Nov 25, 2008

व्यायाम 'हराम' आहे

सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला.
"लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?''
मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना!
"बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही. वजन वाढेल नाहीतर काय?" बायकोनं अगदी 'असामी'तल्या 'मी' अर्थात धोंडोपंत जोशींच्या बायकोची गादी चालवली.
माझ्या प्रकृतीला नावं ठेवणार्‍या या मित्रानं फार काही मोठा तीर मारला नव्हता.
`लेका, आठवीत असताना तू शर्टाच्या बाहीला शेंबूड पुसायचास आणि गोष्ट सांगायला उभा राहिलास, की दर मिनिटात तीनदा चड्डी सावरायचास,' असं मी त्याला त्याच्या तरुण सेक्रेटरिणीसमोर सांगितलं असतं तर त्याची तिच्यासमोरच चड्डी नसती सुटली? पण सभ्यता सोडून बोलण्याचा अधिकार डॉक्‍टर किंवा वकिलालाच असतो. त्यामुळं मी काही पातळी सोडली नाही.

"हो...थोडं वजन वाढलंय खरं!" मी प्रामाणिकपणानं मान हलवली.
"थोडं? अरे सुजलाहेस सगळीकडून!"अभय एवढ्या जोरात उसळला की मला माझी पोटाची, छातीची, दंडांची, मांड्यांची, पोटर्‍यांची चरबी लोंबते आहे असा भास होऊन त्या 'सुमो' पैलवानाच्या जागी स्वतःचाच चेहरा दिसायला लागला.
"जिने चढताना सुद्धा धाप लागत असेल लेका!"
त्याचा हा हल्ला मात्र मी परतवण्याचा निर्धार केला."अभ्या, डॉक्‍टर झालाहेस म्हणून काही पण बोलशील? काही पण धाप बिप लागत नाही मला! मी ट्रेकिंगला सुद्धा जातो. अगदी साल्हेर, कळसूबाईच्या! तुला वाटतंय तशी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये.""तर तर! गेले ते दिवस! आता वर्षातून एकदा त्या 'ड्यूक्‍स नोज'ला जाता आणि मग अंग धरलंय म्हणून चार दिवस रजा टाकता. मला माहितेय तुमचं 'रेग्युलर ट्रेकिंग'!" बायको नावाची बाई ही नवर्‍याची अब्रू चारचौघांत काढण्यासाठीच असते, या तत्त्वावर हिनं शिक्कामोर्तब केलं.
"तेच म्हणायचंय मला! ये, काट्यावर ये बघू!" अभयनं वजनकाटा पुढे केला. माझ्या अंगावर काटा आला.
"८४ किलो! अरे, काय वजन की काय? आता माझं ऐकायचं. चाळिशी तरी गाठायची आहे ना तुला?" अभयनं निर्वाणीचा इशारा दिला.
पूर्वीच्या बायका नवर्‍याविषयी असा अपशकुनी उल्लेख ऐकला, की कसनुशा होत असत. नवर्‍यानं आपल्या मरणाविषयी उल्लेख केला, तर हातानं त्याचं तोंड बंद करीत. वर आपलं आयुष्य त्याला लाभो, अशी इच्छा व्यक्त करत, असं आमचं मराठी 'सौभाग्य वस्तू भांडार'छाप चित्रपटविषयक ज्ञान आम्हाला सांगतं.आमच्या बायकोनं मात्र, "बघा! हेच सांगत होते ना तुम्हाला?" असं म्हणून मित्रालाच आणखी फूस दिली.
"मी डाएटचा कोर्स देतो तुला. उद्यापासून व्यायाम सुरू कर. किमान दहा किलो वजन कमी केलं पाहिजे तुला." अभयनं फर्मान सोडलं.
कागदावर फराफरा काहीतरी खरडलं. सेक्रेटरीला बोलावून कुठल्या तरी डाएट आणि खादाडी, आरोग्यावरच्या दोन-तीन लेखांच्या प्रिंट आऊट दिल्या. एवढं करून त्याचं समाधान झालं नसावं. मला आणखी काही तोंडी सल्ले दिले. वर, त्याची फीदेखील घेतली. सर्दी-पडशावरचं औषध घ्यायला गेलेला मी मित्राच्या या अमूल्य आणि अनपेक्षित सल्लादानाच्या ओझ्यानं पार वाकून गेलो.
घरी गेल्यापासून बायकोची भुणभुण सुरू झाली... "उद्यापासून व्यायाम सुरू करा. सोनारानंच कान टोचलेत ना आता?""सोनार नाही, डॉक्‍टर होता त." असा माफक विनोद मी करून पाहिला, पण तो तिच्या कानावरून गेला. मलाही एक नवी ऊर्मी आली. पहाटे उठून चालायला जायचं आणि महिनाभरात वजन कमी करून त्या डॉक्‍टरड्याच्या तोंडावर कमी झालेल्या वजनाचं तिकीट फेकायचं, अशी भीष्मप्रतिज्ञा करून टाकली.
दुसर्‍या दिवशी पहाटे पाचचा गजर लावला. झोपेतच तो बंद करून पुन्हा झोपलो. साडेपाचला पुन्हा गजर वाजला. बंद झालेला गजर पुन्हा कसा झाला, असा प्रश्‍न पडेपर्यंत लक्षात आलं, की बायकोनं खबरदारी म्हणून दुसर्‍या मोबाईलवर गजर लावून ठेवला होता. तोही बंद करून पुन्हा मुरगुशी मारली. पाच वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा गजरचा ठणाणा झाला. आता मात्र पुरता वैतागलो. घरात तिसरा मोबाईल कुठून आला, असा शोध घेऊ लागल्यावर समजलं, की हा पहिल्याच मोबाईलवरचा "रिपीट अलार्म' होता. आता उठणं भागच होतं. शिवाय काल रात्री केलेला दृढसंकल्पही डोळ्यापुढे काजव्यासारखा चमकला. बर्‍याच महिन्यांपूर्वी अशाच एका व्यायामाच्या संकल्पाच्या बेसावध क्षणी घेतलेली ट्रॅक पॅंट धुंडाळून काढली. खसाखसा दात घासून, चहाबिहा न पिताच फिरायला बाहेर पडलो. माझ्या कानाशी तीनदा गजर करणारी बायको स्वतः मात्र कुंभकर्णाच्या अवस्थेत होती.
बाहेर पडल्यावर कुठं जायचं ते कळेना। थंडीतलीच धुक्‍याची ती पहाट बघण्याची माझी ही ३४ वर्षांच्या आयुष्यातली दुसरी की तिसरी वेळ होती. पाच वर्षांचा असताना आजोळच्या जत्रेला जाण्यासाठी आईनं पहाटे उठवलं होतं. त्यानंतर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मुहूर्तच आठचा असल्यानं आणि लग्नाला मी उपस्थित राहणं अनिवार्य असल्यामुळं पहाटे उठलो होतो. त्यानंतर थेट आजच! बाकी दिवाळीचा ब्राह्ममुहूर्तही मी कधी पाहिला नव्हता. साक्षात बायकोच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी सिझेरियन सकाळी सात वाजता करण्याचा डॉक्‍टरांचा अट्टाहासही मी मोडून काढला होता. सकाळी सातच्या ऐवजी त्यांनी थेट संध्याकाळी सातची वेळ तेव्हा केली होती...सांगायचा उद्देश हा, की सकाळी बाहेर पडलो, तेव्हा एवढी थंडी आणि धुकं असेल, याची कल्पना नव्हती. उठलोच आहोत तर पर्वतीला जावं, असा निश्‍चय केला. लहानपणी गावी राहायचो, तेव्हा पहाटे बायका उठून घराभोवती आणि वाटेवर सडा-रांगोळी करायच्या. त्यावरून चालताना मंद सुगंधाचा आनंद घेता यायचा. पर्वतीच्या वाटेवरही ही परंपरा पाळली जात होती, पण वेगळ्या अर्थानं. तिथे झोपड्यांतल्या पोरासोरांच्या मलमूत्राचा सडा घातलेला होता आणि त्याच्या उग्र दर्पाने नाकातले केसही करपत होते.कसाबसा जीव आणि नाक मुठीत धरून पर्वती पायथ्यापाशी पोचलो. मोठ्या उत्साहानं चढायला सुरुवात केली. पाचवी-सहावीतल्या विज्ञानातल्या उदाहरणांप्रमाणे, सुरुवातीला जास्त उत्साह, नंतर कमी, नंतर आणखी कमी आणि मग शेवटी गलितगात्र अवस्था, या क्रमानं त्या पायर्‍यांवर चढताना अनुभव आला. पहिल्या पंधरा-वीस पायर्‍यांतच आपल्या बापाला हे झेपायचं नाही, हे लक्षात आलं. तरीही निर्धारानं अर्धी पर्वती चढलोच. तिथे बराच वेळ मुक्काम ठोकून, नव्या उमेदीनं उरलेला टप्पा गाठायचा निश्‍चय वारंवार केला, पण मनानं उभारी घेतली, तरी शरीरानं हाय खाल्ली. थोरल्या माधवरावांना तिथूनच दंडवत घालून परतीच्या वाटेला लागलो.


घरी आलो, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती, पण सभ्यतेच्या मर्यादा आड आल्या.हा प्रकार रोजच व्हायला लागल्यावर पर्वतीचा नाद सोडून द्यावा लागला. एकतर रोजची बारा-चौदा तास झोपायची सोय होत नव्हती. त्यातून पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी उत्साहानं अर्ध्या पायर्‍या चढून गेलो, पण दुसर्‍या दिवशी पाव, तिसर्‍या दिवशी आधपाव, चौथ्या दिवशी सात पायर्‍या, असं करत करत दोन ते तीन पायर्‍यांवरच मी गार व्हायची वेळ आली होती. मग पर्वती रद्द झाली. तरीही, व्यायामाची उमेद मी सोडली नव्हती. कुठं तरी जिम लावावी, असा विचार केला. जवळपास कुठेही सोयीची (अर्थात, कमी त्रासाची) जिम मिळेना. ज्ञानप्रबोधिनीत जायला लागलो. एका मित्रालाही वजन कमी करायची खुमखुमी आली होती.
तिथला इन्स्ट्रक्‍टर नेमका कुठल्या तरी जुन्या ओळखीचा भेटला. आम्ही आलोय म्हटल्यावर त्याच्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं असावं बहुधा. एखादा खाटिक नवा बकरा मिळाल्यावर जेवढा खूश होईल, तेवढाच आनंद त्याला झाला. आम्हाला कसली कसली वजनं उचलायला लावून, कुठली कुठली चक्रं फिरवायला लावून, स्वतः जिमभर उंडारत फिरायचा. बरं, मुला-मुलींची जिमही वेगवेगळी होती. त्यामुळं निदान तो तरी विरंगुळा होईल, हा हेतूही फोल ठरला. सुजलेलं अंग कमी होण्याऐवजी कष्टानं अंगावरच सूज चढलेय, हे लक्षात आल्यावर जिमचा उत्साहदेखील आठ दिवसांत मावळला. तिथले पैसेही फुकट गेले.
"अहो, पोहायला तरी जा आता!'' बायकोनं शेवटचं अस्त्र सोडलं.मग मला तीन-चार वर्षांपूर्वी पंधरा-वीस दिवस कष्ट करून पोहायला शिकल्याची आठवण झाली. तसं, विहिरीत जीव वाचविण्याइतपतच पोहता येत होतं मला, पण एवढ्यात हार पत्करून चालणार नव्हतं. शहरातल्या तमाम स्विमिंग पूलवर जाऊन चौकशी केली. कुणाची वेळ जमणारी नव्हती, तर कुणाची फी अवाच्या सव्वा होती. कुणाचा टॅंकच खराब होता, तर कुणाकडे ऍडमिशन फुल होती. कुणाकडे सध्या जीवरक्षक नव्हते. उगाच टॅंकच्या व्यवस्थापकांचा जीव धोक्‍यात कशाला घाला, असा विचार केला.एस.पी.च्या टॅंकची वेळ जमून आली. तरीही, सकाळी सहाला उठण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार होतं. कारण त्यानंतरची कुठलीच वेळ माझ्या सोयीची नव्हती. ऍडमिशन घेऊन टाकली आणि दुसर्‍या दिवशी जामानिमा करून टॅंकवर धडकलो. सकाळी सहाची गार हवा, वारा आणि बर्फासारखं गार पाणी...आहाहा! काय आल्हाददायक अनुभव हो! अंगाचं नुसतं लाकूड झालं होतं. त्याशिवाय, स्विमिंग टॅंकशी चार वर्षांनी संबंध आलेला...त्यामुळं दर पाच फुटांवर होणारी दमछाक...! काठाकाठानंच पोहलो, तरी पुरेवाट झाली. घरी आल्यानंतर दोन दिवस उठता-बसता नाकी नऊ येत होते. एकदा झोपल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर काही झालो नाही! कुणाकडे वळून बघायचं, तरी मानेला प्रचंड त्रास द्यावा लागत होता.
माझे व्यायामाचे असे अनेकविध चक्षुचमत्कारिक आणि अंगविक्षेपित प्रयोग फसले होते. त्यामुळं सगळे तूर्त थांबवले होते. एके दिवशी सहज टीव्ही बघत बसलो होतो. बाबा रामदेवांचं सप्रयोग व्याख्यान सुरू होतं. त्यांनी प्राणायामाचं महत्त्व सांगितलं. श्‍वास रोखून धरायचा आणि निःश्‍वास टाकण्याचं तंत्र त्यांनी सांगितलं. मला वाटलं, अरे, आपल्याला एवढे दिवस हे का नाही सुचलं?...हिंदी चित्रपटांतले घरच्यांसोबत न बघण्यासारखे अनेक प्रसंग आपण वर्षानुवर्षं श्‍वास रोखून बघत आलो आहोत (आणि नंतर काहीच हाती न पडल्यानं त्याबद्दल पस्तावलोही आहोत!) तसंच, सुटकेचा निःश्‍वास तर प्रत्येक संकटानंतर टाकला आहे! हे आपल्याला जमण्यात काहीच अडचण नाही!!मग त्या दिवसापासून मी बाबा रामदेवांचा परमभक्त झालो. वर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आता श्‍वास रोखून ठेवणं आणि उच्छ्वास टाकणं मला सहजरीत्या जमू लागलं आहे...जय बाबा रामदेव की!

Nov 23, 2008

श्रद्धा आणि सबुरी

विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते!
"कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती। कोणाचं कार्य जास्त उजवं, यावर मुंबईत, दिल्लीत, खल सुरू होता। अखेर मुदत संपायला वीस मिनिटे बाकी असताना दिल्लीहून यादीचा फॅक्‍स विलासरावांच्या बंगल्यावर येऊन थडकला।विलासरावांनी उत्सुकतेनं यादीवर नजर फिरवली, पण त्यांनी "कार्यसम्राट' म्हणून ज्यांच्या नावांशी शिफारस केली होती, त्यांची नावं यादीत शोधूनही सापडेनात। अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नावं मिळाली, तसे विलासराव अस्वस्थ झाले। त्यांनी अँटनींशी चर्चा करून यादीबद्दलची आपली स्पष्ट मतं नोंदवली. `बघतो,' असं आश्‍वासन देऊन अँटनींनी फोन ठेवला.
दिल्लीच्या फॅक्‍सचं दुसरं पान यायचं राहिलंय का, अशी चौकशी करण्यास विलासरावांनी पीएला सांगितलं। मग पीएची लगबग सुरू झाली। काही क्षण असेच अस्वस्थतेत गेले आणि अचानक, "साहेब, आणखी काहीतरी येतंय दिल्लीहून!' असं ओरडतच पीए आला. विलासरावांनी घड्याळात पाहिलं, "अवघी 17 मिनिटं!''कॉंग्रेसमध्ये गुणांची, कार्याची किती कदर केली जाते, अशा भावनेचं एक प्रसन्न, विजयी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं. दिल्लीचा फॅक्‍सटोन सुरू झाला. दुसऱ्या, सुधारित यादीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण यादी येण्याऐवजी कुणाचं तरी चित्र फॅक्‍सवर उमटत असल्याचं पाहायला मिळालं. विलासरावांनी फॅक्‍स काढून हातात धरला, तर ते साईबाबांचं चित्र होतं. खाली मोठ्या अक्षरात अक्षरं होती -"श्रद्धा आणि सबुरी.'
...
कॉंग्रेसचा प्रचार अगदी धूमधडाक्‍यात झाला। पक्षांतर्गत विरोधकांचीही डाळ फारशी शिजली नाही। कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं कार्य घरोघरी पोचविण्यासाठी जिवाचं रान केलं. कॉंग्रेस आघाडीनं दहा वर्षांत महाराष्ट्रात केल्या अफाट, देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली.सत्ता पुन्हा मिळाली, तरी राज्याचं नेतृत्व कोण करणार, हा प्रश्‍न काही सुटला नव्हता. दिल्लीच्या वाऱ्या करूनही काही निर्णय जाहीर होत नव्हता. राज्यात जवळपास आठ वर्षं आपलं नेतृत्व असल्यामुळेच कॉंग्रेसला पुन्हा विजय मिळाल्याचं विलासरावांना मनातून वाटत होतं, पण पक्षानं त्यावर शिक्कामोर्तब करावं, अशी त्यांची इच्छा होती.एवढ्यात काही राणे-समर्थक कार्यकर्ते भेटायला आल्याची वर्दी पीएनं त्यांना दिली. मनातलं वादळ बाजूला सारून प्रसन्न चेहऱ्यानं विलासराव त्यांना भेटायला गेले. नमस्कार-चमत्कार झाले, क्षेमकुशल विचारून झाले. कार्यकर्त्यांनी विलासरावांच्या नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं कौतुक केलं. राणेसाहेबांनी त्यांच्यासाठी पाठविलेली भेट विलासरावांकडे सुपूर्द केली. विलासरावांनी कौतुकानं उलगडून पाहिलं, तर साईबाबांचा भलामोठा फोटो होता. त्याखाली "श्रद्धा आणि सबुरी' असं भल्यामोठ्या अक्षरात लिहिलं होतं.
...
अचानक विलासरावांची तंद्री भंग पावली. समोरच सोफ्यावर पडलेल्या वर्तमानपत्रांमध्ये शिर्डीतल्या कॉंग्रेस प्रचाराच्या कार्यक्रमाचे फोटो आणि बातमीकडे त्यांचं लक्ष गेलं. "श्रद्धा आणि सबुरी' या साईबाबांच्या तत्त्वांवर आपला विश्‍वास असल्याने कोणतेही "प्रहार' झेलायला आपण तयार असल्याची त्यांची प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी जरा जास्तच ठळक छापली होती. विलासरावांनी पीएला हाक मारली. "हे वक्तव्य केवळ धार्मिक भावनेशी संबंधित होतं, त्याचा विपर्यास करून पत्रकारांनी राजकीय अर्थ काढला,' अशा स्वरूपाचा खुलासा सर्व प्रसारमाध्यमांना पाठवून देण्याचे आदेश त्यांनी पीएला दिले!
--------
संदर्भ :
शिर्डीची बातमी (२१।११।०८)
श्रद्धा आणि सबुरीपुढे "प्रहार' निष्प्रभमुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहिल्याबद्दल सर्वच वक्‍त्यांनी विलासरावांचे अभिनंदन केले। त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी साईबाबांचा भक्त आहे। श्रद्धा आणि सबुरी ही त्यांची शिकवण मी अंगिकारली। नेतृत्वावर श्रद्धा ठेवणे आणि सबुरीने काम करणे, हेच माझ्या मुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहण्याचे गमक आहे। नेतृत्वावर तुमची श्रद्धा असेल तर मग कितीही "प्रहार' होवोत ते निष्प्रभच ठरतात, असा शेरा त्यांनी आपल्या विरोधकांना पक्षांतर्गत हाणला.
----