Dec 27, 2009

"आल इज व्हेरी व्हेरी व्हेरी वेल'!

सध्या सॉल्लिड बिझी आहे. घरी लिहायला वेळ मिळत नाही आणि हापिसात आल्यावर कामांमधून लक्षात राहत नाही. त्यामुळे नियमित ब्लॉग लिहिण्याचा संकल्प बासनात गुंडाळला गेला आहे. तरीही, नव्या वर्षात हे बासन उलगडून काही नवे प्रयोग करण्याचा विचार नक्कीच आहे. तोपर्यंत, कामाचाच भाग असलेलं हे परीक्षण वाचून घ्या! दुधाची तहान ताकावर!


"जगणं' सापडेपर्यंत अनेकांचं अर्धं आयुष्य उलटून गेलेलं असतं. आयुष्याच्या दावणीला स्वतःला बांधून घेऊन घाण्यात गोल गोल फिरण्याऐवजी काही जण चौखूर उधळतात, मनमुराद जगतात आणि मग यश, आनंद स्वतःच त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात... "थ्री इडियट्‌स'मधला एक "इडियट' याच पद्धतीनं स्वच्छंदी आयुष्य जगणारा आहे. बाकीच्या दोघांना तो दिशा दाखवतो आणि त्यांचं जगणं प्रसन्न करून टाकतो.
रॅंचो (आमीर खान), फरहान (माधवन) आणि राजू (शर्मन जोशी) या इंजिनिअरिंग करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची ही कहाणी आहे. फरहान आणि राजू हे आई-वडिलांच्या दबावामुळे, कौटुंबिक जबाबदारीमुळे इंजिनिअर होण्यासाठी आलेले. दबून जगणारे, नाकासमोर चालणारे. त्यांच्या आयुष्याची दिशा चुकल्याचं रॅंचो त्यांना जाणवून देतो. तिघेही त्याच्यासोबत कॉलेजात धमाल उडवतात आणि त्यावरून बदनामही होतात. त्यांना जगण्यातलं सौंदर्य दाखवणाऱ्या रॅंचोबद्दलचं रहस्य मात्र त्यांना माहिती नसतं. ते उलगडण्यासाठी त्यांना बरीच खटपट करावी लागते...
चेतन भगत यांच्या "फाइव्ह पॉइंट समवन' या कादंबरीचा आधार घेऊन दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी "थ्री इडियट्‌स'ची पटकथा लिहिली आहे. चित्रपटाला अपेक्षित तरुण वर्ग, आमीर खानच्या पुढील चित्रपटाविषयीची उत्सुकता आणि विधू विनोद चोप्रा-हिरानी या जोडीकडून "मुन्नाभाई'नंतरची असलेली अपेक्षा, एवढ्या सगळ्या कसोट्यांवर हा चित्रपट खरा उतरून आणखी उरतो. म्हटलं तर पालकांनी आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादू नये, एवढाच साधा विषय. "तारे जमीं पर'मध्येही वेगळ्या प्रकारे तो होताच. पण दिग्दर्शन आणि पटकथालेखन करताना हिरानी यांनी तो अशा प्रकारे मांडला आहे, की चित्रपट सादर करण्याचं गणितच बदलून जावं. सध्याच्या "मल्टिप्लेक्‍स' संस्कृतीला न साजेशी, दोन तास 50 मिनिटांची लांबी असलेल्या या चित्रपटाची पटकथा हा तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल.

या तीन मित्रांचे कॉलेज आणि पाच वर्षांनंतरचा काळ, अशा दोन काळांत घडणाऱ्या घटना पटकथेत अशा बेमालूम मिसळल्या आहेत, की प्रेक्षकाला विचार करण्याचीही उसंत मिळू नये. म्हटलं तर कॉलेजमध्ये या तिघांनी घातलेला धिंगाणा, एवढाच मध्यंतरापर्यंतच्या चित्रपटाचा अर्थ असला, तरी त्या प्रत्येक प्रसंगाला काही अर्थ, संदर्भ आहेत. त्यातले काही शेवटच्या प्रसंगापर्यंत लक्षात येत नाहीत.

आमीर खानने पंचेचाळिशीच्या घरात असतानाही कुमारवयीन मुलाची व्यक्तिरेखा निव्वळ डोळ्यांतून आणि देहबोलीतून बेमालूम साकारली आहे. माधवन, शर्मन जोशी आणि नवा चेहरा ओमी (चतुर) यांचा अभिनयही अप्रतिम. करिना कपूर झकास दिसते आणि छोट्या भूमिकेतही उत्तम कामगिरी करून जाते. तिरसट आणि हेकेखोर प्राचार्य वीरू सहस्रबुद्धे ऊर्फ "व्हायरस' ही बोमन इराणीची आणखी एक लक्षवेधी भूमिका. शंतनू मोईत्रा यांनी स्वानंद किरकिरेंच्या गाण्यांना योग्य न्याय दिला असला, तरी चित्रपटातल्या सादरीकरणामुळेच ही गाणी अधिक श्रवणीय झाली आहेत.

चित्रपट सर्वच बाबतींत उत्कृष्टतेच्या पातळीवरचा असला, तरी तरुणाईला आवडतं, या गैरसमजातून की काय, रॅगिंगचे ओंगळ आणि किळसवाणे प्रसंग माथी मारले आहेत. केवळ कॉलेजात नव्हे, तर त्यानंतरही दोन-तीनदा हे प्रसंग सहन करावे लागतात. चतुरने चुकीचे शब्द वापरून हास्यस्फोटक भाषण करण्याचा प्रसंगही उत्तरार्धात खालच्या पातळीवर घसरला आहे. प्राचार्यांची मनोवृत्ती बदलायला लावणारा त्यांच्या मुलीच्या बाळंतपणाचा प्रसंगही असाच अनावश्‍यक आणि न झेपणारा आहे.

हा ओंगळवाणेपणा सोडला, तर बाकी "ऑल इज वेल' नव्हे, "ऑल इज सुपर्ब'!