Feb 6, 2017

सोनियाच्या ताटी!



असं म्हटलं जातं, की काही माणसं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. (चमच्याचं माहीत नाही, पण सोन्याचं नाणं गिळणारी काही लहान मुलं मला माहीत आहेत. त्यानंतर ते नाणं त्यांच्या पोटातून (कुठल्याही वाटेने) बाहेर काढण्यासाठी डॉक्टरला सोन्यानं मढवण्याचं आमिष दाखवणारे त्यांचे आई-बापही मला माहीत आहेत. पण ते जाऊ दे!) तर काही माणसं त्यांचा पुनर्जन्म झाल्यानंतर तोंडात सोन्याचा चमचा धरायला लागतात. अर्थातच राजकारणात गेल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म होत असतो आणि सोन्याचा चमचा तोंडात धरायला लागण्यासारखी परिस्थिती येण्याआधी त्यांना बऱ्याच जणांकडे चमचेगिरीसुद्धा करायला लागलेली असते.
राजकारणात वरिष्ठांकडून उमेदवारीचं टॉनिक मिळालं, की अनेकांना सोन्याचे दिवस येतात. कॉंग्रेसला सध्या सोन्याचे दिवस नसले, तरी त्यांचे वरिष्ठ नेते नुकतेच सोन्याच्या ताटातून जेवण करताना टीव्हीवर दिसून आले. त्याच्या क्लिप `व्हायरल` झाल्या. निवडणुकीच्या काळात व्हायरल होणाऱ्या अशा बातम्यांचा, फोटो-व्हिडिओंचा ताप हा व्हायरल फीवर पेक्षा जास्त डेंजरस असतो. मोठमोठ्या नेत्यांपर्यंत तो व्हायरल होण्याची शक्यता असते आणि त्यातून उमेदवारांच्या डोक्याला वेगळाच ताप होतो. बरं, जे सोन्याच्या ताटातून जेवण करत होते, ते होते साक्षात कॉंग्रेसचे निष्ठावंत पाईक, छोट्या पदापासून उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीपर्यंत पोहोचलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि नंतरचे `आदर्श` मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वगैरे वगैरे. (तसंही कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना गेली अनेक वर्षं `सोनिया`च्या ताटामुळेच जेवायला मिळत आहे, हे सगळ्यांनाच माहितेय.) एवढी महत्त्वाची बातमी म्हटल्यावर कुठल्यातरी उत्साही कार्यकर्त्याला वाटलं असणार, की एवढा `सोन्यासारखा` महाराष्ट्र घडवणाऱ्या मंडळींना या निवडणुकीच्या काळात आणखी फेमस करून टाकावं. त्यानं केले फोटो व्हायलरल. नतद्रष्ट मीडियावाल्यांनी त्याचाही बाऊ केला. धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या विरोधकांनी लगेच ही संधी साधून बोंबाबोंब केली. (त्यांना बिचाऱ्यांना प्लॅटिनमच्या ताटात जेवायला लागत असल्याची असूयाही त्यामागे असावी!) एवढी चर्चा झाल्यानंतर शेवटी अशोकराव चव्हाणांना खुलासा करावा लागला. त्यांनी खरं काय ते सांगून टाकलं. त्यांच्या मते हे कार्यकर्त्यानं घरी प्रेमानं वाढलेलं जेवण होतं. साहजिकच आहे, आता कार्यकर्त्याच्या आग्रहाला बळी पडणं, हा तर राजकीय नेत्यांचा धर्म आहे. आणि याच धर्माचं पालन ते सत्तेत असतानाही करत असतात. कार्यकर्ते म्हणा, बिल्डर म्हणा, उद्योगपती म्हणा, गावगुंड म्हणा, सगळ्यांचा आग्रह एवढा असतो, की कितीही ठरवलं, तरी त्यांचं प्रेम नाकारता येत नाही. या प्रेमाला काही नतद्रष्ट लोक भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घोटाळे, `सत्तेचा माज,` अशा काहीतरी उपमा देतात.
तात्पर्य काय, की आजपासून सोन्याच्या ताटात जेवायला सुरुवात करा. बायको कटकट करायला लागली, तर तिला सांगून टाका, की तिच्या प्रेमापोटीच हे सगळं चाललंय!
ता. क. भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून तिकीटासाठी दोन लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय म्हणे. कार्यकर्त्यांनी स्वतः प्रेम व्यक्त केलं नाही, तर नेते त्यांना ते व्यक्त करण्याची संधी आणि पर्याय उलपब्ध करून देतात, ते हे असे!
....