Mar 25, 2011

गेले यायचे राहुनी...

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काळात तीन-एक आठवडे सिनेमा थिएटर ओस पडली होती. प्रेक्षक टीव्हीसमोरच ठिय्या देऊन बसतील आणि थिएटरकडे फिरकणारही नाहीत, असा कयास बांधून निर्मात्यांनी मोठे चित्रपट लावायचे टाळले; पण जरा डोकं चालवलं असतं, तर चालू घडामोडींवरचे वेगवेगळे आणि आकर्षक चित्रपट आले असते आणि सहज "ब्लॉकबस्टर' ठरले असते. एक झलक...
...
फस गये रे ओबामा!
प्रमुख भूमिका ः बराक ओबामा, मुअम्मर गडाफी, होस्नी मुबारक, सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन आणि पाहुणे कलाकार म्हणून याच जातकुळीतले अनंत हुकूमशहा.

अमेरिकेने गल्लोगल्ली, गावोगावी, शहरोशहरी आणि देशोदेशी पोसलेल्या हुकूमशहांच्या इतिहासापासून कथा सुरू होते. मग हेच हुकूमशहा भस्मासूर बनून अमेरिकेवर कसे उलटतात, मग अमेरिकेचे हितशत्रू अमेरिकेला कसे उलटे करतात आणि आपणच त्यांना हुसकावल्याचा उलटा कांगावा करण्याची वेळ अमेरिकेवर कशी येते, अशा घटनांमधून ही कथा रंगत जाते. इजिप्तच्या ताज्या संदर्भामुळे ही कथा अधिक जिवंत आणि वास्तववादी ठरू शकेल. लीबियाचे हुकूमशहा गडाफी आधी घाबरल्याचं नाटक करून नंतर अमेरिकेलाच तोंडघशी पाडतात आणि ओबामांना इतर देशांना भरीला घालून हल्ले सुरू करण्याची वेळ येते, या टप्प्यावर शेवट होतो.
...
(फिर) तेरे बिन लादेन...
प्रमुख भूमिका ः ओसामा, ओबामा, जॉर्ज बुश.
चित्रपटाची पार्श्‍वभूमी "फस गये रे...'सारखीच. फक्त अफगाणिस्तानची पार्श्‍वभूमी हा "यूएसपी' ठरू शकेल. जॉर्ज बुश यांच्या बालपणापासून चित्रपट सुरू होतो. लहानगा जॉर्ज "लंडन लंडन'ऐवजी "लादेन लादेन', "रंग रंग कोणता'ऐवजी "लादेन लादेन कोणता', "खांब खांब खांबोळी'च्या ऐवजी "इराक-अफगाणिस्तान लांबोळी', असे खेळ खेळत असतो. लहानपणीच्या जॉर्जच्या भूमिकेत तेवढ्याच बालिशपणासह स्वतः जॉर्ज बुश बेमालूम अभिनय करतात. बुश आणि अमेरिका शेवटपर्यंत लादेनचा शोध घेत राहतात; पण तो त्यांच्या हाती लागत नाही. शेवटी "तेरे बिन लादेन'मध्ये लादेनची भूमिका करणारा कलाकारच त्यांच्या हाती लागतो, असा उत्कंठावर्धक क्‍लायमॅक्‍स. बुश यांची सद्दी संपल्यानंतर ओबामा पुन्हा लादेनच्या शोधावर निघतात, असं "कॅची' दृश्‍य दाखविल्यानं चित्रपटाच्या "सिक्वल'ची ("एक बार फिर' तेरे बिन लादेन) उत्कंठाही टिकून राहते.
...
सिंग इज किंग! (पार्ट 2)
प्रमुख भूमिका ः मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज.
एका दाट जंगलात बोधिवृक्षाखाली मनमोहनसिंग तपश्‍चर्या करीत बसले आहेत. समष्टीपासून दूर जाऊन मनःशांतीचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अचानक सोनिया गांधींचा फोन येतो. मनमोहनसिंगांना पंतप्रधान केल्याचं सांगितलं जातं. मनमोहनसिंग भगवे कपडे बदलून पांढरे कॉंग्रेसवादी कपडे परिधान करून विमानातून थेट राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर अवतीर्ण होतात. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर उभी केल्यासारखी त्यांची खुर्ची सतत डळमळीत राहते. अचानक तिची "डावी' बाजू कलते. मग "उजवी'कडून खुर्ची उलटविण्याचा जोरदार प्रयत्न होतो. तरीही ती स्थिर राहते. कुणीकुणी कुजके, मोडके टेकू आणून खुर्चीला लावतं. त्यामुळं खुर्ची डळमळीत राहते. त्यावर बसलेले मनमोहनसिंग मात्र निश्‍चल, निस्तब्ध, स्थितप्रज्ञ दिसतात. पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेऊन पुन्हा जागेवर येते, तरीही खुर्चीला काही होत नाही. मध्येच अवकाशातून अणुकरार, राष्ट्रकुल, "आदर्श', "विकिलिक्‍स' अशा वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचे वार होत राहतात. तरीही ते जागचे हलत नाहीत...
या चित्रपटाचा "यूएसपी' असा, की पाच वर्षांच्या काळात घडणारी कथा संथ, उत्कंठाहीन असली आणि नायक अगदीच "भारत भूषण' असला, तरी प्रेक्षक पुन्हा पाच वर्षांचा काळ बघण्यासाठी तिकीट काढून कौल देतात!
...
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा

प्रमुख भूमिका ः विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, इत्यादी.
फिरत्या रंगमंचावर हा चित्रपट घडतो. प्रत्येक हिरो येऊन आपली भूमिका चांगल्या प्रकारे वठवण्याचा प्रयत्न करतो. मध्येच विंगेकडे बघत राहतो. प्रॉंप्टरच्या इशाऱ्याचा वेध घेत राहतो. "नेक्‍स्ट' असं करून ओरडल्याचा एका बाईचा आवाज पडद्यामागून ऐकू येतो. की लगेच स्क्रीनवर असलेला हिरो आपलं चंबूगबाळ आवरून प्रेक्षकांचा रामराम घेतो. गंमत म्हणजे, पडद्यावर असेपर्यंत अगदी "लार्जर दॅन लाइफ' असणारा हा हिरो त्याची भूमिका संपल्यानंतर अगदीच केविलवाणा दिसू लागतो. रंगमंचाच्या कोपऱ्यावर, आडोशाला उभे असलेले काही सहायक अभिनेते मध्येच विंगेत जाऊन ऑर्डर सोडणाऱ्या त्या बाईंना काहीबाही सांगताना दिसतात. हिरोच्या कपाळावर चिंतांचं जाळं पसरतं. तो विंगेकडे बघूनच "नेक्‍स्ट'ची आज्ञा कानी पडण्याची वाट बघत चंबूगबाळं आवरायला घेतो. पुढे काही घडणार, अशी उत्सुकता असतानाच "दी एन्ड'ची पाटी झळकते...