Oct 15, 2017

घेता, किती घेशील दो कराने?


``आज संध्याकाळी जायचंय ना हो आपण खरेदीला?`` सकाळी पेपर वाचताना सौ. किरकिरे एकदम आठवल्यासारख्या ओरडल्या आणि सगळ्या घराचं लक्ष वेधलं गेलं. बहुधा कुठल्यातरी साडीच्या दुकानांतल्या आकर्षक साड्यांच्या जाहिरातींवर त्यांची नजर पडली होती.

 

यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त, घरांच्या किमती कमी होणार, अशाच बातम्या महिनाभर झळकत होत्या. एसटीचा प्रवास थोडासा महागणार असल्याची कुणकुण होती, पण यावेळी कुठे फिरायला जाण्याचा बेत नव्हता. पेट्रोलच्या किंमतींवरून रणकंदन झाल्यानंतर सरकारनं पेट्रोल दोन-चार रुपये कमीच केलं होतं आणि काही पदार्थांच्या जीएसटीमध्येही कपात केली होती. थोडक्यात, विरोधकांच्या मोर्चांशिवाय महागाईचं विशेष विरोधी वातावरण कुठे नव्हतं. त्यामुळे खरेदीसाठीही अगदी अनुकूल काळ होता. त्यातून दिवाळी अगदीच दोन दिवसांवर आली होती आणि आज खरेदीला जाणं आवश्यकच होतं. कुमार आणि सुकन्येचे खरेदीचे तर भलेमोठे प्लॅन्स कधीपासून आखून तयार होते. त्यासाठीची यादीही त्यांनी तयार ठेवली होती.

``आम्ही लहान होतो, तेव्हा आम्हाला असं कुणी विचारतही नव्हतं!`` किरकिरे आजोबांनी सकाळपासून तीनशेएकोणसत्तराव्या वेळेला हे वाक्य उच्चारलं, तेव्हा समोर ऐकून घ्यायला कुणी नव्हतं. ``वर्षातून एकदा नवीन कपडे मिळायचे, तेसुद्धा दिवाळीला. वडील कुठूनतरी स्वस्तातलं एखादं कापड घेऊन यायचे आणि मग त्यातच घरातल्या सगळ्या भावंडांची शर्टांची शिलाई व्हायची.`` आजोबांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्वकाळातली टेप वाजवली. ``अरे श्रीधर, तुला चष्म्याची नवीन फ्रेम सांगितली होती, ती आणलीस का रे?`` त्यांना तेवढ्यात काहीतरी आठवलं.

``ती बाजारातच आली नाहीये हो अजून! तो दुकानदार वैतागला होता माझ्यावर, दर महिन्याला तुमच्यासाठी वेगवेगळ्या फ्रेम्स मागतो म्हणून!`` श्री. किरकिरेंनी शक्य तेवढ्यात नम्र आवाजात खुलासा केला.

``बरं ठीकेय, संध्याकाळी तसंही आपण बाहेर शॉपिंगला जाणारच आहोत, तेव्हा काय ते बघू.`` आजोबांनी विषय मिटवून टाकला. आजीलाही बाजारात नवी आलेली नवी `पाठक बाई स्टाईल` साडी घ्यायची होती, पण एकदम संध्याकाळीच विषय काढू, असं तिनंही ठरवून टाकलं होतं. चिरंजीवांना कॉलेजसाठी नवीन बूट घ्यायचे होते. खरंतर अजून त्याची दहावीच सुरू होती, तरीही मनातून तो कॉलेजला कधीच पोचला होता. सुकन्येला आलिया भट स्टाईल पलाजो घ्यायचा होता, कृती सेनॉन स्टाईल लेहंगा, कंगना स्टाईल स्पॅगेटी टॉप आणि दीपिका स्टाईल अनारकलीही हवा होता. एकूण सगळ्यांचे सगळे प्लॅन्स ठरले होते. ठरला नव्हता तो एकाच व्यक्तीचा प्लॅन आणि ती व्यक्ती होती, श्री. किरकिरे. सगळ्यांना नव्या खरेदीसाठी मूड आला होता आणि श्री. किरकिरेंना फक्त टेन्शन आलं होतं...खर्चाचं. सगळ्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर होती, कारण घरखर्चाचा कोलमडणारा हिशोब त्यांना सावरायचा होता. सकाळपासून त्यांची जी घालमेल चालली होती, त्यावरूनच सौ. किरकिरेंना अंदाज आला होता. त्यामुळे आपल्या खरेदीची यादी आयत्यावेळीच जाहीर करावी आणि दुकानदारानं गळ घातली म्हणून घ्यावं लागलं, असा देखावा निर्माण करावा, असा त्यांचा बेत होता.

दुपारपर्यंत फारसं काही उत्साहवर्धक घडलं नाही, पण दुपारनंतर घडामोडींना वेग आला. सरकार पाडण्यासाठी किंवा मंत्रिमंडळ विस्तारासाठी येतो, तसा.

``सगळ्यांनी एकत्र खरेदी जायलाच हवं का?`` चिरंजीवांनी शंका काढली. त्यांना संध्याकाळी टीव्हीवर लागणारी फुटबॉलची मॅच बघायची होती. खरंतर दिवाळीच्या तोंडावर संध्याकाळी एकत्र बाहेर खरेदीसाठी जाण्याचा कुमारी किरकिरेलाही वैताग आला होता, पण तिला खरेदीसाठी दुसरं कुणी पार्टनरही मिळालं नव्हतं. शिवाय बंधुराज घरी असल्यामुळे तिला निवांतपणे घरी बसून `हाफ गर्लफ्रेंड`ही बघता येणार नव्हता. तिची त्यावरून धुसफूस सुरू झाली. आजीआजोबांना पाय मोकळे करायला बाहेर पडायचंच होतं, पण पावसाची लक्षणं दिसत होती आणि आता भिजण्याची कुणाचीच इच्छा नव्हती.

``ते ऑनलाइन का काय ते शॉपिंग करता ना तुम्ही? ते कुठे जाऊन करतात?`` आजीनं शंका काढली, तसे चिरंजीव आणि सुकन्या फिस्सकन हसले.

``अगं आजी, ऑनलाइन शॉपिंग घरीच करता येतं. त्यासाठी कुठे जावं लागत नाही.`` सुकन्येनं आजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तिनं मोबाईलवर वेगवेगळ्या वेबसाइट्स कशा असतात, तिथे केवढ्या व्हरायटी असतात, लेटेस्ट ट्रेंड आणि कस्मटर रेटिंग बघून कसं खरेदी करता येतं, हे सगळं तिला दाखवलं. ``पण मोबाईलवर दुकानदाराशी घासाघीस कुठे करता येतेय?`` या आजीच्या प्रश्नावर कुणाकडेच उत्तर नव्हतं. आणि खरेदीची मजा घासाघीस करून दुकानदाराकडून आपल्याला पाहिजे तशा वस्तू आपल्याला हव्या त्या दरात घेण्यातच आहे, असं सांगून आजीनं ऑनलाइन शॉपिंगचा प्रस्ताव धुडकावून लावला.

बाहेर जाऊन ही मंडळी किती खरेदी करणार आणि त्यासाठी किती वेळ खर्ची घालणार, याचा अजूनही श्री. किरकिरेंना अंदाज येत नव्हता. नाही म्हणायला एक गोष्ट त्यांना साथ देत होती, ती म्हणजे पाऊस. दुपारपासून जो काही पाऊस लागला होता, त्यामुळे सगळ्यांच्याच खरेदीच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. छत्र्या आणि रेनकोट सांभाळत आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत खरेदीला जाण्यात कुणालाच रस नव्हता. निदान आजचा बेत उद्यावर गेला, याचा सूक्ष्म आनंद श्री. किरकिरेंच्या चेहऱ्यावर झळकत होता. अर्थात, आज खरेदीला गेलो नाही, तर उद्यापासून आपल्याला वेळ नाही आणि मग मनासारखी खरेदी राहूनच जाईल, याचा सौ. किरकिरेंना अंदाज होता. काहीतरी करायला हवं होतं.

 

``पण संध्याकाळी घरी बसून काय करायचं?`` चिरंजीवांनी विचारलेली शंका सौ. किरकिरेंच्या पथ्यावर पडली.

``मी मस्त उपाय सांगते!``  उत्साहाने उडी मारत त्या पुढे आल्या. पुन्हा सगळ्यांचे कान टवकारले गेले.

``आठ दिवस फराळाच्या कामामुळे घरातल्या साफसफाईला वेळ मिळाला नव्हता. सगळे अनायसे घरी आहेत, तर आजच करून टाकूया साफसफाई! सगळ्यांची मदत होईल!``

 

सौ. किरकिरेंनी हे वाक्य उच्चारलं मात्र, पुढच्या दहा मिनिटांत घरातले सगळे मरगळलेले, सुस्तावलेले, कंटाळलेले चेहरे पावसापाण्याची पर्वा न करता बाजारातील गर्दीत खरेदीच्या उत्सवात रममाण झाले होते!


 

-    अभिजित पेंढारकर.