कदा भास झाला होता. पण मी रोज नेमानं (माझ्याच) घरी जातो. त्यात काही विसरायला होत नाही. त्यामुळं ती शक्यता मावळली. "गजनी' पाहिल्यावर असं कळलं, आपला पण "गजनी' झाला असावा. (तसंही, "लहानपणी डोक्यावर पडला होतास काय,' ही प्रशंसा जागोजागी ऐकावी लागतेच!) या "गजनी'पणाचे किस्से अनेक आहेत. एकदा-दोनदा भेटलेली माणसं, त्यांचे चेहरे, नावं, महत्त्वाचे निरोप, संदेश हे तर हमखास विसरले जातातच. बायकोनं सांगितलेले निरोपही जेव्हा मी विसरतो, केव्हा "माझं लक्षच नव्हतं,' असं उत्तर देतो, तेव्हा मात्र माझी काही खैर नसते. पूर्वी अतिप्रिय आणि तोंडपाठ असलेली चित्रपटांची, संगीतकारांची, कलाकारांची नावंही मी हल्ली धडाधड विसरतो. "अर्रर्र...जिभेवर आहे अगदी नाव!' असं अनेकदा होतं. अंथरुणात लोळत पडलेलं असताना सुचलेली ग्राफिटीही तासाभरानंतर आठवू म्हणता आठवत नाही!त्यामुळं कुठल्या तरी कार्यक्रमात किंवा अनेक वर्षांपूर्वी कुठल्या ट्रेकला किंवा संस्थेत भेटलेली व्यक्ती पुन्हा भेटल्यावर "काय, ओळखलं का?' असं विचारते, तेव्हा माझा चेहरा पाहण्यासारखा होतो. मग काहितरी विषय काढून, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्या माणसाची पार्श्वभूमी जाणून घ्यायचा प्रयत्न मी करतो. म्हणजे, ही व्यक्ती रत्नागिरीची, पुण्याची का अन्य कुठल्या ओळखीची आहे, याचा आधी अंदाज घ्यायचा. मग त्यातून "कसं काय चाललंय,' "नवीन काय' वगैरे निरर्थक, पण सूचक प्रश्न विचारून साधारणपणे काही सुगावा लागतो का, हे पाहायचं. अगदीच नाही जमलं, तर मग थेट सांगून टाकायचं - "नाही बुवा ओळखलं!' ओळखल्यावरही, नाव माझ्या लक्षात नसतं, ते वेगळंच! विसरभोळेपणाचा किस्सा आजच मुद्दाम सांगण्याजोगं कारणही तसंच घडलं. दुपारी घरी आलो आणि "जेवताना काही पातळ पदार्थ नाही,' म्हणून बायकोचा(मनातल्या मनात) यथेच्छ उद्धार केला. मग ताक दिसल्यावर स्वतःच कढी करायचं ठरवलं. छान फोडणी वगैरे करून, मिरच्या, कढीलिंब, कोथिंबिर वगैरे घालून कढी केली. जरा जास्त गरम करावी म्हणून गॅसची आच वाढवली आणि घात झाला! चोथा आणि पाणी वेगवेगळं झालं. दोघांचा समेट काही होईना. सगळं मिश्रण तसंच्या तसं फेकून द्यायचं जिवावर आलं. निदान कोथिंबिर, कढीलिंब तरी वाचवू, म्हणून तेवढाच अलगद काढून घेतला. नव्यानं फोडणी करून, त्यात तो घातला. पण हे प्रकरण काही जमणार नाही आणि ताक पुन्हा फुकट जाईल, एवढं पूर्वानुभवानं कळलं. इकडे मनस्वीचं "बाबा, तुम्हाला किती वेळीा सांगितलं, कढी करू नका म्हणून! मला आवडत नाही!!' हे टुमणं सुरूच होतं. पुन्हा ते मिश्रण थेट फेकून दिलं आणि पातेलं धुवून तिसऱ्यांदा फोडणी केली. या वेळेला मात्र जरा काळजी घेऊनच गरम केली. बरी झाली. भात वगैरे खाऊन झाला, वामकुक्षीही झाली आणि संध्याकाळी बायको आल्यावर कढीची पाककृती विचारून घेतली. (दुपारीच विचारली असती, तर "इगो' दुखावला गेला असता ना!) "कढीच्या ताकात डाळीचं पीठ मिसळायचं असतं.' (एवढीही अक्कल नाही का तुला?) असं तिनं नम्रपणे सांगितलं. तेलाऐवजी तुपाची फोडणी असते, अशी ज्ञानात नवी भरही घातली. सगळ्यात कहर त्यानंतरचा होता. तिनं कालच करून ठेवलेलं टॉमेटोचं सार शिल्लक होतं. मी ते पाहिलंही होतं आणि भातावर घेण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवलं होतं. थेट भातावर घेऊ, म्हणून तिथे तसंच ठेवलं होतं. आणि त्याच्या शेजारीच उभं राहून, "काहितरी पातळ पदार्थ करायला काय होतं हिला!' अशी निंदानालस्ती करीत कढीचे प्रयोग केले होते!! दुपारी चार वाजता हे लक्षात आल्यावर मी कपाळावर हात मारून घेतला. बायकोकडून उद्धार झाला, तो वेगळाच!!- हा किस्सा विसरण्याआधी लिहून टाकावा म्हटलं. म्हणूनच ही घाईघाईतली पोस्ट!
आमचा पण `गजनी'