Jul 29, 2010

व्यसनेशु सख्यम!

आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.

अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही. काही सिनेमे तर अर्धवट बघितले, पण इंटरव्हलनंतर बघायचे राहिले, ते राहिलेच. अनेक जुने, अर्धजुने सिनेमेही मी पाहिलेले नाहीत. पूर्वी घरून परवानगी नव्हती, कुठले सिनेमे बघायची त्याची अक्कल नव्हती, रत्नागिरीत फार काही बघण्याची संधी नव्हती...बरीच कारणं. बॅकलॉग बराच राहिलाय, एवढंच खरं.

हाच बॅकलॉग भरून काढण्याचे आता प्रयत्न चाललेत. त्यामुळे आज वेळ होता म्हणून थोड्या सीडी खरेदी कराव्यात, असा विचार करून दुकानात शिरलो होतो. दहा-पंधरा मिनिटांत खरेदी उरकून निघायचं होतं, पण सीडींचा खजिना पाहून रमायलाच झालं. मोझर बेअरच्या अलिकडे आलेल्या स्वस्तातल्या सीडी हे माझं पहिलं लक्ष्य होतं. पण डीव्हीडी पाहिल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो.

नव्या, जुन्या सिनेमांच्या अनेक डीव्हीडी खुणावत होत्या. माझे अलिकडच्या काळात चुकलेले अनेक सिनेमे एकत्रित उपलब्ध होते. त्यातही सर्वांत चांगल्या पॅकेजसाठी बरीच शोधाशोध केली. कमिने, वेन्सडे, देव डी, अशा एकूण सहा चित्रपटांची डीव्हीडी अवघ्या 55 रुपयांना पाहून मी थक्क झालो. अलिकडे पायरसी बोकाळल्यापासून 50 रुपयांत पाच, सहा चित्रपट की गोष्ट काही नवी नव्हती. पण ती बनावट सीडींच्या बाबतीत होती. अधिकृत, चांगल्या दर्जाच्या आणि कंपनीच्या सीडीसुद्धा एवढ्या स्वस्तात उपलब्ध असल्याची मला कल्पनाच नव्हती.
अवघ्य 55 रुपयांत सहा सिनेमे खरेदी करताना मला रत्नागिरीचे सिनेमा पाहण्यासाठीचे संघर्षाचे दिवस आठवले. तेव्हा थिएटरला तिकीट दहा रुपयांच्या आतच होते, पण तरीही घरून सिनेमा पाहायला जायला परवानगी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. "टीव्हीवर येईल तेव्हा बघ सिनेमा!' हे उत्तर ठरलेलं असायचं. मग काहीतरी कारण सांगून, बाबापुता करून परवानगी मिळवायला लागायची. नववीत असताना आईनं "थरथराट' बघायला परवानगी दिली नाही, तेव्हा तेवढा "थयथयाट' केला होता मी! दहावीच्या अख्ख्या वर्षात मी एकच चित्रपट पाहिला होता. मोठं झाल्यावर मी यंव करीन नि त्यंव करीन अशी स्वप्नं पाहायचं वय होतं ते. मी त्यावेळी मोठं झाल्यावर आपण तिन्ही थिएटरला लागलेले सगळेच्या सगळे सिनेमे दर आठवड्याला पाहायचे, असली स्वप्नं रंगवायचो. आमच्या महत्त्वाकांक्षेची झेप तेवढीच!

अनेकदा उन्हाळ्यात सार्वजनिक पूजेच्या निमित्तानं मळ्यात, मैदानात सिनेमे प्रोजेक्‍टरवर दाखवले जायचे. शेजारपाजारचा कुणीतरी जोडीदार शोधून मी ते पाहायला जायचो. टिपिकल मिथून, अमिताभ, नाहीतर जीतेंद्रचे सिनेमे असायचे. पण तरीही कुठेतरी शेणार, चिखलात, काट्यात, गडग्यावर बसून डोळे तारवटून ते सिनेमे पाहायचो. रस्त्यात बसलेलो असताना बस आली म्हणून चंबूगबाळं आवरून मध्येच उठावं लागायचं. पडद्याच्या समोरच्या बाजूला जागा मिळाली नाही, तर मागच्या बाजूनं उजव्या हातानं फायटिंग करणारा अमिताभ पाहावा लागायचा. मध्येच कुठून तरी सापबिप निघाला, तर पळापळ व्हायची. धुरळा, मातीनं कपडे खराब व्हायचं. पण "की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने' या निर्धारानं आम्ही टिकून राहायचो.
"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.
मजा होती त्या दिवसांत!

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!
 

9 comments:

Ruhi said...

सुंदर लेख... विचार पटले.

Asha Joglekar said...

सहज साध्या गोष्टीची सुरेख आकर्षक मांडणी .

अभिजित पेंढारकर said...

thanks, ruhi, and asha ji!

Satish said...

aamhi suddha lahan pani punyat vadyamadhe rahat astana, video bhadayane aanayacho... eka ratri 3 pictures salag..... shevatacha sinema kadheech pahayacho nahi karan zop lagun jayachi.... :)

आनंद पत्रे said...

सहीये.... क्वालीटीच्या बाबतीत थोडी तडजोड दिसते तिथं.. पण ९ रुपयाला सुंदर सिनेमा बेश्टच... ;)

Raj Jain said...

:)

छान लिहले आहेस.

कधीतरी एक असे करत करत दर शनिवारी - रवीवारी जाऊन डिव्हिडी घेउन येणे ह्यामुळे घरात जवळ जवळ २०० डिव्हीडी गोळा झाल्या आहेत ! मज्जा येते पण कधी वाटले पण नव्हते की ओरिजनल डिव्हीडी आपण एवढ्या गोळा करु म्हणून.... पण होत गेले.

Anonymous said...

हॅलो अभिजित,
टुरींग टॉकीजमध्ये घरातून खुर्ची घेऊन चित्रपट पाहिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. नगरला जनता रेटमध्ये २ रुपयाात बाल्कनी (सन १९९०) तिकिटात बच्चनचे अनेक चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिलेत. धन्यवाद
महेश

अभिजित पेंढारकर said...

thanks a lot, frnds!!

- abhijit.

Ketaki Abhyankar said...

कुठले हो दुकान? नाव कळल तर मी पण धाड़ टाकून येइन म्हणते. रस्त्यावर पण ७० सांगतात किम्मत