Jul 21, 2008

खल्लास!


(20 जून) "ड्यूक्‍स नोज'ला (नागफणी) गेलो होतो. बऱ्याच महिन्यांनी केलेला ट्रेक!
यंदा अजून पाऊसच नसल्यानं कुठेही जायचा उत्साह नव्हता. तोरण्याला जायचा विचार पावसाअभावी अगदी ऐनवेळी रद्द केला होता. पण ड्यूक्‍स नोजला जायचंच, असं पक्कं ठरवलं होतं. एकतर मी गेल्या सात-आठ वर्षांत "गिरीदर्शन'बरोबर हा ट्रेक एका वर्षाचा अपवाद वगळता कधीही चुकवलेला नाही. त्यातून मला तो भयंकर आवडतो. तुफानी वारा, तंगडतोड करणारी पायवाट आणि भन्नाट धबधबा! बास! आणखी कुठलं आकर्षण हवं?
जाताना अजिबात पाऊस नव्हता. उन्हाळ्यात "ड्यूक्‍स नोज' कशाला काढला, असा विनोदही (?) मी निघताना केला. पण नंतर खंडाळ्यात पोचलो आणि धुक्‍याचं दर्शन झालं. म्हटलं, चला, फेरी अगदीच वाया नाही गेली!
डोंगरावर चढायला सुरुवात करतानाचेच दोन मोठे ओहोळ अगदी छोट्या झऱ्यासारखे वाटत होते. वाटलं, धबधब्याच्या ऐवजीही आता फक्त छोटा झराच पाहायला मिळणार! जाताना वाटेत दोन-तीन ठिकाणी निसरडी होणारी वाट अगदी कोरडी ठणठणीत होती. त्यामुळे कोणाच्या पडण्याचा आनंद घेता आला नाही आणि आधार देण्याचाही! पण पुढे आल्यावर धबधब्याच्या पाण्याचा थोडाथोडा आवाज आला. म्हणजे, अजून जीव आहे तर!
धबधब्याच्या पाशी पोचलो, तेव्हा विश्‍वासच बसला नाही स्वतःच्या डोळ्यावर! चक्क भिजण्याएवढं पाणी होतं! एकेकाळी धारेत उभंही राहता न येण्याची मजा अनुभवली होती, म्हटलं, हादेखील अनुभव घेऊ! अर्थातच यथेच्छ भिजण्यापासून लोकांच्या अंगावर पाणी उडवणे, मधल्या डोहात "गणपती बाप्पा मोरया' करण्यापासून सगळा आनंद घेतला. नंतरची वाट काही फारशी अवघड गेली नाही. पण मुंबईचे कुणी कॉलेज युवक-युवती दोर बिर लावून किरकोळ पायवाट चढत होते, त्यामुळं झकास मनोरंजन आणि खोळंबाही झाला. नागफणीवर पोचल्यानंतर सुमारे तास दीड तास नुसतंच थांबून वाट पाहावी लागली. तिथे मस्त पाऊस आला आणि पुन्हा चिंब भिजलो.
वर काही ओळख परेड वगैरे झाली नाही. मी डबा आणला नव्हताच, त्यामुळे बाकीच्यांच्या डब्यावर आडवा हात मारला. आणखी कुणी आंग्लाळलेले एक-दोन ग्रुप आले होते. काही शाळेची मुलंही होती. उतरताना नेहमीची घसरगुंडीची मजा आली. काही जण झकास पडलेही. पण डोंगरपायथ्याला सुरू असलेलं एका रस्त्याचं काम पाहून मन खट्टू झालं. आता ड्यूक्‍स नोजला पूर्वीची मजा येणार की नाही, असं वाटत राहिलं.
घरी लवकर पोचायचा गृहमंत्र्यांचा आदेश असल्यानं उगाच हात दाखवून अवलक्षण नको, म्हणून जीपनंच लोणावळ्यात आलो आणि तिथून लोकल पकडून पुण्यात. साडेसहाला मला घरी पाहून सौभाग्यवतींचा चेहरा उजळला. नंतर त्यांना महागड्या हॉटेलात जेवण घालावं लागलं, ही गोष्ट वेगळी!
एकूण धमाल आली. मुळात, मी अजूनही ट्रेक करू शकतो आणि त्यात पूर्वीची धमालही करू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला! आपला विनोदाचा दर्जाही अगदीच घसरला नाहीये आणि उमदा स्वभावही (डोंबल!) कायम आहे, हेही लक्षात आलं. असो. ढाक-भैरीही जमल्यास करू!
हां, पण पायाचे तुकडे मात्र पडले. नागफणी पायथा ते लोणावळा ही पाच किलोमीटर पायपीट न करताही! ती केली असती, तर काय झालं असतं कुणास ठाऊक! पुन्हा एकदा व्यायाम सुरू करण्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा!!
-----------
http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/DukeSNoseKhallasTrek