Apr 24, 2011

राडा ...? छे, छे.. संशयकल्लोळ!

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या काही कलाकारांना पुण्यात धुंद अवस्थेत "मोकळ्या' वातावरणात फिरताना पोलिसांनी पकडलं. त्यांच्याबद्दल पेपरात भरपूर बदनामीकारक बातम्या छापून आल्या. खरंतर चांगल्या घरातल्या, सालस, सज्जन अशा या कलाकारांनी काहीच केलं नव्हतं. त्यांच्या जराशा मोकळेपणाच्या वागण्यानं त्यांच्यावर निष्कारण बालंट आलं होतं, हे त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनीही केलेल्या खुलाशांवरून स्पष्ट झालं. प्रत्यक्षात या "ऐतिहासिक' घटनेचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकांच्या नशिबी नव्हतं, पण या कलाकारांचं पाऊल वाकडं पडल्याच्या अफवा कशावरून उठल्या असाव्यात आणि प्रत्यक्षात काय घडलं असावं, याविषयीचे काही अंदाज...

'ग्लोबल वॉर्मिंग'वरचा एक मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या ज्वलंत समस्येकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार रस्त्यावर उतरले होते. तेदेखील त्या चित्रपटाशी थेट संबंध नसताना, केवळ सामाजिक प्रश्‍नाबद्दलची कळकळ म्हणून! आता "ग्लोबल वॉर्मिंग'चा म्हणजे थोडक्‍यात "जागतिक उकाड्या'चा प्रश्‍न मांडण्यासाठी "रिऍलिस्टिक लुक' द्यावा, म्हणून या घटनेतील काही तारकांनी त्या रात्री तसेच कपडे घातले होते, (किंवा घातले नव्हते!) एवढंच.

सौरभ गांगुलीनं भर स्टेडियममध्ये शर्ट काढून फिरवला, तरी त्याच्या कारकिर्दीत त्याला भारताला वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही. ते स्वप्न धोनीच्या शिलेदारांनी पूर्ण केलं, तर "सार्वजनिक वस्त्रत्याग' करण्याचं व्रत बॉलिवूडच्या एका मॉडेल-कम-अभिनेत्रीनं (म्हणजे जी अभिनेत्री "कमी' आणि मॉडेल जास्त असते ती!) जाहीर केलं होतं. (त्यामुळंच भारतीय खेळाडू जास्त हिरिरीनं खेळले, असंही म्हणतात!) काही नतद्रष्ट संस्कृतिरक्षकांनी तिला ते प्रत्यक्षात आणू दिलं नाही. आपल्या वचनपूर्तीचं ठिकाण तिने पॅरिसला हलविण्याचं जाहीर केलं, त्यामुळे निदान लाइव्ह कव्हरेज पाहता येईल, या आशेनं अनेक जण टीव्हीला डोळे लावून बसले होते. तो सोहळाही रहित झाला. तिची हुकलेली संधी अल्प प्रमाणात का होईना, आपण पूर्ण करावी, अशी या मराठी तारकांची इच्छा होती. पण हाय रे कर्मा! तिथेही (रसिकांचं) कमनशीब आडवं आलं!

या घटनेतील काही कलाकारांनी "राडा' अशा काहीतरी नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटाच्या नावावरून त्यांना जे अपेक्षित होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावर साकारता न आल्याची त्यांना खंत होती. ती त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर चित्रपटाचं नाव सार्थ करून भरून काढली!

"तुला धड मराठी बोलता येत नाही!', "कसले कपडे घालतात आजकालच्या मराठी नट्या', "पार लाज सोडली हो हल्लीच्या पोरींनी,' असे जाहीर टोमणे एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीला ऐकावे लागत होते. त्याचा अभिनव निषेध करण्यासाठी तिला याहून अभिनव आंदोलन सुचलं नाही.

पोलिस आयुक्तपदी महिला अधिकारी असतानाही पुण्यात महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे, याकडे पोलिसांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचा हा उपक्रम होता. त्याअंतर्गत नियोजनानुसार फरसाण-शेव पार्टी करून ते फिरायला बाहेर पडले होते. त्यांच्या बोलण्यावरून कुणीतरी "शेव पार्टी'च्या ऐवजी "रेव्ह पार्टी' असं ऐकलं आणि निष्कारण पोलिसांना फोन केला. दरम्यान, या कलाकारांना कुणीतरी टारगट तरुण छेडत होते, म्हणून त्यांनीही पोलिसांना कळवलं. पोलिसांची "एन्ट्री' आणि पुढे मिळालेली "प्रसिद्धी' हा मात्र त्यांच्या नियोजनाचा भाग नव्हता.

सर्वसामान्य लोक रात्री-अपरात्री "धुंद' झाल्यावर जसे वागतात, त्याहून आपण काही वेगळं केलं नव्हतं, तरीही कलाकार असल्याने आपल्याविरुद्ध मोठी आवई उठली, अशी भावना या कलाकारांच्या मनात आहे. कलाकार म्हणून (निदान अशा प्रसंगी) वेगळी वागणूक देण्यास बंदी घालावी, यासाठी ते आता जनहित याचिका दाखल करणार असल्याचे समजते!