Nov 18, 2015

Operation `बाहु`बली


(भाग 2)

खजिना विहीर चौकातून टिळक रस्त्याला जाऊन तो पार करावा, असा विचार केला, पण तिथेही अभूतपूर्व गर्दी होती. एरव्ही टिळक रस्त्यावरच्या दोन मंडळांच्या मध्ये खूप अंतर असतं. पुढचा गणपती येईपर्यंत एका जागी उभं राहून वाट बघायलाही कंटाळा येतो. त्या रात्री मात्र सगळी संकटं आमच्यासमोर हात जोडून उभी होती. लांबलांबपर्यंत रस्ता पार करण्याची अजिबात संधी दिसत नव्हती. मग तिथून मागे वळून भिकारदास मारुतीच्या जवळच्या बोळातून टिळक रस्त्यापर्यंत आलो.  गर्दीतून सुटकेचा मार्ग तिथेही दिसत नव्हताच, पण आता पर्याय नव्हता. लवकरात लवकर तिथून बाहेर पडणं महत्त्वाचं होतं. शेवटी तसाच धीर करून गर्दीत घुसलो.

माझा उजवा हात डाव्या हातानं धरूनच गर्दीतून चालावं लागत होतं. हात गळ्यात बांधल्यामुळं निदान ते बघून तरी लोक थोडीशी जागा देत होते. तरीही, पायाखाली दिसत नसणा-या फूटपाथवरून दुस-या चौकापर्यंत जाणंही सहनशक्तीचा अंत बघणारं होतं. लोक दोन्ही बाजूंनी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांच्या धक्क्यापासून वाचण्याचा! दोन्ही मुलं हर्षदाच्या ताब्यात होती. आधीच गर्दी, त्यात माझा हात जायबंदी, त्यामुळे मुलं जास्तच घाबरली होती. कसाबसा सावरत, धक्क्यांपासून वाचत त्याच गर्दीतून एसपी कालेजच्या चौकापर्यंत पोहोचलो आणि डावीकडे वळून थोडा मोकळा श्वास घेतला. तरीही अग्निपरीक्षा संपली नव्हतीच. उजवा हात जरा हलला तरी ठणकत होता. आता टिळक रस्त्यापासून पर्वतीच्या पुलापर्यंत चालत जायचं होतं. वाटेत गर्दीची विघ्नं होतीच. ना. सी. फडके चौकापर्यंत आलो आणि नीलायम समोरच्या रस्त्यावर एका मिरवणुकीनं पुन्हा रस्ता अडवला होता. या गर्दीत घुसण्याचं धाडस दाखवणं म्हणजे मूर्खपणा ठरला असता. पर्वतीजवळ लावलेली बाईक तर ताब्यात घ्यायलाच हवी होती. मग हर्षदा आणि मनस्वीनं बाईकवरून घरी यावं आणि मी निमिषला घेऊन चालत घरी पोहोचावं, असं आम्ही ठरवलं.

तिथून चालत घरी आलो. मुलांना एकटंच घरी झोपवून हर्षदाबरोबर मी ग्लोबल हास्पिटलला पोहोचलो.  गर्दीचं दिव्य पार पडलं, पण हास्पिटलमधल्या अतिशहाण्यांशी संघर्ष अद्याप बाकी आहे, याची तेव्हा कल्पना नव्हती. हात दुखतोय, त्या अर्थी मुका मार लागला असेल, किंवा फारतर फ्रॅक्चर असेल, अशीच शंका वाटत होती. किंबहुना, तशी खात्रीच होती. `ग्लोबल`मध्ये पोहोचलो, तर तिथे गणपतीचाच प्रसाद मिळालेले आणखी दोन तीन पेशंट आले होते. एका झिडपिडीत माणसानं आमची चौकशी केली. हा स्वतः रात्रपाठीचा डाक्टर आहे, हे समजल्यावर मी थिजूनच गेलो. त्यानं प्राथमिक चौकशा केल्या आणि हात हलवल्याशिवाय दुखत नाहीये, याचा अर्थ फ्रॅक्चर नसावं, असा निष्कर्ष काढला. मग माझी एक्सरेसाठी रवानगी केली. हात थोडा हलवल्यावर प्रचंड दुखत होता. एक्सरे काढणा-या माणसानं मला तो कोपरात शक्य होईल तेवढा वाकवायला लावला. प्रचंड कळा मारत होत्या, पण इलाज नव्हता. त्यानं कोपराचे दोन angles मधून एक्सरे काढले.

आता एक्सरे रिपोर्टसाठी थांबणं आवश्यक होतं. ते लवकर आले आणि ते पाहून फ्रॅक्चर नाहीये, असं निदान तिथल्या डाक्टरांनी केलं. पेन किलर इंजेक्शन देऊ आणि उद्या सकाळपर्यंत नाही थांबलं, तर खांद्याचा एक्सरे काढू, असं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्षात दुखणं खांद्याला आहे, हे त्यांना बहुधा एक्सरे काढल्यानंतर लक्षात आलं असावं. मग धनर्वात आणि पेन किलर अशी दोन दोन भोकं शरीराला पाडून घेतल्यानंतर आम्ही घरी आलो. रात्री एकाच कुशीवर कसाबसा तळमळत झोपलो.
सकाळी उठलो, तरी त्रास कमी झाला नव्हता. रात्रीपासून सतत एक विचार मनात येत होता. मुकामारच असेल, तर हात जरा ताणून, दुःख सहन करत वर घेऊन बघावा. पण तो त्रास सहन न झाल्यामुळे असेल किंवा दुस-या कुठल्या भीतीमुळे, पण तेवढा जोर केला नाही.
दहा वाजता सदाशिव पेठेतलं मोडक हास्पिटल गाठलं. मिरवणूक सुरूच होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांबूने अडवलेल्या रस्त्यांचे अडथळे पार करण्याची शर्यत खेळावी लागत होती. टिळक रस्त्याच्या अलीकडेच गाडी लावून हास्पिटलपर्यंत चालत गेलो. एक्सरे टेक्निशिअन आले नव्हते. तिथल्या असिस्टंट डाक्टरांना दाखवलं, त्यांचाही पहिला अंदाज असाच होता, की सहन न होण्यासारखं दुखत नाहीये, त्या अर्थी फ्रॅक्चर नसावं. कदाचित मुकामार असेल, किंवा किरकोळ फ्रॅक्चर असेल, असाच ग्रह आता आम्हीसुद्धा करून घेतला होता.

एक्सरे टेक्निशिअन सांगवीहून निघाल्याचं समजलं. गणपती मिरवणुकीचे अडथळे पार करत ते कधी पोहोचणार, यासाठी आम्ही आता देवच पाण्यात ठेवायचे बाकी होते. तरीही ते अपेक्षेपेक्षा खूपच वेळेत पोहोचले. त्यांनी लगेच एक्सरे काढले. मुख्य म्हणजे जिथे दुखत होतं, तिथले, म्हणजे खांद्याचे एक्सरे काढले. काही सेकंदात ते तयार झाले आणि ते पाहून त्यांची नाही, पण माझी काळजी वाढली.

फ्रॅक्चर आहे, असं त्यांनी सांगितलं.
म्हणजे आता प्लॅस्टरचा ताप, असाच विचार मी मनात केला.

पण त्यांचं पुढचं वाक्य काळजात धडकी भरवणारं होतं.

`बहुतेक सर्जरी करावी लागेल! मी डाक्टरांशी बोलून कन्फर्म करतो!!`

(क्रमशः)