Nov 25, 2009

ती भीषण रात्र...

रात्रीचे दहा वाजले होते. रात्रपाळीत पान 1 ची जबाबदारी पार पाडत होतो. नेहमीप्रमाणे बातम्या संपादित करून, पान लावण्यास सुरवात करायची होती. त्यापूर्वी संपादकांशी बोलून घ्यायचे होते. त्यांना फोन केला, तोपर्यंत मुंबईतील घडामोडींची माहिती कुणालाच नव्हती. मुंबईतल्या गोळीबाराचा फ्लॅश कुठल्या तरी चॅनेलवर सुरू झाला होता. सीएसटी स्थानकावर गोळीबार, एवढीच प्राथमिक माहिती कळली होती. कुठल्या तरी माथेफिरूचा असेल, असं समजून त्या विषयाची केवळ नोंद घेतली होती. संपादकांनी त्या विषयाची आठवण करून दिल्यानंतर पुन्हा आवर्जून सर्व चॅनेल आणि साइट्‌स पाहिल्या. दहा मिनिटांत दहशतवादी हल्ल्याची भीषणता लक्षात आली. आधी सीएसटी स्थानकाचे नाव होते, नंतर दहशतवादी ताज हॉटेलात घुसल्याचे स्पष्ट झाले. तातडीने आधीच्या आवृत्त्यांसाठी तशी बातमी तयार करून घ्यावी लागली.
एव्हाना घरी गेलेले अनेक सहकारीही ही बातमी टीव्हीवर पाहून पुन्हा कामावर आले होते. सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. संसदेवरच्या हल्ल्यापेक्षाही हा भीषण होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो महाराष्ट्राच्या हृदयावर, सर्वांच्या जिव्हाळ्याच्या मुंबईवर झालेला हल्ला होता. हल्ल्याचं रौद्र रूप हळुहळू प्रकट होत गेलं. नेमके किती अतिरेकी, किती पोलिस, किती जखमी, किती शहीद यांची माहिती घेत असतानाच अचानक रात्री अकराला मोठमोठे फ्लॅश झळकू लागले. अशोक कामटे शहीद...विजय साळसकर शहीद...हेमंत करकरे शहीद! मालेगावातील बॉंबस्फोट प्रकरणी ताब्यात घेतलेल्या साध्वी आणि अन्य हिंदू आरोपींच्या प्रकरणावरून करकरेंचं नाव "एटीएस'प्रमुख म्हणून चांगलंच गाजत होतं. त्यातच ते हेल्मेट वगैरे घालून कारवाईसाठी सज्ज झाल्याची दृश्‍यंही दाखविली गेली होती. त्यातच ही बातमी आली आणि काळजात चर्रर्र झालं. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचं भीषण रूप त्याआधीच स्पष्ट झालं होतं. पण करकरे, साळसकरांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचे प्राण क्षणार्धात गेल्याचं कळल्यानंतर दहशतवाद्यांबद्दल अक्षरशः तिडीक निर्माण झाली.
शहर आवृत्तीसाठी आणखी बरीच धावपळ करावी लागणार होती. सुदैवाने सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने ती शक्‍य झाली. रात्री काम संपवून दोननंतर बाहेर पडलो, तेव्हाही हल्ल्याचा विषयच चर्चेला होता. पुढचे चार दिवस तो तसाच सुरू राहिला. मुंबईनं बॉंबस्फोट, महापुरासह अनेक धक्के गेल्या काही वर्षांत पचवले होते. दहशतवादी हल्ला त्यापैकी सर्वांत भीषण होता. वार्तांकन म्हणूनही ते आव्हान होतंच. पुढचे चार दिवस टीव्ही चॅनेलच्या बातम्या पाहत असताना त्यांच्या कष्टांची आणि परिश्रमांचीही प्रकर्षाने जाणीव झाली...

Nov 24, 2009

गावागावांत...

mahabaleshwar-nov 09 424

महाबळेश्‍वर आणि रायगडाची चार दिवसांची सहल या महिन्यात केली. दोन्ही ठिकाणी मजा आली, स्वतःची गाडी घेऊन गेल्यामुळं निवांत आणि निश्‍चिंतही होतो. धावपळ, दगदग फार झाली नाही. रायगडावर मुक्कामासाठी थोडा त्रास पडला, पण आधीच्या नियोजनात बदल केला आणि ती चिंताही मिटली. त्याविषयी लिहीनच नंतर. आज लिहायचंय, ते रायगडावरून परतताना बसलेल्या सुखद धक्‍क्‍याबद्दल.
परतताना महाडजवळ महामार्गाच्या तिठ्याजवळ आम्ही थांबलो होतो. दुकानातून थोड्या गोळ्या घेतल्या आणि रस्ता विचारून घेणं, हाही उद्देश होता. सुदैवानं पत्ता योग्य सांगितला गेला. नाहीतर पत्ता सांगण्याची आपल्या लोकांची रीत म्हणजे जागतिक आश्‍चर्यात नोंद होण्यासारखी.
गाडीत पुन्हा बसत होतो, तेवढ्यात तिथेच दुकानाबाहेर लावलेल्या एका बोर्डाकडे माझं लक्ष गेलं. हो...माझा अंदाज खरा होता. तिथे चक्क महाड पोलिसांनी वाहतूकविषयक जागृतीसाठी "ट्रॅफिक ग्राफिटी'मधील माझ्या एका "ग्राफिटी'चा वापर केला होता! भले परवानगी घेतली नसेल, पण सामाजिक हितासाठी हा वापर झाल्याचं समाधान जास्त होतं.
याआधीही "सकाळ सोशल फाउंडेशन'नं रस्त्यावर, चौकाचौकांत वाहतूक जागृतीसाठी "ग्राफिटी'ची निरनिराळी वाक्‍यं फलकांवर लिहून प्रदर्शित केली होती. त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला होता. आता महाडपर्यंत आपली "ग्राफिटी' पोचलेली पाहून खरंच समाधान वाटलं.

ता. क. : फलकाच्या तळातील प्रायोजकांच्या व्यवसायाचा फलकातील विचारांशी संबंध असेलच, असे नाही!