Nov 12, 2007

कानपिचक्‍या

थोरल्या कपूर घराण्यातला बबड्या आणि (काही अपरिहार्य कारणास्तव) "बिग बी'चा वारस न ठरू शकलेल्या धाकल्या कपूरांची बबडी.

दोघांचा पहिलाच पिच्चर. त्यातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा. (म्हणजे, बहुतेक वेळा आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या कथा, कथासूत्र, कथेचा "जर्म', संकल्पना यावरून प्रेरणा घेणारा...थोडक्‍यात "ढापणारा') बरं, बॉलिवूडकरांना आधीच गरीब बापड्या प्रेक्षकांना मोठमोठी स्वप्नं दाखवायची भारी हौस. त्यातून हा तर बाबा तर काय, स्वप्नांचा घाऊक "मॉल'वाला. भसाभस बघ स्वप्नं, विक प्रेक्षकांना...बघ स्वप्न, विक प्रेक्षकांना...असं करणारा. तर अशा या सगळ्या तारकादळाचा पिच्चर येणार ऐन दिवाळीत.

त्याच वेळेला आपलं "भुजाबळ' दाखवायची बॉलिवूडचा "न भूतो न भविष्यती' असा सुपर-डुपर-टिपरस्टारची खुमखुमी! बरं, त्याचा सिनेमाही त्याच्याच जिवलग मैत्रीण कम बहीण कम सल्लागार कम मार्गदर्शक कम "फॅमिली फ्रेंड'नं दिग्दर्शित केलेला. त्याच्याही सिनेमात त्याची लाडकी एक "छबडी.' या दोन "रेड्यां'ची (हे संबोधन चित्रपटासाठी; व्यक्तींसाठी नव्हे.) झुंजही ऐन दिवाळीत. (असते एकेकाला हिंसाचाराची हौस!) मग जाहिरातबाजीही तशीच हवी. लहान मुलं उड्या मारत "माझी आई मोठी की तुझी आई मोठी' खेळतात ना, तसं "माझा बाप मोठा की तुझा बाप', तशीच ही स्पर्धा. मग टीव्हीवरचे नाच्यांचे ("नाचांचे' कसे म्हणावे?) कार्यक्रम, कुठल्या कुठल्या पार्ट्या, फॅशन शो, गेला बाजार सार्वजनिक हळदीकुंकू...जिथे संधी मिळेल तिथं आपल्या पिक्‍चरची वाणं वाटायचा सपाटाच. मधुबाला, वहिदा रहमान, माधुरी दीक्षितसकट तमाम सौंदर्यवतींना बाराच्या भावात काढतील, अशाच या "बबडी' आणि "छबडी' असल्याचा दिंडोरा. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी पण मजबूत प्रीमिअर वगैरे.

"आमच्या बबड्या-बबडीचं "विविध गुणदर्शन' पाहायला यायचं हं,' ही आईबाबांची प्रेमाची सक्ती. त्यामुळं तमाम तारकादळं साक्षात जमिनीवर. "समजलास काय मला,' अशा आवेशानं स्वप्नांच्या विक्रेत्याला जमिनीवर आणण्यासाठी "किंग'ही सज्ज. अख्ख्या चित्रपटसृष्टीचाच "बाप' मानल्या जाणाऱ्यालाही मग सस्नेह निमंत्रण. "बापा'ची "शहजाद्या'सह हजेरी. अशी ही सगळी सरबराई.

चित्रपटसृष्टीतले "बाप', "पिते', पोरं, घरच्या सुना-बहिणी, ज्यांच्यासाठी ही खटपट करताहेत, ते खरे या सगळ्यांचे "बाप' असलेले प्रेक्षक कोणाच्या पारड्यात पसंतीचं माप टाकतात, हे कळायला वेळ लागेल.
-----------