Jan 11, 2010

`फेस' सेव्हिंग!



`फेसबुक' नावाच्या प्रकाराबद्दल बरेच दिवस ऐकून होतो. त्यावर अकाउंट नसल्याबद्दल अनेकांकडून बोलणीही खाल्ली होती. "अगदीच कसा तू मागासलेला' अशी दूषणंही मित्रांकडून मिळाली होती. पण तरीही, तिकडे फिरकण्याचं घाटत नव्हतं. अखेर काल इरेला पेटलो. रात्री दीड वाजता भरपूर गप्पा मारून घरी गेल्यानंतर अस्वस्थ मनःस्थितीत होतो. दिवसा घरच्या आणि दारच्या कामांतून अवांतर गोष्टींना वेळ मिळत नाही आणि रात्री झोप येते. अखेर ठरवलं, आज काही झालं तरी फेसबुकवर जायचंच.

मागे एकदा अकाउंट ओपन केलं होतं बहुधा, पण वापर नसल्यानं पासवर्ड विसरलो होतो. म्हणून रात्री दोनला कॉंप्युटर पेटवला आणि फेसबुकात अवतीर्ण झालो! आधीच तीनेक डझन फ्रेंड्‌स रिक्वेस्ट येऊन पडल्या होत्या. अकाउंट ओपन करण्यापासून माझी तयारी होती. आठवून आठवून पासवर्ड दिला. सात-आठ प्रयत्नांनंतर तो बरोबर ठरला. मग फेसबुक म्हणजे काय, याची माहिती घेतली. तंत्रज्ञानविषयक आमचं ज्ञान अगाध असल्यानं ऑर्कुटवरही असाच दोन-तीन वर्षांनी गेलो होतो. हल्ली तर ऑर्कुटचे स्क्रॅप फक्त जी-मेलच्या अकाउंटवरच वाचतो. काही अपडेट करायलाही वेळ मिळत नाही. तर सांगत काय होतो, की फेसबुकात गेल्यानंतर लक्षात आलं, की आपले बरीच ओळखीची मंडळी आधीच इथे शिरकाव करून बसली आहेत. आपणच जगाच्या मागे पडलो होतो!
फेसबुकाच्या इतर विभागांची माहिती घेतली. आलेल्या छत्तीसेक फ्रेंड्‌स रिक्वेस्ट स्वीकारल्या. काहींना स्वतःहून पाठवल्या. त्या देखील समोर दिसलेल्या मित्रांना. आधीच ओळख असलेले मित्र शोधून काढणे आणि नवे मित्र जोडणे याला आणखी महिनाभर तरी द्यावा लागेल. मध्यंतरी बऱ्याच जणांकडून मेल्स, लिंक्‍स आल्यानंतर मी ऑनलाइन फ्री एसएमएसच्या वाटेला गेलो होतो. आता अधून मधून त्याच्या आधारे पैसे वाचवू लागलोय. त्यातलीच ही गत.काल रात्रीच एका मित्राशी दिवसभरातल्या कामाच्या नियोजनाबद्दल बोलत होतो. प्रचंड गतीने बदलत्या जगात आपलं स्थान काय, यावरची ती महान चर्चा होती. कुटुंबीयांसाठी किती वेळ द्यायचा, वाचन कधी करायचं, टीव्ही कधी बघायचा, काम किती वेळ करायचं, घरातली-बाहेरची कामं कधी करायची आणि एवढं करून इंटरनेटसाठी किती वेळ द्यायचा, यावर आम्ही परिसंवाद घेतला.
त्याच तिरिमिरीतून रात्री फेसबुकाचं अवतारकार्य घडलं.असो. आयुष्यात काहीतरी नवीन घडलं, एवढंच! आगे आगे देखेंगे, होता है क्‍या!