जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Jul 9, 2009
तो मी नव्हेच!
""तो "अग्निहोत्र'चा संगीतकार अभिजित पेंढारकर तूच का रे?''
परवा एक लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणनव्वदाव्या वेळेला कुणीतरी हा प्रश्न विचारला आणि मी पुन्हा एकदा निःशब्द झालो.
""अरे बाबा तो मी नव्हे!'' या खुलाशाचाही आताशा कंटाळा यायला लागलाय.
हा अभिजित पेंढारकर नावाचा कुणी दुसरा इसम मला माहित झाला, तो "असंभव'चा पार्श्वसंगीतकार म्हणून. अधूनमधून मी ती सीरियल बघायचो. तेव्हा हे नाव वाचून मलाही गोंधळायला झालं होतं. आयला, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याच नावाचा कुणी माणूस आहे आणि आपल्याला माहित नाही म्हणजे काय? या क्षेत्रातल्या बऱ्याच मित्रांकडे चौकशा करून पाहिल्या, माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! कुणाचीच त्याच्याशी थेट ओळख नव्हती. सीरियलपुरतेच त्याचे नाव येत असल्याने फारसा कुणाला माहिती असण्याचीही शक्यता नव्हती.
"अग्निहोत्र' किंवा अन्य तत्सम मालिकांमध्येही हे नाव झळकायला लागलं आणि लोक मला विचारायला लागले. काही केवळ शंका उपस्थित करून थांबत, तर काही जण "व्वा! आता संगीताच्या क्षेत्रातही तुमचं नाव आलं का? अभिनंदन!' असं करून जखमेवर मीठ चोळायला लागले.
"तो मी नव्हेच' असा खुलासा करण्याची संधीही काही जण देईनासे झाले.
"बस काय राव!' म्हटलं, की आमचं पुढचं बोलणंच खुंटायचं.
पण परवा एका अगदी ओळखीच्यानंच हा प्रश्न विचारला आणि म्हटलं, खुलासा करायला निदान ब्लॉगचं माध्यम तरी वापरूया!
आपलं नाव अगदी "युनिक' असल्याच्या भ्रमाचा भोपळा काही वर्षांपूर्वीच फुटला होता. आमच्या आजोळी म्हणजे शिपोशीचाच कुणी नातेवाइक "अभिजित पेंढारकर' असल्याचं कळलं होतं. त्याची माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही, पण त्याच्याविषयी ऐकलंय मात्र अनेकदा.
दुसरा अभिजित पेंढारकर मला कळला, पुण्यातल्या एका मित्राकडून. त्याच्या मूळच्या निपाणी गावचाच तोही. गंमत म्हणजे, तो त्याला अनेकदा भेटला होता आणि माझी त्याच्याशी भेट करून देण्याची इच्छाही होती. पण हे दोन अभिजित पेंढारकर काही एकत्र भेटले नाहीत.
मी "सकाळ'मध्ये लिहिण्यास सुरुवात केली आणि माझा लेख वाचून त्याच्या मैत्रिणीचा मला ई-मेल आला. तिला वाटलं, मी "तो' अभिजित आहे. नंतर खुलासा झाला, पण आमची मैत्री वाढली. अशा रीतीने तीदेखील दोन अभिजित पेंढारकरांना ओळखू लागली. पण तो काही मला भेटला नाही आणि तीदेखील! आता ती अमेरिकावासी झाल्याचं कळतंय.
...तर असं आहे सगळं!
कुणीतरी त्या दुसऱ्या (तिसऱ्या, चौथ्या...) अभिजित पेंढारकराला मला भेटवा रे!
Jul 7, 2009
एक धुकाळ सहल!
ताम्हिणीत जाण्यात "रिस्क' होती.
दरवर्षीप्रमाणे दणकून पाऊस, दरडीबिरडी कोसळण्याची भीती म्हणून नव्हे. तर अजिबात पाऊस नसल्याच्या बातम्या होत्या म्हणून!
जूनपासून पावसाची वाट पाहूनपाहून थकलो होतो. गाडीतून दोन ट्रिपा केल्या, दोन्ही कोरड्या! जेजुरी आणि कार्ला इथे घामानं पुरेवाट झाली होती. ताम्हिणीत पाच जुलैला जायचं हे तर ठरलं होतं, पण धाकधूक होतीच. ताम्हिणीत जायचं म्हणजे मस्त पाऊस, धुकं, धबधबे, असं समीकरण गेली आठ-दहा वर्षं डोक्यात पक्कं बसलं होतं. पहिल्यांदा तिथे गेल्यापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता दरवर्षीची एक फेरी कधीच चुकली नव्हती. रोज पावसाच्या बातम्यांवर आणि आभाळाकडे लक्ष ठेवून होतो. आज पाऊस येईल, उद्या येईल, असं गेले दोन आठवडे वाटत होतं. रोज निराशाच पदरी येत होती. ताम्हिणीचा "व्हेन्यू' बदलायला लागतो की काय, अशी परिस्थिती होती. आदल्या दिवसापर्यंत "अपडेट्स' घेणं सुरू होतं.
अखेर गेल्या आठवड्यात पुण्यात हलका पाऊस झाला आणि जरा जीवात जीव आला. तरीही जिल्ह्यात फार दमदार पाऊस झाल्याची वार्ता नव्हती. ऑफिसातल्या एका सहकाऱ्यानंही तिथं जाण्याविषयी नकारघंटाच लावली होती. शेवटी गुरुवारी त्याच भागात राहणारा एक सहकारी निदान तिकडे प्रसन्न वातावरण असल्याची सुवार्ता घेऊन आला. हा खरंच थोडा दिलासा होता. तरीही, मी सोडून कुटुंबीयांपैकी बहुतेक जणांचा तिकडे जाण्याबाबत आग्रह कमीच होता. निघण्याच्या आदल्या दिवशी एका मित्रानं खबर आणली, की थोडे-थोडे धबधबे आहेत. जरा आणखी उमेद आली.
पाच जुलैला सकाळी दहा जणं मिळून दोन गाड्यांतून ताम्हिणीकडे कूच केले. साधारणपणे चांदणी चौक ओलांडला, की ताम्हिणीच्या वातावरणाचा वास यायला लागतो. या वेळी पिरंगुट ओलांडले, तरी फारसे काही वातावरण नव्हते. पौडमध्ये मिसळ खाल्ली, तेव्हाही "पाऊस नाही' या चर्चेनं जरा धडधड वाढली. "सगळ्यांना घेऊन आलोय खरं, पण धबधबे मिळाले नाहीत तर आपली काही खैर नाही,' या विचारानं जीव खालीवर होत होता. वाटेत एके ठिकाणी हवा भरायला थांबलो, तर तिथेच आमचा नेहमी थांबण्याचा फेवरेट स्पॉट होता. जरा पुढे जाऊन बघितलं, तर धबधबा! डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता! ज्याच्या शोधात पुण्याहून 80 किलोमीटरवर बोंबलत आलो होतो, तो साक्षात पुढ्यात हात जोडून उभा होता!
आम्ही तिथे फोटोबिटो काढले, पण भिजलो मात्र नाही. कारण भिजायला घाटमाथ्यावर भरपूर धबधब्यांच्या सान्निध्यात जायचं होतं! मग वाटेत थांबतथांबत निघालो होतो. एका पठारावर आलो, तर रस्ता धुक्यात बुडून गेलेला. समोरची गाडीही दिसत नव्हती. दोन्ही बाजूला पाणी आहे आणि आपण बंधाऱ्यावरून निघालो आहोत, असंच भासत होतं. शेवटी गाडी धांबवली आणि मस्त धुक्यात बुडून गेलो. धुकं जसं आलं त्याच वेगानं नाहीसंही झालं. चला, ताम्हिणीचा आटापिटा अर्धाअधिक सत्कारणी लागला होता!
घाटमाथ्यावर गेलो, पण धबधब्यांची रांग काही दिसत नव्हती. एखाददुसरा ओघळ दिसत होता. वाटेत एक-दोन धबधबे लागले, पण तिथे थांबावंसं वाटलं नाही. शेवटी धबधब्यांच्या शोधात घाटउतारापर्यंत गेलो. शेवटी तिथून परत फिरलो. परतीच्या वाटेवर जो धबधबा लागला, त्यात मस्त भिजलो. फार मोठा नव्हता, पण आनंद घेण्याएवढ्या धारा होत्या.
दरवर्षीपेक्षा जरा लवकरच यंदा ताम्हिणीत गेलो होतो. पावसाची स्थिती नव्हती, तरी निराशा झाली नाही. उलट, सहल फलदायी झाल्याचाच अनुभव आला!
अभ्यंगस्नान!
अधिक्रुत पत्नीबरोबरचा अधिक्रुत फोटो!
Subscribe to:
Posts (Atom)