"सार्वजनिक काका' अशा नावाचा एक पुरस्कार पुण्यात दिला जातो. सार्वजनिक कार्यात अग्रेसर असलेल्या लोकांसाठी हा पुरस्कार असावा. आमच्याशी संबंधित दोन काकांनी मात्र त्यांच्या "सार्वजनिक' वागण्याने अलीकडच्या काळात उच्छाद मांडला.
गेल्या वर्षीपर्यंत मला वेळ असल्यानं मनस्वीला सकाळी शाळेत आणि दुपारी बाल भवनला सोडण्याची जबाबदारी मीच खांद्यावर (आणि कडेवर) घेतली होती. या वर्षी मात्र निमिषचं आमच्या घरात आगमन झाल्यापासून आणि मनुच्या शाळेची वेळ बदलल्यापासून तिच्या शाळेच्या वेळांच्या बंधनात अडकायला नको वाटू लागलं. मनुची शाळा यंदा सकाळी 7.20 ची झाली. त्यामुळं सहाला उठणं, तिला आवरून वेळेत तयार करणं आणि काकांच्या व्हॅनसाठी सातच्या आधी सोडणं, असा दिनक्रम झाला. महिनाभरच झाला शाळा सुरू होऊन आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. एके दिवशी मात्र मनस्वी दुपारी घरी आली, ती हिरमुसल्या चेहऱ्यानं. तिला शाळेत उशीर झाल्यामुळं शिक्षा झाली होती. मैदानात उभं राहायला आणि उठाबशा काढायला लावलं होतं.
सकाळी ती वेळेत खाली उतरली, पण काका आले, तेव्हा त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर होतं. त्यांनी तशाच अवस्थेत मुलांना गोळा करून वाटेत दुसऱ्या गाडीत मुलं सोडली आणि त्यांच्या मार्फत ती शाळेत पोचली, तेव्हा थोडासा उशीर झाला होता. अशा कारणासाठी पाच-दहा मिनिटं उशीर झाल्यानंतरही मुलांना शिक्षा झाल्याचं कळल्यावर माझं डोकंच फिरलं.
दुसऱ्याच दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना तीव्र नाराजी व्यक्त करणारं पत्र दिलं. त्यांनी त्याची दखल घेतली, पण फारसा फरक पडला नव्हता त्यांना. वर उठाबशा म्हणजे मुलांसाठी व्यायामच असतो, असंही ऐकावं लागलं.
या काकांनी दुसऱ्या काकांकडे मुलं सोपविताना शाळेपर्यंत व्यवस्थित निरोप पोचविण्याची व्यवस्था तातडीने करायला हवी होती. ती त्यांनी न केल्यामुळे या मुलांना नाहक शिक्षा झाली.
दुसऱ्या काकांची वेगळीच तऱ्हा.
मनस्वी बाल भवनला अधून मधून दांड्या मारतेच. कधी पाऊस, कधी कुठलं काम, कधी कार्यक्रम यामुळे ती जाऊ शकत नाही. दर वेळी ती एक-दोन दिवस गेली नाही, की तिसऱ्या दिवशी तिच्या काकांना फोन करून ती येणार असल्याचं कळवायला लागायचं. त्यातून हल्ली साडेचारच्या बाल भवनसाठी तिची रिक्षा खूप लवकर, म्हणजे पावणेचारलाच येते, म्हणून आम्ही जाताना तिला स्वतःच सोडायचं ठरवलं होतं. तरीही काकांना पैसे दोन वेळचेच देत होतो.
मध्यंतरी एक-दोनदा काकांना फोनवरून न कळवल्यामुळं ते मनस्वीला घेऊनच आले नाहीत. मग उगाच धावतपळत तिला आणायला पुन्हा जावं लागलं. दरवेळी त्यांचं कारण ठरलेलं असायचं - ती कुठेतरी खेळत होती, बाईंनी मला सांगितलंच नाही, काका काही बोललेच नाहीत..वगैरे वगैरे.
आज पुन्हा ते तिला तिथेच ठेवून निघून गेले, तेव्हा या संतापानं टोकच गाठलं. मनस्वी ताईंबरोबर घरी आली. मी फोनवरून त्यांना झापलं. पण तरीही ते ढिम्म होते. आजही त्यांची कारणं तयार होती. मी रिक्षा बंद करून टाकली, तरी त्यांना फारसा काही फरक पडलेला नव्हता.
आता मनस्वीला दुसरी व्हॅन शोधायचेच. पण स्वतः करीत असलेल्या कामावर विश्वास असलेले काका कुठे मिळतील?