निषेध! त्रिवार निषेध!!
"देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नव्हे, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटाला आहे। एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे...
"इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्यूँ? ये देश मेरा है। क्या मुझे कहीं भी रहने का हक नहीं?'असा तेजतर्रार, बाणेदार, हृदयाचा ठाव घेणारा जळजळीत डायलॉग आतापर्यंत ऐकला होता कधी? "जब तक बैठने के लिए न कहा जाए, शराफत से खडे रहो...ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं' किंवा "ये ढाई किलो का हाथ किसीपे पडता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है,' म्हणणारे तुमचे अँग्री यंग किंवा ओल्ड मॅन पाचोळ्यासारखे उडून जातील या संवादफेकीपुढे
तरुणाईचा, राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा धगधगता अंगार आपल्या संवादांतून, देहबोलीतून ओकणाऱ्या या नव्या अभिनयसम्राटाचं नाव कमाल खान!हा कमाल खान कोण बुवा, असा कुत्सित, बाष्कळ प्रश्न तुम्ही विचारणार असाल, तर तुमच्या अकलेची, सारासार विवेकबुद्धीची आणि सामान्यज्ञानाची कीवच करायला हवी.
`देशद्रोही' नावाचा राष्ट्रभक्तीचा ज्वलंत हुंकार गेला महिनाभर विविध वाहिन्यांवरील जाहिरातींच्या माध्यमातून देश पेटवतो आहे. (ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय!)"देशद्रोही'चा नायक-निर्माता (आणि कदाचित कथा-पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शकही!) कमाल खान याच्या तोंडून हा डायलॉग एखाद्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडतो आणि तमाम प्रस्थापित अभिनयसम्राटांच्या छाताडावर थयथया नाचतो! बहुधा, या प्रस्थापित अभिनयसम्राटांना या नव्या उद्रेकाचे हादरे जाणवू लागले होते, म्हणून जुलमी, निष्ठुर व्यवस्थेशी संगनमत करून त्यांनी चित्रपटावर बंदी घातली. कमाल खान या उमलत्या कळीची (किंवा कळ्याची म्हणा हवं तर!) फुलण्याची स्वप्नंच खुडून टाकली.एक वास्तव पडद्यावर साकार होण्याआधीच पडद्याआड गेलं।
आता कायदेशीर लढाई लढली जाईल. तमाम अन्यायग्रस्तांचे वाली, दीनदुबळ्यांचे आशास्थान आणि सर्व न-अभिनेत्यांचे प्रेरणास्थान मा. महेश भट यांची साथ असल्यामुळे कुठल्या कुठल्या परिसंवादांतून, मुलाखतींतून या अन्यायाला तोंड फोडलं जाईल. न्याय मिळेल...न मिळेल।
कदाचित, कमाल खान वेगळ्या नावानं, पण हीच "श्टोरी' वापरून हाच चित्रपट पुन्हा काढेल. पण तरीही, "देशद्रोही'वरील बंदी उठली नाही, तर त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेला, अभिनयाला प्रेक्षक नक्कीच मुकतील.
अवांतर : महेश भट यांच्या आगामी चित्रपटाचा विषय "देशद्रोही'वरील बंदीनाट्य हाच आहे म्हणे!