नंदाच्याई...
आम्ही लहानपणापासून त्यांना "नंदाच्याई'च म्हणत आलो.
त्यांच्या मुलीचं नाव "नंदा', म्हणून त्यांना "नंदाच्या आई' असं नाव पडलं, हे आम्हाला खूप उशीरा कळलं.
आमच्या शेजारीच राहायच्या त्या. अगदी घरासमोरच. आमच्या आवाराच्या मालकांनी दोन खोल्यांची जागा या आखाडे कुटुंबाला राहायला दिली होती. नंदाचे बाबा- म्हणजे नंदाच्याईंचे पती- हमाली करायचे. त्यांची स्वतःची हातगाडी होती. (हातगाडी म्हणजे दोन चाकांची, एका बाजूने ओढायची लांबलचक लाकडी गाडी. त्यावर माल ठेवून ओढून नेतात. हल्ली भेळेच्या गाडीलाही "हातगाडी' म्हणतात!) लहानपणी आमचं घर आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत चिकूच्या झाडाखाली त्यांची हातगाडी लावलेली असायची. त्यावर बसून खेळण्यात आमचा कितीतरी वेळ जायचा. आमचा खेळ असलेली ही वस्तू कुणाच्या तरी आयुष्याची शिदोरी आहे, आयुष्यभराचं ओझं आहे, हे(ही) खूप उशीरा कळलं!
नंदाच्याईंचं मूळ नाव रजनी आखाडे असावं बहुधा. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. नंदाच्याई अधूनमधून कुणाकुणाकडे धुणीभांडी करायच्या. आमच्याकडेही होत्या काही काळ. पण त्यांना मी ओळखतो ते आमच्या शेजारची एक प्रामाणिक, निःस्वार्थ माऊली म्हणून! आमची पर्यायी आजीच होती ती! हलक्या कानाच्या असणं, सारासार विवेक नसणं, हे काही दुर्गुण असतीलही त्यांच्यात (कदाचित, "अडाणी'पणातून आलेले) पण त्यांचा प्रेमळ आणि लाघवी स्वभाव त्यावर मात करायचा.
लहानपणी आजी-आजोबा जवळ नसताना आणि असतानाही, आम्हाला त्यांचा मोठा आधार असायचा. बामणाच्या घरातला मुलगा म्हणून माझ्या हुशारीचं (!), धिटाईचं त्यांना आधीपासूनच कौतुक होतं. त्यातून आमच्या आवारातला एकमेव सरळमार्गी, आज्ञाधारक (तेव्हा होतो!) मुलगा म्हणूनही माझ्यावर विशेष प्रेम होतं. आजी-आजोबांच्या कौतुकासोबत मी त्यांच्याही मायेला त्यामुळे पात्र ठरलो होतो. माझ्याकडून त्यांनाही बऱ्याच अपेक्षा होत्या. (त्या पूर्ण न झाल्याचे पाहण्याआधीच सुटल्या बिचाऱ्या!) चांगल्या घरातल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजीनिअर व्हायचं, एवढीच अपेक्षा पालकांनी ठेवलेली असायची. नंदाच्याईही मग त्यात कधी कधी सामील व्हायच्या.
लहानपणी मी खूप धडपड्या होतो. कायम कोणती ना कोणती जखम किंवा व्रण अंगावर दागिन्यासारखा बाळगलाच पाहिजे, हा नेम. एकदा चिडवण्यावरून धावाधावी सुरू असताना स्वयंपाकघरात उघड्या ठेवलेल्या विळीवर पडलो. लगेच उठून घराबाहेर पळत गेलो. नंदाच्या आईंच्या घरापाशी पोचलो, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, माझ्या पायातून रक्त येतंय. दीडेक इंच खोल जखम झाली होती. (अजूनही तिचा व्रण अश्वत्थाम्यासारखा पायावर बाळगतोय!) मग त्यांनीच हळद वगैरे चेपली आणि माझे पराक्रम दाखवायला घरी घेऊन आल्या.
माझ्या भावाला घरात एकटा ठेवून आईवडील बाहेर गेले असताना, वडिलांच्या बॅगेतले फंडाचे पैसे त्याने खिडकीतून बाहेर फेकले होते. बाहेरच्या मोकळ्या जागेत नोटांचा पाऊस पडला होता. नंदाच्या आईंच्या घरासमोरच ही खिडकी असल्याने त्यांच्या चटकन ते लक्षात आलं आणि त्यांनी सगळे पैसे गोळा करून संध्याकाळी परत दिले.
टीव्हीनं नुकताच लोकांच्या आयुष्यात शिरकाव करायला सुरुवात केली होती आणि रामायण-महाभारत वगैरे कार्यक्रमांची भलतीच क्रेझ होती. नंदाच्या आई त्या वेळी आमच्या घरी ठाण मांडून बसायच्या. (तेव्हा टीव्ही पाहण्यासह अनेक निमित्तांनी एकमेकांकडे जाण्याची प्रथा होती. "प्रायव्हसी' जपण्याच्या नावाखाली घरांची दारं बंद होण्याचं भूत मानगुटीवर बसायचं बाकी होतं!) आजोबा तर संध्याकाळच्या "ज्ञानदीप'पासून "आमची माती आमची माणसं'पर्यंत सर्व कार्यक्रमांचे चाहते. एखादे वेळी "क्रीडांगण'मध्ये जिन्मॅस्टिक्स प्रकारात स्विमिंग कॉस्च्यूम वगैरे घातलेल्या मुली दिसल्या, की आजोबा आणि नंदाच्या आई यांची जी चर्चा रंगायची, की ऐकणाऱ्याची हसूनहसून पुरेवाट व्हावी!
त्यांचा मोठा मुलगा शशी टेम्पो चालवायचा. दुसरा रवी आमच्यापेक्षा थोडासा मोठा. घरी संवादापेक्षा भांडणंच जास्त. शशी दारू प्यायचा. त्याचं लग्न झालं, तोपर्यंत ही मंडळी आमच्याच आवारात एका स्वतंत्र जागी राहायला गेली होती. आवाराच्या मालकांनी एका कोपऱ्यात ऑफिस व राहण्यासाठी एक इमारत बांधली. त्यात आंब्याच्या झाडाखाली यांनाही दोन खोल्यांचं घर बांधून दिलं होतं. शशीची बायको मोठी जहांबाज आणि भांडकुदळ होती. नंदाच्याईंशी तिची रोज हमरीतुमरी व्हायची. एकमेकींच्या सात पिढ्यांचा दोघी उद्धार करायच्या. सर्व थराच्या शिव्यांचा, सर्व अवयवांचा यथेच्छ उल्लेख व्हायचा. दारूनं शशीचा अकाली घोट घेतल्यानंतर त्याच्या बायकोला रानच मोकळं मिळालं. उदरनिर्वाहासाठी तिनं अन्य सोपे मार्ग शोधले. त्यावरूनही दोघी सासवा-सुना रोज एकमेकींच्या उरावर बसू लागल्या. गंमत म्हणजे कुणी बाहेरच्या माणसांनी नंदाच्या आईंशी भांडण काढलं, की या सासवा-सुना एक व्हायच्या आणि त्याला धोबीपछाड घालायच्या.
म्हातारपणी नंदाच्या आईंना दुसऱ्या मुलाचा संसार व्यवस्थित पाहण्याचं भाग्य मिळालं. त्याला चांगली नोकरी लागल्यानं त्यांचे हलाखीचे दिवसही संपले. सुनेची कटकट आधीच मिटली होती. तिनं स्वतःची दुसरी व्यवस्था पाहिली होती. मी पुण्याला आल्यानंतर नंदाच्या आईंची खबरबात फक्त फोनवरून अध्येमध्ये मिळायची. नंदाचे बाबा आधी गेले आणि त्या पाठोपाठ त्याही गेल्या.
नंदाच्या आई आणि बाबांसाठी ते घर मालकांनी बांधून दिलं होतं. मालक गेले. नंदाच्या आई आणि बाबाही गेले. सध्या त्यांचा मुलगा व त्याचे कुटुंबीय राहत असलेलं ते घर मालकाच्या मुलानं नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला सुपारी देऊन पाडलं. एक वर्तुळ पूर्ण झालं...
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Mar 6, 2010
नंदाच्याई
Mar 1, 2010
`होळी'चा हरवता चेहरा
मेट्रो'सिटी म्हणजे विविध संस्कृतींची, विविध जातिधर्मांच्या माणसांची सांगड घालणारे शहर, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु पुण्यासारख्या शहराची ओळख आता विविध संस्कृतींची बजबजपुरी व्हायला लागली आहे की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे.
होळीचंच उदाहरण घ्या! "होळी' म्हणजे फाल्गुन पौर्णिमा. शिमगा. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होळीची परंपरा वेगळी आहे. कोकणात होळी म्हणून एक काठी (बरेचदा वठलेले झाड) उभे केले जाते आणि पौर्णिमेला त्याभोवतीच बरेच सरपण जमवून ते पेटवितात. अन्य ठिकाणीही वेगवेगळी पद्धत आहे. मात्र, होळी जाळण्याचा दिवस (किंवा रात्र!) पौर्णिमेचीच असते."होळी' खेळण्याविषयी मात्र अलीकडे बदलत्या काळात वेगवेगळे रंग दिसू लागले आहेत. प्रामुख्याने "रंगपंचमी'च्या दिवशी होळी खेळण्याची पद्धत बहुतांश ठिकाणी रूढ आहे. पुण्यात मात्र उत्तर भारतीय प्रभावामुळे आणि सुटीमुळेही कदाचित, होळी पौर्णिमेच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. होळीला सुटी नसली, तरी दुसऱ्या दिवशी, धुळवडीला सुटी नक्की असते. मग त्या दिवशीही रंग खेळला जातो. रंगपंचमी तर हक्काचीच!
होळीचा रंग नेमका कोणता म्हणायचा?
होळीचंच उदाहरण घ्या! "होळी' म्हणजे फाल्गुन पौर्णिमा. शिमगा. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होळीची परंपरा वेगळी आहे. कोकणात होळी म्हणून एक काठी (बरेचदा वठलेले झाड) उभे केले जाते आणि पौर्णिमेला त्याभोवतीच बरेच सरपण जमवून ते पेटवितात. अन्य ठिकाणीही वेगवेगळी पद्धत आहे. मात्र, होळी जाळण्याचा दिवस (किंवा रात्र!) पौर्णिमेचीच असते."होळी' खेळण्याविषयी मात्र अलीकडे बदलत्या काळात वेगवेगळे रंग दिसू लागले आहेत. प्रामुख्याने "रंगपंचमी'च्या दिवशी होळी खेळण्याची पद्धत बहुतांश ठिकाणी रूढ आहे. पुण्यात मात्र उत्तर भारतीय प्रभावामुळे आणि सुटीमुळेही कदाचित, होळी पौर्णिमेच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. होळीला सुटी नसली, तरी दुसऱ्या दिवशी, धुळवडीला सुटी नक्की असते. मग त्या दिवशीही रंग खेळला जातो. रंगपंचमी तर हक्काचीच!
होळीचा रंग नेमका कोणता म्हणायचा?
Subscribe to:
Posts (Atom)