Apr 15, 2008

नस्ती आफत!


परवाच एका सिनेमाच्या पार्टीला गेलो होतो. एकतर मराठी सिनेमाच्या पार्टीत "सकाळ'वाल्याला फार महत्त्व असतं. त्याच्याशिवाय आपल्या पिक्‍चरचं काही खरं नाही, असं निर्मात्यांना उगाचच वाटत असतं. एक बडे निर्माते-दिग्दर्शक होते. ते माझी वाटच बघत होते. नेहमीप्रमाणे पिक्‍चरची माहिती देऊन झाल्यावर जास्तच प्रेमात आले. एकतर मी प्रिमिअर शो पाहिला नव्हता. चित्रपट मला कसा वाटला, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. पण मी त्याबद्दल काहीच बोलू शकलो नाही.

नंतरच्या बोलण्या-वागण्यातून एकंदरीत लक्षात आलं, की माझ्या नावाची त्यांना दहशत होती!सध्या मराठी चित्रपटसृष्टीत निदान पुण्याबाबत तरी मला सगळे घाबरतात की काय, असंच वाटायला लागलंय. काही निर्माते तर "अरे बापरे! पेंढारकर लिहिणार आहेत काय,' म्हणून डोक्‍याला हात लावतात. काही माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला बोलावता आलं तर बरं होईल, असा लकडा पीआरओकडे लावतात. खरं तर अशी दहशत बिहशत असायचं काहीच कारण नाही. मी काही राक्षस नाही. किंवा कुणाबद्दल आकसानं पण लिहीत नाही. पण खोट्याला खोटं म्हणतो, एवढंच.

गेल्या वर्षी तर एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं माझ्याविरुद्ध शड्डूच ठोकला होता. त्याला आम्ही प्रत्युत्तरातून सरळ केला. यंदाही अगदी भोळा, साळसूद असलेल्या एका लेखक-दिग्दर्शकानं माझ्याविरुद्ध मोहीम चालवली. त्याच्या चित्रपटाला मी वाईट म्हटलं, म्हणून. आम्ही धूप घातला नाही.बहुधा, अशाच काहीतरी समजुतीखाली हे प्रसिद्ध दिग्दर्शक महाशय होते. मग त्यांनी पीआरओला माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी "शो' अरेंज करायला सांगितलं.

मी म्हटलं, रात गई, बात गई. दुसऱ्या दिवशी विसरून जातील. पण नाही! मी एका कार्यक्रमात असताना, त्या पीआरओ चा फोन आला.
"अहो, ते दिग्दर्शक तुमच्यासाठी पेटलेत! तुम्ही आज कधी बघणार आहात, विचारताहेत.'
मी म्हटलं, उद्या बघतो.
मग त्यांनी माझा नंबरच साहेबांना देऊन टाकला. दुपारी कार्यक्रम संपल्या संपल्या घरी जाताना साहेबांचा फोन.
"बघणार का आज पिक्‍चर?'
मी म्हटलं, "नाही. उद्या. आज बरं नाहीये.'
"बरं. पण पॉझिटिव्हच लिहा. तुमच्यावर बरंच अवलंबून आहे..'

दुसऱ्या दिवशी इमाने इतबारे चित्रपट पाहिला. बरा होता. मी बरंच लिहिणार होतो.ऑफिसात पोचतोय, तोच साहेबांचा फोन.
"बघितला का? कसा वाटला?'

मी म्हटलं, "चांगला आहे.'

तेव्हा कुठे साहेबांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. खरं तर मी चित्रपट पाहिल्यावर त्यांना माझ्यासोबत जेवायलाही जायचं होतं म्हणे. पण मी दुसऱ्या दिवशीही चित्रपटच न पाहिल्यामुळे त्यांचा नाइलाज झाला.

परीक्षण चांगलं आल्यावर पुन्हा थॅंक्‍सचा एसएमएस वगैरे. मी माझ्या पद्धतीप्रमाणे, "ते माझं कामच होतं,' असं उत्तर पाठवलं. त्यावर परत, "आय ऍम व्हेरी ग्रेटफुल टू यू'चा एसएमएस.
आता, मी ज्याचे चित्रपट पाहत पाहत मोठा झालोय, त्यानं एवढं अगदी माझ्या हातापाया पडावं, असं काही नव्हतं. माझं कर्तृत्वही तेवढं नाही आणि त्याचा दर्जाही एवढा कमी नाही. तशी गरजही नाही. तरी, कुणीतरी त्याच्या मनात भरवलं असावं, की मी वाईटच लिहितो म्हणून. आणि एकदा मी वाईट लिहिलं, की संपलं सगळं!
असो. या सगळ्या प्रकरणातून एक वेगळा अनुभव मिळाला, झालं!
-----

Apr 14, 2008

वाचू कीर्तनाचे रंगी...

पुण्यात सिंहगड पायथ्याजवळ रेव्ह पार्टीची नशा जगजाहीर झाली, त्या वेळी केलेलं हे लिखाण आहे. रेव्ह पार्टीनंतर सांस्कृतिक डोस पाजण्याचं पीकच आलं होतं. "पेशव्यांची परंपरा असलेल्या पुण्याचं काय झालं हो!' असा टाहो फोडला जात होता. विश्‍वास नांगरे पाटीलही सगळीकडे याच विषयावर बोलत होते. त्याचंच हे प्रहसन.
---------
बालगंधर्व (रंग) मंदिरात बुवांचं कीर्तन ऐन रंगात आलंय. समोर उपस्थित सदाशिव पेठी, नारायण पेठी, शनिवार पेठी, तबला-पेटी आणि समस्त सुसुसुसुसुसुसुसु-संस्कृत, सुसुसुसुसुसुसुसु-जाण आणि सुसुसुसुसुसुसुसु-शिक्षित मंडळी आणि पत्रकार-पत्रकारिणी धुंद ("मद्य' नव्हे) होऊन डोलताहेत...काही भावविव्हल आणि भक्तिवेल्हाळ श्रोते तर पार "समाधी अवस्थे'त गेलेत...(काही नतद्रष्ट यालाच सुखाची झोप असं म्हणतात...असो. अशा कपाळकरंट्यांना काय कळणार अशा अध्यात्मिक गोष्टी...(पुन्हा) असो.)

महाराजांच्या जिभेवर जणू सरस्वतीच भांगडा करतेय...आणि वाणीतून तर मध, साखर भसाभसा सांडतेय...(पवित्र, टापटीप "देऊळ' असूनही त्यामुळंच माशाही घोंघावताहेत...)जाहला संस्कारांत खंड । म्हणूनच "रेव्ह पार्ट्या' उदंड ।।"विश्‍वास' म्हणे असे हे "गुंड' । ठेचावेत करूनी "जेरबंद' ।।तर मंडळी, माऊलींनी काय सांगून ठेवलंय...या जगात अज्ञान आणि अंधकाराचं उदंड पीक आलंय...अधर्म आणि असंस्कार माजलाय...अशा परिस्थितीत एकच उपाय...पालकांनो, मुलांना भरपूर प्रेम द्या...नाहीतर आमच्याकडे पाठवा...आम्ही त्यांना कोठडीत त्यांच्यावर "प्रेमवर्षाव' करू...!!अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक, सगुणतारक, दुर्गुणहारक संतशिरोमणी विश्‍वासराव नांगरे पाटील महाराज की जय...!!!!! (एकच जयघोष...)महामहोपाध्याय, संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ ("देवाधिदेव'च्या सुरात) विजयराव भटकर महाराज की जय...!! (मंदिरा'तील मागच्या उजव्या कोपऱ्यातील गटाकडून आरोळी) संतशिरोमणी, महान संस्कृतीरक्षक श्री श्री श्री (किमान तीनदा आवश्‍यक. दोनदा चालेल. पण फक्त एकदा "श्री' खपवून घेणार नाही) बबनराव पाचपुते महाराज की जय! (हा "देशा'वरचा आवाज)

एवढा सगळा गदारोळ आणि घोषणांचा चित्कार यथासांग पार पडल्यानंतर नांगरे-पाटील महाराज पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाला (खरं तर तथाकथित उच्चभ्रूंच्या बेगडी अब्रूरूपी लंगोटीलाच) हात घालतात.मंडळी, ""आजची तरुण पिढी बहकण्यामागचं आणि रेव्ह पार्ट्यांसारख्या वाईट मार्गाला लागण्यामागचं कारण एकच आहे....आईवडिलांचं होणारं दुर्लक्ष आणि संस्कारांचा अभाव...!''""आज आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही...सगळे पैशांच्या मागे लागलेत...त्यामुळेच हा दुराचार समाजात माजलाय. अशा पार्ट्यांत नाचणारी, अमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुण पिढी पाहताना आमचं हृदय हेलावतं...त्यांच्या (फक्त मुलांच्या) अंगावर हात टाकताना मनाला किती यातना होतात...पण इलाज नसतो..."पोलिसी खाक्‍या'नंच ठोक्‍यायला...आपलं..."ठोकायला' लागतं...किती वेदना होत असतील...मारणाऱ्यांना...! पण इलाज नाही ! आजच्या तरुण पिढीला योग्य जागेवर आणायचं असेल, तर त्यांना त्यांच्या "योग्य जागी' लाथा घालायलाच हव्यात...नाही का?''बोला...अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक विश्‍वासराव नांगरे पाटील महाराज की जय !! ...पुन्हा एकमुखी गजर.त्यापाठोपाठ संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ भटकर महाराज आणि संतशिरोमणी पाचपुते महाराज यांच्याही अनुयायांकडून (की समर्थकांकडून?) त्यांच्या नावांचा अनुक्रमे गजर.

नांगरे-पाटील महाराजांच्या कीर्तनात पुन्हा एकदा समाजातील अव्यवस्था, सगळीकडे माजलेला भ्रष्टाचार, संस्कृतीचा ऱ्हास, वाढता चंगळवाद, यांची ओघवत्या आणि मधाळ वाणीत उजळणी होते. (मधासाठी आलेल्या माशा आता सगळीकडे घोंघावून श्रोत्यांना "नको तिथे' चावू लागल्या आहेत.) (मध्येच कुणीतरी सदाशिव पेठी पुणेकर "पोलिस खात्यात भ्रष्टाचार नाही काय?' असा भोचक प्रश्‍न आपलं तोंड कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं विचारतात. त्यामुळं महाराजांची गैरसोय होते, पण ते तिच्याकडे (आणि त्याच्याकडे) सोयीस्कर दुर्लक्ष करतात.)

संदीप खर्डेकर बुवांना बुक्का लावायला उठतात. त्यांच्या कपाळावर आधीच नाकापासून केसांपर्यंत शेंदूर असल्याने त्यांच्या बुक्का कुठे लावायचा, असा प्रश्‍न बुवांना पडतो. प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावून कीर्तनाची सांगता होते.

(टीप ः - नांगरे-पाटील बुवा सध्या (बदली होईपर्यंत) शाल-श्रीफळ आणि सव्वाअकरा रुपये या दराने पुणे जिल्ह्यात कुठेही "बहकलेली तरुणाई' या विषयावरील कीर्तनासाठी उपलब्ध आहेत.)

------

Apr 13, 2008

"गोष्ट' तशी चांगली, पण "विनोदा'ला टांगली!

"क्रेझी 4'ची जाहिरात फसवी आहे.
ती पाहून, चित्रपटातले मुख्य कलाकार अर्शद वारसी, इरफान खान, राजपाल यादव आणि सुरेश मेनन हे चित्रपटातले "क्रेझी 4' आहेत, असा अंदाज होतो. प्रत्यक्षात तसं नाही. राकेश रोशन, राजेश रोशन, लेखक अश्‍वनी धीर आणि दिग्दर्शक जयदीप सेन हे ते "क्रेझी 4' आहेत, हे चित्रपट पाहिल्यावर कळतं.

"क्रेझी 4' म्हणजे धमाल कॉमेडी वगैरे असल्याचा समज त्याच्या प्रचंड जाहिरातबाजीतून उगाचच होतो. ही एक साधी, थोडीशी रहस्यमय आणि थोडीशी थरारकथा आहे. हल्ली कोणतीही गोष्ट कॉमेडीत नुसती लपेटून नव्हे, तर चांगली बरबटून द्यायची पद्धतच असल्याने ती वाहवत गेलेय. काही ना काही मानसिक उणिवांमुळे मानसोपचार सुरू असलेले चार तरुण. जूही चावला ही त्यांची डॉक्‍टर. ती एकदा त्यांना क्रिकेट सामना पाहायला बाहेर नेते, तेव्हा तिचंच अपहरण होतं. मग त्यात तिच्या जवळच्यांचाच हात असल्याचं या चौघांना कळतं. त्यातून ते तिची आणि आपली सुटका करून घेतात, अशी कथा. कथेत काही विशेष नाही म्हटल्यावर ते पटकथेत तरी हवं. पण केवळ प्रत्येकाच्या वैचित्र्यावर आधारित संवाद लिहून आणि घटना रचून वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम लेखक राकेश रोशन/अश्‍वनी धीर आणि पटकथालेखक अश्‍वनी धीर यांनी राबविल्यानं हा प्रवासही बेचव झाला आहे.

सर्वसाधारण "थ्रिलर' चित्रपट म्हणून "क्रेझी 4' मनोरंजक आहे, पण कॉमेडीचा हट्ट धरल्याने राखी सावंत, शाहरूख खान आणि हृतिक रोशन (याचं तर चित्रपट संपल्यावर!) यांचे आयटम सॉंग निष्कारण टाकल्याने त्याची चव गेलेय. तरीही, अपेक्षाभंग झाला, तरी कंटाळा येत नाही, हे बाकी खरं!

अभिनयात अर्शद वारसी, इरफान खान बाजी मारतात. जूही चावला, राजपाल यादव, सुरेश मेनन यांना काहीच संधी नाही. राकेश रोशन यांचं दिग्दर्शन असल्याशिवाय चांगलं संगीत द्यायचं नाही, असं बंधू राजेश रोशन यांनी ठरवलंच आहे. छायाचित्रण आणि नृत्यदिग्दर्शन उत्तम आहे. आकर्षक वेष्टणातला जुनाच मसाला बघायचा असेल तर "क्रेझी 4' ठीक आहे.
---