करण जोहर नावाचा एक मोठ्ठा दिग्दर्शक आहे. (कोण रे तो टवाळ, त्याचे सिनेमे पाहून असं वाटत नाही, असं म्हणतोय?)
मोठ्ठा म्हणजे यश, भपका, (अरे भंपका!), चमचमाट, झगमगाट, मोठमोठ्या ताऱ्यांचा लखलखाट (चित्रपटीय भाषेत याला "भव्यदिव्य' म्हणतात) या बाबतीत मोठ्ठा. लहान वयातही महान. शाहरुख खान, फराह खान, मनीष मल्होत्रा, गेला बाजार शंकर-एहसान-लॉय यांचा जिगरी दोस्त. कुठे शाहरुखला "केबीसी'साठी तयार कर, कुठे फराह खानला हनिमूनची तिकिटं काढून दे, मनीष मल्होत्राच्या नव्या दुकानाचं (बुटीक?) इंटिरिअर सुचव, अशी मित्रांसाठी पडेल ती ("पडेल' नव्हे!) कामं करणारा. अधूनमधून सिनेमेदेखील दिग्दर्शित करणारा. त्यातून छान छान मुली, गोड गोड दृश्यं, सुंदर सुंदर स्थळं दाखवणारा. भावनासम्राट! प्रेक्षकांचे डोळे आणि हृदयं पिळून गंगा, यमुना, सरस्वतीही दुथडी भरून वाहतील एवढा अश्रूंचा पूर काढणारा.
एवढं सगळं वर्णन अशासाठी, की हा भला गृहस्थही आमीर खानचा "तारे जमीं पर' पाहून हेलावला. त्याला आता "पालक' (याचा अर्थ पिता; भाजी नव्हे) व्हावंसं वाटायला लागलंय. ""मी आत्तापर्यंत लग्न केलेलं नाही. करायचा विचारही नाही; पण "तारे...' पाहिल्यानंतर पिता म्हणून आपल्या मुलाला समजून घेण्याची गरज मला वाटू लागलीय,'' असं त्यानं जाहीर केलं.पिता बनण्याची त्याची मनीषा लवकरच पूर्ण होवो. तो चित्रपटातला असल्यामुळे "व्हर्च्युअली' पिता वगैरे बनण्याची साधनाही करू शकतो.
आम्हाला काळजी वेगळीच आहे. करणने तर स्वततिकीट काढून, थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितलाय. त्याच्या मनात काय भावना आहेत कोणास ठाऊक? पण आता, चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बुजुर्ग कलाकारांसाठीही आमीर आता "तारे जमीं पर'चा विशेष खेळ आयोजित करणार आहे, म्हणे!