May 28, 2010

बर्थ डे गिफ्ट!

तब्बल 18 दिवसांची सुटी उपभोगून काल कामावर पुन्हा (अरेरे!) रुजू झालो.

लिहिण्यासारखं गेल्या काही दिवसांत बरंच होतं. पण मुहूर्त लागत नव्हता. सुटीच्या काळात मी आणि मनस्वी मुंबईला फिरून आलो, परवाच रत्नागिरीलाही दोघं गेलो होतो. मध्ये आम्ही सहकुटुंब अलिबागला जाऊन आलो. लिहायला सुचत होतं, पण वेळ काही जमत नव्हती. मांडी ठोकून बसून लिहावंसं वाटत नव्हतं. काल मांडीवर घ्यायचं एक नवं आधुनिक खेळणं बायकोनं चक्क प्रेझेंट दिलं आणि ब्लॉग लिहिण्यासाठी मांडी ठोकून बसावंच लागलं.

वाढदिवसाला काही गिफ्ट मिळालं नाही, म्हणून थोडासा आश्‍चर्यचकित झालो होतो. गेला बाजार एखादा शर्ट तरी मिळेल, असं वाटलं होतं. पण निराशा पदरी पडली. मध्ये मनस्वी आणि हर्षदाला काहीतरी खुसपूस करताना ऐकलं होतं. "बाबांना एवढ्यात सांगू नको,' असंही हर्षदा मनस्वीला दटावत होती. पण त्याचं रूपांतर वाढदिवसाच्या सरप्राइज गिफ्टमध्ये झालं नव्हतं. बहुधा काहितरी फिस्कटलं असावं. त्यामुळं नंतर मी वाट पाहणं सोडून दिलं.

रत्नागिरीला फिरून आलो आणि काल कामावर रुजू झालो. "रात्री लवकर घरी या' असा हर्षदाचा निरोप पाहूनही फारसं आश्‍चर्य वाटलं नव्हतं. चार दिवसांनी घरी आल्याबद्दल घरावर गुढ्यातोरणं, पाटरांगोळी असण्याचीही शक्‍यता नव्हती. काहितरी सरप्राइज मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. पण मला वाटलं, असेल काहितरी किरकोळ गोडधोडाचा पदार्थ वगैरे. घरी जायला साडेनऊ वाजलेच. मग हर्षदानं मनस्वीच्या पद्धतीनं मला डोळे मिटून हात पुढे करायला लावून हातावर एक काळी बॅग ठेवली. लॅपटॉप!!

मी उडालोच! जवळपास हार्ट ऍटॅक येण्याचाच बाकी होता.

वाढदिवसाला गिफ्ट म्हणून लॅपटॉप? तोही चक्क बायकोकडून? काहीही चर्चा न करता, न सांगता, न कल्पना देता?
लॅपटॉप घ्यायचा का, असा विषय काही दिवसांपूर्वी झाला होता आणि "सध्या आपली आर्थिक लायकी नाही,' असं म्हणून तो संपविलाही होता. पुढे एक दोन वर्षांनी कधीतरी घेऊ, असंही आमचं बोलणं झालं होतं. त्यामुळेच नुकताच आठच दिवसांपूर्वी चांगला "सॅमसंग' 22 इंची मॉनिटरही खरेदी करून आलो होतो. तेव्हा लॅपटॉप वगैरे घेण्याचं काही तिच्या मनात घोळत असेल, याची सुतराम शक्‍यता नव्हती. असती, तर काहितरी कारण काढून मी एलसीडी मॉनिटरचा बेत रद्द केला असता!!

असो. एवढं धक्कादायक गिफ्ट बघून मला तर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच सुचेना. आनंद तर झालाच, पण एवढे पैसे हिनं आणले कुठून, अशी शंका त्याआधी मनात आली. घरातली एखादी वस्तू तर काढून विकली नाही ना, असा संशय आला. पण बहुतेकशा वस्तू जागच्या जागी होत्या. (झोपेत माझा एखादा अवयव काढून विकण्याएवढीही माझी झोप दांडगी नव्हती!) किमतीच्या आणि खर्चाच्या हिशेबात मी लॅपटॉप गिफ्ट मिळाल्याचा आनंद गमावतो आहे याची जाणीव झाल्यानंतर हर्षदानं मला सावरलं. "गिफ्ट मिळाल्याच्या आनंदापेक्षा दुःख जास्त करून घेऊ नकोस,' असं सांगून धीरही दिला. मीही मग तिच्या आणि मनस्वीच्या आनंदात सामील झालो. (मी हे गिफ्ट उघडून पाहण्याआधी मनस्वीचे त्यावर पत्तेही खेळून झाले होते!)

तर, अखेर मांडीवर खेळवायची आणखी एक गोष्ट आमच्या घरी दाखल झाली! आता मांडी ठोकून काम करावं आणि संसारोपयोगी काहितरी करावं, अशी तिची अपेक्षा असणार, नक्कीच! बघूया, कसं काय जमतंय ते!!

8 comments:

सागर said...

अर्ई वाह...वाढदिवसाच्या (उशिरा) शुभेच्छा...
आता येवू द्यात भरपूर पोस्ट...ब्लोग आवडला....

Mahendra said...

अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा.:)

Pankaj - भटकंती Unlimited said...

अश्शी बायको सगळ्यांना मिळो. मी लॅपटॉप नाही पण फुल फ्रेम कॅमेरा घ्यायला हवा असे हळूच म्हणेल तिला. आणि नंतर बजेट नाही म्हणून खंतावूनही दाखवेल :-)

गजानन said...

मस्त लिहीलयं... मला सुदधा माझ्या बायकोनी असचं तिच्या सेव्हिंग मधुन एक महागडं (आणि माझ आवडतं :) ) गिफ्ट दिलं... कौतुकाने तिच्याकडे बघत राहण्याशिवाय मी काहीच करु शकलो नाही...

अनिकेत said...

नशिब काढलसं मित्रा. अलिबागच्या हवेत काही आहे की काय? मी पण जाऊन येईन म्हणतो एकदा. एरवी माझ्याच पैश्याने कुठलीही ’मला’ हवी असणारी गोष्ट सुध्दा घेण्याचे प्लॅन्स बायकोने फिसकटवले आहेत argh!!!!

tanvi said...

अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा.:)

Mandar Kulkarni said...

Majja aahe baba.......!!!

Ketaki Abhyankar said...

अरे वा, नशिबवान आहात तुम्ही! मला सांगाव लागत माझ्या नवर्‍याला की मला ही ही वस्तू दे "सर्प्राइज़ गिफ्ट" म्हणून :)