स्वतःचं लग्न स्वतः ठरविण्याचा आणि जुळवून आणण्याचा उपद्व्याप पाच वर्षांपूर्वी केला होताच। आता दुसऱ्यांची लग्नं जुळवण्याचा प्रयत्न करून पाहायचं होतं। आपण काही पु।लं।चा "नारायण' नाही, पण लोकांना निदान दिशा तरी दाखवता येईल, असं वाटत होतं। साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाच्या विवाहेच्छूंच्या मेळाव्याच्या निमित्तानं ती संधीही गेल्या रविवारी, 27 तारखेला मिळाली।
`साथ-साथ'च्या नवीन रचनेत कार्यक्रमही बदलले होते। वधु-वर मेळाव्यासारखा कार्यक्रम घेणार काय, असं मला विचारण्यात आलं, तेव्हा झटकन "हो' म्हणून टाकलं। एकतर स्वतःचं सूत्रसंचालन कौशल्य आजमावायचं होतं। त्यातून विवाह म्हणजे आपल्या अगदी आवडीचा विषय। आपण कसे ग्रेट आणि दुसरे कसे मूर्ख, हे दाखवायची संधीही आपसूक मिळणार होती। निमंत्रण आनंदानं स्वीकारलं।दोन-तीन फेऱ्या निश्चित केल्या होत्या। साथ-साथ च्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यात काही फेरबदल केले, काही वाढवल्या. माझी मूळ संकल्पना कायम ठेवली.
सुरुवातीला औपचारिक ओळख कार्यक्रम घ्यायचा विचार नव्हता। पण आयत्या वेळी काही बदल करून, ओळखीचा कार्यक्रम घातला। त्यातून मुलं-मुली मिक्स व्हायला मदत होईल, असं वाटलं.एकतर मेळावा सुरू व्हायच्या आधीच एक मुलगा एक मुलगी असं सगळ्यांना बसवलं. त्यातून पहिल्यांदाच आलेल्या मुलं-मुली बाजूला पडण्याचा धोका टळला. एकमेकांची ओळख स्टेजवर जाऊन करून द्यायची, असा हमखास हातखंडा विषय ठेवला. एकमेकांची लग्नाच्या दृष्टिकोनातून ओळख करून घेताना मुलं-मुली बऱ्यापैकी मोकळी झाली, एकमेकांत मिसळली. दुसऱ्याच्या अपेक्षा आणि त्याचं प्रोफाइल मांडताना प्रत्येकाची कसरत पाहण्यासारखी होती.दुसऱ्या फेरीत लग्नायोग्य संभाव्य जोड्यांना एकमेकांना प्रश्न विचारायला सांगितले. फारसं पुढे येऊन न बोलणाऱ्या जोड्या त्यासाठी निवडल्या. ही फेरीही रंगली.
तिसऱ्या फेरीत सगळ्या मुलामुलींना वेगवेगळे प्रसंग देऊन त्यात तुम्ही काय केलं असतंत, यावर बोलायला सांगितलं। बायको उशिरा घरी आली तर, तिची आई आजारी असेल तर, नवऱ्याची जवळची मैत्रीण काहीबाही एसेमेस पाठवत असेल तर, बायको लग्नाआधीच कुणाच्या शारीरिकदृष्ट्याही जवळ आली असेल तर...? असे प्रसंग होते। मुलांनी खूप उत्साहानं आणि हिरीरीनं उत्तरं दिली। सगळे प्रामाणिक होते, ही आनंदाची गोष्ट।त्यातून काही उणिवा, उण्या बाजू राहिल्या, त्या दाखवून दिल्या. मुलांनाही त्या पटल्या.साथ-साथ च्या कार्यकर्त्यांनीही चांगली मदत केली. दोन तास हा मेळावा चालला. विदाऊट ब्रेक. मला लवकर निघायचं होतं आणि उशिरा सुरू झाला होता म्हणून. नाहीतर तो आणखी रंगला असता. शेवटी शेवटी गुंडाळावा लागला.
एकूण अनुभव छान होता. एकतर माझा सूत्रसंचालनाचा आत्मविश्वास वाढला. त्यातून निदान दोन तास तरी लोकांना आपण आपल्याकडे पाहायला, ऐकायला लावू शकतो, एवढा विश्वास आला. मुलांना चांगला कार्यक्रम दिल्याचं समाधान मिळालं. मुलांनीही "आतापर्यंतचा उत्कृष्ट कार्यक्रम' अशा शब्दांत या कार्यक्रमाची प्रशंसा केली."साथ-साथ'मध्ये जे काही कमावलं, त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं....!
आता मोठ्या स्तरावर असाच काही उपक्रम करायचा विचार आहे. आहे कुणी लग्नाळू?
---------