जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Jun 23, 2010
डोळे तुपाशी; डोके उपाशी!
दसऱ्याचा रावण दहनाचा भव्य कार्यक्रम पाहायला जावं आणि बुजगावण्याला जाळताना पाहायला लागावं, तसं काहीसं "रावण' पाहणाऱ्या प्रेक्षकांचं होतं. प्रचंड बजेट, अफाट मेहनत, बक्कळ पैसे घेणारे बडे कलाकार आणि भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देणारे दिग्दर्शक मणिरत्नम अशी भरभक्कम रसद रणांगणावर मान टाकते आणि "रावण'चं "दहन' कसलं, शेकोटीच पाहावी लागते!
महाभारतावरचा "राजनीती' झाला; आता मणिरत्नम यांनी "रावण'मध्ये रामायणाला वेठीस धरलं आहे. इथे दुष्ट प्रवृत्तीचा "रावण' (वीरा ः अभिषेक बच्चन) आहे, त्याला मारणारा "राम' (देव ः विक्रम) आहे आणि रावणानं अपहरण केलेली त्याची पत्नी "सीता' (रागिणी ः ऐश्वर्या राय) आहे. सीतेचं अपहरण, रामाला हनुमानाची (गोविंदा) मदत, सीतेची अग्निपरीक्षा (पॉलिग्राफ टेस्ट!) असं सगळं आहे. मणिरत्नम यांचा रावण मात्र जरा जास्तच सहानुभूती वाटावा असा आणि अन्यायामुळे व्यवस्थेशी संघर्ष करणारा आहे. हा रावण जसा सीतेच्या प्रेमात पडतो, तसेच तिलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते, एवढाच कथानकातला "ट्विस्ट'!
मणिरत्नम यांनी आतापर्यंत नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत आणि प्रत्येक चित्रपटातून ते सामाजिक भाष्य करू पाहतात. "रावण' मात्र सामाजिक सोडाच, कुठलंच भाष्य करत नाही. वीरानं केलेल्या रागिणीच्या अपहरणापासून चित्रपटाला सुरवात होते. रागिणी त्याच्या लंकेतल्या यातना भोगत असताना त्याच्यावर झालेला अन्याय आणि त्याची सर्वांना मदत करण्याची वृत्ती जवळून अनुभवते. तिच्या मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते. रागिणीला सोडविण्यासाठी आणि वीराला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक देव जंगजंग पछाडतो. रागिणीला मिळवून तो हा संघर्षही संपवतो.
रावणाची व्यक्तिरेखा सादर करताना मणिरत्नम यांनी अभिषेक बच्चनची प्रतिमा लक्षात ठेवून त्याला खूपच सहानुभूती मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. चित्रपटाची मोठी फसगत तिथेच झालीय. सुरवातीच्या निर्घृण हिंसाचाराच्या दृश्यात तो नरसंहारक म्हणून शोभत नाही आणि नंतरच्या सहानुभूतीपूर्ण प्रतिमेमुळे आधीचं क्रौर्य अविश्वसनीयच वाटू लागतं. रागिणीला तिच्याविषयी प्रेम वाटावं म्हणून केलेली ही व्यवस्था कथानक भरकटून टाकते. चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात.
कथा-पटकथा फसली असली, तरी चित्रपट शेवटपर्यंत पाहत राहावासा वाटतो तो संतोष सिवन-मणिकंदन यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रणामुळे. रौद्रभीषण धबधब्याचं दृश्य असो वा जंगलातील शोधमोहीम... प्रत्येक फ्रेमच्या कानाकोपऱ्यातून कॅमेरा फिरवून त्यांनी झाडं-फुलंच नव्हेत, तर दगड-धोंडेही जिवंत करून टाकले आहेत. शेवटचा अधांतरी पुलावरच्या मारामारीचा प्रसंग म्हणजे तंत्रज्ञानाची, छायाचित्रणाची अत्युच्च पातळी आहे. रहमानचं संगीत वेगळं असलं, तरी चित्रपटातली गाणी अनावश्यक पद्धतीनं येतात.
न शोभणारी व्यक्तिरेखा आणि आचरट हावभाव यामुळे अभिषेक बच्चनची कामगिरी फसली आहे. ऐश्वर्या राय-बच्चनने अभिनयाचा आणखी एक उत्तम नमुना सादर केला आहे. रविकिशन लक्षात राहण्यासारखा. गोविंदाला वाया घालवलं आहे. विक्रमही ठीकठाक.
छायाचित्रण, सादरीकरणासाठी पाहायलाच हवा, असा हा "रावण' मणिरत्नमचा चित्रपट म्हणून अपेक्षापूर्ती करत नाही, एवढं खरं.
Jun 22, 2010
`भात-राशी'च्या राशीला!
आमचा मित्र अजित रानडे याच्या wanderers क्लबने ट्रेक आयोजित केला होता. रविवार होता आणि मीही बऱ्याच दिवसांत कुठे ट्रेक केला नव्हता. सगळं जुळून आलं होतं....
सकाळी सहाच्या आधीच शिवाजीनगर स्थानकावर पोचलो. साडेसहाच्या लोकलनं निघायचं होतं. जाताना अजिबात गर्दी मिळाली नाही. त्यामुळे प्रवास छान झाला. पाऊस पडण्याविषयी जरा शंकाच होती. वाटेतही कुठे पावसाची लक्षणं दिसत नव्हती. नाही म्हणायला डोंगरांच्या टोकांवर ढगांचे पुंजके जमलेले काही ठिकाणी दिसत होते, पण मनाचे मोर थुईथुई नाचावेत, असं वातावरण नव्हतं.
तासाभरात कामशेतला पोचलो. तिथून जीपने महागाव या ठिकाणी जायचं होतं. तिथल्या घटेश्वर मंदिरात पहिला थांबा होता. काही मंडळी मागे राहिली होती. त्यांची व्यवस्था करून आम्ही जीपने घटेश्वर मंदिरात पोचलो. तिथे चहाचा आस्वाद घेतला. पुण्यातून आणलेली इडलीही हादडली. अजितनं तिथे कसले कसले व्यायाम पण घेतले. त्याचे नेतृत्वगुण हल्ली फारच फुलून आलेत, हेही लक्षात आलं. इंग्रजीतूनही तो सफाईदार (की बेमालूम) मार्गदर्शन करत होता.
पोटपूजा झाल्यानंतर आम्ही साडेनऊच्या सुमारास भातराशी टेकडीकडे मोर्चा वळविला. जाताना पावसाचं टिपूस नव्हतं. अधूनमधून तर ऊन येत होतं आणि घामाघूम व्हायला होत होतं. दोन चार छोट्या टेकड्या आणि डोंगररांगा पार करून आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोचलो. दुपारचे बारा वाजले होते. तरी तिथे हवा आल्हाददायक होती. हवा स्वच्छ असल्यानं लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना असे किल्ले आणि चक्क ड्यूक्स नोजचं टोकही दिसत होतं. महिनाभरानं तिथे जायचंच आहे, पण त्याआधीच तिथलं दर्शन घडलं.
पठारावर मस्त आराम केला. गार वा-याच्या झुळका सुखावत होत्या. कुणाच्या तरी पाय लचकला होता. सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मग भातराशीची टेकडी चढायला सुरुवात केली. अगदी छोटंसंच टेकाड होतं ते. वर चढायला सुरुवात करतानाच पावसाचे हलके शिंतोडे उडाले. वर पोचेपर्यंत पाऊस नक्की येणार, असं वाटत होतं, पण पुन्हा त्याच्या लहरीपणाबद्दल मनात संशयाचं धुकं दाटत होतं.
वर चढायला सोपंच होतं. काही नवख्या माणसांना आधार द्यावा लागला. वर पोचलो, तर अधिक आल्हाददायक आणि गार हवा होती. खालून दरीतून कुणीतरी फुंकर मारावी, तसे धुक्याचे ढग वर आले. काही काळ तेही मनाला सुखावून गेले. पुन्हा एकदा पावसानं शिंतोडे उडवून वाकुल्या दाखवल्या. पण प्रत्यक्षात तो वरुणराजा मात्र मेहेरबान होत नव्हता.
तिथे टेकाडावरच डबे खाल्ले. गावातून दोन वाटाडे आमच्यासोबत आले होते. एक मोठा बाप्या आणि दोन लहानगे. त्यांनाही आमचे डबे खायला दिले. सगळ्यांचे डबे चाखून आणि संपवून झाल्यानंतर उतरायला सुरुवात केली.
उतरणीची वाट जरा आणखी अवघड होती. दोन-तीन डोंगररांगा तर भन्नाट होत्या. तिथून तोल सावरत घसरताना मजा आली. तसेच आम्ही उतरून बेडसे लेण्यांपाशी आलो. लेणी बघायला जाताना खालून वर जाण्याऐवजी वरून खाली येण्याचा हा अनुभव अनोखा होता.
लेणी ठीकठाक होती. निदान कार्ल्याच्या लेण्यांपेक्षा स्वच्छ, नेटकी वाटली. तिथून उतरायला ढीगभर पाय-या होत्या. खाली पुन्हा गावापर्यंत चालत जातानाचा रस्ता मात्र थोडासा कंटाळवाणा झाला. मुख्य रस्त्यावर आमच्यासाठी जीप वाट बघत उभ्या होत्या. तिथून कामशेतला आलो आणि साडेपाचची लोकल निघून गेल्यानं एक तास तिथेच वाट पाहत उभं राहावं लागलं. त्या काळात छान गप्पा आणि टाइमपास झाला. येताना लोकलमध्ये दंगा करायचा विचार होता, पण प्रचंड गर्दी होती आणि आम्ही सगळे विखरले गेल्यानं गप्प बसून राहावं लागलं. हा त्रास सहन करण्यापलीकडचा होता.
चला, पावसाळ्याची सुरुवात तर छान झाली..!!