग आम्ही सगळेच श्रोते व्हायचो!

बाकीची दोन भावंडं तशी लहान असल्यामुळं सुनीताशी माझ्या ब-याच गप्पा व्हायच्या. आपापल्या भावी आयुष्यावरही आम्ही बोलायचो. तिच्याशी माझं ब-यापैकी ट्यूनिंगही होतं. आमच्या घराशेजारची पोरं मला सुनीताच्या नावावरून चिडवायचीही. पण मामेबहिणीशी लग्नाच्या विचाराची संकल्पनाही मला कधी पटली नव्हती.
आपापल्या घरातली सुखदुःखं, कटकटी याच्यावर आम्ही त्या अजाणत्या वयात बरीच गहन आणि गंभीर चर्चा करायचो. त्या त्या समस्यांवरच्या उपाययोजनांवरही बोलायचो. अर्थात, मोठ्या माणसांसमोर कधी ते उपाय मांडण्याचं धाडस आम्हा दोघांचंही झालं नाही. मुंबईत धाकट्या मामाच्या घरीसुद्धा आम्ही सुट्यांमध्ये योगायोगानं एकत्र राहिलो, तेव्हाही आमच्या खूप गप्पा व्हायच्या.

सुनीताला रत्नागिरीत भेटलो, तेव्हा ह्या सगळ्या आठवणी निघाल्या. तिच्या किंवा माझ्या घरी भेटलो नाही, हे बरंच झालं, असं वाटलं. बोलण्यात आमचे नेहमीचे विषय निघालेच. `आईवडिलांनी आपल्याला लहानपणी वाचनाची आवड आणि सवय लावली नाही, त्यासाठी पुस्तकं विकत आणून दिली नाहीत, किंबहुना, आपल्याला `घडवण्या`साठी जास्त वेळ दिला नाही, ही माझी नेहमीची तक्रार. माझ्यापेक्षा त्या खेडेगावात वाढताना सुनीताला हे जास्तच जाणवलं असणार, असं मला वाटत होतं. ती म्हणाली, ``तुलनेनं बाबांनी आमच्यासाठी खूप केलं. आजोबा गेल्यामुळे खूपच लहान वयात त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली. लांबची नोकरी, त्यासाठी रोजची पायपीट, शाळेतल्या कटकटी, घरी आल्यावर घरातल्या समस्या, आमची भांडणं, घर आणि जागेची सगळी व्यवस्था पाहणं, कामावर आलेल्या मजुरांना दिवसभराची कामं देणं, पहाटे डोंगरावर असलेल्या गोठ्याकडे जाऊन गुरांची व्यवस्था पाहणं, दूध काढणं, एवढे सगळे व्याप ते एकट्यानं सांभाळत होते. तरीही आमच्या अभ्यासासाठी खूप वेळ द्यायचे. त्या परिस्थितीत यापेक्षा जास्त काही करण्याची अपेक्षाच करता येणार नाही!``

याच्या आधी आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नव्हता. सुनीतालाही अशा दृष्टिकोनातून विचार करताना आत्तापर्यंत कधी ऐकलं नव्हतं. मीसुद्धा अशा पद्धतीनं कधी विचारच केला नव्हता ह्या गोष्टींचा!

स्वतः पालक झाल्यावर किती समज येते नाही, माणसात!