Sep 7, 2009

गोष्टी योगायोगाच्या

रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!'
मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती. मग आम्ही आसपासच्या परिसरात टाइमपाससाठी हिंडत होतो. त्यातच एक आंब्याचं झाड मिळालं. भरपूर कैऱ्या लागल्या होत्या. दगडांना तोटा नव्हताच. वेळही घालवायचा होता. मग कैऱ्या पाडत बसलो. तसल्या आंबटचिंबट कैऱ्या खाल्ल्याही. (लग्न झालं असलं, तरी आंबट-चिंबट खावं लागण्याची वेळ तोपर्यंत आली नव्हती. कृपया गैरसमज नको!)
नशीबावर फारसा विश्‍वास नाही आपला, पण योगायोगावर मात्र भयंकर आहे! योग असेल, तर कुठलाही माणूस कुठेही भेटू शकतो, असे अनेक अनुभव आलेत. प्रवासात त्याच ठिकाणी थांबण्याचा योग हा त्यातलाच एक.
पूर्वी एकदा मुंबईला काही कामानिमित्त गेलो होतो. संध्याकाळी लगेच परतणार असल्यानं मामा किंवा आत्या कुणाच्या घरी गेलो नव्हतो, वा फोनही केला नव्हता. बोरिवली स्टेशनवर उतरलो आणि जिना चढताना नेमकी मामेबहीण पुढ्यात! भरपूर शिव्या खाव्या लागल्या मग. आई-वडिलांना सांगण्याची धमकीही दिली. मला जाणं शक्‍य नव्हतं, म्हणून कुणाला कळवलं नव्हतं. पण ही दत्त म्हणून हजर! मुंबईच्या एवढ्या तुफान गर्दीत, कुणाकडे बघायला कुणाला वेळही नसताना ती समोर अचानक भेटण्याचं प्रचंड आश्‍चर्य वाटलं होतं.
लग्नासाठी आधी नकार देऊन, सहा महिन्यांनी पुन्हा तिच्यातच "आयुष्याचं सार्थक' शोधून तिला सहधर्मचारिणी बनविली, हा "योग' म्हणावा, की "भोग' याबाबत मात्र मी अजून संभ्रमात आहे!
----