परवा भांडारकर रस्त्यावरच्या रणजित हॉटेलला जायचे होते. तसा कार्यक्रमांनिमित्त अनेकदा गेलो असेन तिथे. पण अजूनही ते प्रभात रोडला, की भांडारकर रोडला, हे अजून आठवत नाही. ते शोधताना आधी प्रभात रोड, मग भांडारकर, असे करत राहिलो. अखेर कार्यक्रम संपल्यानंतर पोचलो. तसा कार्यक्रम बुडवून फार काही नुकसान नव्हते, पण केवळ माझ्या वेंधळेपणामुळे तो बुडाला, हे महत्त्वाचे.
पत्ते शोधण्याची आणि लक्षात ठेवण्याची आमची ही नेहमीची बोंब! पुण्यात आता बारा वर्षे होतील, पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला!
पत्ता शोधण्याचा केलेला एक आंतरराष्ट्रीय पराक्रम अद्याप लक्षात आहे. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना एकदा नियतकालिकाचे काम त्या रात्रीतच पूर्ण करायचे होते. आमची रत्नागिरीची एक मैत्रीण तिच्याकडचे लेख घरीच घेऊन गेली होती. ते तिच्याकडून मिळवून टाईप बिईप करून घ्यायचे होते. त्या काळी मोबाईल वगैरे काही नव्हते. (असं म्हणायची पद्धत आहे म्हणून नव्हे, पण खरंच तेव्हा नव्हते!) तिचा पत्ताही आम्हाला धड ठाऊक नव्हता. फक्त तिच्या सोसायटीचं नाव माहित होतं आणि कर्वेनगरमध्ये कुठेतरी राहते, एवढंच कुणीतरी सांगितलं होतं.
आम्ही रात्री अकरा वाजता अख्ख्या कर्वेनगरात तिचा पत्ता शोधायला प्रारंभ केला. मी आणि एक मित्र. तिच्या सोसायटीच्या समजलेल्या नावाशी साधर्म्य असलेल्या सोसायट्या धुंडाळू लागलो. एकतर पुण्याच्या उपनगराचा तो भाग. रात्री साडेनऊ-दहालाच दारंखिडक्या लावून गुडूप होण्याची अहमहमिका. त्यामुळं तिचा पत्ता शोधणं समुद्रातून मोती शोधण्याएवढंच अवघड असल्याचं आम्हाला लगेचच लक्षात आलं. पण आमची चिकाटी कुणाच्या बापाला भीक घालणार नव्हती!
काही सोसायट्या धुंडाळून नावांच्या पाट्या तपासल्या. त्यात कुठे ओळखीचं आढळलं नाही. तिचा पत्ता शोधताना आम्हाला लक्षात आलं, की तिचं सासरचं आडनावच आम्हाला ठाऊक नाहीये! आणि माहेरच्या आडनावावरून लक्षात राहायला ती काही माधुरी दीक्षित नव्हती!! तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा त्या सोसायटीच्या भिंतीपाशी गेला आणि मळकट-कळकट पाट्यांवरची नावे शोधण्याचे ते कष्टप्रद काम त्याने पुन्हा उरावर घेतले. ते शोधताना त्याच्या डोक्याची शंभर शकले होणार, हे स्पष्ट होते, तरीही!
काही सोसायट्यांच्या सेक्रेटरींना उठवलं. अमूक अमूक नावाची, रत्नागिरीहून आलेली कुणी मुलगी तुमच्या सोसायटीत राहते का, असंही विचारलं. बरं, तिच्या नवऱ्याचं नाव-आडनाव, हुद्दा, नोकरी-व्यवसाय, आम्हाला काहीच माहित नव्हतं. फक्त माहिती होतं तिचं माहेरचं नाव आणि वर्णन.
कर्वेनगराच्या त्या स्मशानशांततेत हे "गढे मुर्दे' उकरण्यात किती तास गेले कुणास ठाऊक! सुमारे साडेबारा-एकच्या दरम्यान आम्ही ही मोहीम थांबवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं, की आम्ही भर अंधारात केलेली ही वणवण फारशी कुणाच्या उपयोगाची नव्हती. आमची पत्ते शोधण्याची खुमखुमी जिरली होती, एवढंच. लेख वेळेवर मिळाले नाहीत म्हणून, किंवा आमची वणवण वाया गेली म्हणून, कुणालाच सोयरसुतक नव्हतं! नंतर ती मैत्रीणही भेटली आणि ते लेखही. मात्र कायम स्मरणात राहील, असा एक उपद्व्याप आमच्या नावावर नोंदला गेला!