Aug 15, 2009

पारतंत्र्यदिन!

mask
(खालील लेख हा आठ दिवस सर्व मनोरंजन बंद असल्याने भोगाव्या लागलेल्या मनस्तापाचा झालेला उद्रेक आहे. त्यातून "स्वाइन फ्लू'सारख्या जीवघेण्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची भावना झाल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा!)
----
पारतंत्र्यदिन!

छ्या! वैताग आलाय नुसता!
कुठे जाणं नाही, येणं नाही. नुसतं घर एके घर नि ऑफिस एके ऑफिस. पिक्‍चर नाही, नाटक नाही, चौफुला नाही की डान्स बार नाही!
आयचा घो या एच1एन1च्या!
गेल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती बरी होती. म्हणजे हा जो कुणी प्राणघातक विषाणू आहे, त्याच्या झळा जाणवत नव्हत्या. गेल्याच शनिवारी थेटरात जाऊन पिक्‍चर पाहिला होता. त्याच्या आदल्या दिवशी मुंबईला जाऊन आलो नव्हतो. फडकी नि मास्क लावून फिरायची फॅशन तोपर्यंत आली नव्हती. शनिवारी रात्री पुण्यात आणखी एकाचा घास त्या रोगानं घेतला आणि लोक बिथरले.
सोमवारी ऑफिसात आलो, तर निम्मे लोकं फडकी लावलेले! बोलतानाही ती काढण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. (पुण्यात इतर वेळीही दहशतवाद्यांसारखी तोंडं झाकून फिरणाऱ्या मुलींनी "बघा, आमच्या नावानं बोटं मोडत होतात ना!' असे टोमणे मारून घेतले म्हणे!) मलाही लाजेकाजेस्तो दुसऱ्या दिवसापासून रुमाल लावून फिरणं नशीबी आलं. मनस्वीच्या (कन्या!) शाळेला आठ दिवस सुटी असल्याचं रविवारीच कळलं होतं. सोमवारी पालकमंत्र्यांनी सगळ्याच शाळा, थेटरं बंद करून टाकली. बसा बोंबलत!
मुघलांना जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे, तसे मला ते एच1एन1 जागोजागी अदृश्‍य स्वरूपात दिसू लागलेत. एखाद्या अभयारण्यात पायी फिरताना कुठेही वाघबिघ असेल की काय, अशी भीती जशी वाटते ना, तसंच हल्ली बाहेर पडताना कुठे हा मेला विषाणू तरंगत असेल नि कधी आपल्या नाकातोंडातून शरीरात बसकण मारेल, अशीच दहशत जाणवते.
मास्कची विक्री दुप्पट, तिप्पट, दसपट, शेकडो पटीनं वाढली. दुकानदारांनीही त्यासाठी भरभरून सहकार्य केलं. (सदाशिव पेठेतल्या एका दुकानदारानं तर चक्क दुपारी एक वाजून तीन सेकंदांनी आलेल्या एका गिऱ्हाइकालाही तातडीने मास्क दिला म्हणतात!) मास्क कसा वापरावा, यावरून सरकारनं, प्रशासनानं, डॉक्‍टरांनी आणि स्वयंघोषित तज्ज्ञांनी मनसोक्त गोंधळ घातला. कुणी त्या डुकराच्या तोंडाचे मास्क वापरायला सांगितले. कुणी म्हणाले, ते नको, साधे सुद्धा चालतील. कुणी सांगितलं, मास्क नको...फक्त स्वच्छ धुतलेले रुमाल बांधा! ("स्वच्छ धुतलेले' ही अट फारच जाचक होती, ही गोष्ट अलाहिदा!) ते भारीतले (एन 95) मास्क म्हणे स्वाइन फ्लू झालेल्या पेशंटच्या आसपास वावरतानाच घालायचे. आता रिक्षात, बशीत, टमटमीत, बाजारात, दुकानात, ऑफिसात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आसपास आहे की नाही, कसं ओळखायचं? मनोरुग्ण वगैरे वागण्यावरून ओळखू शकतो हो, स्वाइन फ्लूचा रुग्ण कसा ओळखायचा? बरं, शिंकतोय-खोकतोय म्हटलं, तरी ते आपण बारा महिने करत असतो! "स्वाइन फ्लू'त म्हणे घसा खवखवतो. ते शेजारच्या माणसाला कसं कळणार?
साधे मास्क घेतले, तर ते म्हणे दोन-तीन दिवसच वापरायचे. नंतर योग्य रीत्या त्यांची विल्हेवाट लावायची. (खरं तर मास्कबाबत अशी गोंधळ वाढवणारी माहिती देणाऱ्यांचीच विल्हेवाट लावायला हवी. पण ते "स्वाइन फ्लू' गेल्यानंतर बघू!) "योग्य रीत्या विल्हेवाट' हा अगदी पुणेरी फसवेपणा बरं का! ते मास्क एकतर जाळून टाकायचे, किंवा जमिनीत पुरायचे. आता मला सांगा, कुठला माणूस घरातून खाली उतरून ते मास्क जाळून किंवा पुरून टाकणार आहे?
रुमालांचीही एक गंमतच आहे बरं का! नाका-तोंडात विषाणू जाऊ नये, म्हणून रुमाल बाळगायचा. पण रुमाल मात्र घरी जाऊन स्वच्छ धुवायचा. आता तीन ते आठ तास हवेत स्वतंत्रपणे जिवंत राहू शकणारा हा विषाणू रुमालावर बसलेला असेल, तर तो घरात जाऊन रुमाल धुवायला टाकेपर्यंत दुसरीकडे कुठेतरी दडून नाही का बसू शकत? आणि नंतर आपण झोपल्यावर, जेवताना, लोळताना नाही का आपला डाव साधू शकत?
गेल्या आठवड्यात त्या विषाणूनं दहा-बारा बळी घेतल्यानंतर लोक जामच घाबरले. जिवाचाच प्रश्‍न आला, तेव्हा बाहेरही पडायचे बंद झाले. कुणी सांगितलं, निलगिरी हा बेस्ट उपाय! लगेच सगळे बेशुद्ध पडेपर्यंत ती निलगिरीच हुंगायला लागले. दुकानांतली निलगिरीच संपून गेली!
"स्वाइन फ्लू'नं जे बळी घेतले, त्यात नात्यांचा-आपुलकीचा घेतलेला बळी सर्वांत क्‍लेशकारक आणि धक्कादायक होता. जिवाला घाबरून लोक आपल्या जवळच्या व्यक्तींनाही विचारेनासे होण्याएवढे स्वार्थी झाल्याच्या बातम्या मन विदीर्ण करून गेल्या.
असो. यंदाचा स्वातंत्र्यदिन पारतंत्र्यात गेला असला, तरी गणपती सुरळीत पार पडतील आणि तोपर्यंत या राक्षसाचा आपण नायनाट करू, ही आशा!!
--